Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 7)

Read Later
तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 7)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग सात)

'मोप कमवलैस रुपये. तुज्या भावांसाठी ठिवायला मी नाय कशापायी म्हनीन पन अर्धै ठेव.अर्धे तुज्या  हौसीमौजीसाठी खर्च कर. आगं राणी,लगीन आयुक्शातनं येकदाच करत्यात. नटूनथटून घेयाचं. कायबी इच्छा मागं ठिवू नुको.'

'बरं आई तू म्हणशील तसं करु,'तानी म्हणाली.

'अभिजीतराव बस्ता बांदायला तुमच्याच दुकानात येऊ आमी. कदी जायचं त्ये ठरवायला लागा.'

---------------

राबसाहेब,देवयानी त्यांच्या नेहमीच्या सोनाराकडे येऊन बसले होते. सोनाराने त्यांना चांदीच्या ग्लासातून पाणी दिलं. चहा झाला. तेवढयात काचेचा दरवाजा ढकलला गेला आणि अभिजीत, तानी व सासूबाई सोबत आत आले. दिनू व रघूलाही आणलं होतं. 

तानीची नि रावसाहेबांची ही पहिलीच भेट. सहा फूट उंच,रुपेरी केस,अंगापिंडाने भारदस्त असे सफारी घातलेले रावसाहेब तानी बघतच राहिली. वच्छीने तिला हाताने हलवताच ती रावसाहेब व देवयानीच्या वाकून पाया पडली. रावसाहेबांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले,'चिरायु भव' वच्छीच्या डोळ्यांत आनंदाचं चांदणं नाचू लागलं. तिनेही त्या दोघांसमोर हात जोडले.

 अभिजीत व वच्छीने मिळून एक दोन पेडाचं सात काळे मणी,चार सोन्याचे मणी या डिझाइनचं वाटीमंगळसूत्र निवडलं. नंतर दोघांसाठी अंगठ्या घेतल्या. तेवढ्यात वच्छीने एक डाळींबी खड्यांचा तनमणी,मोत्यांचे तोडे,साखळ्या या साऱ्या वस्तू स्वतःच्या पसंतीने लेकीसाठी घेतल्या. गळ्याबरोबर घालायला तानीने एक नाजूकसा हार घेतला,त्यावर साजेसे झुमके घेतले. आपापली बीलं देऊन झाल्यावर ते बस्ता बांधायला वळले.

रावसाहेब व देवयानी घरी जायला निघाले. वच्छीने त्यांना पुन्हा एकदा विनयपुर्वक नमस्कार केला. रावसाहेब म्हणाले,'भटजींना विचारुन लग्नाचा मुहुर्त,ठिकाण कळवतो. तुम्ही फक्त सांगितलेल्या वेळी हॉलवर या. अगदी मोजकी माणसं बरोबर आणा. बैठक वगैरे घेतली असती पण तानीचे वडील शुद्धीत..असो. वच्छीने पुन्हा नमस्कार करुन मान हलवली.

दिनू व रघू पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गाडीत बसायला मिळाल्याने खूश झाले होते. तानी अभिजीतच्या बाजूच्या सीटवर बसली होती व दिनू,रघूच्या बाजूला वच्छी अंग चोरुन बसली होती. लेकीचं वैभव बघून तिचं मन समाधानाने भरलं होतं. त्याचवेळी आपला दादला ठीक असता तर आपणही आज देवयानीसारखं ताठ मानेने हिंडलो असतो मग पैशाने गरीब का असेना होता अशा उलटसुलट विचारांची पानं तिच्या मनात फडफडत होती.

 दिनू,रघूने वच्छीच्या साइडचा दरवाजा उघडला तेंव्हा वच्छी भानावर आली. तिने अंगभर घेतलेला पदर अजुनच सावरून घेतला व गाडीतून उतरली. एका मोठ्या राजवाड्यासारखं दुकान होतं ते. दुकानाचं नाव 'देवयानी' ठळक अक्षरांत दिसत होतं. अभिजीत गाडी पार्क करुन आला. 

अभिजीतदादूच्या लग्नाचा बस्ता म्हंटल्यावर सगळे कामगार खूष झाले. आविष्कारने तानी व वच्छीशी ओळख करुन घेतली. नवरीसाठी शालू,हळदीची साडी,इतर काही साड्या घेतल्या. दिनू व रघूला आविष्कार छोट्यांच्या दालतान घेऊन गेला. दोघांनाही मोती रंगाचे शेरवानी,फेटे घेतले शिवाय दोघांनाही एकस्ट्रा दोन दोन टिशर्ट जीन्स घेतल्या. दिनू,रघू एकदम खूष झाले. 

वच्छीने गादीवर बसून सासूसाठी दोन सुती साड्या निवडल्या. तानीच्या मामामामीसाठी,काकूकाकूसाठी कपडे घेतले. ही तिच्या नात्याची माणसं..तिचा नवरा दारुच्या आहारी गेल्यापासून यांनी वच्छीच्या घराकडे पाठ फिरवली होती तरीही लेकीचं लग्न म्हणजे त्यांचा मानपान करणं हे वच्छीला तिचं कर्तव्य वाटलं.

 नंतर वच्छीने आविष्कारच्या मदतीने देवयानीसाठी,हेतलसाठी  व आयेशासाठी उंची साड्या काढल्या. रावसाहेबांसाठी सफारीचं कापड निवडलं. अभिजीतच्या आवडीनुसार अभिजीतला कापडं घेतली. अभिजीतने  शेरवानी,सुट शिवायला टाकला. अभिजीतने सासऱ्या़साठी दोन सदरेलेंगे घेतले,दोन शर्टपँटची कापडं घेतली. सासूसाठी काठापदराची लुगडी घेतली. चार सुती लुगडी घेतली. आविष्कार, तानी व वच्छीकडून पैसे घ्यायला राजी होत नव्हता पण वच्छीने त्याला त्यांच्या खरेदीचे पैसे घ्यायला लावले.

तिथून सगळी गँग आईसक्रीमपार्लरमधे गेली. तानीला आजचं आईसक्रीम खूप स्पेशल वाटत होतं. दिनू व रघू तर यादी घेऊन वाचत बसले होते. त्यांनी अगदी भरपेट आइस्क्रीम खाल्लं. ताईचं लग्न म्हणजे तिच्या छोट्या भावांसाठी आनंदाचा सोहळा होता.

रावसाहेबांनी शहराच्या वर्दळीपासून दूर असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचं सभागार लग्नासाठी बुक केलं. लग्नाच्या आदल्यादिवशी आयेशाची तर नुसती लगबग चाललेली. तिच्या खास मैत्रिणीही आल्या होत्या. तानीला आयेशाने स्वतः तिच्या घरी जाऊन तिच्या दोन्ही हातांवर वरातीची मेहंदी काढून दिली. पायांवरही सुरेख मेहंदी काढली व तिची जरा चेष्टामस्करी करुन घरी आल्यावर तिने देवयानीच्या व स्वतःच्या हातावर मैत्रिणींकरवी मेहंदी घालून घेतली. हेतलने स्वतःसाठी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली होती. 

सनईच्या सुरांनी सभागारातलं प्रसन्न वातावरण अधिकच आल्हाददायक झालं होतं. देवक,हळद,होम,सप्तपदी सगळे विधी यथासांग पार पडले. मुहुर्तावर लग्न लागलं नि तानी सरपोतदारांची सूनबाई झाली. 

वधुवरांनी उखाणे घेत परस्परांना घास भरवला. तानीला निरोप देताना वच्छीला अगदी गहिवर आला होता. तानीच्या वडिलांनीही सकाळपासून दारुच्या थेंबाला हात लावला नव्हता. तानीने आई,आज्जी,बाबा सगळ्यांचा निरोप घेतला. रघू तर तिला सोडायलाच कबूल नव्हता. तानी अभिजीतसोबत गाडीत बसली. इकडे सगळी मंडळी शोकाकूल झाली होती. 

फुलापानांनी सजवलेल्या प्रवेशद्वारातून तानीने ग्रूहप्रवेश केला. रावसाहेबांचे आलेले सगळे नातेवाईक हॉलमधूनच आपापल्या घरी गेले होते.

 तानी प्रथमच तिचं सासरचं घर पहात होती. आयेशा तिच्या हाताला धरुन तिला प्रत्येकाची खोली दाखवत होती. वरती दोन मोठाल्या बेडरुम्स होत्या. एक हेतल,आविष्कारची व दुसरी अभिजीतची. 

आयेशाने तानीला अभिजीतच्या बेडवर बसवलं व म्हणाली,'आजपासून तू माझी वहिनी झालीस. माझ्या दादूची बायको. या घरातल्या एकेकाचा स्वभाव कळेलच तुला हळूहळू. माझ्या दादूला खूप खूप प्रेम दे ग वहिनी. खूप चांगला आहे दादू माझा.'देवयानीने साद घातलाच आले मम्मी म्हणत आयेशा खाली गेली.

---------

आविष्कार रौनकला गोष्ट सांगत होता. गोष्ट पुर्ण व्हायच्या आधीच रौनक झोपी गेला

'लवकर झोपला ना रौनक,

'हो,दमला काकाच्या लग्नात इथंतिथं बागडून.'

'तरी बरं देवळाच्या सभागारात केलं लग्न.'

'हो नं. तो तामझाम करण्यापेक्षा हे असं देवळाच्या सभागारात,देवाच्या सानिध्यात केलेलं लग्न अधिक आवडतं बघ. आजुबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, गर्द हिरवाई..पप्पांनीपण शहरापासून दूर कसा स्पॉट शोधून काढला ना! कमालय पप्पांची."

'त्यात कमाल कसली आलीय. पप्पांचा हात वीटेखाली अडकला. धाकट्या चिरंजीवांना नाराज करायचं नव्हतं नि व्याह्याची माहितीही बिझनेस सर्कलमधे द्यायची नव्हती सो हे देऊळ,सभागार वगैरे नाहीतर पप्पा देवाचं किती आणि काय करतात ते च़ागलंच ठाऊकय मला.' 

'हो. तेही झालंच. त्यांना स्वत:वर जास्त विश्वास आहे.देव वगैरे भ्रामक कल्पना असं मानतात ते पण तसं ते इतरांना जाणवू देत नाहीत म्हणजे अगदी तगडा विरोध नाही त्यांचा. देखल्या देवा दंडवत करतात झालं.' 

'आवि थांब नं. कोणाचातरी आरडाओरडा ऐकू येतोय रे खाली. कुत्रीही भुंकताहेत. थांब जरा मी बघतेच टेरेसमधे जाऊन.'

हेतल बेडवरून उठली व टेरेसकडे गेली. सातेक बंगल्यांची सोसायटी त्यांची. तिथला रस्ता रात्री अकरानंतर अगदी चिडिचूप असायचा. 

हेतलने पाहिलं बंगल्याच्या गेटजवळ एक सडकछाप माणूस रखवालदाराशी भांडतोय. तो हातवारे करत होता,मोठमोठ्याने आरडाओरडा,शिव्या ऐकू येत होत्या. रखवालदार त्या माणसाला अडवण्याचा सर्वतोपरी पर्यंत करत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून बंगले असल्याने त्यांच्या समोरच्या बंगल्यातील मंडळी आपापल्या टेरेसमधे येऊन सरपोतदारांच्या बंगल्यासमोरचा तमाशा चवीचवीने, उत्सुकतेने बघत होती.

-----------

पूजा झाल्यानंतर आज प्रथमच तानी अभिजीतच्यासोबत रुम शेअर करणार होती. दिवसभराच्या गडबडीत आलेला शीण नाहीसा करण्यासाठी ती बाथरुममधे गेली. तिच्या माहेराच्या घरातल्या टिचभर मोरीपुढे हा पांढराशुभ्र बाथरुम म्हणजे सुंदर स्वप्न होतं. खाली अभिजीतशी देवयानी देण्याघेण्याबद्दल बोलत होती. तानीने  गार पाण्याचा शॉवर घेतला. गाऊन घालून ती बाहेर यायला निघणार तोच तिला तिच्या बापाचा दारुच्या नशेतला आवाज ऐकू आला.

क्रमशः

नमस्कार

चेम्पिअन ट्रॉफीची तयारी सुरु असल्याने लिखाणास थोडासा वेळ झाला तर तुम्ही समजून घ्याल ही आशा करते.
                                            धन्यवाद.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now