Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तिचे कुटुंब (भाग 6)

Read Later
तिचा परीघ,तिचे कुटुंब (भाग 6)

तिचा परीघ,तिचं कुटुंब(भाग सहा)

'थांब अभिजीत. माझं म्हणणं तू पुर्ण ऐकून घेतलं नाहीस. मी तुला तानीशी लग्न करायची संमती देईन पण माझ्या काही अटी आहेत,'---रावसाहेब

'कुठली अट पप्पा?,' अभिजीत खरंतर ही बातमी तानीला सांगायला उतावीळ झाला होता.

'अट क्र.1.  लग्न अगदी साधेपणाने मंदिराच्या सभागारात होईल. लग्नाला अगदी मोजकीच माणसांना बोलावण्यास येईल.
'अट क्रं.2. लग्न झाल्यावर निदान मुल होईस्तोवर तरी तानीला नाटकात काम करता येणार नाही.' 
अट क्र.3. तानीच्या माहेरची मंडळी आपल्या बंगल्यात येणार नाहीत.

अभिजीतला पहिली अट मान्य होते पण दुसरी अट..खरंतर तानी किती पँसिनेट होती तिच्या अभिनयकलेबद्दल आणि तिसरी अट पाळायची..म्हणजे तानीला तिच्या मायेच्या माणसांपासून दुरावायचं!

'पण पप्पा'..अभिजीत म्हणाला.

'पण नाही न् बीण नाही त्या तानीला माझ्या अटी सांग. अटी मान्य असतील तर लग्नाच्या तयारीला लागुया.

एवढं बोलून रावसाहेब त्यांच्या खोलीत गेले.

---------------

आविष्कार अभिजीतची पाठ थोपटत म्हणाला,'अभी,मानलं बॉ तुला. जे मला शक्य झालं नाही ते प्रेम वगैरे केलंस. थ्रीलिंग असतं रे हे असं प्रेमात पडणं,घरच्यांचा विरोध पत्करणं,त्यांची संमती मिळवणं वगैरे. साला,मला कधी जमलच नाही रे. माझं आपलं शाळेत नाव घालतात तसं आईवडिलांनी लग्न करुन दिलं आणि मग तीच शाळा बरी असं मनात रुजतं तशी हेतल मनात रुजत गेली.'

'म्हणजे भाई,आधी कोण होती का मनात तुझ्या?'--अभिजीत

'छोडना. का विझत आलेला निखाऱ्यावर फुंकर मारतोयस!'---आविष्कार

'बरं तुला वाटेल सांगावसं तेंव्हा सांग.'---अभिजीत

'माझं जाऊदे. तू आधी तानीकडे जा. ते अटीबिटीचं ती घेईल बघून. बायका काढतात रे मार्ग. तेवढं जास्तीचं डोकं असतं त्यांना.'----आविष्कार

हेतलने रौनकची तयारी करुन त्याला आविष्कारच्या हाती सोपवताना त्या भावाभावांचं बोलणं पुसटसं ऐकलं व म्हणाली,'कोणाला लव्ह मेरेज थ्रिलींग वाटतं आविष्कार? आणि काय बोलत होता एवढं खाजगी?'

'काही नाही गं वहिनी,ते आपलं विझत आलेल्या निखाऱ्यावर फुंकर घालू नको असा हा भाई  सांगत होता.'---अभिजीत

'काय?'--हेतल

'काही नाही गं. तो काहीतरी यड्यासारखा बरळतोय झालं. तू नको लक्ष देऊस. चल मी निघतो दुकानात कामगार माझी वाट बघत असतील आणि रौनुला शाळेत सोडायलाही उशीर होईल, नाहीतर आणि अभ्या,तुझी तानी येऊदे मग बघतो तुझी.'--आविष्कार

'अरे दादू,तू इथेच अजून. जा वहिनीला भेटून गुडन्यूज दे,'--आयेशा

'हो गं जातो पण पप्पांच्या अटी..'--अभिजीत

'त्या अटी होय. त्यांचं बघता येईल नंतर. चान्स मिळालाय तर बाशिंग बांधून घ्या न जाणो ती कोण ती जिग्ना आली नि पप्पांना ती पसंत पडली तर..'--आयेशा

'काय बोललीस आयेशा?'--हेतल

'नाही नाही ते आपलं असंच.'---आयेशा

'आयेशा,माझे कान तीक्ष्ण आहेत म्ह़टलं. जिग्नाबद्दल बोलत होतीस ना. मी आपलं एक तोलामोलाचं स्थळ सुचवलं होतं. आता तुम्हाला गरीबाघरची भाजीभाकरीच प्रिय आहे त्याला मी तरी काय करणार!'असं म्हणत नाक मुरडून हेतल तिच्या बेडरुममधे निघून गेली.

नाराज चेहऱ्याने अभिजीतने आयेशाकडे पाहिलं.

'ए दादू तुला माहितीय नं ती हेतल किती गर्विष्ठ आहे ते. तू नको मनाला लावून घेऊस.'--आयेशा.

'हेतल,असं बोलतात वहिनीबद्दल!'--देवयानी

'चुकलं मम्मी,सॉरी चल दादू आज तू मला ड्रॉप कर. 

हेतल व अभिजीत देवयानीला बाय करुन जायला निघाले.

--------------

हेतल रौनकने घातलेला पसारा आवरत असताना ललिताबाईंचा फोन आला.

'हेलो मम,गुड मॉर्निंग.'

'गेले का सगळे?'

'हो,मम्मी देवळात गेल्या. रावसाहेब लॉनमधे फिरतायत. ते हल्ली क्वचित जातात दुकानात. मी रौनकचा पसारा आवरतेय.'--हेतल

'बरं ते अभिजीतच्या लग्नाचं काय झालं? रावसाहेबांनी काय घेतला निर्णय?'--ललिताबाई

'अगं मम, मी म्हंटलेलं न तुला रावसाहेब त्या अभीच्याच बाजूने आहेत म्हणून. अगदी तसंच झालं बघ. त्यांनी अभिजीत नि तानीच्या लग्नाला संमती दिली. फक्त आपला रुबाब दाखवायला तीन अटी तेवढ्या ठेवल्या. काय तर म्हणे,लग्न साधेपणाने मंदिराच्या सभागारात करायचं, त्या तानीने मुल होईस्तोवर  नाटकात काम नाही करायचं आणि तिच्या माहेरच्यांनी आमच्या बंगल्यात यायचं नाही. नाटकं सगळी.'--हेतल

'हो कां. सभागारात लग्न करतील नाही तर काय. त्या अभिजीतने मित्रवर्गांत तोंड दाखवायला जागा ठेवलीय कुठे देवयानी व रावसाहेबांना. लोकं चर्वितचर्वण करु नये म्हणून ही सभागाराची आयडीया. तुझी सासू न बोलून शहाणी नि सासरा बेरका नाहीतर तुझे पॉप. केस नसलेल्या टाळक्यावर हात फिरवत बसतात नुसते. जरा म्हंटलं,त्या बंटीला बिजनेसमधे सामील करुन घ्या तर म्हणे,अजिबात नको. मला माझ्या बिझनेसचं दिवाळं नाही काढायचं.'--ललिताबाई

'तू कशाला काळजी करते मम्मा, मी जरा वेळ साधून आविष्कारला सांगेन, बंटीला त्याच्या हाताशी घ्यायला. बरं,त्याचा इकनॉमिक्स झाला का क्लीअर?'--हेतल

'कसला होतोय. नुसत्या पंढरीच्या वाऱ्या. हे म्हणतात त्याने बीकॉमची डिगरी मिळवली की दुसऱ्या दिवशी त्याला धंद्यात घेतो. ती मेली डिगरी का फिगरी मिळेपर्यंत माझं पोरगं म्हातारं होईल न् मग चांगली डिकरीपण  मिळायची नाही त्याला."--ललिताबाई

--------

आयेशाचं कॉलेज जवळ आलं तसं अभिजीतने कार थांबवली. आयेशा कारमधून उतरली व तिने अभिजीतला बेस्ट लक दिलं. अभिजीतने कार तानीच्या घराकडे वळवली. 

अभिजीतच्या मनात राहून राहून एकच विचार येत होता,तो म्हणजे पप्पांनी घातलेल्या अटी. तानी त्या मान्य करेल का? आणि तिने त्या का मान्य कराव्या? पप्पांच्या अटी म्हणजे तानीच्या स्वातंत्र्यावर बंधनं. का पप्पा या अटींना पुढे करुन तानीला अप्रत्यक्षरित्या लग्नास नकार देण्यास प्रव्रुत्त करत आहेत. या बुद्धिबळ खेळणाऱ्यांचं काही खरं नाही. कधी कुठची खेळी खेळतील नि समोरच्याला कधी चेकमेट कलतील ते सांगता येत नाही.'अभिजीत असा विचार करेस्तोवर तानीची बिल्डींग आली.

तानी रात्रभर तळमळत होती. आज कितीतरी दिवसांनी तिला तिचा अभी भेटणार होता. काय बरं सांगेल तो? 

बेल वाजताच तानी अक्षरशः लहान मुलासारखी दार उघडायला धावली. तिने दार उघडताच अभिजीत आत आला व त्याने दरवाजा लावून घेतला. तानीच्या चेहऱ्यावर प्रश्नांचं जाळं होतं तरी तिने मन शांत ठेवत अभिजीतला हाय केलं. 

ती त्याच्यासाठी त्याच्या आवडती फिल्टर कॉफी करण्यासाठी वळली. अभिजीत एका खुर्चीवर बसून वाक्यांची जुळवाजुळव करत होता. 

तानी कॉफीचे मग घेऊन आली. अभिजीत त्याच्या विचारातच गर्क होता.

'हूं'---तानी

अभिजीतने मान वर करुन पाहिलं. तानीने कॉफीचा मग त्याच्या पुढ्यात धरला होता. अभिजीतने मग घेतला. तानी त्याच्या अगदी समोर बसली.

'एनिथिंग सिरियस,अभी?'तानीने विचारलं.

"पप्पांनी आपल्या लग्नाला संमती दिलेय.' मगावर बोटं फिरवत अभिजीत म्हणाला.

'खरं सांगतोयस अभी तू. अभी,एवढी गोड बातमी तीही एवढा दु:खी चेहरा करुन सांगतोयस. तू पण नं. तुला नुसते सरप्राईजेस द्यायला आवडतात मला. अभी आज मी इतकी खूष आहे इतकी खूष आहे,'असं म्हणत तानीने स्वतःभोवती गोल गिरकी घेतली. 

'अभी थांब हं,देवापुढे साखर ठेवून येते. तू पण चल ना. जोडीने नमस्कार करु देवाला. देवाने ऐकलं माझं.' तानी ओसंडून वहाणाऱ्या धबधब्यासारखी बोलत होती.

'तानी..तानी पप्पांनी अटी घातल्याहेत. त्या अटी तुला मान्य असतील तरच लग्नाचा विचार करु म्हणाले,'अभिजीत म्हणाला.

'अटी?..कोणत्या?"--तानी

'लग्न अगदी साधेपणाने मंदिराच्या सभागारात होईल. लग्नाला अगदी मोजक्याच माणसांना बोलावण्यात येईल.
'अट क्रं.2. लग्न झाल्यावर निदान मुल होईस्तोवर तरी तुला नाटकात काम करता येणार नाही.' 
अट क्र.3. तुझ्या माहेरची मंडळी आपल्या बंगल्यात येऊ शकत नाहीत.'

तानी ऐकतच राहिली.

दोन क्षण असेच शांततेत गेले.

'तानी,'अभिजीतने तानीला हाक मारली.

'काय सांगू मी तरी. आता आता वाटलेलं सुख हातात येतय माझ्या तर तेही अशा जाचक अटींसह. लग्न साधेपणाने करायचं यावर माझं दुमत नाही. मलाही तो लग्नाच्या नावाखाली होणारा अवाजवी खर्च आवडत नाही. मुल होईस्तोवर नाटकात काम करायचं नाही. बरं,होईल आपणास दिडेक वर्षात मुल. तेवढ्या
 वेळात मी घरातल्या मंडळींशी एडजस्ट होईन. दुसरी अटही मान्य आहे मला तुझ्यासाठी पण तिसरी अट.माझ्या माहेरचे कोणी बंगल्यात येऊ शकणार नाहीत हे जरा अतीच वाटतंय. माझ्या आईला माझं घर बघावसं नाही वाटणार का? माझे भाऊ भाऊबीजेला,रक्षाबंधला माझ्याकडे नाही येऊ शकत?' तानीने विचारलं.

अभिजीत म्हणाला,'माझं तर डोकंच चालेनासं झालंय. आधी मला पंधरा दिवस तुला भेटू दिलं नाही मग या अटी. बरं त्यांना याचा जाब विचारायला गेलो नि त्यांनी परत आपल्या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय बदलला तर.'

तानी आत गेली. तिने देवापुढ्यात साखर ठेवली,मनोभावे नमस्कार केला. मग प्रसन्न वदनाने अभिजीतला म्हणाली,'अभी,चल माझ्या आईकडे जाऊ. ती नक्की योग्य सल्ला देईल आपल्याला. माझ्या आजवरच्या आयुष्यात जेंव्हाजेंव्हा मी अशी द्विधा मनस्थितीत सापडते ना तेंव्हातेंव्हा मी माझ्या आईचा सल्ला घेते आणि मला मार्ग सापडतो.'

अभिजीत व तानी दोघं वच्छीकडे गेली. 

वच्छी कामावर गेली होती. दिनू व रघूची दुपारची शाळा होती. दिनू आईला बोलवायला पळाला. थोड्याच वेळात वच्छी लगबगीने घरात आली.

'बाय माजे. पावन्यास्नी चायपानी तरी दिलं का ताने?'

'आई,आम्ही कॉफी घेऊन आलोय.'

'दिन्या लेका पानी तरी द्यायचंस ना.'

'आई,मी परका नाही तुम्हांला. परक्यासारखी वागणूक देऊ नका प्लीज,'अभिजीतने माठातलं पाणी घेत म्हंटलं.

'होय ओ अभिजीतराव,मी पडली अडाणी मानूस ..ते जावंदे. एवढ्या घाईत कशापाई आलास. समदं ठिकाय नव्हं.'

तानीने आईला सगळा विषय समजावून सांगितला. वच्छीने थोडा वेळ विचार केला मग म्हणाली,' त्या वरच्याची इच्छा दुसरं काय. सरळधोपट सगळं मिळत गेलं काय जगण्याचा आनंद जातो बगा. आमी नाय येणार बंगल्यात तानीला भेटायला. तानी नि अभिजीतराव तुम्ही दोघं येत जा ओ आम्हांला भेटायला. चला आता जास्ती इचार करु नगसा. लागा लग्नाच्या तयारीला.' 

वच्छीने शेवयाची खीर बनवली. देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांची तोंडं गोड केली. 

'ताने,अभिजीतरावांबरुबर जा नि तुज्यासाठी दोनचार पाटल्या,गळ्यातला हार बनवायला टाक सोनाराकडं.'

'नको गं आई. चार पैसे आज गाठीला हायत ते माज्या भावांच्या शिक्षणासाठी राखून ठेवायचा इचार हाय माजा.'

'मोप कमवलैस रुपये. तुज्या भावांसाठी ठिवायला मी नाय कशापायी म्हनीन पन अर्धै ठेव.अर्धे तुज्या  हौसीमौजीसाठी खर्च कर. आगं राणी,लगीन आयुक्शातनं येकदाच करत्यात. नटूनथटून घेयाचं. कायबी इच्छा मागं ठिवू नुको.'

'बरं आई तू म्हणशील तसं करु,'तानी म्हणाली.

'अभिजीतराव बस्ता बांदायला तुमच्याच दुकानात येऊ आमी. कदी जायचं त्ये ठरवाय लागा.'

अभिजीत म्हणाला,'दागिने घ्यायला दोनहीं कुटुंब सोबत जाऊ. मी बोलतो पप्पांशी.'

वच्छी म्हणाली,'मंग तर सोन्याहून पिवळं हुईल बगा.'

तानी व अभिजीत दोघंही वच्छीच्या पाया पडले. वच्छीचे डोळे आनंदाश्रुंनी तुडुंब भरले.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now