" आत येऊ का?"
" कोण? " वाचत बसलेल्या सागरिकाने मान वर न करता विचारले.
" आवाजही ओळखत नाही का?" सागरिकाने मान वर केली.
" पराग.. तू??" सागरिकाचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता.
" नशीब नाव तरी लक्षात आहे." पराग हसत बोलला.
"सॉरी.."
" कशासाठी?" त्याने आश्चर्याने विचारले.
" खरंतर तू म्हणाला होतास म्हणून मी डान्समध्ये भाग घेतला. आणि कॉलेज संपल्यानंतर तुझ्या टचमध्ये नाही राहिले म्हणून." तिच्या डोळ्यात पाणी आले.
" अग वेडाबाई.. रडतेस काय?" पराग पुढे झाला. न राहवून ती त्याच्या मिठीत शिरली. तो आधी थोडा बिचकला पण हळूवारपणे तो तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. ती हमसून हमसून रडत होती.
" सगळं करिअर संपलं रे माझे. काहीच करता आले नाही.." पराग काहीच न बोलता तिला रडू देत होता. तिचा आवेग ओसरला. त्याने तिला पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर ती हसली.
" किती मूर्खपणा हा. तू माझ्या घरी आलास, मी तुला पाणी देण्याऐवजी तूच मला देतो आहेस."
" एवढ्या लहान गोष्टींचा विचार नाही करत मी. तू ही करू नकोस." पराग तिच्या हातावर थोपटत म्हणाला.
" तू आज अचानक कसा आलास?"
"त्याचे काय आहे तू बाबा पब्लिक फिगर.. तुझ्या आयुष्यात काय चालू आहे, काय नाही यावर लक्ष ठेवून होतो मी."
" मग आधी का नाही आलास?"
" मी नव्हतो इथे. बाहेरगावी होतो. गेले काही दिवस तुझ्या बातम्या वाचून तुझी काळजी वाटत होती. पण हातातले काम टाकून येऊ शकत नव्हतो. काम संपल्या संपल्या आलो लगेच. चालेल ना?"
" हो.. खरंतर.." बोलता बोलता मध्येच सागरिका थांबली.
" खरंतर काय? बोलून टाक. गेले कितीतरी वर्ष हे ऐकण्यासाठी आसुसलो आहे." पराग बोलत होता.
" काय ऐकण्यासाठी?"
" हेच की तुझे माझ्यावर प्रेम आहे.." पराग बोलला.
" तुला कसे माहित?" सागरिकाचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते.
" त्याचे काय आहे मॅडम. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं ना तरी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना दिसत असते."
" समजेल असं बोल ना.."
" तू निशाकडे जी माझी सतत चौकशी करायचीस ते मला समजत होते. मीच तिला तुला माझ्याबद्दल काही सांगू नको म्हणून सांगत होतो. त्यानंतर इतके वर्ष या फिल्डमध्ये असूनही तुझे नाव कोणासोबतही जोडले गेले नाही याने माझी खात्रीच पटली. "
" खूप दुष्ट आहेस तू.." सागरिका परागच्या छातीवर बुक्के मारत म्हणाली.
" जे हवं ते बोल. तू एवढी मोठी झाली होतीस. मला निदान स्वतःच्या पायावर तरी उभे रहायचे होते. तेवढा वेळ मला हवा होता. पण त्याआधीच मला यावे लागले."
" तू येईपर्यंत मी दुसर्या कोणाशी लग्न केले असते तर?"
" माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे." पराग ठामपणे बोलला. "आहेस तयार माझ्याशी लग्न करायला?"
" पराग... तुला असं नाही ना वाटत, माझं करिअर संपलं आहे म्हणून मी.."
" कसं ओळखलस तू? मला माहिती आहे तू स्वार्थी आहेस, दुष्ट आहेस.." पराग बोलत होता.
" पराग.." सागरिका परत रडायला सुरुवात करणार होती.
" अग वेडे, तुझ्यावर प्रेम आणि विश्वास दोन्ही आहे म्हणूनच तर आलो आहे ना तुझ्यासाठी.. आणि कोणी सांगितले तुझे करिअर संपले म्हणून? एखाद महिना काम मिळाले नाही म्हणून करिअर संपत असते तर बरेचजण घरीच बसले असते." पराग सागरिकाला समजावत म्हणाला.
कशी मदत करेल पराग सागरिकाला नव्याने उभी रहायला, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा