Jan 22, 2022
स्पर्धा

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 5)

Read Later
तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 5)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 5)

आविष्कारने हेतलच्या कंबरेभोवती त्याचा हात गुंफला व तिला बेडरुममधे घेऊन गेला. 

'छे! मला वाटलं तू मला दोन्ही हातांनी उचलून वगैरे..'--हेतल लाजत म्हणाली.

'येतं तर माझ्या मनात पण हल्ली तू सुद्रुढ होत चालल्येस नं,कंबरेत उसण भरायची माझ्या,'आविष्कार हसत म्हणाला.

'शोभायला नको का रावसाहेब सरपोतदारांची सून. नावाप्रमाणे अंगही खात्यापित्या घरचं हवं,'--हेतल

'हो आणि माझ्यासाठी रेडीमेड टेडी,' असं म्हणत आविष्कारने हेतलला मिठीत घेतलं.

------------

इकडे अभिजीतची झोप उडाली होती. कोणी बरं फोटोज शेअर केले असतील? आणि तो व्हिडीओ? तो माणूस जर अभिजीतच्या समोर आला असता तर अभिजीतने त्याचे पुढचे सगळे दात त्याच्या घशात घातले असते,त्याचं थोबाड सुजवून ठेवलं असतं. 

अभिजीत जाणून होता की पप्पा एवढे नक्कीच रागावणार नसते,त्याने हा विषय हळूवारपणे पप्पांच्या गळी उतरवला असता पण रावसाहेब सरपोतदारांच्या मुलाचा एखाद्या मुलीला प्रपोज करतानाचा व्हिडीओ त्यांच्या सो कॉल्ड प्रतिष्ठीत मित्रमंडळींत शेअर होणं हे त्यांच्यासाठी लज्जास्पद होतं. 

अभिजीत पप्पांना दुखवू शकत नव्हता. त्याने तानीला मेसेज केला..
प्रिय तानी, पुढचे पंधरा दिवस मी तुझ्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुही मला मेसेज,फोन करण्याचा प्रयत्न करु नकोस. आशा आहे तू मला नक्कीच समजून घेशील,
तुझाच अभी.

--------

तानी पार्टीवरुन आली ती जणू हवेत तरंगत. तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराने तिला मागणी घातली होती.  दौऱ्यावर असताना बरेचदा ती दोघंच जवळपासच्या नदी,तलावावर फिरायला जायची. तेंव्हा तानीला बरेचदा वाटायचं,अभिजीतचा हात हातात घेऊन चालावं, त्याच्या डोळ्यांत स्वतःचं अस्तित्व शोधावं,मऊ,उबदार शालीसारखं अभिजीतला स्वतःच्या देहाभोवती लपेटून घ्यावं पण..पण तानीला तिच्या मर्यादा ठाऊक होत्या. अभिजीतचं घराणं मोठं होतं त्यामानाने तानीचं घराणं म्हणजे किडामुंगीसारखं. जगण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने गांडुळासारखी जगणारी माणसं. 

पण या साऱ्या तिच्या मनातील भीतीच्या अंधाराला अभिजीतच्या प्रपोजने छेद दिला होता. आशेच्या किरणाने तिच्या मनाचा गाभारा उजळला. तानीने मनोमन देवाचे आभार मानले. 

सकाळी तानीला जरा उशिराच जाग आली. तिने मोबाईल हातात घेतला व अभिजीतचा मेसेज वाचला. 'पंधरा दिवस भेटू नकोस' हे वाचल्यावर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ' का बरं अभिजीतला माझ्यापासून दूर रहायचं असेल? काल रात्री तर त्याने मला प्रपोज केलं.

 तानीने ग्लासात ठेवलेलं ते गुलाबाचं फुलं हातात धरलं व आपल्या ओठांना लावलं. ती स्वत:शीच हसली. 'त्याच्या मम्मीपप्पांना तर कालच्या पार्टीबद्दल कळलं नसेल? ते रागावले असतील का अभीवर? अभी बोल ना रे. तू बोलल्याशिवाय कसं कळणार मला?'तानीचं स्वगत चालू होतं.

 यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी तानीने आईकडे जायचं ठरवलं. तानीची आई,वच्छी जास्ती शिकलेली नव्हती पण जगाच्या पाठशाळेतलं अनुभवांचं ज्ञानकडू तिच्याजवळ होतं.

----------

तानीला सकाळीच घरी आलेलं पाहून वच्छी म्हणाली,'का गं,आज सुट्टी वाटतं.'

'नाही गं. माझा मुडच नाहीए बघ.'

'का बरं आसं? थांब च्या करते तुझ्यासाठी नि दोन भाकऱ्या थापते. जवारीची भाकर आवडते नं तुले. पयले घरात समदे डबे रिते असायचे नि आता तुझ्या आर्डरीमुळं वाणी मह्यन्याच्या मह्यन्याला वाणसामान घरात आणून टाकतोय. तुझे भाऊबी बदाम नि काजूबिया खाऊन गुटगुटीत झालैत बग.'
वच्छी एका बाजूला परातीत पीठ,पाणी घेऊन सटासटा भाकरी थापत होती नि तोंडाने लेकीशी बोलत होती.

 'ताने,तुला सांगते तू झालीस तवा पोरगी झाली म्हून या तुझ्या बापान नि आज्जीन आक्शी कुतंबल्यावानी तोंडं केली व्हती नि आता तुज्याच जीवार उठल्याबरुबर कडक चाय नि मस्कापाव खात्यात. लेकीला बोजा म्हनायचा जमाना गेला आता. तुज्या भावास्नीबी किती आधार हाय तुजा. वह्यापुस्तकं,टीरिपा,कपडेलते काय लागंल तो खर्च भागवतीस बग भावांचा. तुझ्या घरीच येऊन राह्यलो आसतो पण ही तोंडाळ म्हातारी नि तुजा बेवडा बाप हाय ना माज्या पाचवीला पुजलेला. मी सवता मेल्याशिवाय माजी ह्यातून सुटका होयाची नाय.' 

वच्छीने तानीला तव्यावरची टम्म फुगलेली भाकरी नि नवीन कपातसून च्या दिली. 'ताने, त्यो कपबशीवाला रशीदचाचा येतो ना रविवारचा,तेच्याकडसून येक डझन कपबशी घेतली. बरी हाय नव्हं. 

ताने,आगं मगापासनं मी एकटीच बोलतेय. तुझा चेरा कशापायी उतरलाय? काल तर तुला अभीरावांनी परपोज क काय म्हनत्यात त्ये केलं नव्हं. तुला आवडतात ना अभिजीतराव? काल तू आमाला सोडलंस नि अभिजीतरावांची भैन आयशा नवीन कापडं घिऊन आली. आमाले बोलली पटापटा तयारी करा नि चला लेकीच्या बड्डेला. मी म्हनलं,आताच तर करुन आलो बड्डे तर नाय म्हने अभिजीतराव सरपाइज देनार हायती. काय ती सजावट नि त्यो झाकपाक,डोळे दिपले बग माजे."

तानी भाकरीचा तुकडा चहात बुडवत म्हणाली,"आई, अभिजीतने मेसेज केलेला मला. मी त्याला पंधरा दिस भेटायाचं नाय,तेच्यासंगं बोलायाचं नाय आसं लिवून पाठवलंय. काय समजावं आता. माजा तर जीवच लागंना झालाय.'

'काय तरी अडचण आली आसलं त्यास्नी. तू राग नगं धरु त्या भल्या मानसावर. त्ये सांगतील तसंच वाग.वच्छीने तानीला धीर दिला.

--------------

त्या पंधरा दिवसांतील एक एक दिवस अभिजीतला युगासारखा वाटत होता. त्याचं खाणंपीणं कमी होत होतं. अभिजीतला या अवस्थेत पाहून देवयानी व रावसाहेब चिंतेत पडले. 

पंधराव्या दिवशीच्या रात्री..

'आज बरोबर पंधरा दिवस झाले, अभिजीतने तुमचा शब्द पाळला.'--देवयानी

'हं'-- रावसाहेब '

'पुढे काय करायचं ठरवलाहात?' --- देवयानी

 रावसाहेब चष्मा काढून त्यांच्या दोन्ही पापण्यांवर बोटांनी जोर देत म्हणाले,
'पोर जिद्दी आहे खरा.'

' तुमचाच गुण उतरलाय पोरामधे. मला मिळवण्यासाठी तुम्हीही असेच वेडेपिसे झालेलात. फरक इतकाच की तुम्ही गरीब व मी श्रीमंत होते. तुम्ही आमच्या दुकानात नोकरीला होता.  बापूंनी आपले लग्न लावून दिल्यावर एका विचित्र अपघातात माझा भाऊ व माझी वहिनी वारली. त्यानंतर बापूंची मानसिक स्थिती ढासळत गेली आणि दुकानाचा ताबा तुमच्याकडे आला. मी ज्यावर मनापासून प्रेम केलं तो श्रीपतराव कुठेतरी काळाच्या ओघात गडप झाला. श्रीपतचा श्रीपतराव व श्रीपतरावाचा  रावसाहेब झाला. तुमच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी मीही स्वतःला बदलत गेले. तुम्हीच शिकवलत मला दुतोंडी वागायला. 

रावसाहेबांची मिसेस म्हणून विविध ठिकाणी महिलांच्या जागरासाठी भाषणं देणारी मी खरंतर तुमच्या हातातली एक सजीव कठपुतली. त्यादिवशी मी तुमच्या बाजूने बोलले खरी पण काय चूक होतं आयेशाचं? 

घरात एक न् बाहेर एक असे मुखवटे घालून वावरणं मलाही आताशा अवघड झालंय. 

आविष्कारचं हेतलशी लग्न लावून दिलंत,श्रीमंत बापाची बेटी म्हणून. तिच्या वडिलांच्या गुडविलचा फायदा झाला असेल तर तो तुमच्या धंद्याला. मनानं मात्र ती माणसं तितकीशी चांगली नाहीत. काही असलं तरी तुमच्यासाठी मुलांसमोर मला तुमची बाजू घ्यावी लागते. मीच तुमच्या विरोधात बोलले तर मुलांचं जास्ती फावेल'--देवयानी.

'कुठून कुठे न्हेऊन ठेवलास विषय, देवू! आपण अभिजीतबद्दल बोलत होतो ना. उद्या त्याच्या पसंतीला संमती देतो मग तर झालं.'--रावसाहेब

'खरंच?'--देवयानी

'हो. तुला वाटतं तेवढा दुष्ट नाही मी.'--रावसाहेब

------------

सकाळी डायनिंग टेबलवर रावसाहेब व अभिजीत समोरासमोर बसले होते. 

रावसाहेब म्हणाले,'अभिजीत,पंधरा दिवस झाले. तू काय तो निर्णय घेतला असशीलच.'

'हो पप्पा.'--अभिजीत

'मग विचारल्याशिवाय सांगणार नाही का?'--रावसाहेब

'पप्पा मी नाही जगू शकत तानीशिवाय. तुम्ही मला घराबाहेर काढलत तरी चालेल पण मी लग्न करेन तर तानीशीच,'--अभिजीत

आयेशा,आविष्कार, हेतल,देवयानी सगळ्यांचे कान आता रावसाहेब काय म्हणणार याकडे लागले.

दोन क्षण टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली. मग एकदम रावसाहेबांचा आवाज ऐकू आला.

'अरे मग कर की. नको कोण म्हणतोय तुला. मी तुला विचार करायला सांगितलं होतं. शेवटचा निर्णय तुझाच असेल,'--रावसाहेब

'काय पप्पा. लव्ह यू पप्पा,' म्हणत अभिजीत रावसाहेबांच्या पाया पडला व आयेशाचा आणि रौनकचा तर त्याने पापाच घेतला. 

'हे रे काय दादू,आम्ही म्हणजे वहिनी वाटलो होय तुला,'असं म्हणत आयेशा तिचा व रौनकचा गाल पुसू लागली. 

हेतलला रावसाहेब इतक्या सहजासहजी अभिजीतच्या प्रेमाला मान्यता देतील असं न वाटल्याने तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं तरी तिने बेमालूमपणे चेहरा हसरा ठेवत अभिजीतचं अभिनंदन केलं. अभिजीत आविष्कारला मिठी मारली. इतक्यात पुन्हा रावसाहेबांचा आवाज ऐकू आला..

'थांब अभिजीत. माझं म्हणणं तू पुर्ण ऐकून घेतलं नाहीस. मी तुला तानीशी लग्न करायची संमती देईन पण माझ्या काही अटी आहेत.'

'कुठली अट पप्पा?,' अभिजीत खरंतर ही बातमी तानीला सांगायला उतावीळ झाला होता.

'अट क्र.1.  लग्न अगदी साधेपणाने मंदिराच्या सभागारात होईल. लग्नाला अगदी मोजक्याच माणसांना बोलावण्यात येईल.
अट क्रं.2. लग्न झाल्यावर निदान मुल होईस्तोवर तरी तानीला नाटकात काम करता येणार नाही.
अट क्र.3. तानीच्या माहेरची मंडळी आपल्या बंगल्यात येणार नाहीत.

अभिजीतला पहिली अट मान्य होते पण दुसरी अट..खरंतर तानी किती पँसिनेट होती तिच्या अभिनयकलेबद्दल आणि तिसरी अट पाळायची..म्हणजे तानीला तिच्या मायेच्या माणसांपासून दुरावायचं!

'पण पप्पा'..अभिजीत म्हणाला.

'पण नाही न् बीण नाही त्या तानीला माझ्या अटी सांग. अटी मान्य असतील तर लग्नाच्या तयारीला लागुया.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now