तिचा पैस..

कथा तिच्या आभाळाची


तिचा पैस..



"मॅम.. प्लीज नाही म्हणू नका.. आम्ही फार आशेने आलो आहोत इथे." राज्य पुरस्कार खात्याची माणसे बोलत होती.

" नाही म्हणायला, तुम्ही तुमचे काय का आहे ते सांगितलेच नाही." सागरिका मिस्किल हसत म्हणाली.

" ओह्ह.. मॅम आमची विनंती आहे की यावेळेस पुरस्काराचे सूत्रसंचालन तुम्ही करावे पण ते ही वेगळ्याच पद्धतीने."

" वेगळ्या म्हणजे कशा?" सागरिकाला आश्चर्य वाटले.

" वेगळे म्हणजे, जे पारितोषिक असेल त्या थीमवर आधारित नृत्य वगैरे.. म्हणजे तुम्ही नृत्यांगना आहातच, जमेलच तुम्हाला."

" तुमचे म्हणणे आहे, मी तीनचार तास समारंभात उभे राहून नृत्य करावे? आणि सूत्रसंचालनही?"

" मॅम अगदी पूर्ण वेळ नाही. तुमच्या मदतीला गश्मीरसरही असतील. बघा ना.."

" गश्मीर तयार आहे?"

" मॅम का नसतील? सध्या सगळ्यात जास्त टीआरपी फक्त आणि फक्त तुमच्याच मालिकांना आहे. इन फॅक्ट तुमचे नाव पुढे येताच त्यांनीच स्वतःहून तयारी दाखवली."

" मी विचार करून सांगते.."

" मॅम विचार नको.. मानधनाची अजिबात काळजी करू नका. फक्त हो म्हणा."

" मी कळवते तुम्हाला.." तिचे निरोपाचे शब्द ऐकताच ते उठले. ती त्यांना सोडायला दरवाजापर्यंत गेली. दरवाजा लावताच समोरच असलेल्या तिच्या फोटोकडे नेहमीप्रमाणे तिचे लक्ष गेले. एका छानशा नृत्यमुद्रेतला तिचा फोटो. तिच्या पहिल्या मालिकेतला. तो फोटो बघताच नकोशा आठवणी परत वर आल्या..


सागरिका.. शाळेतली एक हुशार विद्यार्थिनी. हुशारीचा ठप्पा असल्याने बाकी कधी काही केलेच नाही. फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. अभ्यास चालू असतानाच एक गोष्ट मात्र तिचे सतत लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे नृत्य. ती सतत नृत्यावर आधारित कार्यक्रम बघत असायची. घरी कोणी नसले की त्या स्टेप्स ती करून बघायची. स्वतःच खुश व्हायची. घरातून कोणी नाही म्हटले नसते तरी तिने कधीच नृत्य शिकण्यासाठी हट्ट केला नाही. सागरिकाची दहावी झाली. जात्याच सुंदर, त्यात नृत्य करून लवचिक झालेले शरीर.. कॉलेजमध्ये प्रवेश करताचक्षणी ती सगळ्यांच्या नजरेत भरली होती. अभ्यास एके अभ्यास हेच धोरण असल्यामुळे तिने कधीच कोणत्याच कार्यक्रमात भाग घेतला नाही. पण तिच्या एका मैत्रिणीला डान्सची स्टेप करून दाखवताना तिच्या एका सिनियरने तिला बघितले आणि कॉलेजच्या कार्यक्रमात तिचा डान्स ठेवला. आधी नको नको म्हणणारी ती त्यांच्या आग्रहाला बळी पडली. तिचा डान्स सुंदर झालाच. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या एका दिग्दर्शकाच्या पारखी नजरेला तिच्यातले सुप्त गुण समजलं आणि सुरुवात झाली सागरिकाच्या नवीन प्रवासाची..


नवोदित ते प्रस्थापित हा सागरिकाचा प्रवास कसा झाला ते बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all