तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 2)

तिचा परीघ,तिचं कुटुंब

तिचा परीघ,तिचं कुटुंब(भाग 2)

कॉलेजात वाड्मय मंडळाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सिनियर मुलं नाटक बसवण्यासाठी नवा चेहरा शोधत होती. अभिजीत या कामात अग्रेसर होता. एकदा ऑफ पिरिएडला वर्गात येऊन त्याने एक सुंदर गाणं गायलं. सगळा वर्ग स्तब्ध राहून त्याचं गाणं ऐकत होता.

-----------
शेवटून दुसऱ्या बाकावर बसलेल्या तानीकडे अभिजीतचं लक्ष गेलं. तानी सावळी असली तरी नाकीडोळी नीटस होती. तिचे डोळे दिलखेच होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या नाटकासाठी अशाच तोंडावळ्याची नायिका त्याला हवी होती.

 रिसेसमधे काही मुलं तानीच्या बाकाजवळ गेली व  अभिजीतने तिला बोलावलय असं सांगू लागली पण तानी म्हणाली,'कोण अभिजीत? मी नाही ओळखत कुणा अभिजीतला. तुम्ही चुकीच्या मुलीकडे आला आहात. काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय तुमचा.' तानी काही केल्या तयार होईना. 

 शेवटी जठारबाईंनी अभिजीत सरपोतदारवर नवीन चेहरे शोधून काढायचं काम सोपवलंय हे ऐकताच तिचा नाइलाज झाला. ती खाली मान घालून बेसमेंटमधे गेली. तिथे इतरही काही मुलंमुली जमली होती. प्रत्येकाला वाटत होतं, आपल्याला नाटकात एखादा छोटामोठा रोल मिळावा.

 अभिषेक व तानी या जोडीवर प्राध्यापकांनी शिक्कामोर्तब केलं. तानी दबकत म्हणाली,'मला यातलं काहीच येत नाही . मी तर नाटक कधी पाहिलंही नाही.'

 सर म्हणाले,'तानी ते तू बाईंवर सोड. तुला फक्त कॉलेज सुटल्यावर काही काळ तालमीसाठी थांबावं लागेल. उद्या घरी विचारुन ये बरं.' खरंतर मोहिनीच्या मनात नाटकात भाग घ्यायचं होतं. तिने शाळेतही गेदरिंगमधे काम केलं होतं. तिला डावलून तानीला घेतलं हे तिला मुळीच आवडलं नव्हतं.

तानी दुपारी घरी गेली. तिचे दोघे भाऊ शाळेत गेले होते. आई नुकतीच घरकामं करुन आली होती नि नळाला पाणी आलं म्हणून हंडे,कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी बाहेर पडली. ती येईस्तोवर तानीने स्टोव्ह पेटवला. वरण फोडणीला घातलं. भाकऱ्या थापल्या. मिरचीचा ठेचा तोंडीलावणीसाठी केला. एका ताटलीतून तिने आज्जीला जेवण वाढलं. 

तिची आज्जी दिवसेंदिवस खंगत चालली होती. पांघरुणातून तिचा क्रुश देह दिसतच नव्हता. आज्जी कशीबशी उठली.  काठी टेकत चूळ भरुन आली नि जेवायला बसली. 

तानीला काही वर्षांपुर्वीची आज्जी आठवली. तिच्या बाबांना पाठीशी घालणारी. त्यांना दारु पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या आईला शिव्याशाप घालणारी,मुद्दाम तानीच्या आईने करुन ठेवलेल्या डाळीत अधिकचं तिखट घालून लेक सुनेला आमटी तिखट झाली म्हणून मारतोय हे पाहून संतुष्ट होणारी आज्जी नि आता ही अंथरुणाला खिळलेली,सुनेच्या जीवावर जगणारी आज्जी. एवढी जागेला टेकली तरी म्हातारी सुनेला बोलायची एक संधी सोडत नव्हती.

तानीचा बाप तर तानीची आई बंगल्यात कामाला जाते म्हणून तिच्या चारित्र्यावरही संशय घ्यायचा. नशेच्या अवस्थेत भेलकांडत यायचा नि अत्यंत गलिच्छ अशा शिव्या घालत तिच्यावर नाहीनाही ते आरोप करायचा. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. दारुमुळे त्याला नीट जेवताही येत नसे. तिथेच झोपायचा
,कपडे न बदलता. तानीची आई,वच्छी मुकाट्याने सगळं आवरुन ठेवायची. 

बाहेरच्या पायरीवर बसून म्हातारी वच्छीला शिव्या घालत असायची,'वच्छे,तुझ्यामुळं माझा सोन्यासारा पोरगा बाद गेला. तू माझ्या लेकाला माणसातसून उठीवलास. तुझं वाट्टुळं हुईल.' अशी बरळत रहायची. वाटेने येणाऱ्याजाणाऱ्यांना,' सून जगू देईना,माझ्या पोराला मारती म्हणून सांगायची.'

--------

तानीने वच्छीने आणलेली दूड घेतली व आत मोरीच्या कठड्यावर न्हेऊन ठेवली. थोड्याच वेळात तिची दोन्ही भावंडं,दिनू व रघू शाळेतून आले. दप्तर खाटीवर टाकत रघू म्हणाला,'आई, दादाला सातवीची स्कॉलरशीप मिळाली. कोणत्याही क्लासशिवाय दिनूने स्कॉलरशीपचा अभ्यास केला होता. वच्छीने दिनूला पोटाशी घेतलं. त्याची अलाबला केली,म्हणाली,'असंच शिकून मोठं व्हा पोरांनो नि कुठतरी लांब निघून जा बाबांनो,या नरकापासून खूप लांब,खूप लांब.'

म्हातारी स्वैंपाकघरात निजायची. तिला रात्रीचं मोरीत मुतायला जायला, थुंकायला जायला बरं पडायचं. पोरं तिघं नि वच्छी खाली निजायची नि खाटीवर वच्छीचा नवरा. मध्यरात्री कधी तानीला जाग आली तर तिला खाटीवरची तिच्या बापाची,आईच्या क्रुश सांगाड्याशी चाललेली झटापट ऐकू यायची. हळू आवाजात वच्छी,'मला सोडा,सोडा मला' विनवत असायची पण तानीचा बाप एखाद्या दैत्यासारखा तिच्यावर तुटून पडायचा.

-------

सकाळी कॉलेजला जाण्याआधी तानीने आईला सरांचं बोलणं सांगितलं. कॉलेज सुटल्यावर तालमीसाठी थांबावं लागेल म्हणाली.

वच्छी म्हणाली,'बायो सगळं खरं पण तू लवकर घरी येत जा,ती तालीम की काय ती झाल्यावर लग्गेच आणि कुणी लगट कराया लागलं तर हामडून घालायचं. बाय आपली बाईची जात. आपली अब्रु आपण जपाया हवी. तू चार बुकं शिकल्येस. मी अडाणी तुला काय समजावणार! तरीबी माझा आईचा जीव गं म्हून सांगते तुला नि कायती कापडंबिपडं घ्याया लागली तर तेवडे पैकं नाय गं आपल्याकडं.'

तानी म्हणाली,'ते पैक्याचं आता तरी काय बोलले नायत पन बोललेच तर मी सांगीन की  पैकं नायत म्हणून.'

 तानीने आईला वाकून नमस्कार केला नि कॉलेजला पळाली. आजी अंथरुणातसून बरळत होती,'पोर  लग्नाला झाली. तिचे हात पिवळे करायचे तर नाय. शिकिवत्यात फुढंफुढं शिकिवत्यात. मोठी बालिस्टल होनारय शिकून. पोरगी पळून गेली म्हंजी बसंल रडत.'

सौ. जठारबाई नाटकाचं दिग्दर्शन करत होत्या. त्यांनी मुलांना संवादफेक,अभिनयकौशल्य याबद्दल धडे दिले. नाटकाचा विषयच होता बाटली. या दारुच्या बाटलीमुळे व्यसनी माणसाची नि त्याच्या बायकोपोरांची होणारी परवड,बायकोवर होणारे अत्याचार,तिच्या हालअपेष्टा दाखवायच्या होत्या. 

तानीने स्क्रीप्ट वाचताच तिला ते स्वतःच्या घरातलं जगणं वाटलं. जणू तिच्या घरातच केमेरा लावून ते स्क्रीप्ट लिहिलं होतं. तानीला जास्त शिकवावंच लागलं नाही. भूमिका करताना तिच्या अंगात जणू तिची आई शिरायची. आईच्या चेहऱ्यावरच्या वेदना,तिचे हातवारे,नवऱ्याच्या मारामुळे तिच्या शरीराची होणारी दैना,त्याचं एखाद्या गोचिडीसारखं तिला शोषून घेणं.. सगळं तानीच्या देहबोलीतून प्रगट व्हायचं.

 जठारबाई तानीच्या अभिनयकौशल्याबद्द्ल खूष होत्या. हा हिरा शोधून काढल्याबद्दल त्यांनी अभिजीतची कितीदातरी पाठ थोपटली. 

नाटकाच्या प्रयोगादिवशी कॉलेजचं सभाग्रुह विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलं होतं. प्रत्येक कलाकाराने नाटकात आपला ठसा उमटवला. तानीच्या अभिनयाने तर विद्यार्थ्यांसकट,प्राध्यापकांची ह्रदयेही पिळवटली. प्रसिद्ध दिग्दर्शक कातकर यांनी त्यांच्या आगामी नाटकासाठी अभिजीत व तानी या जोडीची निवड केली. वर्गात आता तानीला खास मान होता. कॉलेजकडून तिला सन्मानचिन्ह व रोख रुपये दोन हजाराचं बक्षीस मिळालं.

 यात तिने आपल्या लहान भावांना नवीन कपडे,आईला दोन सुती साड्या,आजीसाठी ब्लँकेट, तसंच घरात काही डबे व ताटंवाट्या घेतल्या. तानीची आई खूप खूष झाली.

 तरी एक शेजारीण बोललीच,'काय बाई लेकीला नाटकात पाठिवतीस. एकदा तोंडाला रंग फासला काय माघारी येणं कठीण'. तानीच्या आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. 

तानी आता बारावीच्या अभ्यासाला लागली. काही कारणांमुळे  कातकरसरांच्या नाटकाच्या तालमी उशिरा सुरु होणार होत्या. तानीचं बारावीचं वर्ष असल्याने जठार बाईंनी तिला नाटकात सहभागी होण्याची सक्ती केली नाही. मोहिनीही आता तानीशी गोड बोलू लागली होती. तानीला कळत होतं की मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो.

क्रमशः

🎭 Series Post

View all