तिचा स्पेशल भोंडला

Bhondala is a ritual during navratri. This is been played by all married women and girls. Its a fun.

तिचा स्पेशल भोंडला

------------------------

रीमा, काल नुकतीच आलेली घरी सुट्टीसाठी. सासू सासर्‍यांनी सांगितलेलं यंदा तरी सणासुदीला जमलं तर घरी ये. घर थोडं भरल्यासारखं राहातं. नेमकी तिलाही मिळाली सुट्टी या दरम्यान.

काल रात्री तसा बराच उशिर झालेला. आज घटस्थापना. सकाळी तशी ती लवकरच उठली. सासूने सांगितल्याप्रमाणे घरची पूजा आटोपली आणि बाहेर गॅलरीत छान वाफाळलेला चहाचा कप घेऊन उभी राहिली. खाली बायकांची घटस्थापनेची लगबग चालू होती. सगळ्याजणी छान नट्टापट्टा करून देवीची स्थापना करायला सज्ज होत्या. आज पहिला दिवस. आजचा रंग होता करडा. काही जणी तर अगदी मॅचिंग मास्क लावून आल्या होत्या. रीमा बायकांची सगळी मज्जा लांबूनच बघत होती. सासूबाईंनी हाक मारली , नैवैद्याचं जेवण करायचं होतं आज.

संध्याकाळ झाली. पुन्हा खाली सगळे खाली जमा झाले. कोरोनाचा कहर होता तरी बायकांचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. रीमा पण उतरली खाली, करड्या रंगाची साडी नेसून, अगदी नट्टापट्टा करून नाही पण सणासुदीला साजेशी तयार होऊन. तिच्या सासूनेच सांगितलेले तिला तसे. जशी रीमा खाली गेली देवीला नमस्कार करायला काही जणींनी तिचे हसून स्वागत केले तर काही जणींची आपापसात चर्चा सुरू झाली. सर्वांकडेच दुर्लक्ष करून रीमा देवीला नमस्कार करून घरात आली.

घरात आल्यावर पुन्हा एकदा रीमाचे पाय बाल्कनीकडे वळले. तिला माहिती होती त्यांच्या सोसायटीची प्रथा. शेवटी कितीही झालं तरी स्त्री मन ते! झाला चालू तिचा आवडता खेळ 'भोंडला'. कित्ती कित्ती आठवणी होत्या तिच्या या खेळाबाबात. अगदी लहानपणापासून! आणि त्यांच्या सोसायटीत जोशी आज्जींच्या मदतीने भोंडला अगदी पारंपारिक पद्धतीने खेळला जायचा. अजून तरी त्यात काही फेरबदल झाले नव्हते. जशी जोशी आज्जींनी पाटावर रांगोळी काढायला सुरूवात केली तरूण मंडळी विडिओ काढण्यात दंग झाली. कुणीतरी लगेच सोसायटीच्या गृपवर विडिओ व्हायरल केला. रीमाने पण लगेच लगबगीने विडिओ पाहिला. जोशी आज्जींनी आज पण पाटावर तसाच छान सुबक हत्ती काढलेला. रीमा तिच्या जुन्या आठवणीत रमली.

रीमा, मूळत: सातार्‍याची. आता लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेली. मोठ्ठ्या वाड्यात एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेली रीमा. एकत्र कुटूंब म्हणजे कुटुंब एवढं मोठ्ठं की वाडा सामान्य दिवशीही गजबजलेलाच असायचा. वाड्याला वडीलधार्‍यांचं छत्र जरा जास्तच लाभलेलं त्यामुळे सगळे सणसूद अगदी पारंपारिक पद्धतीने साजरे होत. गणपती, नवरात्र तर वाड्याचं खास आकर्षण होतं तेव्हा. नवरात्रात भोंडला तर वाड्याच्याच अंगणी खेळला जाई त्यामुळे खिरापतीचा कार्यक्रम नेहमी रीमाच्याच घरी होई. लहानपणापासून तिने भोंडल्याच्या रीतीभाती अगदी जवळून पाहिलेल्या त्यामुळे या खेळाशी, त्याच्या गाण्याशी तिचं वेगळंच नातं जडलेलं. तिची आज्जी पाटावर छान सुबक हत्ती काढत असे धान्याने. मग आई, काकू, माहेरवाशिणी तिच्या ताया , आत्या त्याची पूजा करत. लहान असेपर्यंत लहान मुलींच्या फेर्‍यात फेर धरून नाचतानाची आणि मग मोठं झाल्यावर मोठ्या बायकांच्या फेर्‍यात नाचतानाची मजा काही औरच होती. रीमाचे आजोबा, वडील दोघंही सैन्यात होते. त्यामुळे नकळत तिच्यावर देशप्रेमाचेही संस्कार होतेच. तिला तिच्या बाबांचा विशेष अभिमान होता. तिला नेहमी वाटायचं की मी पण अशाच एका देशप्रेमीबरोबर आयुष्य व्यतीत करणार. तिची आई तिला नेहमी समजावे, रीमा एखाद्या सैनिकाशी लग्न केल्यानंतरचं आयुश्य वाटतं तितकं सोप्पं नाही बरं! पण रीमावर तिच्या वडिलांची एक विशेष छाप होती. त्यामुळे ति्च्या मनानं पक्कं केलेलं, लग्न करणार तर सैनिकाशीच.

‍अमर, वडिलांच्या निवृत्तीसोहळ्यात रीमा आणि अमरची अोळख झालेली. दोघंही पाहताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रीमाचं सैनिकाशी लग्न करायचं स्वप्न पूर्ण झालं. लग्नानंतर ती पुण्यात स्थायिक झाली. तिच्या नशीबाने तिच्याच आज्जीसारख्या हौशी जोशी आज्जी त्यांच्या सोसायटीत राहात होत्या त्यामुळे गणपती आणि नवरात्र छान पारंपारिक पद्धतीने साजरी व्हायची. लग्नानंतरच्या दोन नवरात्रीतला भोंडला तर रीमाने चांगलाच गाजवला. तिची सणसूद साजरी करायची आवड आणि तिला असलेले परंपरा ज्ञान पाहून जोशी अाज्जी तर रीमावर भलत्याच खूश होत्या. तिच्या सासूला त्या नेहमी म्हणत, अगदी नक्षत्रासारखी सून लाभलीय हो!

अमर त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. दोन वर्षापूर्वी अमरला वीरगती प्राप्त झाली. रीमाचा सैनिकाशी लग्न करण्याचा निश्चय ऐकून अमर तिला नेहमी म्हणे,

"एवढं जर तुला देशप्रेम आणि स्वत:च्या वडिलांबद्दल आदर आहे तर तू स्वत: सैन्यात का भरती होत नाही."

यावर रीमा म्हणे,

"बघ हां अमर, मला चॅलेंज नको देऊ, मी ते ही करू शकते."

"मग कर ना कोणी अडवलंय"

अमर गेल्याची बातमी जेव्हा रीमाला कळली तत्क्षणी तिने अमरचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि तिने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी तिच्या सासू सासर्‍यांनीही तिला पूर्णपणे पाठबळ दिलं. लेकीचीच माया द्यायचे ते तिला.

यंदा रीमा सासू सासर्‍यांच्या आग्रहाखातर सणाला घरी आली होती. ते सुद्धा नशीबाने तिला साथ दिली आणि नेमकी याच दरम्यान सुट्टी मिळाली म्हणून. रोज बाल्कनीत उभी राहून ती भोंडला बघत असे आणि रोज जोशी आज्जी भोंडला सुरू व्हायच्या आधी रीमाच्या बाल्कनीकडे बघत.

आज पंचमी. सकाळपासूनच सासूबाईंची लगबग चालू होती. तेवढ्यात जोशी आज्जी आल्या रीमला भेटायला.

"रीमा, बाळ, तू आलीस पण आली नाहीस मला भेटायला?"

"नाही आज्जी, पहिल्या दिवशी मी आलेले पण तुम्ही उशीरा आला होतात."

" भोंडल्याच्या वेळी तू का येत नाही खाली?"

"नाही, मी नाही येत. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत, कशाला उगीच कुणाचा विरस करा."

"काही कुणाचा विरस होत नाही. मी आहे ना, तू आज ये खाली"

रीमा तयारच नव्हती होत कारण तिला समाजमन माहित होतं. शेवटी सासूबाई बोलल्या तेव्हा ती तयार झाली. जशी जशी संध्याकाळ जवळ येत होती रीमाच्या मनाची चलबिचल वाढत होती. आजच्या दिवसाचा रंग होता निळा! रीमाने खाली जायची पूर्वतयारी सुरू केली. तिच्या मनात संमिश्र भावनांचा खेळ चालू होता. साडी कोणती नेसू म्हणून तिने तिचं कपाट उघडलं तोच तिचा मोबाईल खणाणला. तिला ड्यूटीवर अर्जंट रूजू व्हायला सांगितले होते. हातातलं काम सोडून तिने बॅग भरायला घेतली, सासर्‍यांनी तिच्यासाठी टॅक्सी बुक केली. सासूने जोशी आज्जींना रीमाच्या ड्यूटीविषयी कळवले. ज्यावेळेस टॅक्सी आली त्यावेळी भोंडला सुरू झालाच होता आणि ऐलमा पैलमाने सोसायटीचा आवार गुंजत होता.

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा

हे गाणं रीमाच्या विशेष आवडीचं होतं. आज हे गाणं ऐकल्यावर रीमाच्या अंगावर शहारे आले.लहानपणापासून ते लग्नानंतरच्या एक दोन वर्षात या गाण्याचा अर्थ रीमासाठी वेगळा होता आणि आज त्याचा अर्थ तिच्यासाठी पूर्णपणे बदलला होता. आधी या गाण्याचा संबंध ती स्वत:बरोबर, स्वत:च्या नशीबाबरोबर लावायची पण आज मात्र या गाण्याचा अर्थ तिच्यासाठी पूर्णपणे बदल ला होता. आज ही वीरांगना सर्वार्थाने खर्‍याखुर्‍या सेवेसाठी रूजू होत होती तिच्या स्पेशल भोंडल्याच्या दिवशी !

- आरती शिरोडकर

************** समाप्त ***************

वाचकहो, कथा काल्पनिक आहे पण वाचून झाल्यावर आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा ! आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो! शेयर करताना माझ्या नावासकट शेयर करा. धन्यवाद ????????