तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 8)

Ticha parigh, tich kutumb (part 8) (marathi story)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 8)

पूजा झाल्यानंतर आज प्रथमच तानी अभिजीतच्यासोबत रुम शेअर करणार होती. दिवसभराच्या गडबडीत आलेला शीण नाहीसा करण्यासाठी ती बाथरुममधे गेली. तिच्या माहेराच्या घरातल्या टिचभर मोरीपुढे हा पांढराशुभ्र बाथरुम म्हणजे सुंदर स्वप्न होतं. खाली अभिजीतशी देवयानी देण्याघेण्यावरुन बोलत होती. तानीने  गार पाण्याचा शॉवर घेतला. गाऊन घालून ती बाहेर यायला निघणार तोच तिला तिच्या बापाचा दारुच्या नशेतला आवाज ऐकू आला.

------------
ताने ए ताने,ही मला आत येऊ देत नायत बग.. तानीचा बाप ओरडत होता. तानी जिना उतरुन  दिवाणखान्यात गेली. अभिजीतचे पप्पा दिवाणखान्यात येरझारा घालत होते. त्यांच्या हाताच्या मुठी दाबल्या जात होत्या. 

तानी खाली येताच अभिजीत व ती घराबाहेर पडले. त्यांनी दरवाजा ओढून घेतला. गेटजवळ पोहोचताच तानीच्या बापाने तानीला पाहिलं नि माझी लेक सासरी गेली म्हणत गळा काढून रडू लागला. तानी त्याला गप्प करायचा प्रयत्न करु लागताच तिच्याकडे पाचशे रुपये मागू लागला. 

अभिजीत त्याच्याजवळ जाताच दारुच्या तीव्र वासाने त्याला उमसल्यासारखं झालं पण तानीला राग येईल म्हणून तो शांत राहिला. तानीकडे बोट करुन छातीवर हात मारत तो बघ्यांना म्हणाला,'ही माझी लेक आहे आणि मोठमोठ्याने गाऊ लागला,बाबुल की दुवाये लेती.जा,जा तुझको सुखी संसार मिले.

अभिजीतने त्याला गाडीत कोंबलं व गाडी तानीच्या घराकडे वळवली. अभिजीतने व्यसनमुक्ती केंद्राला फोन लावला. 

जावईबापूंना स्वतःच्या नवऱ्यासोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी झोपडीसमोर पहाताच वच्छीचे हातपाय लटपटू लागले. आजुबाजूची मंडळी गोळा झाली. 

अभिजीत म्हणाला,'मामी,मामांचे नेहमीचे कपडे भरा एका पिशवीत. त्यांना न्यायला व्यसनमुक्ती केंद्राची माणसं येताहेत. 

वच्छीने जावयाला बसायला स्टूल दिलं. दोन शर्ट,पटेऱ्या चड्ड्या,लेंगे कापडी पिशवीत कोंबले. मामा ग्लानीतच होता. इतक्यात व्यसनमुक्ती केंद्राची माणसं गाडी घेऊन आली. त्यांनी त्याला उचलून गाडीत टाकला,त्याची पिशवी गाडीत टाकली नि बघताबघता गाडी दिसेनाशी झाली. 

अभिजीत म्हणाला,'मामी,तुम्ही मामांची काही चिंता करु नका. मी तिथे लागणाऱ्या कागदपत्रांची,फीची पुर्तता करतो.' वच्छीने दोन्ही हात जोडून अभिजीतला नमस्कार केला. अभिजीत म्हणाला,'नमस्कार करुन मला लाजवू नका. मी तानीशी लग्न केलं म्हणजे तुमच्या कुटुंबाची काळजी घेणं,देखभाल करणं हे माझं कर्तव्य आहे. दिनू व रघूची चौकशी करुन अभिजीत घराकडे यायला निघाला. 

तो दिसेनासा होताच वच्छीची सासू,'रांडन माझ्या पोराला हाकलून लावला रं,घराच्या भायरा केला गं' म्हणून गळा काढून रडू लागली. शेजाऱ्यांना सगळी परिस्थिती चांगलीच ठाऊक होती. त्यांनी वच्छीच्या जावयाचं कौतुक केलं.

--------------

अभिजीत घरी आला. दिवाणखान्यात रावसाहेब डोक्याला हात लावून बसले होते.

'सॉरी पप्पा,'--अभिजीतने रावसाहेबांची माफी मागितली. आज प्रथमच कधी नव्हे तो आनंदघन बंगल्यापुढे असा तमाशा झाला होता.'

देवयानी पुढे आली,म्हणाली,'अभी अरे आपण इज्जतदार माणसं. आपली अब्रू आपल्याला जीवापेक्षा प्यारी असते. ठाऊक आहे नं तुला. कळतय का आता तुला पप्पा तिच्या माहेरचे इथे फिरकू नयेत असं का म्हणाले ते.'

'हो मम्मी,चांगलच कळलंय मला. मी कर्जतच्या व्यसनमुक्ती केंद्रात फोन लावला. तिथले विश्वस्थ माझ्या ओळखीचे आहेत. मी तानीच्या वडिलांची त्या केंद्रात रवानगी केली. तिथली माणसं गाडी घेऊन आली नि घेऊन गेली त्यांना.  पुन्हा असं होणार नाही याची दक्षता मी घेईन पण त्यांना कोणीतरी रिक्षातून इथे आणून सोडलं असं आपला रखवालदार म्हणाला. तो जर माणूस मला भेटला तर ना..'

हेतल जिन्याच्या साईडला उभी राहून हे बोलणं ऐकत होती. तिला चांगलच ठाऊक होतं,तिच्या ममने बंटीकरवी तानीच्या बापाला दारु पाजून,रिक्षेत घालून,त्याचे कान फुंकून बंगल्यासमोर आणून सोडलं असणार.

हेतल मनात म्हणाली,'वॉव मम यू आर जिनिअस.' ती मग त्यांच्या निजखोलीकडे वळली. 

---------

रावसाहेब म्हणाले,'रात्र खूप झाली. झोपा आता. सूनबाई वाट बघत असतील. निघा.'

अभिजीत निजखोलीत आला तेंव्हा तानी भिंतीच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसली होती. ती रडून रडून हैराण झाली होती. अभिजीत तिच्याजवळ जावून बसला. 
'तानू,ए तानू'

'सॉरी अभी. मी खरंच माझ्या वडलांना या घराचा पत्ता दिला नव्हता. मला खरंच ठाऊक नाही,ते इथवर कसे आले..तेही अशा अवस्थेत.'

'तानू,मी सगळं निस्तरलंय व्यवस्थित. तुझे वडील एव्हाना कर्जतच्या व्यसनमुक्ती केंद्रात पोचलेदेखील असतील. हवं तर आईला विचार फोन करुन.'

हे ऐकताच तानी त्याच्या छातीला बिलगली. अभिजीत तिला उठवून पलंगावर घेऊन गेला. मग बराच वेळ तिला थोपटत राहिला. अभिजीतच्या आश्वासक मिठीत तानी गाढ झोपी गेली.

-------

सकाळी तानी उठली तेंव्हा अभिजीत गाढ झोपलेला होता. तिने त्याच्या अंगावर पांघरुण घातलं व न्हायला गेली. आज तिने अबोली रंगाची साडी नेसली होती. पोपटी रंगाचा ब्लाऊज साडीला शोभून दिसत होता. तानी केस वाळवण्यासाठी पंख्याखाली बसली. तिच्या ओलेत्या केसांतून येणाऱ्या सुगंधाने अभीची झोप चाळवली. त्याने डोळे किलकिले करून पाहिलं,'समोर तानीचं सचैल न्हालेलं रुप पाहून त्याची विकेटच पडली. तो तानीच्या जवळ येणार तोच तानी केसांची बोटवेणी बांधत दूर पळाली.

'ए हे काय गं तानी,ये ना जरा जवळ. कालपण काही दिलं नाहीस. रडत बसलीस मुळूमुळू.'

'हो कां. हवं ..थांब हं देते,'असं म्हणत तानी अभीच्या जवळ आली आणि अचानक मम्मी असं जोरात म्हणून तिथून बाहेर सटकली. अभिजीत गालात हसत केसांत बोटं फिरवत राहिला.

तानी रुमच्या बाहेर आली खरी पण काल रात्रीच्या प्रसंगावरुन कोण काही बोलेल का याची तिच्या मनात भीती होती. ती स्वैंपाकघराकडे वळली. देवयानीने मंद हसत तानीचं स्वागत केलं. 

देवयानीने स्वैपाकघरातील मदतनीस जनाक्का व सदूकाकाशी तानीची ओळख करुन दिली. 
देवयानी तिला म्हणाली,'सुनबाई,आपण फक्त फोडण्या मारायच्या. बाकी स्वैंपाकाची सगळी तयारी ही दोघं करतात. धुवायचे कपडे लाँड्रीबेगमधे टाकत जा. मेड येऊन घेऊन जाईल व घड्या करुन आणून देईल. बाकी इनरवेअर्स  स्वतः धुवून ग्रीलमधे वाळत टाक. आतल्या कपड्यांना उन्हं लागलेली चांगली असतात बाळा. 

तुला बागकामाची आवड असेल तर पाठीमागे आपलं छोटसं गार्डन आहे. माळीकाका तिथे भेंडी,दोडकी,गवार व माठ,मुळा लावतात,कोथिंबीर,मिरचीही आहे. तिथे चौथऱ्यावर बसलीस तरी बरं वाटेल तुला. कथा,कादंबऱ्या वाचायला आवडत असतील तर मात्र रावसाहेबांच्या अभ्यासिकेत जावं लागेल तुला. त्यांची परवानगी घेऊन हवी तेवढी पुस्तकं वाच.'

जनाक्काने तानीला चहापोहे दिले. तेवढ्यात अभिजीत न्हाऊन नाष्ट्यासाठी हजर झाला. त्याचा नाष्टा होताच देवयानी म्हणाली,'तानी एखादी भारीतली साडी नेस. देवदर्शनाला जाऊन येऊ आणि अभिजीत तुही छान तयार हो.'

अभिजीत पटकन तयार झाला पण ती भारी साडी नेसताना तानीची अगदी तारांबळ उडाली. शेवटी अभिजीत तिच्या मदतीला धावला. त्यानेच तिला पदर नीट पीनअप करुन दिला.

महालक्ष्मीची ओटी भरुन झाल्यावर तिथेच थोडावेळ तिघं  थंडाव्याला बसली. 
'देवीच्या मंदिरात किती प्रसन्न वाटतं ना!'--देवयानी म्हणाली.

तानी महालक्ष्मीचं ते साजिरं रुप डोळ्यात साठवून ठेवत होती. देवीचे तेजस्वी डोळे,तिचं मुखकमळ सारंच बघत रहाण्यासारखं. घंटेचा नाद काही वेळ गाभाऱ्यात घुमत राहिला. पुजारीकाकांनी ओटीतली हिरव्या काठापदराची गर्दजांभळी साडी देवीला नेसवली. देवी जणू नवदाम्पत्याला आशिष देतेय असा भास होत होता.

 अभिजीतने तिथल्या फुलवाल्या आज्जीकडून तानी व देवयानीसाठी मोगऱ्याचे गजरे घेतले. तानीने स्वतःच्या आणि सासूच्या केसांत गजरा माळला. वहिनींसाठी असं ती म्हणणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की हेतलचे केस मानेपर्यंतच आहेत. तिने जीभ चावली. अभिजीत व देवयानी तिची फजिती पाहून हसू लागले. 

दुपारी जेवणं झाल्यावर तानीने हनिमुनला जाण्यासाठी बेग भरायला घेतली. तानी कपड्यांच्या घड्या कपाटातून काढून देत होती आणि अभिजीत त्या व्यवस्थित बेगेत बसवत होता. दोघांचे कपडे एकावर एक रचले जात होते.    अभिजीतने तानीसाठी आणलेला सेटीनचा गाऊन त्याने गुपचूप तळाला घातला. 

तेवढ्यात आत येणाऱ्या आयेशाने ते पाहिलं व खुणेनेच विचारलं,'दादू काय आहे त्यात?'
तानी मेडीकल कीट भरण्यात मग्न होती.

अभिजीत तानीला खुणेनेच म्हणाला,'ए बाई, जा ना आता.'

आयेशाने नकारार्थी मान हवली व ओठांची हालचाल करत आधी सांग म्हणाली. अभिजीतने तिला मोबाईलमधील हनिमुन गाऊनचा फोटू दाखवला.
 आयेशाला हसू फुटलं.

अभिजीत मनात म्हणाला,'बोंबला.'

तानीने मागे वळून पाहिलं,'अय्या वन्स तुम्ही कधी आलात?'

'हे काय आताच. झाली का तयारी?' आयेशाने हसू आवरत विचारलं.

'हो होत आलंय,'तानी म्हणाली.

तेवढ्यात तिथे आविष्कार व देवयानीही आले. देवयानीने  त्यांना लाडूचा डबा दिला. 

आविष्कार म्हणाला,'मम्मी,सगळं मिळतं गं तिथे.'

'ते झालंच रे पण थंड प्रदेशात जाताय म्हणून हे पंचखाद्याचे लाडू असुदेत जवळ. थंडी बाधणार नाही आणि गरम स्वेटर वगैरे घ्या सोबत. काही राहिलं असेल तर तपासा परत,'देवयानी बोटाने चष्मा वर करत म्हणाली.

'मम्मी,मी आणि वहिनी मिळून परत एकदा सगळी बेग चेक करतो,तळापासून. भाईही जरा नजर टाकेल. म्हणजे काय नजरचुकीतून एखादं वस्त्र रहायला नको. नाहीतर भाईचं माहितीय ना इनरवेअर्स विसरुन गेलेला आणि मग तिथून मम्मीला फोन नि हेतलवहिनीचं तुनतुनं-तुमचे इनर्स तुम्ही घ्यायचे.टीटीएमएम.' आविष्कारने डोक्यावर हात ठेवला. 

देवयानी म्हणाली,'बघा गं बायांनो,चेक करा. माझे लेक असेच आहेत भोळ्या सांबासारखे.'

'बघू बघू भोळ्या सांबाची बेग बघू,'आयेशा म्हणाली तसा अभिजीत म्हणाला,'काही नको. तू क्रुपा करुन निघ बरं आता.'

आता आविष्कारचंही कुतूहल वाढलं त्याबरोबर अभिजीतने दोघांनाही हाताला धरून बाहेर काढलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all