Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तिचं कुटुंब (अंतिम भाग) (मराठी कथा)

Read Later
तिचा परीघ,तिचं कुटुंब (अंतिम भाग) (मराठी कथा)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (अंतिम भाग)

आविष्कार,रावसाहेब वअभिजीतने चुलीवरच्या मासळीवर ताव मारला. मग अधुनमधून असंच तानी तळलेले बांगडे,भरलेली पापलेटं,खेकड्याचा रस्सा,तिसऱ्यांचं सुकं,मुशीचं मटण,सागोतीवडे करुन घालू लागली. नॉनव्हेज असलं की रावसाहेब मनसोक्त जेवू लागले. म्हंटलय नं कुणीतरी, प्रेमाचा रस्ता पोटातून जातो ते काही खोटं नाही. रावसाहेबांचा तानीवरचा राग निवळू लागला.

तानी सगळ्यांशी जुळवून घेत होती. रावसाहेबांच्या बंगल्यात थोड्याशा कुरबुरी सोडल्या तर उल्हास नांदत होता. दुकानाचीही भरभराट होत होती,पण या सुखाला कोणाची तरी दुष्ट लागली. 

----------

अभिजीत व आविष्कार दुकानात बसले असताना त्यांचा शाळामित्र धनंजय अचानक उगवला.

'अरे अलभ्य लाभ, आज इकडे कुठे दर्शन दिलंत?'--आविष्कार

'बस काय. आम्ही सगळे पक्या,मन्या,शशी,विकी..जमतो अधनंमधनं. तुम्ही दोघंच बिझी असता.'--धनंजय

'अरे यार,नोकरीचं वेगळं पडतं. दहा ते पाच काम केलं की झालं. दुकानाचं तसं नसतं रे चोवीस तास भेज्याला ताप असतो.'--आविष्कार

'ह्याच तापातून थोडं रिलेक्स व्हायचंय, आपल्याला. आपल्या तीस मित्रांची मिळून महाबळेश्वरला पिकनिक काढायची आहे, तुम्ही दोघंही येणार आहात."

'डन. आम्ही दोघं येतो नक्की,"अभिजीत म्हणाला.

'बघ हां नवीन लग्न झालंय तुझं तेंव्हा बायकोला विचारुन वगैरे.."--धनंजय

'ए,एवढंपण काय नाय हां. मी येतो बोललो ना तुला मग येणार. थांब थंडा मागवतो,"--अभिजीत

सॉरी पण धनंजय मला नाही जमणार त्यादिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुमच्यासोबत आलो तर बायको मारेल मला."--आविष्कार

"बरं तुला माफ करतो पण नेक्स्ट टाईम पक्का ये हां"-धनंजय-

"पक्का"--आविष्कार

"अरे नको परत कधी,आता घाईत आहे.'--धनंजय.

----------

अभिजीतने रात्री तानीला तो मित्रांसोबत महाबळेश्वरला जाणार असल्याचं सांगितलं.

'छे!मला टाकून जाणार तू अभी,"तानी म्हणाली.

"अरे यार शाळेतले मित्रयत यार ते लहानपणापासूनचे. त्यांना कसं नाही म्हणू. बरं नाही म्हणलं तर बायकोवरून आयुष्यभर चिडवतील साले,"अभिजीत तानीची समजूत घालत म्हणाला.

"हूं,मला कधी न्हेणार मग तू महाबळेश्वरला,"तानीने लाडात विचारलं.

"न्हेणार तर. आपल्या लग्नाची पंचवीशी झाली की सेकण्ड हनिमुनला तिथंच जाऊ आपण,"अभिजीत तानीला चेष्टेत म्हणाला.

तानीने रागाने अभिजीतवर उशी फेकून मारली मग त्याच्या कुशीत येऊन झोपली व म्हणाली,"पण तू लवकर ये हं."

"हो राणी,"तानीच्या गालांवर हात फिरवत अभिजीत म्हणाला.

-------------------

अभिजीत सहलीसाठी घराबाहेर पडताना देवयानीने त्यांला सांभाळून जा,एकमेकांची काळजी घ्या अशा सूचना केल्या. तानीने अभिजीतला नजरेनेच बाय केलं. तो आत्ता दोन दिवस घरात नसणार म्हणून तिला अस्वस्थ वाटत होतं. देवयानी दारातून आत जायला वळणार तोच भिंतीवरची पाल चुकचुकली. देवयानीच्या अंगावर सरकन काटा आला. 

पहाटे पाच वाजता सर्व मित्र ठरवलेल्या ठिकाणी जमा झाले. साडेपाच वाजेस्तोवर बस सुटली. प्रत्येकजण उत्साहात होता. 

ए सावंत,ए बनसोड्या,ए भिड्या..एकमेकांच्या पाठीवर थापा मारल्या जात होत्या. थट्टा,विनोद होत होते. कुणीतरी गाणं गायला सुरुवात केली,तुम तो ठहेरे परदेशी साथ क्या निभाओगे सुबह पहेली गाडीसे तुम तो चले जाओगे. दुसऱ्याने त्याची लय पकडली,ना जय्यो परदेश,सय्या ना जय्यो परदेश. मधेच एकजण उठला. जय शिवाजी जय मराठी. मराठी गाणी होऊद्या..तसं एकाने सुरु केलं,हिरव्या हिरव्या रंगांची दाटी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंड्याळ्याचो घाट. अजुन काही सेकंदांनी आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाही नव्हती.

पायटे गावाजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना ही बस दोनशे फूट दरी असलेल्या ठिकाणाच्या संरक्षण कठड्यावर आदळली. तो कठडा तुटून बस तीस फुटापर्यंत खाली घसरली व झाडीत अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणीही मयत झाले नाही हीच एक काय ती दिलासादायक गोष्ट. अपघाताची वार्ता कळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमी प्रवाशांना गाडीबाहेर काढले.

अपघाताचे व्रुत्त कळताच तिथल्या पोलिसठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.जगदाळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णांना रुग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. 

'ठाण्याहून पोलादपूरमार्गे महाबळेश्वरला निघालेली बस.पायटी गावाजवळ दरीत कोसळली. बसमध्ये असलेले तीस प्रवासी हे शाळामित्र असून सहलीसाठी महाबळेश्वरला जात होते. जखमींना पोलादपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले आहेत. पोलीस निरीक्षक श्री.जगदाळे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींचे नातेवाईक घटनास्थळी भेट देत आहेत.' अशा बातम्या प्रत्येक न्यूज चेनलवर दिल्या जाऊ लगल्या. ती बातमी पहाताच तानीच्या हातातील तांदूळाचं ताट खाली पडलं,तांदूळ इतस्तत: विखुरले गेले. देवयानी जागेवरच बसून राहिली. रावसाहेबांच्या हातापायांना कंप सुटला. 

आविष्कार व हेतलने या तिघांनाही पाणी पाजलं,धीर दिला. आविष्कार घटनास्थळी जायला निघाला तशी तानीही नेसत्या वस्त्रानिशी त्याच्यासोबत निघाली. वाटेत तानीच्या डोळ्यांतलं पाणी खळत नव्हतं तर आविष्कारसमोर लहानपणापासूनचे त्याचे व अभिजीतचे रागरुसवे,दोस्ती,प्रेम येत होतं. गाडीच्या काचेला वायपर असतात ज्याने पावसाचं पाणी पुसलं जातं पण डोळ्यांना ते नसतं ना. त्याचे डोळे ओसंडून वहात होते पण तानीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती सतत देवाचा धावा करत होती.

गाडी रुग्णालयाजवळ येताच तानी वीजेच्या वेगाने धावत सुटली. तिने स्वागतिकेला 'अभिजीत सरपोतदार असं नाव सांगताच स्वागतिकेने डावीकडच्या वॉर्डकडे बोट केलं. तानी तिकडे धावत सुटली. वॉर्डमध्ये प्रत्येक खाटीवर जखमी रुग्ण पडले होते. काहींचे नातेवाईक आले होते तर काहींचे नाही. तानी भिरभिरत्या डोळ्यांनी अभिजीतला शोधू लागली. तिला कोपऱ्यातल्या खाटीवर अभिजीत दिसला. त्याच्या कपाळावरील जखमेला पट्टी बांधली होती.

आविष्कार डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. त्याने आपलं नाव  अभिजीतशी असलेलं नातं सांगितलं. डॉक्टर म्हणाले,"मि.अभिजीत सुदैवाने वाचलेत. त्यांच्या कपाळावरची जखम लवकर बरी होईल पण.."

"पण काय डॉक्टर,"तानी आत येत म्हणाली.

"आपण?"

"मी तानी..मिसेस तनुजा अभिजीत सरपोतदार."

"तनुजा,तुम्हाला मन घट्ट करावं लागेल. खचून चालणार नाही."--डॉक्टर

"नक्की काय झालंय माझ्या अभीला?"--तानी

"मि.अभिजीतच्या मणक्याला मार लागल्याने  कंबरेखालचा भाग सुन्न झाला आहे."

"काय सांगताय डॉक्टर," तानी मटकन खुर्चीत बसली. 

डॉक्टरांनी तिला पाणी दिलं. आविष्कारचीही स्थिती काही वेगळी नव्हती. 

डॉक्टर म्हणाले,"फिजिओथेरपी,मसाज करुन नक्कीच फायदा होईल."

"डॉक्टर पण तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल ना?" तानीने विचारलं.

"हो,नक्कीच पण कधी ते नाही सांगू शकत. अभिजीतचा ढासळत जाणारा आत्मविश्वास तुम्हाला वाढवायचाय, तनुजा. त्याच्या मनातली निराशा दूर करावी लागेल. सकारात्मक द्रुष्टीकोन, योग्य औषधोपचार, मसाज याने तो लवकर बरा होईल,"डॉक्टर म्हणाले.

अभिजीत शुद्धीवर आला तेंव्हा त्याच्या हातात सलाइनमधून इंजेक्शन्स देण्यासाठी सुई घुसवलेली होती. आपण इथवर कसं आलो हेच त्याला आठवत नव्हतं. त्याच्या उशाला रावसाहेब बसले होते. खाटीच्या बाजूला देवयानी,तानी होत्या. आविष्कार समोर होता. 

अभिजीत म्हणाला,"आम्ही गाडीत होतो पप्पा.नंतरचं मला काहीच आठवत नाही."

सिस्टर अभिजीतला धीर देत म्हणाली,"मि. अभिजीत तुम्ही टेंशन घेऊ नका. टेशन घेतलत तर अजून त्रास होईल तुम्हाला."

-------------

अभिजीतला या अवस्थेत बघून देवयानीचे डोळे सारखे पाणावत होते. तानीची आई तिथे आली तसे रावसाहेब देवयानीला घेऊन घरी जायला निघाले. वॉर्डच्या बाहेर तानी आईच्या कुशीत डोकं घालून बरीच रडली. 

वच्छी म्हणाली,"ताने,असं काय करतीस. तुच धीर सोडला तर कसं होणार सांग बरं. डोळं पूस माजे बाई. देवावर भरोसा ठिव. तोच तारंल बघ."

अभिजीतला जाणवलं की त्याला कंबरेच्या खाली संवेदनाच होत नाहीएत. अभिजीत अक्षरशः गुरासारखा ओरडला,"डॉक्टर, माझे पाय का हलत नाहीएत? डॉक्टर."

डॉक्टर व आविष्कारने त्याला कसंबसं गप्प केलं. डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं.

------------

आविष्कार वॉर्डमधल्या त्याच्या इतर मित्रांना जाऊन भेटत होता. कोणाचा हात मोडला होता तर कोणाचा पाय. 

दोन दिवसांनी अभिजीतला घरी आणलं. आत्ता अभिजीत  विकलांग,परावलंबी झाला होता. आत्ता कुठे लग्न झालं होतं त्याचं. ऐन उमेदीचे दिवस होते आणि अचानक हे असं घडलं. 

रावसाहेबांनी अभिजीतसाठी एक मदतनीस ठेवला,शाम नावाचा वीसेक वर्षांचा. सावळासा,बुटका शाम बोलघेवडा होता. अभिजीतला परिस्थितीवर मात करण्यासाठी शाम त्याला त्याच्या गावकऱ्यांची उदाहरणं द्यायचा. फिजिओथेरपिस्ट येऊन शामकडून व्यायाम करुन घेत होते.

आविष्कारला एकट्याला दुकान सांभाळावं लागत होतं.रावसाहेब लेकाच्या आजारपणाने आधीच दुबळे झाले होते. हेतलची मम,ड्याड  हे अभिजीत,तानीला औपचारिकरित्या भेटून गेले. निघताना हेतलची मम देवयानीला म्हणाली,'देवयानी,सांभाळा स्वतःला. काय करणार एकेकाचा पायगुण वाईट असतो. तेंव्हापासून देवयानीला तानीशी लग्न केल्यामुळे आपल्या लेकाचं हे असं झालं की काय ही शंका वाटू लागली. तानीला लेकीसारखी वागवणारी देवयानी आताशा तानीशी तुटकतुटक वागू लागली.

रौनकचा हट्टीपणा व हेतलचं दिवसेंदिवस त्याच्या आगाऊपणाला खतपाणी घालणं चालूच होतं. हेतलच्या फटकळपणामुळे कोणीही तिला किंवा रौनकलाही समजवायचा धीर करत नव्हतं.

आयेशा नि रावसाहेब मात्र तानीला समजून घेत होते. आयेशा तानीला बरं वाटावं म्हणून सतत तिला खूश ठेवण्याचा प्रयत्न करायची.

-------------

रौनकच्या शाळेतून फोन आला होता. हेतलला व आविष्कारला ताबडतोब या म्हणून सांगण्यात आलं होतं. 
रौनकने बाजूच्या मुलाला  पोटात गुद्दे मारले होते. त्या मुलाचं पोट जोरात दुखू लागल्याने त्याच्याही आईला बोलावलं होतं त्याला घेऊन जाण्यासाठी. 

हेतल व आविष्कार दोघे शाळेत पोहोचले. वॉचमनला सांगताच वॉचमनने प्रिन्सिपलला निरोप दिला. थोड्याच वेळात प्रिन्सिपलने त्यांना आत केबिनमध्ये बोलावले. केबिनमध्ये प्रिन्सिपल डिसोजा बसले होते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर राज व त्याची आई बसली होती.

 मेडिसिन दिल्याने राजला थोडं बरं वाटलं होतं. मात्र त्याची पहाडासारखी आई, हेतलला बघताच लालबुंद झाली. शिपाई रौनकला घेऊन आला. 
प्रिन्सिपलने विचारलं," Why did you bit your classmate, Raunak?"
रौनक घुश्श्यात बोलला..Sir,Raj occupies much space  so I beat him.

यावर राज काही सांगण्याआधीच राजची आई,जसविंदर म्हणाली,"ये लडका हमेशा मेरे बेटो को तकलीफ देता है सर। रोज झगडा करता है राज से।"

मग ती हेतलकडे बघत म्हणाली,"देख बोलके रखती हूँ,अगर फिरसे मेरे बेटे को इसने मारा तो.."

हेतल त्या पंजाबी जसविंदरचा तप्त अवतार बघून जागीच सटपटली. प्रिन्सिपलने रौनकला राजची माफी मागायला लावली. 

जसविंदर एक तीव्र रागीट कटाक्ष हेतल व रौनकवर टाकून तिथून निघाली,तसे प्रिन्सिपल डिसोझा म्हणाले,"Rounak's mischiefs are rising day by day. We can't afford any dispublicity of our school due to such type of naughty students. You have to come to school  every saturday for one hour. Sister Maria will teach him good manners."

हेतलला राग आला होता पण प्रिन्सिपलनशी पंगा घ्यायचा नसतो एवढं माहीत असल्याने ती गप्प राहिली. 

___________

शनिवारी रौनकला घेऊन ती शाळेत गेली तेंव्हा शाळा चालू नसल्याने परिसरात अगदी शांतता होती. पक्ष्यांचाच काय तो आवाज ऐकू येत होता. 

हेतल व रौनकला शिपायाने सिस्टर मारियाकडे न्हेले. सिस्टर मारिया येशूची प्रार्थना करत होती. तिने मागे वळून पाहिलं. पांढऱराशुभ्र झगा,गळ्यात जीझसचं लॉकेट असलेली चेन,डोक्यावरील एक केस दिसणार नाही अशाप्रकारे पिनअप केलेला पांढराशुभ्र फडका. किती शांत दिसत होता तिचा चेहरा! 

हेतलला बाहेर थांबण्यास सांगून सिस्टरने रौनकशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्याला काही बोधपर गोष्टी सांगितल्या. महिनाभरात रौनकमधे खरोखरच बदल होऊ लागला. तो सगळ्यांशी विनयतेने बोलू लागला. त्याच्या चुका त्याच्या लक्षात येऊ लागल्या. तो चुकलं तर सॉरी बोलायलाही शिकला. 

सिस्टर मारिया हेतल व आविष्कारशीही बोलायची. तिने गोड बोलून अत्यंत शांतपणे हेतलला तिचं वागणं कसं आततायीपणाचं आहे ते दाखवून दिलं व तिच्या अतिकाळजी घेण्यामुळे रौनक बिघडत जाईल हेही पटवून दिलं. 

आविष्कारलाही समजावलं की जमेल तसा वेळ हा त्याने रौनकसाठी काढला पाहिजे. त्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत कारण मुलावर संस्कार करणं ही आईवडील दोघांचीही जबाबदारी असते. आविष्कारलाही ते पटलं. हेतलचं तिच्या ममकडे सासरच्या कागाळ्या करणं बंद होत गेलं. देवयानी,तानीलाही हेतलमधला हा सकारात्मक बदल जाणवू लागला.

तानीच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. शेवटी धीर करुन तिने रावसाहेबांकडे  नाटकात काम करण्याची परवानगी मागितली आणि आश्चर्य म्हणजे रावसाहेबांनी तिच्या मागणीला होकार दिला. 

हेतलही म्हणाली,"खरंच कर तू तानी नाटकात कामं. मी व मम्मी  घरातलं आवरु."

तानीने  दिग्दर्शकांना फोन लावला. कातकर सरांनी तिला नाटकात रोल दिला. तानी रोज तालमीला जाऊ लागली. तानीचे आईवडीलही तिला धीर देत होते. या संकटकाळात तिचं सासर व तिचं माहेर..तिचं कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहिलं.

तानीचा बाबाही आता बरा होऊन परत आला होता. त्याचं व्यसन सुटलं होतं. एकदा तो बंगल्याबाहेर येऊन तानीशी बोलत असताना रावसाहेबांनी त्याला पाहिलं. रावसाहेबांनी त्याला आत बोलावलं. तानीचा बाबा मग अधूनमधून येऊन अभिजीतसोबत बसू लागला. तानीला अजुन एका नाटकात भूमिका मिळाली. तिच्या यशाचा आलेख वाढू लागला. पेपरात तिचं नाव पाहून रावसाहेबांना  तिचा अभिमान वाटू लागला. 

-----------

तानी डॉक्टरांशी बोलत होती. डॉ. म्हणाले,"पेशंटमधे सुधारणा आहे पण मनोबळ कमी पडतय. असं काहीतरी झालं पाहिजे की त्यांना आता आपल्याला उठण्याशिवाय पर्याय नाही असं वाटावं.

------------

रात्रीची वेळ होती. जेवणं झाली होती. शाम त्याच्या घरी गेला होता. पलंगावर पडून असलेल्या अभिजीतला पेसेजमधून कुजबुज ऐकू आली. त्याला तानीचा व आविष्कारचा आवाज ऐकू येत होता. तो बैचेन झाला. त्याला वाटलं भास असेल पण परत दुसऱ्या,तिसऱ्या दिवशीही तेच..तानी आणि भाई..कसं शक्य आहे! 

 अभिजीतचं विचार करुन डोकं फुटायची वेळ आली. चौथ्या दिवशी रात्री मात्र अभिजीतला पेसेजमध्ये तानी व भाई एकमेकांना बिलगलेले स्पष्ट दिसले. तानी भाईच्या बाहुपाशात होती. भाई तिच्याशी काहीतरी हलक्या आवाजात बोलत होता. अभिजीतच्या मस्तकात सणक गेली. शरीरातला सर्व जोर गोळा करुन तो त्या जोडीकडे झेपावला. त्याने साताठ पावलं टाकली व पेसेजमध्ये येत तानीच्या सणकन थोबाडीत दिली. भाईsssss तो ओरडताच घरातले सगळे धावत आले.

आता आविष्कारची पाळी होती. आविष्कार म्हणाला,"शांत हो अभिजीत. अरे तुला उठवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  आम्ही हे नाटक रचलं. अभिजीत तू आम्हाला एकत्र पाहून चालत आलास. अभी....अभी तू तुझ्या पायावर उभा आहेस कळतय का तुला!"

रावसाहेबांनी तानीची पाठ थोपटली,"अभी, तुझी बायको हाडाची कलाकार आहे रे. तुझ्यासाठी दिरासोबत अभिनय करायला तयार झाली. तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करेन म्हणत होती."

देवयानीने तानीला जवळ घेतलं व म्हणाली,"तानी,मला माफ कर बाळा. कोणाचं तरी ऐकून मी तुला अवलक्षणी मानलं. तुझ्या पायगुणावर संशय घेतला पण तूच माझ्या लेकाला परत उभं केलंस."

तानीला रडू आवरत नव्हतं. अभिजीत ओरडल्यामुळे दु:खाश्रू नि अभिजीत त्याच्या पायावर उभा राहिल्याने आनंदाश्रू यांचा संगम तानीच्या डोळ्यांतून वहात होता. 

आयेशा म्हणाली,"दादा खरंच घरातला प्रत्येकजण तुझ्या बरं होण्याकडे डोळे लावून होते. कधीही देवळात न जाणारे,पूजा न करणारे आपले पप्पाही नित्यनेमाने पूजा करु लागले आहेत. तुझ्या पायात बळ यावं म्हणून देवासमोर अक्षरश:लोळण घालतात. ही तुझी तानी तर एकभुक्त राहिली आहे,तुझ्यासाठी."

अभिजीतही या साऱ्यांच प्रेम ऐकून सदगदित झाला. 'चला रे सगळे बाहेर,'रावसाहेबांनी आवाज दिला. त्याबरोबर सगळे पांगले. आत्ता खोलीत होते फक्त तानी आणि अभिजीत, एकमेकांच्या मिठीत परस्परांचे खांदे भिजवत. 

त्याच आठवड्यात रावसाहेब सत्यनारायण घालतात. कंच हिरवी साडी,नाकात नथ,हातात हिरवा चुडा,गळ्यात तनमणी,मंगळसुत्र अशी सजवीधजलेली तानी तिच्या लाडक्या अभिजीतसोबत पुजेला बसली. तानीच्या माहेच्यांना रावसाहेबांनी स्वतः जातीने बोलावून आणलं होतं. वच्छी हा साजिरागोजिरा लेकजावयाचा जोडा पाहून अत्यंत समाधान पावली. देवयानी तर खूपच खूष  होती. आयेशा व हेतल सगळ्या पाहुण्यांची सरबराई करत होत्या. शेवटी सगळ्यांचा मिळून एक ग्रुप फोटो काढला. अशी होती तानी आणि तिचा परीघ,त्यात तिला भेटलेली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं.

प्रत्येक मुलीत अशी एक तानी दडलेली असते,हो ना!

ही कथा लिहिताना तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार.

समाप्त

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now