तिचा पारिजातक..

ही एक लघुकथा.. प्राजक्त आणि एका स्त्रीच्या नात्याची..


लघुकथा

तिचा पारिजातक
©स्वप्ना…

अंगणातल्या सगळ्या झाडांना कुरवाळत शमाबाई बसल्या पारिजातकाच्या कट्ट्यावर. वाऱ्याच्या झुळकीने दोन फुलं डोक्यावरून चेहऱ्याला स्पर्श करत खाली पदरात अडकली. हसुन त्यांनी ती उचलली क्षणभर त्यांना ओंजळीत घेऊन न्याहाळत म्हणाल्या,

"काय हे रूप इवलेसे आणि हा गंध मात्र अभाळभर वाटणारा.. तिन्ही सांजेलाच उमलताना आसमंत दरवळून टाकणारा.. मनाला अगदी प्रसन्न करणारा.. आता थोड्यावेळापूर्वीच तर आतमध्ये श्रेया वाट्टेल ते बोलली म्हणून मन खट्टू करून आपण बागेत आलो पण आता मन एकदम आंनदी ह्या चिमुकल्या फुलांनी केलंय ना.. लबाडच आहे हे झाड दुरूनच ओळखतं त्याच्या खाली आपण येणार असलो तर आपली मनस्थिती ओळखून फुलं टाकतं आपल्यावर.. सासूबाईंनी हट्टाने
लावून घेतला होता हा पारिजातक म्हणाल्या होत्या,

"तुझ्या माझ्या नात्याचा.. अग दोन बायका एका संसारात म्हणजे एका म्यानेत दोन तलवारी सांभाळायचा आहेत माझ्या लेकाला.. मग त्या तलवारी जर सतत धारदार असतील तर तो तरी कसा हाताळले त्यांना? हे झाड करेल मदत त्याला..”

“ह्या वाक्यावर किती हसलो होतो आपण.. म्हणालो होतो,

"आई हे झाड कसं काय मदत करेल?"
तर म्हणाल्या,

"बघ आता ह्या श्रावणापासून गंमत त्याची..”

“कार्तिकापासून लावलेलं ते रोपटं बऱ्यापैकी बहरलं होतं श्रावणात.. त्याच्या खाली बांधलेला हा पार.. दोघींनी मिळून माती, विटा रचून काय सुंदर रंगवला होता गेरूने.. जरा काही चिडचिड झाली माझी की म्हणायच्या,

“जा गं..त्या पाराजवळ आलेल्या एकवीस दुर्वा आण बरं..”

नाही म्हणता येत नव्हतं आणि आलं पाराजवळ की हा बदमाश पारिजातक भिरभिर फुलं सोडायचा डोक सगळं शांत करायचा एकवीस दुर्वा होई पर्यंत.. घरात गेलं की मन वेगळ्याच आनंदात काहीतरी कामाला लागायचं.. कधी कधी सासुबाई स्वतःच म्हणायच्या,

"शमा आज तू नाही मलाच जावं लागतंय गं परिजातकाकडे. मन काही थाऱ्यावर नाही बघ.. बायकांच्या जीवाला हे असले दुःख आनंदाचे चढ उतार येतातच गं. अगं आपले आयुष्यातले टप्पे असे विचित्र गं बाई. मग ते शारिरीक बदल ,मानसिक बदल स्विकारता स्वीकारता जवळची नाती नको ना तुटायला म्हणून हा पारिजातक अंगणी उभा ठेवावा वाटला. बाईचे बदल बाहेरून जितके जाणवतात तितकेच आतून होत असतात. कधी मन फुलपाखरू तर कधी पाण्याच्या तळाशी जाणाऱ्या मासोळीसारखं.. कधी नुसता पतंग तर कधी भित्रा ससा.. नको नको ते विचार करून स्वतःला घाबरवून टाकणारा.. ह्या सगळ्या बदलाला स्वीकारत प्रत्येक टप्प्यात तिला नाती जगवायची असतात कारण शेवटी सगळं आयुष्य ह्या नात्याभोवती तर फिरत राहतं तिचं. मग मलाही परिजातकाची मिठी म्हणजे त्याचा प्रेमळ स्पर्श आवडला. काय होतं ना.. तिच्या ह्या बदलांना भोवतालची लोकं समजूनच घेऊ शकतील असंही नाही मग उगाच तिची घुसमट ती अगदी तिला उतारवयात सजीव पुतळा बनवते. त्यापेक्षा तिनं असं यावं ह्या परिजातकाजवळ आणि त्याच्या प्रेमळ स्पर्शानं तिला हळुवार जीव लावावा तिला खरंच दुसरं काही नको असतं तिला हवा असतो समजून घेणारा, दोन कौतुकाची फुलं ओवाळून टाकणारा पारिजातक..”

हे सगळं आठवताना मघाशी घरात घडलेले विसरून शमाबाई परिजातकासारख्या टवटवीत होऊन घरात आल्या.
समाप्त..

वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,अश्याच कथांचा संग्रह हवा असल्यास 7038332429 ह्या no वर मॅसेज करा,..धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद