तिचा परीघ,तिचं कुटुंब(भाग 4)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 4) (मराठी सकथा,marathi story)

तिचा परीघ,तिचं कुटुंब(भाग 4)

'दादू ऐकना. तुझ्यासोबत हल्ली एक मुलगी असते म्हणे. मी तिचा फोटो पाहिला तुझ्या मोबाईलमधला. क्युट दिसते रे. आवडली मला वहिनी.' आयेशा तिच्या दादूकडे पहात म्हणाली.

'एवढं सोप्पं नाहीए ते आशी. पप्पामम्मी हो म्हणतील असं वाटत नाही मला. माझी तानी त्यांच्या स्टेटसला शोभणार नाही. पप्पा तर लग्नालाही  बिझनेस वाढवण्याच्या उद्देशाने बघतात. ' खांदे खाली घेत अभिजीत म्हणाला.

आयेशा म्हणाली,'पप्पा काहीही झालं तरी तुझ्याविरुद्ध जाणार नाहीत. सो बी काल्म. सरळ सांगून टाक नि हो मोकळा.'

अभिजीत आयेशाच्या गालावर हात ठेवत म्हणाला,'थँक्यू आशी मला समजून घेतल्याबद्दल.'

ती दोघं मग बराच वेळ बोलत राहिली.

----------------

त्यादिवशी तानीचा वाढदिवस होता. तानीची आई तिच्यासाठी गोडाचा शिरा घेऊन आली होती. दोघं भाऊही आले होते. तानी त्या तिघांना सिनेमाला घेऊन गेली. मोठ्या हॉटेलमधे तानीने त्यांना खाऊपिऊ घातलं. चारेक वाजता तिने त्यांना घरी नेऊन सोडलं.

 इकडे अभिजीत तिला फोन लावत होता. अभिजीत तिच्या बिल्डींगखाली येऊन थांबला. सेटीनच्या लाल ड्रेसमधे तानी खूप सुंदर दिसत होती. तिने तिचे कुरळे केस मानेवर मोकळे सोडले होते. अभिजीत तिला घेऊन लाँग ड्राइव्हला गेला. एका सभाग्रुहाजवळ त्याने गाडी थांबवली. तानीची सर्व सहकलाकार मंडळी तिथे हजर होती. आश्चर्य म्हणजे,अगदी सुंदर पोशाखात तिचे गोड भाऊ व आईही तिथे हजर होती. मोती कलरच्या शेरवानीत अभिजीत खूपच देखणा दिसत होता.

 लाल बदामाच्या आकाराच्या फुग्यांनी सभाग्रुह सजवला होता. गुलाबाच्या पाकळ्या तानीच्या पायवाटेवर अंथरल्या होत्या. तानीला हे सगळं नवीन होतं,अचंबित करणारं होतं. स्वतःचं एवढं कौतुक तिने कधी कल्पनेतही अनुभवलं नव्हतं. 

गुलाबी गुलाबांच्या नक्षीचा केक तानीने कट केला. सर्वांनी टाळ्या वाजवून तानीचं अभिष्टचिंतन केलं. अभिजीतने तानीला केक भरवला. तो तानीसमोर लाल गुलाबाचं फुल घेऊन मान झुकवून उभा राहिला व तानीला म्हणाला 'आय लव्ह यू तानी. व्हिल यू मँरी मी.'

 तानीने स्वतःला चिमटा काढला. होय, ते सारं सत्य होतं. रावसाहेब सरपोतदारांचा लेक अभिजीत सरपोतदार तानीला प्रपोज करत होता. तानीने त्याच्या हातातलं नाजूक फुल घेतलं व त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. तानीच्या आईने दोघांना भरभरुन आशीर्वाद दिले.
अभिजीतची बहीण आयेशाही तिथे हजर होती. तिला तर भावी वहिनीशी किती बोलू न् किती नको असं झालं होतं. 

रावसाहेबांना हस्तेपरहस्ते ही खबर लागली. रात्री आयेशा व अभिजीतला घरी यायला बराच उशीर झाला. रावसाहेब चिंतातूर अवस्थेत दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत होते. दारावरची बेल वाजली. देवयानी दार उघडायला जाणार इतक्यात रावसाहेबाली तिला हातानेच अडवले. त्यांनी स्वतः दार उघडलं.

दारात अभिजीत व आयेशा उभे होते. रावसाहेब म्हणाले,' या या'

दोघं बिचकत आत आली. पादत्राणं काढून हातपाय धुवून, कपडे बदलून आली.  देवयानी म्हणाली, 'चला जेवून घ्या.' 

मुलं म्हणाली, 'नको मम्मी, आम्ही बर्थडे पार्टीला गेलो होतो यथेच्छ जेवून आलोय.'

रावसाहेब उद्गारले,'कोणाची बर्थडे पाटी ! " 

आयेशा म्हणाली, 'पप्पा, दादूची फ्रेंड आहे तानी म्हणून त्याच्यासोबत नाटकात काम करायची ती. मम्मी व मी याआधी भेटलोय तिला.  अजुनपर्यंत कधीच असं सेलिब्रेशन तिच्या वाट्याला आलं नव्हतं. आम्ही दोघांनी मिळून सगळी व्यवस्था केली होती खास तानीसाठी.'

 रावसाहेब म्हणाले, 'तुझ्या भावाला तोंड आहे ना सांगायला!'

आयेशाने मान खाली घातली.

अभिजीत म्हणाला, 'होय पप्पा आम्ही दोघांनी पार्टी एरेंज केली होती. तानी माझी बेस्ट फ्रेंड आहे पप्पा.'

रावसाहेब म्हणाले, 'फक्त बेस्ट फ्रेंड?'

'असं का विचारताय पप्पा?'अभिजीत चाचरला. रावसाहेबांनी त्याला त्यांच्या व्हाट्सपवर आलेले फोटोज व व्हिडिओ दाखवला ज्यात अभिजीत तानीला गुलाबाचं फुल देत होता व 'तानी, आय लव्ह यू . व्हील यू मेरी मी?' म्हणत होता.

 पप्पांशी कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी तो व्हिडिओ पहाताच अभिजीतला घाम फुटला.

'पप्पा पप्पा तुम्ही रागावू नका. मी तुम्हाला योग्य वेळ येताच सर्व काही सांगणार होतो.'

' काय करते ही तानी?'---पप्पा

'तानीने बऱ्याच नाटकांत कामं केली आहेत. दौऱ्यावर आम्ही सोबत असायचो.'--- अभिजीत 

'ते नाटकांचे भिकार धंदे मला सांगू नकोस. तिचे शिक्षण, तिचं घराणं याबद्दल सांग.' -पप्पा

पप्पा, तानी, तिचे आईबाबा, दोन भाऊ  सायनजवळच्या एका झोपडपट्टीत रहातात. वडील एमआयडीसीत कामाला होते पण त्यांना दारुचं व्यसन लागलं. ते कामाला जाइनासे झाले मग तानीच्या आईकडे घरकाम करण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही. तिची तीन मुलं,नवरा,सासू यांचं पोट भरण्यासाठी ती घरकाम करायची. तानी नाटकात काम करायला लागल्यापासून त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरीही ज्या घरांनी तिला गरीब परिस्थितीत मदतीचा हात दिला त्यांच्याकडे ती अजुनही घरकामाला जाते.'

देवयानी रागाने थरथरायला लागली,'अभिजीत,तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतय का?'

'का मम्मा काय चुकीचं बोलतोय दादू?'--आयेशाने विचारलं.

'तू गप्प बस आयेशा. मोठ्या माणसांत बोलू नकोस. अभिजीत,तुझ्या थोरल्या भावाचं लग्न आम्ही आमच्या बरोबरीच्या महंतांच्या हेतलशी करुन दिलं. त्यांच्या गुडविलचा आपल्या बिझनेसला किती फायदा झाला आहे आणि तू आमची सगळी बाजारातली पत धुळीला मिळवायला निघालाहेस.'

'मम्मा, तुच तुझ्या विमेन्स वेलफेअर क्लबच्या भाषणांत सांगतेस ना की कुठचंही काम हलकं नसतं. काम हे काम असतं. कष्ट करताना लाजू नका वगैरे वगैरे,'--आयेशा मम्माला म्हणाली.

देवयानी म्हणाली,'ते बाहेरचं जग. तिथे तसंच बोलावं लागतं. आपली एक इमेज बनवावी लागते. उगीच नाही मला विमेन्स अपलीफ्टमेंटचा पुरस्कार मिळाला!'

'म्हणजे मम्मा ते सगळं खोटं वागणं तुझं. तुझे दोन मुखवटे आहेत का मम्मा?'----आयेशाने विचारलं.

देवयानी आयेशाला मारायला धावली. रावसाहेबांनी तिला अडवलं,म्हणाले,'पोरगी मोठी झालेय आत्ता. तिचं तिला कळत नाहीय आपण काय बोलतोय ते.'

रावसाहेब अभिजीतला म्हणाले,'अभिजीत,हे वयच असं असतं. या वयात गाढवीणपण सुंदर दिसते. आम्ही आईवडील आहोत तुझे,शत्रू नाही. तुला पंधरा दिवस देतो. तू नीट विचार कर आणि काय तो निर्णय घे.जा आत्ता झोपा सर्वांनी.' बेल वाजल्यावर वरच्या मजल्यावरील बेडरुमच्या बाहेर आलेली हेतल,जिन्याच्या रेलिंगला उभी राहून या सर्व चर्चेचा आसुरी आनंद घेत होती. अभिजीत व तानीचा व्हिडिओ,फोटोज तिनेच तिच्या खास माणसाकरवी रावसाहेबांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर शेअर केले होते ज्यामुळे नेहमी शांत रहाणारे रावसाहेब अस्वस्थ झाले होते.'

हेतल हळूच तिच्या बेडरुममधे शिरली. तिचा चार वर्षांचा रौनक व तिचा पती अभिलाष दोघे एकमेकांना मिठी मारुन गाढ झोपले होते. 

हेतलने टेरेसमधे जाऊन तिच्या ममला फोन लावला.
'हेलो मम,आपलं काम सकसेसफुल झालं,'--हेतल

'काय म्हणतेस काय. तुझ्या तोंडात दहीसाखर. माझ्या लेकाने,बंटीने फोटोज काढलेलेच तसे. तसा हुशार आहे माझा बंटी. हेतल,काय झालं नेमकं सांग की. रावसाहेबांनी त्या अभ्याला घराबाहेर काढलं असेल ना. इस्टेटीतून बेदखल केलं तर राबसाहेब सरपोतदारांच्या सगळ्या इस्टेटीची तू मालकीण होशील. मग बघू त्या म्हाताराम्हातारीचं काय करायचं ते,'--हेतलची आई ललिताबाई म्हणाल्या.

'तू म्हणतेस तेवढी वेडपट नाहीएत ती जुनी खोडं. अविष्कारची मम्मा तर पक्की चाप्टर आहे. बाहेर मारे संतीणीसारखी भाषण देत फिरते. रावसाहेबांनी अभिलाषला नीट विचार करायला वेळ दिलाय. बघुया काय होतं पुढे,'--हेतल

'तू मात्र तोंडात मिट्ट साखर ठेवल्यासारखीच बोल हं त्या बुढ्ढाबुढ्ढीशी. दिल्ली अभी दूर नहीं है.'

आविष्कार पाणी प्यायला उठलेला तो टेरेसमधे येताच हेतलने लगेच विषय बदलला. 'मम,हा आवि इतका थकून येतो सांगू दुकानातून. माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्याला. चल बाय मम गुड नाईट.' मम काय समजायचं ते समजली.

आविष्कारने हेतलच्या कंबरेभोवती हात गुंफला व तिला बेडरुममधे घेऊन गेला. 

'छे! मला वाटलं तू मला दोन्ही हातांनी उचलून वगैरे..'--हेतल लाजत म्हणाली.

'येतं तर माझ्या मनात पण हल्ली तू सुद्रुढ होत चालल्येस नं,कंबरेत उसण भरायची माझ्या,'आविष्कार हसत म्हणाला.

'शोभायला नको का रावसाहेब सरपोतदारांची सून. नावाप्रमाणे अंगही खात्यापित्या घरचं हवं,'--हेतल

'हो आणि माझ्यासाठी रेडीमेड टेडी,' असं म्हणत आविष्कारने परिमलला मिठीत घेतलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all