तिचा पैस.. अंतिम भाग

कथा तिच्या आभाळाची


तिचा पैस.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की पराग सागरिकासाठी आपलं काम सोडून येतो. आता बघू पुढे काय होते ते.


" चला उठा.. काम करायची वेळ झाली." पराग आत येत म्हणाला.

" कसलं काम?" नाश्ता करत असलेल्या बाबांनी विचारले.

" बाबा, मी सागरिकाचे नाव एका डान्स शो साठी दिले आहे. तिला आता सरावाला सुरूवात करावी लागेल."

"पराग, तू आलास म्हणून सावरली हो ही. नाहीतर आम्हाला कठिणच जात होते." आई म्हणाली.

" आता आपल्या होणाऱ्या बायकोसाठी एवढे तर करावेच लागेल ना? " पराग सागरिकाकडे बघत बोलला. सागरिका लाजली.

" पण तुझे काम?"

" ते मी करतो मॅनेज.. सध्या प्राधान्य सागरिकाच्या डान्स शो ला."

सागरिकाने झोकून डान्स करायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी मदतीला पराग होताच. परागच्या अपेक्षेप्रमाणेच सागरिकाने मस्त कमबॅक केले. ती जिंकली जरी नाही तरी तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळाला. प्रेक्षकांची सगळ्यात जास्त मतं तिलाच मिळाली होती. ते बघून आधीच्या जेवढ्या निर्मात्यांनी तिच्याशी बोलणं टाळले होते. त्या निर्मात्यांनी तिच्याशी परत संपर्क साधला होता. तिची मुख्य भूमिका असलेली नवीन मालिका सुरू होणार होती. त्या आधी पराग आणि सागरिकाचे धूमधडाक्यात लग्न झाले. मालिका सुरू असली तरी न चुकता सागरिका नृत्याचे कार्यक्रम करतच होती. तिचे जुने आयुष्य परत सुरू झाले होते अपवाद एकाच गोष्टीचा होता. आधी तिला न चुकता कसले ना कसले पारितोषिक मिळायचे. आता मात्र ते थांबले होते. हा सल काही केल्या जात नव्हता.

" एवढं सगळं होऊन सुद्धा राणीसरकार नाराज आहेत आज.." परागने तिची अस्वस्थता बघून विचारले.

" नाराज असे नाही रे.. पण एक गोष्ट खटकते आहे."

" बोलून टाका."

" मी जेव्हा नवीन होते तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव होत होता. आता काम मिळाले आहे पण चुकूनही कोणतेच पारितोषिक माझ्याकडे फिरकतही नाही. मला स्वतःलाच असं वाटतं आहे की मी कुठे कमी पडते आहे का?" सागरिका खूपच अस्वस्थ झाली होती.

" मला सांग तुला जाहिरातीची ऑफर येते? "

" हो.."

" तुझ्या डान्स शो ला गर्दी होते?"

" लोकांना बसायला जागा नसते."

" मग मला सांग, तुझा जर परफॉर्मन्स वाईट असता तर तुला हा प्रतिसाद मिळाला असता?"

" पण तरिही.. मलाही असे वाटते ना माझेही कपाट त्या बाहुल्यांनी भरावे. माझेही कौतुक व्हावे."

" मला सांग या बाहुल्या कोण देतं?"

" परीक्षक.."

" किती असतात?"

" ते पुरस्कारावर ठरते."

" मी शंभर धरतो. मग शंभर परीक्षकांना आवडलेली गोष्ट मोठी की हजार लोकांना?"

" मला नाही पटत." नाक उडवत सागरिका बोलली.

" पटेल.. एक दिवस नक्की पटेल." तिचे नाक ओढत तिला घट्ट मिठीत घेत पराग तिच्या कानात पुटपुटला. तिने समाधानाने डोळे मिटून घेतले.


" कसला एवढा विचार सुरू आहे?" विचारात दंगलेल्या सागरिकाच्या खांद्यावर हात ठेवत परागने विचारले.

" तू? कधी आलास? मला समजलेच नाही."

" कसे समजणार? तुम्ही तुमच्या या प्रतिमेकडे बघत बसला होता ना."

" सॉरी.. बस तू.. मी चहा ठेवते."

" चहा नंतर कर. काय झाले ते सांग आधी." पराग तिचा हात हातात घेऊन बोलला.

" पराग, ते राज्य पुरस्काराची माणसे येऊन गेली. आणि त्यांनी सूत्रसंचालन आणि डान्सची ऑफर दिली आहे."

" मग त्यात काय विचार करण्यासारखे?"

" पराग, मी जर चुकत नसेन तर यामागे आशाताई आहेत. त्यांनीच पाठवले असावे या लोकांना."

" या मागे कोणीही असले तरी निर्णय तुझा असणार आहे. "

" पराग, आजपर्यंत एकही पुरस्कार न मिळालेली मी अशा लोकांसाठी सूत्रसंचालन करू ज्यांनी मला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला?"

" सागरिका, हे एक वर्तुळ आहे. जिथून सुरुवात होते. तिथेच अंत होतो. ज्या लोकांनी तुला त्रास दिला आज त्यांनाच तुझ्या मदतीची किंवा प्रसिद्धीची गरज आहे. आता तू ठरव." पराग उठत म्हणाला.

" पराग.."

" काय?"

" हा कार्यक्रम झाला की आपण बाळाचा विचार करायचा.." पराग मागे वळला. त्याने तिचा चेहरा हातात धरला. तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला,

" तू म्हणशील तसे.. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे."

सागरिकाने कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली. खूप नाही पण काही महत्त्वाचे डान्स तिने करायचे मान्य केले. गश्मीरही तिला छान साथ देत होता. त्याने स्वतःहून तिच्यासोबत एक डान्स करायची तयारी दाखवली.

शेवटी कार्यक्रमाचा दिवस उगवला. नाही म्हटले तरी थोडेसे दडपण तिच्यावर होतेच. ते जाणून घेऊन पराग पूर्ण दिवस तिच्यासोबत राहिला होता. कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवर जाताच सागरिकाचे सगळे दडपण निघून गेले. ती तिच्या भूमिकेत शिरली. तिचे नृत्य, तिचे बोलणे याला प्रेक्षकांची छान दाद मिळत होती. या सगळ्यात ती स्वतःला हरवून बसली होती. तिला परागचे शब्द राहून राहून आठवत होते.. शंभर परीक्षक की हजारो प्रेक्षक? तिने शेवटचे नृत्य सादर केले. परत एकदा वन्स मोरचा आवाज आला. पण ती खूप थकली होती. ती काही बोलणार तोच गश्मीरचा आवाज आला.

"मला माहित आहे, तुम्ही सगळे घरी जाण्यास उत्सुक आहात. पण खास आग्रहास्तव एक शेवटचा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. तो पुरस्कार आहे सगळ्यात लोकप्रिय चेहरा. पारितोषिक देण्यासाठी मी बोलावतो माननीय आशाताई यांना."

गश्मीरची ही घोषणा खरेतर सागरिकासाठी धक्का होती. त्यात आशाताई. काहीच प्रतिक्रिया न देता ती विजेत्याच्या नावाची वाट बघू लागली. आशाताईंना बोलायला सुरुवात केली.

" आणि विजेती आहे तुमच्या सगळ्यांची सागरिका.." सर्वजण उठून उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. सागरिकाने प्रेक्षकांमध्ये पाहिले. मागे बसलेले तिचे आईबाबा आणि पराग यांच्या डोळ्यात पाणी होते. सर्वांना अभिवादन करत सागरिका पुढे आली. आशाताईंनी अभिनंदन करत तिच्या हातात बाहुली दिली. सागरिकाने बोलायला सुरुवात केली.

" खरंतर अनेक वर्षांनी हा पुरस्कार स्वीकारताना संमिश्र भावना मनात दाटून येत आहेत. हा नाकारून मला या पुरस्काराचा अनमान करायचा नाही. पण आज माझ्या नवर्‍याचे शब्द खरे ठरले. तुम्हा प्रेक्षकांचे प्रेम बघून मला माझा पैस गवसला आहे. मला समजले आहे की पुरस्कार जरी मनाला उत्साह देत असतील तरिही माझ्यासाठी तुम्हा सर्वांचे प्रेम हीच माझ्या कामाची खरी पावती आहे. तुमचे मनोरंजन करणे हेच माझे आभाळ आहे."



एका अभिनेत्रीचा प्रवास ही अचानक मनात आलेली संकल्पना. लिहिण्याचा माझ्यापरीने केलेला प्रयत्न. कसा वाटला ते सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all