तिचा पैस.. भाग ३

कथा तिच्या आभाळाची
तिचा पैस.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की मालिकाविश्वात प्रवेश झालेल्या सागरिकाला तेच ते काम करण्याचा कंटाळा आला होता म्हणून ती दुसरीकडे काम करायची परवानगी घेते. आता बघू पुढे काय होते ते.


" काय ग आज सेटवर एवढी शांतता?" सागरिकाने आपल्या हेअरड्रेसरला, नीताला विचारले. तिने इकडेतिकडे बघितले. रूमचा दरवाजा लावला.

"मॅम, मी सांगितले आहे असे कोणाला सांगणार नसाल तर सांगते."

" बापरे.. केवढी खबरदारी. नाही सांगणार कोणाला. बोल पटकन." सागरिका हसत म्हणाली.

" मॅम, चॅनेलने तुम्हाला दिलेली परवानगी आशाताईंना आवडली नाही." सागरिकाच्या चेहर्‍यावरचे हसू मावळले.

" आशाताई? पण त्यांचा इथे काय संबंध?"

" तुम्हाला माहित नाही का? त्या आपल्या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. फक्त आपले नाव त्या कुठे येऊ देत नाहीत. त्यांना कलाकार म्हणूनच प्रसिद्धी आवडते."

" अग, त्या कलाकार आहेत ना? मग माझी घुसमट का नाही समजत त्यांना. टीआरपी मिळतो आहे म्हणून कथाही बदलत नाहीत की थांबवत नाहीत. लोक किती शिव्या घालतात. करणार काय अशावेळेस माणूस?" सागरिका पोटतिडीकेने बोलत होती.

" मॅम, यावर आमच्यासारखी माणसं काय बोलणार? आमचं आपलं एकच काम. कलाकारांची ठरलेली केशभूषा करायची. काम करायचं, पैसे घ्यायचे, बाजूला व्हायचं. आहे त्यात समाधान मानायचं."


" हे बदलायला नको का? आपण जर स्वतःला कलाकार समजतो तर थोडा चाकोरीबाहेरचा विचार नको का करायला? मला बघना.. सुरूवातीला नृत्य असणारी भूमिका होती, ते नृत्य करायलाच मिळत नाही. थांब.. इथे बोलण्यापेक्षा मी आशाताईंशीच जाऊन बोलते." सागरिका उठू लागली. नीताने तिला थांबवले.

" मॅम नको ना. मी तुम्हाला सांगितले हे कळले तर उगाचच माझ्यावर राग काढतील त्या. तुम्ही नंतर बोला ना."

सागरिकाला तिचे म्हणणे पटले. ती थांबली आणि थांबूनच राहिली. कथेत ट्विस्ट म्हणून तिच्या भूमिकेचा अपघात दाखवून तिची भूमिका अचानक संपवली गेली. सागरिकापेक्षा प्रेक्षकांनाच जास्त धक्का बसला. सागरिकाला वाईट वाटले. पण तसेही नवीन काहीतरी करायचे होते म्हणून तिने याला जास्त महत्व दिले नाही. ज्या निर्मात्यांनी तिला नवीन कामासाठी विचारले होते त्यांनीही बोलणी थांबवली. चोहोकडून अंधार दाटून आला. यामागे आशाताई होत्या हे तिला समजले होते. काहीच कारण नसताना त्यांनी असा डूख का धरावा हे तिला समजत नव्हते. खरेतर तिचे आणि त्यांचे ऑफस्क्रीन नातेही छान होते. दोघी खूप बोलायच्या. सागरिकाने त्यांनाही आपली अडचण सांगितली होती. तरिही त्यांनी असे का करावे तिच्यासाठी हे अगम्य होते. मनातले सगळे त्यांच्याशी जाऊन बोलायचे होते. पण तिचे राहिलेले पैसे देताना ज्या प्रकारे तिला वागणूक दिली गेली त्यावरून तिची कोणाशी बोलायची इच्छाच राहिली नाही. आईबाबांमुळे ती सावरत असली तरी तो धक्का तिला पूर्णपणे पचवता आला नाही. तिने बाहेर जाणे थांबवले, ती जे शास्त्रीय नृत्य शिकत होती ते ही तिने बंद केले. दिवसभर स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची. सगळं संपलं असं वाटत असतानाच आशेचा किरण बनून तो सागरिकाच्या आयुष्यात आला.


कोण असेल तो? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all