Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 9)

Read Later
तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 9)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग नऊ)

'मम्मी,मी आणि वहिनी मिळून परत एकदा सगळी बेग चेक करतो,तळापासून. भाईही जरा नजर टाकेल. म्हणजे काय नजरचुकीतून एखादं वस्त्र रहायला नको. नाहीतर भाईचं माहितीय ना इनरवेअर्स विसरुन गेलेला आणि मग तिथून मम्मीला फोन नि हेतलवहिनीचं तुनतुनं-तुमचे इनर्स तुम्ही घ्यायचे.टीटीएमएम.' आयेशा म्हणाली तसा आविष्कारने डोक्यावर हात ठेवला. 

देवयानी म्हणाली,'बघा गं बायांनो,चेक करा. माझे लेक असेच आहेत भोळ्या सांबासारखे.'

'बघू बघू भोळ्या सांबाची बेग बघू,'आयेशा म्हणाली तसा अभिजीत म्हणाला,'काही नको. तू क्रुपा करुन निघ बरं आता.'

आता आविष्कारचंही कुतूहल वाढलं त्याबरोबर अभिजीतने दोघांनाही हाताला धरून बाहेर काढलं.

-----------------

अभिजीत व तानी सकाळीच गोव्याला पोहोचले. हिरवागार निसर्ग,माडापोफळीच्या बागा,पक्ष्यांची सुमधूर किलबिल.. वातावरण अगदी आल्हाददायी होतं. त्यांच्या रुमच्या टेरेसमधून अगदी समोर निळाशार समुद्र,वाळू दिसत होती. 

दोघांनीही दुपारपर्यंत आराम करायचं ठरवलं. शॉवर घेऊन दोघांनी नाश्ता केला व ताणून दिलं. दुपारी जेवणात फीश फ्राय,बांगड्यांचं हुमण,लाल भात होता. जेवण अगदी रुचकर होतं. 

चारच्या सुमारास ते  बाहेर पडले. एका गाइडला सोबत घेऊन त्यांनी तिथली शांतादुर्गा, मंगेशी,नागेशी,रामनाथी ही प्राचीन मंदिरे पाहिली. रात्री रुमवर पोहोचेतो दहा वाजले होते. सोलकढी,सागोती,भात जेवून दोघं हातात हात गुंफून किनाऱ्यावर फिरले. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या जणू नव्या जोडप्याला कुतुहलाने पहात होत्या. 

पुढचे सातही दिवस त्यांनी गोव्यातील प्रसिद्ध चर्च,दुधसागर धबधबा व प्राचीन,अतिप्राचीन मंदिरे बघणं,दोन्ही वेळ रुचकर भोजन जेवण्यात, गुलाबी मिठी पांघरुन रात्री जागवणे यात घालवली. मधुचंद्राचे गोडगुलाबी दिवस कसे कापरासारखे उडून गेले. 

निघण्याच्या आदल्यादिवशी रात्री अभिजीतने सलमान खान दिलवालेमधे देतो तसा अगदी तसाच नजर खाली करुन तानीला तो बेगच्या तळाला ठेवलेला शॉर्ट गाऊन दिला. 

तानीने अभिजीतच्या चेहऱ्याकडे पाहिलं व त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून जास्त काही न बोलता तो शॉर्ट गाऊन घालून आली. त्या तलम रेशमी गुलाबी गाऊनमधे तानी खूपच मोहक दिसत होती. तानीने आपला मुखचंद्र दोन्ही हाताच्या तळव्यांनी झाकला होता. अभिजीतने तानीचे रेशमी हात बाजूला करताच ती त्याच्या बाहुपाशात सामावली. रात्रभर दोन पाखरं चोचीत चोच घालत प्रणयराधनेत दंग झाली.
मधुचंद्राचे गोडगुलाबी दिवस कापरासारखे उडून गेले.
-----     

तानी व अभिजीतने घरच्यांसाठी भरपूर खरेदी केली होती. घरी येताच आयेशा वहिनीच्या गळ्यातच पडली. 'अय्या,वहिनी काय काय केलंस ते सांग ना.'--आयेशा

'हो गं सगळं डिट्टेलमधे सांग आयेशाला. आता हे वर्ष झालं की तिचंही जमवायचंय नं.'---हेतल

'ए काय गं हेतलवहिनी! भाई सांग हं तुझ्या बायकोला. मी हे घर सोडून कुठ्ठे जाणार नाही सांगून ठेवते. प्रत्येक भिंतीवर मी माझं नाव कोरुन ठेवलंय म्हंटलं.'--आयेशा

'बरं आपण घरजावई बघुया मगतर झालं,.'--रावसाहेब आयेशाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले. 

'हे ओ काय पप्पा,लग्न करणं कम्पलसरी कुठे असतं!'

'बघू बघू.'--पप्पा हसतहसत म्हणाले.

तानी व अभिजीत शुचिर्भूत होऊन आले. तानीने गोव्याहून आणलेली आंबापोळी,फणसपोळी,कच्च्या फणसाच्या गऱ्यांचे खोबरेल तेलात तळलेले चीप्स,शेंगदाण्याचे,शेवाचे,बुंदीचे लाडू,कोकम आगळ,आमसूलं,काजुबिया हा सगळा मेवा डायनिंग टेबलवर ठेवला. रौनकने आंबापोळीचं पाकिट फोडलं तर आविष्कार काजूबिया घेऊन बसला. 

देवयानी म्हणाली,'अगं तुम्ही सगळंच कोकण उचलून आणलत. कोकणमेवा फार आवडतो आपल्या घरातल्या सर्वांना.'

तानी म्हणाली,'मम्मी आपण सारेजण मिळून एकदा कोकण,गोवा,कारवार,केरळ अशी मोठी ट्रीप काढू. काय सांगू तिथली देवळं किती अवाढव्य आहेत. साधेपणातलं सौंदर्य पावलोपावली दिसतं तिथे.'

हेतल हळूच नाक मुरडत म्हणाली,'सरड्याची धाव कुंपणापर्यंत.'

-----

रौनकला सदूकाकांनी पास्ता बनवून दिला तो आवडला नाही. रौनकने रागाने पास्त्याची डिश भिरकावून दिली. पास्ता घरभर पसरला. 

रौनक जमिनीवर बसून पाय फाकवून,डोकं आपटून आपटून रडू लागला. सदुकाका पडलेला पास्ता उचलत होते,ते बघून रौनकने रागाने पाण्याचं ग्लास फेकून सदूकाकांवर मारलं,जे नेमकं त्यांच्या कपाळावर बसलं. डोळा जरा चुकला. तानीला रौनकचं हे आततायी वागणं सहन झालं नाही. 

दिनू व रघूने कधी मस्ती केली की ती त्यांना धपाटा द्यायची तसाच धपाटा तिने रौनकच्या पाठीवर घातला व सदूकाकांसोबत पास्ता उचलायला लावलं. सदूकाकांची माफी मागायला लावली. रौनक रडत रडत 'आय एम सॉरी सदूकाका' असं म्हणाला. नुकतीच अंघोळ करुन आलेली हेतल,तानी रौनकवर धपाटा घालतेय हे पाहून रागाने लाल झाली. 

ती तानीवर गरजली,'माझ्या लेकाला दिडदमडीच्या नोकरांची माफी मागायला लावतेस! त्याची मम्मा अजून जीवंत आहे हे विसरु नकोस. रौनक काहीही करेल,तू मधे पडायचं नाही सांगून ठेवते. तू नोकरांशी गोड वागणारच गं. शेवटी त्यांच्यातलीच न् तू. कोल्ह्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून कोल्ह्याचा वाघ बनत नाही.'

हेतलने अक्षरश: तोंडसुख घेतलं तानीवर. अभिजीत व आविष्कार दुकानात गेले होते. आयेशा कॉलेजमधे.

 देवयानीला कळेना यात बाजू कोणाची घ्यायची. मोठीची की छोटीची. तिने परिस्थितीचं गांभीर्य पहाता हेतलला शांत होण्यास विनवलं. हेतल सासूबाईंवर म्हणजे देवयानीवर उसळली. 'मला वाटलंच होतं मम्मी तुम्ही या तानीचीच बाजू घेणार. गोड गोड बोलून एकेकाला आपल्या बाजूला करुन घेतेय ही तानी.' हेतल असं बोलून पाय आपटत तिच्या बेडरुममधे निघून गेली. 

रावसाहेब कानात हेडफोन घालून गाणी ऐकता ऐकता वरच्या पट्टीत घोरत होते. देवयानी मात्र विचारात पडली,हे रे काय? मुलं लहान असताना त्यांचं दुखणंखुपणं,जरा मोठी झाली की त्यांचा अभ्यास,परीक्षा,त्यांच्यासोबतची जागरणं,त्यांची स्वतःच्या पायावर उभं रहाण्यासाठी चाललेली धडपड ज्यात आधारासाठी त्यांच्या पाठीशी उभं रहाणं आणि आता लग्नं करुन दिली तर जरा मोकळं झालं समजेन तर सुनांची भांडणं सोडवायची. बरं,कोणा एकीची बाजू घेतली तर दुसरी नाराज होणार. खरंच  मुलांची आई होणं महाकठीण.

हेतलने ममला फोन लावला व घडलेला सगळा प्रकार रडतरडत सांगितला. हेतलची मम म्हणाली,'तिची हिंमतच कशी झाली माझ्या नातवावर हात उगारायची. कोण समजते कोण ती पोर स्वत:ला. लोकांची पोरं वाटेवर पडल्येत का कोणीही यावं धपाटा मारुन जावं. ते काही नाही. आतापासून अंकुश ठेव त्या पोरीवर. नाहीतर कानामागून आली आणि तिखट झाली म्हणतात तशी गत व्हायची. मिऱ्या वाटायला कमी करणार नाही ती तूझ्या डोक्यावर. लक्षात ठेव हेतल,जीवंत आईचं दूध प्यायलंस तू. तेवढाच ताठपणा अंगात असुदे तुझ्या.'

अभिजीत दुकानातून आला तेंव्हा त्याला तानी थोडी नाराज दिसली. अभिजीतने तिला काय झालंय का,कुणी काही बोललं का?कुठे दुखतय का विचारलं पण तानी काहीच बोलली नाही. तिने अभिजीतला व स्वतःला जेवण वाढून घेतलं. 

तानी किचनमधे पानं घेऊन गेली तेंव्हा देवयानी त्याला म्हणाली,'काही नाही रे. भांड्याला भांडं लागायचंच. पुरुषांनी पडू नये बायकांच्या भानगडीत.. बायकांची भांडणं म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे. आता एक होतील बघ पण तुम्ही दोघं उद्या तानीच्या माहेरी जाऊन या.मी नारळाच्या वड्या बनवल्यात. तेवढ्या घेऊन जा जाताना.

अभिजीत रात्री झोपलेल्या तानीला एकटक बघत होता. मंद प्रकाशात तानीचा चेहरा अगदी बकुळ फुलासारखा प्रसन्न,पवित्र दिसत होता. माझ्या तानीला कोणाची नजर न लागो,तो मनात म्हणाला व त्याने तानीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now