तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग तीन)

तिचा परीघ,तिचं कुटुंब(मराठी स्टोरी:marathi story)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 3)

तानी आता बारावीच्या अभ्यासाला लागली. काही कारणांमुळे कातकरसरांच्या नाटकाच्या तालमी उशिरा सुरु होणार होत्या. तानीचं बारावीचं वर्ष असल्याने जठार बाईंनी तिला नाटकात सहभागी होण्याची सक्ती केली नाही. मोहिनीही आता तानीशी गोड बोलू लागली होती. तानीला कळत होतं की मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो.

-------------

अभिजीतला तानीच्या घरची परिस्थिती कळली होती. तो तिला त्याच्या मित्रांची पुस्तकं,नोट्स जमा करुन देत होता. तानीच्या अभ्यासाकडे त्याचं लक्ष होतं. कित्येकांना त्या दोघांमधे अफेअर असल्यासारखं वाटायचं. कॉलेजमधे तशा वावड्याही उठल्या होत्या.

 तानी मात्र सिन्सिअरली सगळे लेक्चर्स अटेंड करत होती. बारावीची परीक्षा चालू असतानाच एका रात्री तिच्या वडिलांच्या पोटात खूप दुखू लागलं. त्यांना सरकारी इस्पितळात दाखल केलं. दारुमुळे लिव्हरची पार वाट लागली होती.

तानीला वडिलांची माया कधी मिळालीच नव्हती. बाप घरी आला नाही तर आई त्याच्या जाचातून कायमची सुटेल असंही तिचं मन म्हणत होतं. इस्पितळात द्यायचा डबा,आजीचं न्हाणंखाणं,भावंडांचं जेवण सगळं तानी सांभाळत होती. 

दोन पेपरांमधे सुट्ट्या होत्या असल्याकारणाने तिला जरा बरं पडायचं.  दोघे भाऊ पाणी भरु लागायचे,भांडी घासू लागायचे. तानीला अभ्यास करु द्यायचे. बऱ्याचदा अभिजीतही त्यांच्यासाठी बिरयानी,चिकनहंडी,रोटी वगैरे घेऊन यायचा. दिनू व रघू अभिजीतदादावर खूष होते.

 कधी खूप वेळ बसून तो तानीच्या पेपराची तयारीही करुन घ्यायचा. तानीची आजी तिचा लेक इस्पितळात असल्याकारणाने गप्पगप्प होती. पोरांशी भांडून जेवण मिळायची पंचाईत होईल हे ती जाणून होती. 

अभिजीतला तानीत रस वाटू लागला होता. तिचा साधेपणा,प्रांजळपणा,तिच्या डोळ्यांतले प्रामाणिक भाव त्याला आवडू लागले होते. तो विचार करत होता,तानीशी लग्नगाठ बांधली तर.. पण मग एका टोकाला त्याला त्याच्या पप्पांची श्रीमंती दिसायची नि दुसऱ्या टोकाला तानीची झोपडी,तिथलं दारिद्र्य. तानी म्हणजे त्याला दारिद्रयाच्या चिखलात उमलेलं नाजूक कमळ वाटायचं.

 अभिजीत विचार करु लागला,हे कमळ मी घरी न्हेलं तर मम्मापप्पा कसे रिएक्ट होतील! मुंबईतले सुप्रसिद्ध कापड व्यावसायिक ज्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यातल्या मुलीशी झालंय त्यांच्याच कनिष्ठ पुत्राचा विवाह एका झोपडीतल्या गरीब मुलीशी जिचा बाप बेवडा आणि आई घरकामवाली आहे. अभिजीत असा सगळ्या बाजूंनी विचार करत रहायचा. केलेल्या क्रुत्याचे परिणाम काय होतील,आपण मम्मीपप्पांना समजावू शकू का वगैरे वगैरे..

----------

महिन्याभराने तानीचा बाप इस्पितळातून घरी आला. डॉक्टरांनी त्याला दारु कमी करण्याची तंबी दिली होती. तानीच्या आईने कोणाएका साधुमहाराजाकडून दोरा आणून त्याच्या गळ्यात घातला होता. पती मग तो कसाही असो,पत्नी त्याला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. वच्छीही अशीच एक स्त्री होती. आपल्या डोक्यावरचं ठळक कुंकू तिला प्राणापलिकडे प्रिय होतं,जे जपण्यासाठी जणू ती नवऱ्याला मरणाच्या दाढेतून ओढून आणत होती. तिला बिचारीला काय ठाऊक की त्याला नरकच प्यारा होता. तोच त्याच्या अधोगतीला कारणीभूत होतं. त्याने दारू खाल्ली नव्हती तर दारुने त्याला खाल्लं होतं. उसाच्या यंत्रात ऊस टाकल्यावर रस गाळून घेतल्यावर जे उसाचं चीपाड उरतं तशी त्याची अवस्था झाली होती. ती दारु त्याच्या संसाराचा घोट घेत होती. 

-----------

तानीचा शेवटचा पेपर झाला नि कातकर सरांचा नाटकाच्या तालमीबाबत निरोप आला. दर संध्याकाळी कामगार हॉलमधे तालीम असणार होती. तानीचे उच्चार स्पष्ट नव्हते,प्रमाणभाषेतले नव्हते.

 सधन आईबापाची एकुलतीएक लेक तानीला साकारायची होती. आईवडिलांची कडक शिस्त,त्यांच्या शिस्तीच्या पिंजऱ्यातून नाटकाची नायिका,सुलेखा हिला बाहेर पडायचं असतं आणि त्यासाठी तिला मदत करतो,त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून रहायला आलेला तिच्या पप्पांच्या मित्राचा मुलगा. या नाटकात कठोर आईबाप होते, त्यांची शिस्त,मुलीला सगळं काही देण्याची त्यांची धडपड,त्याबदल्यात मुलीकडून भरमसाठ मार्कांची त्यांची असलेली अपेक्षा,मुलीचं नीट परीक्षेत दोनदा अत्यल्प गुण मिळवणं,मम्मीपप्पांना समाजापुढे लेकीचं अपयश मांडायला वाटणारी भीती,लेकीचा आत्महत्येचा प्रयत्न आणि त्या पेईंगगेस्टने तिचा तो डाव हाणून पाडणं,तिला हळूहळू नैराश्यातून बाहेर काढणं आणि सुलेखाचं त्या पेईंगगेस्टमधे गुंतत जाणं..खूप छान कथा होती. नाटकाचं नावच होतं सोन्याचा पिंजरा. 

सोन्याचा पिंजरा या नाटकाची तालीम जोरदार चालली होती. कधी रात्रीचे दहा,अकराही वाजत. तानीच्या आईचा अभिजीतवर विश्वास बसला होता. अभिजीत रात्री तिला घरी आणून सोडायचा. तानी सुलेखाचं पात्र अक्षरश: जगत होती. एवढी अभ्यासावर सक्ती तिला कोणी कधी केलीच नव्हती. सुलेखाला मिळणारी पुस्तकं,नावाजलेला क्लास वगैरे सगळं असं होतं जे तानीला बालपणापासून हवंहवंसं वाटायचं पण ते तिला कधी मिळालंच नव्हतं. 

 तानीला आता नाटकांची गोडी लागली होती. हेच आपलं क्षेत्र असं तिने मनोमन ठरवून टाकलं होतं. 'सोन्याचा पिंजराचा' पहिल्या प्रयोग पहायला तानीची आई,दिनू,रघू तिघेही हजर होते.  प्रेक्षकांनी नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं. प्रयोग संपल्यावर तानीच्या आईने विंगेत जाऊन तानीला मिठीत घेतलं. तानीने आईची कातकर सरांशी व इतर सहकलाकारांशी ओळख करुन दिली. 

कातकर सर तानीच्या आईला म्हणाले,'ताई,तुमची लेक खूप मोठी होणार बघा.' 

प्रयोगाला अभिजीतची आई व बहिण आयेशा आली होती. अभिजीतने तानीशी त्या दोघींची ओळख करुन दिली होती. 

नेमकं त्यारात्री तानीच्या बापाने दारु पिऊन खूप गोंधळ घातला. तानीवर कधी नाही तो हात उचलला तेंव्हा मात्र तानीची आई भडकली. तिने कोनाड्यातली काठी घेतली नि नवऱ्याला चांगला बदडून काढला. 

तानीची आजी बाहेरुन ओरडत होती,'धावा रे कुणीतरी धावा. ही कैदाशीन मारतेय माझ्या लेकाला. धावा धावा.' बायकोने चांगलं चोपून काढल्याने तानीच्या बापाची दारु उतरली. त्याच्या पोटावर काठी टेकवत वच्छी म्हणाली,'माझ्या एकाबी पोराला हात लावलास तर माझ्याशी गाठय धेनात ठिव.' तानी गरीब गाईसारख्या वच्छीचा हा संतप्त अवतार पहिल्यांदाच पहात होती. 

तानीने मग कधी मागे वळून पाहिलं नाही. नाटकाचे दौरे महाराष्ट्रातल्या अनेक गावांत झाले. यादरम्यान अभिजीतला तानीला अधिक जवळून जाणता आलं. तानी अगदी पाण्यासारखी होती,पाणी कसं कोणत्याही रंगात मिसळून जातं तशी तानी थोरापासून लहानांपर्यंत सर्व मंडळींत मिसळून जायची. याच कालावधीत तानी व अभिजीत दोघं एकमेकांच्या जवळ येत गेले. तानीलाही अभिजीतच्या बाईकवर त्याच्या पाठीवर रेलून लांबवर फिरायला आवडायचं. अभिजीत तानीसाठी खूप तरल गाणी गायचा. तानी त्याच्या आवाजाच्या जादूत हरवून जायची. तिची गरिबी, दारुडे वडील सारं सारं विसरायची.

 रात्री स्वप्नातही अभिजीत येऊ लागला तेंव्हा मात्र तिला भीती वाटू लागली. चित्रपटांमधे मुलं मुलींना फिरवतात व मग सोडून देतात तसं तर आपलं होणार नाही ना या विचाराने मध्यरात्रीही तिला घाम फुटायचा आणि जर अभिजीत प्रेमाच्या आणाभाका देऊन सोडून गेला तर कोणत्या तोंडाने घरी जायचं. ज्या आईने एवढ्या विश्वासाने आपल्याला नाटकाच्या दौऱ्यावर पाठवलय तिचा आपण विश्वासघात तर करत नाही ना पण मग तीच स्वतःला समजवायची की अभिजीतने तिला आयलव्हयू म्हंटलंय कुठे. त्याच्यासाठी ती एक चांगली मैत्रीण आहे. बास इतकंच. 

कॉलेजचा अभ्यास करताकरता आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधेही तानी चमकली. व्यावसायिक, प्रायोगिक नाटकं करत राहिली. नाट्यकार्यशाळांमधेही ती बरंच काही शिकली. शिकत गेली,घडत गेली.  तिच्या कॉलेजच्या मुख्याध्यापकांनीही तिला यात सपोर्ट केला. हे सर्व करताना अभिजीत तिच्यासोबत होताच,इतरही अनेक सहकलाकार तिचे दोस्त बनले. तिचं साऱ्यांशी सहजतेने वागणं कुठंतरी अभिजीतला खटकू लागलं. पदवीपरीक्षा पास झाल्यावरही तानीने रंगमंचाची साथ सोडली नाही.

तानी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली होती. तिने स्वत:चा वनबीएचकेचा फ्लेट खरेदी केला होता. आईलाही तिथे येऊन रहाण्याची गळ घातली पण आई म्हणाली,'नको बाय,या दारुड्याला कुठे त्या पॉश वस्तीत न्यायचं. हे तराठ होऊन कुठंबी पडतं,अंगाखांद्यावर मासक्या झोंबतात तरी सुद नसती हेला जीवाची. आमी हितंच बरी. तू जा खूशीनं रहा.'सुट्टीला मात्र तानीची आई दिनू,रघूला तानीच्या घरी घेऊन जायची. 

----------

 शहरात रावसाहेब सरपोतदारांचं दुमजली दुकान होतं. दुकानात नुकत्याच जन्मलेल्या मुलापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंतच्या कपड्याचं एक दालन होतं. पाच ते  पंधरा वयोगटातल्या मुलामुलींच्या पोशाखांचं दालन होतं,कॉलेजच्या मुलामुलींच्या आधुनिक कपड्यांचं व एक्सेसरीजचं एक दालन होतं. वरच्या मजल्यावर सुटींगशर्टींगचं एक दालन व सहावार,नऊवार साड्यांचं एक दालन होतं.

 अभिजीत नित्यनेमाने  दुकानात जाऊ लागला होता. मोठा भाऊ, आविष्कार याच्याकडून तो दुकानातील माल कोठून खरेदी करतात,त्यावर मार्जिन कसं ठरवतात, गिर्हाईकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या क्ल्रुप्त्या योजतात या मुलभूत बाबी हळूहळू जाणून घेत होता. दुकानातील कामगारांना तो विशेष मान द्यायचा,त्यांच्याशी आपुलकीने बोलायचा.  दुकानातल्या कामगारांनाही अभिजीतचा मनमोकळा स्वभाव आवडू लागला होता. 

अभिजीतच्या घरी..बंगल्यात डिनरला घरातील सारे सदस्य एकत्र बसले होते. रावसाहेब सरपोतदार, त्यांची पत्नी,थोरला लेक व सून यांच्यासमोर अभिजीतचं कौतुक करत होते. खरंतर त्यांना भीती होती की अभिजीत पुर्णवेळ त्याच्या अभिनयाच्या छंदाला देईल पण अभिजीत पदवी प्राप्त झाल्यावर पप्पांसोबत दुकानात येऊ लागला होता.
रावसाहेबांची पत्नी देवयानी,लेकाची ही प्रगती ऐकून खूष झाली. 

ती म्हणाली,'अभिजीतच्या लग्नाचं बघायला हरकत नाही आता.'
रावसाहेब म्हणाले,'अगं,काय घाईए. अजून लहान आहेत चीरंजीव.'
हेतल म्हणाली,'पप्पा,माझ्या बघण्यात एक स्थळ आहे. माझी मावस बहीण जिग्ना.. गुजरातमधील प्रसिद्ध  व्यापारी हिरालाल  शहा यांची एकुलती एक मुलगी. ती आपल्याकडे सुट्टीमधे रहायला येणार आहे तेंव्हा तुम्ही नीट पारखून घ्या तिला. वहिनीचे हे बोल ऐकताच अभिजीतला जोराचा ठसका लागला. त्याच्या नजीक बसलेल्या त्याच्या बहिणीने आयेशाने त्याला पाणी दिलं. अभिजीत सर्वांना सॉरी म्हणत जेवणावरुन उठून गेला.

तो टेरेसमधे रेंगाळत होता. इतक्यात आयेशाने मागून येऊन त्याला भो केला. अभिजीत दचकला म्हणाला,'काय हे आयेशा,आता लहान का आहेस तू!'

आयेशा,रेलिंगवर हात ठेवत म्हणाली,'दादू मी मी तुझ्यासाठी लहानच आहे रे. तुझी आशी. दादू,हल्ली तुझं चित्त जाग्यावर नसतं बघ.'

अभिजीत म्हणाला,'का गं,असं का वाटलं तुला?'

'टिशर्ट बघ उलटा घातला आहेस. बाहेर कुणाच्या लक्षात नाही आलं पण माझं बारीक लक्ष असतं बरं तुझ्यावर.'

अभिजीत हसला. 

'दादू ऐकना. तुझ्यासोबत हल्ली एक मुलगी असते म्हणे. मी तिचा फोटो पाहिला तुझ्या मोबाईलमधला. क्युट दिसते रे. आवडली मला वहिनी.' आयेशा तिच्या दादूकडे पहात म्हणाली.

'एवढं सोप्पं नाहीए ते आशी. पप्पामम्मी हो म्हणतील असं वाटत नाही मला. माझी तानी त्यांच्या स्टेटसला शोभणार नाही. पप्पा तर लग्नालाही  बिझनेस वाढवण्याच्या उद्देशाने बघतात. ' खांदे खाली घेत अभिजीत म्हणाला.

आयेशा म्हणाली,'पप्पा काहीही झालं तरी तुझ्याविरुद्ध जाणार नाहीत. सो बी काल्म. सरळ सांगून टाक नि हो मोकळा.'

अभिजीत आयेशाच्या गालावर हात ठेवत म्हणाला,'थँक्यू आशी मला समजून घेतल्याबद्दल.'

ती दोघं मग बराच वेळ बोलत राहिली.

(क्रमश:)

🎭 Series Post

View all