तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग 10) (मराठी कथा: marathi story)

Ticha parigh, tich kutumb (part 10) (मराठी कथा : marathi story)

तिचा परीघ,तिचं कुटुंब (भाग दहा)

अभिजीत रात्री झोपलेल्या तानीला एकटक बघत होता. मंद प्रकाशात तानीचा चेहरा अगदी बकुळ फुलासारखा प्रसन्न,पवित्र दिसत होता. माझ्या तानीला कोणाची नजर न लागो,तो मनात म्हणाला व त्याने तानीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. 

--------------

तानीने तिचा हात अभिजीतच्या छातीवर ठेवला. मध्यरात्री तानी ,'बाबा मारु नको ना माझ्या आईला,मारु नको..वहिनी मी नाही मारणार रौनकला,मी नाही पुन्हा मारणार,मला आवडतात लहान मुलं,मी इतकी वाईट नाही..'असं काहीबाही बरळत होती. अभिजीतने तिला हलवून जागं केलं. तिला प्यायला पाणी दिलं. अभिजीत तानीला कुशीत घेऊन झोपला. तो विचार करत होता,'काय गंमत आहे ना! लग्न झालं की पुरुष हा फक्त पत्नीचा पतीच बनत नाही तर तिचा पिताही बनतो. तिच्यातल्या दडलेल्या लहान मुलीचं मन जपतो. तर कधी स्वतः मुल होऊन तिच्याकडे हट्ट करतो,त्रागा करतो.'

______

सकाळी तानी तिचं आवरुन अभिजीतला उठवायला आली. 
'अभिजीत,उठ ना रे. दुकानात जायला उशीर होईल.'

'भाईचं आवरत आलंय. उठ चल बघू माझं शहाणं बाळ ते.'

'नाही उठत. आज नाही जायचंय मला दुकानात.'

'ते का बरं?'

तानीच्या मांडीवर डोकं ठेवत अभिजीत म्हणाला,'का र ण मला आज आईने माझ्या तानीला घेऊन माझ्या सासरवाडीला जायला सांगितलय.'

'अय्या! खरंच.'

'अगदी खरं. आत्ता ही गोड बातमी दिल्याबद्दल मला ब क्षी स..'

तानीने तिच्या पुढे आलेल्या बटा अलगद कानामागे सरकवल्या व मांडीवर डोकं ठेवलेल्या अभिजीतच्या ओठांजवळ आपले ओठ न्हेले. काही क्षण गरम श्वासांची देवघेव झाली आणि 'अय्या भाई तुम्ही!'असं तानी चित्कारली तसा अभिजीत दचकून उठला. तेवढ्यात तानी तिथून पळणार तोच अभिजीतने तिचा गाऊन पकडला व तिला स्वतःकडे ओढलं. 

तानी भिंतीकडे सरकली. अभी तिच्या अगदी जवळ गेला. पावसाचे थेंब पडल्यावर वेल शहारते तशी तानी लज्जेने शहारली. तिच्या पापण्या आपसूक झुकल्या. अभी तिच्या लज्जेने आरक्त झालेल्या गालावर बोट फिरवत म्हणाला,'अंघोळ करून येतो मग बघतो तुला.'

---------------

रघू गल्लीत गोट्यांनी खेळत होता तेव्हा ओट्यावर बसलेल्या चाळीतल्या काही बायकांच्या गप्पांकडे त्याचं लक्ष गेलं. कानफुंके काकू हलकेमावशींना त्याच्या ताईबद्दल काहीतरी सांगत होत्या. रघूला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. पोट भरणे,पोट दुखणे,पोटाला तडस लागणे हे तो बालभारतीतून शिकला होता पण पोट वाढविणे म्हणजे काय रघूला कळेना. त्याने खेळ तसाच सोडला नि तो घराकडे वळला. दिनू संस्कृतची सुभाषितं पाठ करत होता.

रघूने हातपाय धुतले व खोलीत आला. त्याने दिनूला हाक मारली.

'ए दादा ऐकना रे.'

'आई कधी येणार?'

'का रे भूक लागली तुला? आई आज मालकीणबाईंच्या पुरणपोळ्या करुन देणार आहे. उशीर होईल तिला यायला. तुला नि आज्जीला वाढून देऊ का?'

'आज्जी झोपलेय. झोपूदे तिला. नाहीतर बडबड सुरु करेल परत. आपण आई घरी आल्यावरच जेवू.'

'बरं मग अभ्यास करत बस. तुझे वाक्यप्रचार पाठ करायचे राहिलेत ते कर जरा.'

'ए दादा,मला नं आज एक नवीनच वाक्यप्रचार कळला,पोट वाढविणे.'

'हा कोणता वाक्यप्रचार?' दिनू विचारात पडला.

'अरे तीच तर गंमत मला आईला विचारायचीय. त्या कोनावरच्या कानफुंके काकू हलके काकूंना सांगत होत्या..'रघू म्हणाला.

'रघू असं दुसऱ्यांचं बोलणं ऐकणं चुकीचं असतं. कितीदा सांगितलं तुला?'

'अरे मी ऐकत नव्हतो. मी आपला तिथे खेळत होतो. त्यांचं बोलणं कानावर पडलं माझ्या. माझ्या कानाला काही दरवाजे नाहीत बंद करुन ठेवायला,'रघू जरा नाराजीतच बोलला.

'बरं बरं. आता सांगतोस की..'

'मी नाही सांगणार. तू चिडतोस माझ्यावर.'--रघू

'ए काय मुलींसारखा चिडतोस. चल सांग पटदिशी.'--दिनू

'तुझी सफेद,गुलाबी फुलांवाली,मागे रबरवाली पेन्सिल पेन्सिल देशील मला आक्रुती काढायला तरच सांगतो.'--रघू

'ही घे पेन्सिल सांग आता.'

'हां तर त्या कानफुंके काकू हलके मावशींना सांगत होत्या,'लग्न झालं म्हणे तानीचं. अगदी गुपचूप केलं देवळात.कायतरी काळंबेरं असनार. तानीने पोट वाढवलं आसलं. मला बाई पयलेच डाऊट व्हता त्या पोरीवर.'

'असं म्हणाली ती. तिचीतर ना.' दिनकर रागात म्हणाला.

'वाईट म्हणाली का रे ती आपल्या ताईला. शिवी आहे का ती?' रघूने विचारलं.

इतक्यात तानी व अभिजीत आत आले. ताई समोर दिसताच रघूने तिला गच्च मिठी मारली. हातभर हिरवा चुडा,कपाळावर टिकली,हळदकुंकू, नाकात चमकी,कानात सोन्याचे डुल,गळ्यात सोन्याचा हार,मंगळसूत्र. हिरवीगार साडी नेसलेली,सोन्याने पिवळी झालेली ताई दिनूला देवीच वाटली. तानीने त्यांना नारळाच्या वड्यांचा डबा दिला त्याबरोबर दोघंही खूश झाले.

इतक्यात वच्छीही कामावरुन आली. ती लेकजावयाला पाणी द्यायला आत गेली तसं वडी खातखात रघूने ताईला सांगितलं,'ताई त्या कोनावरच्या कानफुंके काकू हलके काकूंना सांगत होत्या की तानीने पोट वाढीवलं असणार म्हणून तिचं झटचेपट लग्न करुन दिलं. त्यांना तुझ्यावर आधीपासूनच डाऊट होता म्हणे.'

रघूचं बोलणं ऐकून तानीला खूपच वाईट वाटलं. 

वच्छी म्हणाली,'आगं त्या कानफुंकीचं काय मनाला लावन घितीस? देवानं तोंड दिलंय,म्हूनशान र्हाती कुचाळक्या,लावालाव्या करीत.'

अभिजीत म्हणाला,'म्हणूनच या वस्तीपासून आपण मुलांना दूर न्हेलं पाहिजे. मुलांवर याच वयात संस्कार होतात. अडनिड्या वयातली मुलं ही. ते काहीनाही, तुम्ही सगळे तानीच्या ब्लॉकवर रहायला लागा. आजच ही रुम खाली करुया. मी टेंपो बोलवतो,जे काय सामान आहे ते बांधायला घ्या.'
वच्छीने जावयाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. म्हणाली,'पानीबी येईनासं झालंय ओ आजकाल. चार दिसातून येकदा येतं मग धावा त्या पान्यामागं.'

वच्छीने सगळ्यांना जेवायला वाढलं. वांग्याचं भरीत,कळण्याची भाकरी,गोडं दही असा सुंदर बेत होता. संध्याकाळपर्यंत दिनू,रघू,वच्छी ,म्हातारी यांना अभिजीतने तानीच्या ब्लॉकवर पोहोचवलं.

-------------

माळीकाकांसोबत तानी बगिचातली भेंडी,गवार काढत होती. 

'माळीकाका किती वर्षे करताय ओ हे काम?'

'हे पिढीजात काम आमचं. हे हिरवं शिवार म्हणजे देव आमचा. माजा पोरगाबी हेच काम करतो. लांब तिकडं मुनिसपालटीचं हाफिस हाये वैतरणाला. माजा पोरगा तिथल्या बागंत काम करतो. तिथल्या बागंत घिऊन गेलला मला. हे बचकाभर मोठेमोठे गुलाब,रगतासारे लालेलाल. समद्या रंगाची उधळण जनू. निशिगंधा, रातरानी,आपलं ते क्रुष्णकमळ,जाई,जुई..काय इचारु नगा. नि समदं प्लानिंगमंदी. लान टाकलय हिरवंगार. मदीमदी ही फुलझाडं. लेकाचे नि त्याच्या सवंगड्यांचे कष्ट बघून डोळ्यांचं पारणं फिटलं बगा.'

'माळीकाका एक विचारु?'

'इचारा की.'

'उंहू मला तानी म्हणा आधी.'

'बरं तानी.'

'हां अस्सं. माळीकाका आपण का नाही ओ फुलं लावत?'

'मला लय वाटतं गं लावाविशी पन रावसाहेबास्नी पसंद नाय फुलझाडं लावलेलं.'

'का बरं?'

'आसल कायतरी मोठ्या लोकांचं कारण.'

तानी हिरव्यागार भाज्या ओच्यात घेऊन आली तेंव्हा देवयानी हसली तिला,'अगं ताने,एखादं भांडतरी न्यायचं नि माळीकाकांनी दिली असती न् आणून.'

हेतल पिझ्झा ओव्हनमधे ठेवत पुटपुटली,'भिकारी लक्षणं,दुसरं काय!'

तानीने हेतलच्या बोलण्याकडे लक्ष देणं टाळलं तरी मनावर ओरखडा उमटायचा रहातो थोडा!

'मम्मी,आपल्या बागेत फुलझाडं का नाहीत?'

'अगं,रावसाहेबांना नकोत. त्यामागेही कारण आहे. रावसाहेबांच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र लहानपणीच हरपलं. सगळ्या बायका फुलं घालून नटायच्याथटायच्या पण आपली आई फुलं माळू शकत नाही याचा रावसाहेबांना लहानपणापासून राग, म्हणून ते बागेत फुलझाडं लावू देत नाहीत.

 देवाच्या कार्यक्रमात रावसाहेबांच्या आईला मागेच रहावं लागायचं. इतर बायांसारखी देवीची ओटी त्यांच्या आईला भरता नाही यायची म्हणून त्यांचा देवावरही राग. देवपूजा तरी कुठे करतात ते! तानी,प्रत्येक माणूस जसं वागतो ना त्याचा त्याच्या भूतकाळाशी संबंध असतो.'

पिझ्झा घेऊन जाणाऱ्या हेतलकडे बघत देवयानी म्हणाली,'काहीजणांचा मात्र स्वभावच तिखट असतो. त्याला औषध नाही गं ताने.'

-----------

उन्हं छान पडली होती. सासरी आल्यापासनं तानीला विशेष असं काम नसलं तरी तिची स्वैंपाकाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. वेगवेगळ्या प्रांतातल्या पाकक्रुती करुन पहायची,खाऊ घालायची आवड होती तानीला. 

माहेरी ती फावल्या वेळात अशा नवनवीन पाकक्रुती बनवायची. इथेही तिने वेगवेगळी व्यंजनं बनवायला सुरुवात केली. कधी दक्षिणेकडचा उंधियो,कधी कश्मिरी पुलाव,कधी राजस्थानची दालबाटी तर कधी कोकणातल्या रसशेवया. हाताशी जनाक्का व सदुकाका होतेच. तानीच्या अखंड गप्पागोष्टींनी तेही काम करताना कंटाळत नसत. तानी त्यांना आपल्यातलंच एक समजायची जे त्यांना अधिक आवडू लागलं होतं. 

 सरपोतदारांच्या घरी कधी मांसाहार होत नसला तरी रावसाहेब व त्यांची मुलं बाहेर जाऊन किंवा बाहेरुन आणून खाऊ लागली होती.

 रावसाहेबांनी अभिजीतला सांगितलं की तानीला एकदा मासळी आणून दे. कशी करते बघुया. देवयानी स्वैंपाकघरात मासळी आणायला तयार होईना मग तानीने मागीलदारी वीटांची चूल लावली व त्यावर सुरमईच्या तुकड्या भाजल्या. तिरफळं घालून लालतांबडा सार बनवला. तिथेच तांदुळाच्या पिठाच्या पांढऱ्याशुभ्र भाकऱ्याही भाजल्या. 

आविष्कार,रावसाहेब,अभिजीतने चुलीवरच्या मासळीवर ताव मारला. मग अधुनमधून असंच तानी तळलेले बांगडे,भरलेली पापलेटं,खेकड्याचा रस्सा,तिसऱ्यांचं सुकं,मुशीचं मटण,सागोतीवडे करुन घालू लागली. नॉनव्हेज असलं की रावसाहेब मनसोक्त जेवू लागले. म्हंटलय नं कुणीतरी प्रेमाचा रस्ता पोटातून जातो ते काही खोटं नाही. रावसाहेबांचा तानीवरचा राग निवळू लागला.

तानी सगळ्यांशी जुळवून घेत होती. रावसाहेबांच्या बंगल्यात थोड्याशा कुरबुरी सोडल्या तर उल्हास नांदत होता. दुकानाचीही भरभराट होत होती,पण या सुखाला कोणाची तर दुष्ट लागली. 

क्रमशः

नुकतीच मैत्री,प्रेम अन् तिचं कुटुंब भाग 1 प्रकाशित केली आहे. तीही बघा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

🎭 Series Post

View all