मागील भागात आपण पाहिले की सागरिकाला आपली सुरूवात आठवते आहे. बघू आता पुढे काय होते ते.
" तुला आवडेल का, आमच्या मालिकेत काम करायला?" विनयने विचारले.
" सर, मी?? मला याचा काहीच अनुभव नाही."
" हे बघ, सध्यातरी आमच्या मालिकेची गरज ही एका अशा अभिनेत्रीची आहे जिला नृत्य येते. भूमिका लहान असली तरी भाव खाणारी आहे. विचार कर. आम्हाला फ्रेश चेहरा मिळेल आणि तुला ब्रेक.. जास्तीत जास्त महिन्याभराचे शूटिंग असेल."
या शब्दांनी सागरिका भांबावली. एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे हे क्षेत्र खुणावत होते. तिने घरी घाबरतच हा विषय काढला.
" आई, आज कार्यक्रमाला ते विनयसर आले होते.."
" कोण विनय?"
" अशी काय करतेस? तू ती सिरियल बघतेस ना सतत तिचे दिग्दर्शक."
" दिग्दर्शकच ना? कोणी अभिनेता, अभिनेत्री असती तर आनंद झाला असता." आई हिरमुसली होऊन बोलली.
" आई, त्यांनी मला त्यांच्या मालिकेत काम द्यायची ऑफर दिली आहे." सागरिका घाबरतच बोलली.
" काय??? एवढी आनंदाची बातमी असं तोंड पाडून का देते आहेस? तू हो बोललीस ना?" आईचा आनंद गगनात मावत नव्हता.
" तुला आणि बाबांना विचारल्याशिवाय कशी हो म्हणीन?"
" हो ग.. माझा श्रावणबाळ.. लगेच फोन करून हो म्हणून सांग."
" आणि बाबा?"
" ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत? खरं सांगू अशा संधी खूप कमी मिळतात. नको वाया घालवूस. पण या मोहाच्या जगात पाय फक्त घसरून देऊ नकोस म्हणजे झाले?"
" कोणाचा पाय घसरला? कोण पडलं?" बाबांनी घरात येत विचारले. सागरिकाने आईकडे बघितले.
" ते सागरिकाला मालिकेत काम करायची ऑफर आली आहे. मी म्हटलं जा." आई बोलून मोकळी झाली.
" विचारायची पद्धत?" बाबांच्या आवाजावरून त्यांना पटले की नाही समजत नव्हते.
" बाबा, मी त्यांना काहीच नाही बोलले. तुम्हाला नको असेल तर मी नाही सांगते." सागरिका दुःखी स्वरात बोलली.
" लगेच फोन कर.. आणि सांग आमची तयारी आहे म्हणून.."
" बाबा.." सागरिकाला आश्चर्याचा धक्का बसला.
" हो. अग लहानपणापासून तुला बघतो आहे. आमच्यासाठी तू इतर काही न करता फक्त अभ्यास करायचीस. आता जर ही संधी समोरून चालून आली आहे तर आमच्यासाठी नकार देऊ नकोस. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस."
" हो बाबा.. आय लव्ह यू बोथ."
आणि सागरिकाचे पाऊल मनोरंजन विश्वात पडले. सुरूवातीला लहान असलेली तिची भूमिका वाढवली गेली. जिथे तिथे तिच्या सौंदर्याची, अभिनयाची आणि नृत्याची चर्चा होऊ लागली होती. यावर शिक्कामोर्तब तेव्हा झाले जेव्हा राज्य पुरस्कार खात्याने तिला सर्वोत्कृष्ट नवोदित चेहरा म्हणून पारितोषिक दिले.
शिक्षण पूर्ण झाले तरी एका महिन्यासाठी म्हणून सुरू झालेली मालिका अजूनही संपली नव्हती. दर वर्षी चॅनेलतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभात तिचे कोणते ना कोणते बक्षिस ठरले असायचेच. पण आता तिचेच मन त्यात रमत नव्हते. तोच ठरलेला सेट, तीच ती कारस्थाने. तिला काहीतरी वेगळे करायचे होते. तशीही इतर ठिकाणांहून कामासाठी सागरिकाला विचारणाही होत होत होती. तिला काही ठोस निर्णय घेता येत नव्हता. शेवटी चॅनेल हेडशी बोलून तिने त्यांची इतर ठिकाणी काम करायची परवानगी घेतली. तिची लोकप्रियता जाणून घेऊन त्यांनीही नाईलाजाने त्या गोष्टीला मान्यता दिली. चालू मालिकेतले काम सोडायचे नाही या बोलीवर.

सागरिका खूप खुश झाली. पण हीच गोष्ट तिच्या पुढच्या वाटचालीत अडथळा ठरणार होती हे तिला माहीत नव्हते. काय असणार तो अडथळा, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा