Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तीचं कुटुंब(भाग 1)

Read Later
तिचा परीघ,तीचं कुटुंब(भाग 1)

तिचा परीघ,तिचं कुटुंब(मराठी कथा: marathi story)

(भाग 1)

दहावीत होती तानी. तिच्या पाठीमागे दिनू,रघू ही भावंडं. तानीचा बाप सदा दारु पिऊन असायचा. 

रेल्वेरुळाला लागून झोपडपट्टी होती त्यांची. पत्र्याची घरं नि छप्परपण पत्र्याचं. ठिकठिकाणी कवचे गेलेली फरशी. एकच खोली,तीत मधे पडदा टाकून पार्टीशन केलेलं. कोनाड्यात स्टोव्ह ठेवलेला नि वरती फडताळावर तिखटमीठाच्या बरण्या. दुसऱ्या कोनाड्यात मोरी होती तिच्यात तानी,तानीची आई अंघोळी करायच्या. बाकीची पुरुष माणसं बाहेर न्हायची. 

तानीची आई,वच्छी घरकामं करायची. तानी नि तिचे भाऊ शाळेला जायचे. तानीची म्हातारी आजीपण होती. आजी लय खवीस होती. काडीचं काम नाय करायची पण सुनेबद्दल वाईटसाईट लेकाला सांगायची. दारु ढोसून आलेला लेक बायकोला मारत सुटायच्या. कधी तिच्या बांगड्या वाढवायच्या नि मनगटात काच रुतायची,भळाभळा रक्त वहायचं. पोरं भेदरलेल्या डोळ्यांनी आईची दैना बघत रहायची. 

तिन्ही पोरं गुणाची होती. शिकत होती. तानी स्वत:चा अभ्यास करुन भावांचाही अभ्यास घ्यायची. कधीतरी सुट्टीला वच्छी तानीला मालकिणीच्या बंगल्यात घेऊन जायची. तानी मोठालं घरं बघताना हरखून जायची. ते मऊशार सोफे,घरात लावलेला झोपाळा,छताला टांगलेली स्फटिकासारखी लखलखणारी झुंबरं,पायाखालचे मऊशार जाजम पाहून तानीला वाटायचं आपलंबी असंच घर असावं. तो वरचा फिरता पंखा बघून तिला त्यांच्या पत्र्याच्या खोपटातला तडतड आवाज करणारा,बाबा आदमच्या काळातला पंखा आठवे. पलंगपोस पाहून तिला त्यांच्या फाटक्या,विटलेल्या चादरी आठवत.

बंगल्यातली मालकीणबाई लख्ख गोरी होती. तुळशीव्रुंदावनाला पाणी घालायची,तलम साड्या नेसायची. बंगल्यासमोर गाडी उभी असायची. मालकीणबाईंचे यजमान वकील होते. ते ऑफिसला जायला निघाले की मालकीणबाई गेटवर उभी राहून हात हलवायची. तेही तिला हात हलवून छानसी स्माईल द्यायचे. मालकीणबाई लाजायची.

 तानीला वाटायचं,आपल्या आईला असा नवरा मिळाला असता तर तीबी अशीच बंगल्यात राहिली होती. मग आपणपण यँसफँस करणारे झालो असतो. मालकीणबाईंच्या मोहिनीसारखे आपल्यालाही छान छान फ्रॉक घालायला मिळाले असते. दिनू,रघू स्वतःच्या सायकलींवर हिंडले असते. 

मालकीणबाईंची मोहिनी फार अक्कडबाज होती. इकडची काडी तिकडे करत नसायची. छान छान फ्रॉक घालणं,शेजारच्या मुलींसोबत पोर्चमधे खेळणं,गाडीतून शाळेत जाणंयेणं असं तीचं रहाणीमान पाहून तानीला मोहिनी म्हणजे गोष्टीतली राजकन्या वाटायची. 

तानी दहावीच्या शेवटचा पेपर देऊन आली. येतानाच बाजुच्या मॉलमधे सेल्सगर्लची व्हेकन्सी आहे कळल्यावर तिने उद्यापासनं येईन असं त्या मेनेजरला सांगून ठेवलं होतं. तानी दुसऱ्या दिवशीपासून मॉलमधे कामाला जाऊ लागली. तिथल्या इतर सहकाऱ्यांशी तिची चांगली दोस्ती झाली. 

एकदा मालकीणबाई त्याच मॉलमधे काही वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या होत्या,सोबत मोहिनी होती. तानीला पाहून मालकीणबाईंनी तिला खुशाली विचारली. सुट्टीत वेळ वाया न घालवता ती चार पैसे मिळवतेय हे पाहून मालकीणबाईंनी तिची पाठ थोपटली. 

मोहिनी मात्र आईचं हे वागणं पाहून खट्टू झाली.'काय गं ममा,कोणाशीही बोलतेस तू,'हळू आवाजात मोहिनीने आईला चुचकारलं पण ते तानीच्या कानी पडलं. मालकीणबाई आपल्या मुलीला म्हणाली,'मोहिनी, ती तानी सुट्टीचा सदुपयोग करतेय. तुझीही दहावीची सुट्टी आहे. तू काय करत्येस? नुसतं शॉपिंग. गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी. आज फक्त गरजेच्या वस्तू घेण्यासाठी आलेले मी इथे तर तू सोबत येऊन महागडा ड्रेस,मेकअप किट,ज्वेलरी,इम्पोर्टेड चॉकलेट्स, कोल्ड्रिंक वगैरे घेऊन उगा बील वाढवून ठेवलंस.'
'चील हां मम्मा. माझे पप्पा देतात नं तुला पैसे. जरा हाय स्टँडर्डने रहायला शीक गं.' मोहिनी उत्तरली.

हल्ली मोहिनी मालकीणबाईंना असंच टोचून बोलू लागली होती. तिला तिच्या इतर मैत्रिणींच्या मम्मीजच्या तुलनेत तिची स्वतःची साडी नेसणारी,हातभर बांगड्या,कपाळाला ठसठशीत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालणारी आई ओल्ड फेशन्ड वाटायची. दहावीचा निकाल लागला. मोहिनीला पंच्याऐंशी टक्के पडले होते तर तानीला पंच्याहत्तर टक्के मिळाले होते. तानी मालकीणबाईंना पेढे देण्यासाठी म्हणून बंगल्यात गेली होती. मालकीणबाईंनी तिला आशीर्वाद दिला. बक्षीस म्हणून काही पैसे दिले. एक नवीन ड्रेसचं कापड दिलं शिवाय तानीच्या आईच्या विनंतीवरुन मोहिनीचे काही जुने ड्रेसही एका पिशवीत घालून दिले. 

कॉलेज एकच असलं तरी मोहिनीच्या ग्रुपमधे बड्या लोकांची मुलं असायची. तानी मात्र एकटीच खाली मान घालून जायची यायची. मोहिनीला एकदा तिच्या ग्रुपमधल्या एकीने म्हंटलं,'ही तानी नेहमी ठराविक ड्रेसच घालते. गरीब आहे वाटतं.' मोहिनी म्हणाली,'हो गं,गरीब आहे ती. तिची आई आमच्याकडे धुणीभांडी करते. हे जे कपडे घालतेना ते माझेच जुने कपडेयत. माझ्या मम्माने तिला दिले आहेत.'
मोहिनीची मैत्रीण म्हणाली,'मग तू बोलत नाही तुझ्याशी?'
'मला नाही अशा मिडलक्लास लोकांशी संबंध ठेवायची गरज वाटत.' मोहिनी केसाची बट कानामागे घेत म्हणाली.

कॉलेजात वाड्मय मंडळाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सिनियर मुलं नाटक बसवण्यासाठी नवा चेहरा शोधत होती. अभिजीत या कामात अग्रेसर होता. एकदा ऑफ पिरिएडला वर्गात येऊन त्याने एक सुंदर गाणं गायलं. सगळा वर्ग स्तब्ध राहून त्याचं गाणं ऐकत होता.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now