तिचा निर्णय

Chivat Vicharanchi Uprati Shabdashabdat Janvli

विषय : स्त्रीला समजून घेणं खरचं कठिण असतं का?


कथेचे नाव : तिचा निर्णय

ईरा राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

टिम : भंडारा

-©शुभांगी मस्के...

बाळा अमोघ आम्हाला जावू दे... हटट् नको करुस, नको थांबवूस.. हात जोडते तुला... आम्ही का जातोय? तेवढं मात्र नको विचारुस...

तुझ्या प्रश्नाचं, उत्तर माझ्याकडे नसेल... तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे रे आमचं.. तू तर गुणी बाळ आहेस माझं.

अगदी शांतपणे, वृंदाताई लेकाला अमोघला जवळ बसवून, गावी जाण्याचा, त्यांनी घेतलेला निर्णय ... पक्का असल्याचं सांगत होत्या.

आम्ही आहोत एकमेकांसाठी, देव न करो.. विधात्याच्या हातून एखाद्याच्या आयुष्याची दोरी निसटली, तर मात्र जबाबदारी विसरु नकोस!! डोळ्यांच्या कडा पदराने पुसत वृंदाताई बोलल्या...

हो पण आई, झाल तरी काय? असा अचानक गावी जाण्याचा निर्णय??

तुला, कुणी काही बोललं का? स्वरुपा काही बोलली का? अगं तुझ्या लाडक्या नाती, अवनी आणि आर्वी कशा राहातील तुझ्याशिवाय... विचार केलायस का तू.. पोटतिडकीने बोलणा-या लेकराचं बोलणं ऐकून, वृंदाताईंचे डोळे पुन्हा डबडबले.

कुणी कशाला बोलेल.. आणि ठरलयं ना आपलं, दोन बायांत बोलायचं नाही स्वत:चं सँन्डविच करवून घ्यायच  नाही.. वृंदा ताई हळूच हसल्या, येत जात राहू की आम्ही, पण आत्ता नको थांबवूस... वृंदातााईंनी बोलता बोलता बँगा भरायला घेतल्या.

खरं तर गेल्या अनेक वर्षापासुन वृंदाताईंचा मुक्काम, इथेच अमोघच्या घरी पुण्यातच होता.. सामान असं एका बँगमध्ये येण शक्यच नव्हतं..

लेकासुनांमध्ये, गोडीगुलाबीने राहाणारी, नातींच कौतुक करता करता थकत नसलेली आपली बायको, कधीच कुणाकडून फार अपेक्षा न करणारी, वृंदा..अशी कशी वागतेय, विजयरावांना प्रश्नचं पडला होता.

जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षाचा सहवास दोघांचा, सर्व बाजूंनी विचार करणारी, वृंदा जे काही करेल त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं, विजयरावांना ठाम विश्वास होता, त्यांनी विचारुन बघितलं तरी, फायदा काहीच झाला नव्हता.. अखेर त्यांनी गप्प रहायचं आणि होतं ते बघायचं ठरवलं.


आता तुम्हाला वाटतं असेलच की, वृंदाताईंनी एकाएकी असा निर्णय का घेतला.. त्या अशा स्वार्थी का वागल्या असतील ते..

विजयराव आणि वृंदाताईंच लग्न झाल आणि वर्ष दोन वर्षात अमोघचा जन्म झाला..

विजयरावांची नोकरी सततच फिरतीची.. कोण्या एका ठिकाणी ठावठिकाणाचं नसायचा. अमोघच्या शिक्षणाच्या दृष्टीने, कुटूंब सोबत घेवून फिरणं अशक्य होतं. त्यामुळे वृंदाताई अमोघला घेवून तालुक्याच्या ठिकाणी राहायच्या. विजयराव अधुनमधुन येवून जावून असतं.

अमोघचं इंजिनियरिंग झालं आणि पुण्यात मल्टिनँशनल कंपनीत त्याला चांगली नोकरी ही लागली.

इंजिनिअरिंगला सोबत असलेली मैत्रीण, स्वरुपा.. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही कळलं नाही.

लेकरांच्या सुखात आपलं सुख शोधणा-या आईवडिलांनी कुठलेच आढेवेढे घेतले नाही. नाही म्हणायला तसं काहीच कमी जास्ती नव्हतं.. जोड्याला जोडा शोभत होता.

दोन्ही कुटूंबाच्या ,संमतीने दोघांच लग्न, मोठ्या थाटामाटात, पार पडलं आणि राजाराणीचा संसार सुरु झाला...

वृंदाताई आता विजयरावांसोबत त्यांच्या कामाच्या जागी राहू लागल्या. एवढ्या वर्षात कधिच, दोघांना एकमेकांसाठी असा, वेळ देता आलाच नव्हता, आता मात्र दोघे ही एकमेकांसाठी जगत होते.

एक दिवस, सौरभचा फोन आला.. स्वरुपा आणि अमोघकडे गुड न्युज होती... स्वरुपाच्या कुशीत जुळी बाळ वाढत होती.. स्वरुपाची काळजी घेण गरजेचं होतं....

फोन कॉल आल्याआल्या, वृंदाताईंनी आपली बँग भरायला घेतली, विजयरावांनी ही कुठलेच आढेवेढे न घेता... वृंदाताईंना अमोघकडे पुण्यात पोहचवून दिलं..

स्वरुपाला खूप आनंद झाला... वृंदाताई तिची लेकीप्रमाणे काळजी घेवू लागल्या, गोडीगुलाबीने तिचे डोहाळे पुरवू लागल्या. तिचं हवं नको ते बघण्यात आता त्यांचा वेळ कसा जायचा त्यांनाही कळायचं नाही.

स्वरुपा आणि अमोघची, संसारवेल अवनी आणि आर्वी, दोन गोड प-यांमुळे छान बहरली होती.. दोघींच्या बाललीलांमध्ये दिवस कसे सरले आणि पाहाता पाहाता दोघी, आठ वर्षाच्या झाल्या..

इकडे, विजयराव ही रिटायर्ड झाले... आता रिटायर्ड लाईफ छान एंजॉय करा... आजवर आमच्यासाठी खूप झटलात, आता स्वत:साठी जगा... म्हणत अमोघ आणि स्वरुपाने विजयरावांच्या सेवनिवृत्तीची छान जंगी पार्टी आयोजीत केली होती.

आता विजयरावांना निवांत वेळ असायचा. वेळ आता जाता जात नव्हता. वृंदाताई सतत कामात असायच्या, त्यामुळे कधीकधी त्यांची चिडचिड ही व्हायची.

सकाळी स्वत:चं तेवढ्यास तेवढं आवरुन, साडे आठच्या ठोक्याला, बाहेर पडलेली स्वरुपा सायंकाळी,सासूबाईंचा स्वयंपाक आटोपल्यावलचं घरी यायची.

नातींना जेवनाचा डब्बा देण्यापासुन आल्यानंतर त्यांचं आवरुन त्यांना ट्युशनला पाठवणे, त्यांना अभ्यासाला बसवणे, त्यांच खाणपीण बघणे ही जबाबदारी वृंदाताई एकहाती पेलत.

सगळे आपआपल्या कामाला निघून गेल्यावर उरलेली सगळी आवराआवर, करण्यात वृंदाताईंचा बराच वेळ जायचा..

बसं गं जरा दोन मिनिटं, विजयराव कधीकधी मधुनचं स्वत:जवळ बसण्याचा आग्रह करीत. सायंकाळी, बगिचात जावून कधी, उगाच भेळ पाणीपुरी खावून उशिरा घरी याव, विजयरावांना वाटत असलं तरी काही केल्या ते शक्य नव्हत..

दिवसभ-याची आवराआवर, रात्रीचा स्वयंपाक, वृंदाताईंची वाट बघत असायचा..

आजकाल उगाचं स्वरुपाची चिडचिड होत असल्याच स्वरुपाच्या वागण्या बोलण्यावरुन वृंदाताईंच्या लक्षात आलं..

छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष ही एव्हाना एवढ्या वर्षात वृंदा ताईंना करता येवू लागलं होतं.

आतापर्यत, वृंदाताईंच्या खोलीत आजी सोबत झोपत असलेल्या, अवनी आणि आर्वीची जागेअभावी, रवानगी स्वरुपाच्या रुममध्ये झाल्यापासून, तिची प्रायव्हसी नष्ट झाल्यासारखं तिला वाटू लागलं होतं.

आई, तुम्ही कधी बाबांच्या पायाजवळ कधी डोक्याजवळ बसल्या असता, त्यांचं डोकं काय चेपता पाय दाबून देता.. पोरी मोठ्या होतायत, बरं दिसते का ते? आणि तुमचे दुखल्यावर चेपून देवू शकतील का बाबा तुमचे पाय.

पोरींनी नेमकं ह्यातून काय शिकावं?
स्त्री पुरुष समानता... वगैरेचा पाठ, स्वरुपाने वृंदाताईंना पढवला.

स्वरुपाच्या शब्दात, पोरींविषयीची चिंता असती तर एकवेळ वृंदाताईंनी मान्य ही केल असतं, पण....फक्तच चिवट विचारांची उपरती स्वरुपाच्या शब्दाशब्दात जाणवत होती, वृंदाताईं स्वरुपाचे वागणं खटकलं... ह्यावर काहीच न बोलण्याचं त्यानी ठरवलं...

आला दिवस, छोट्या मोठ्या गोष्टींवर दुर्लक्ष करत पुढे सरकवल्या जात होता.

सासूबाई होत्या तोवर ठिर गं, पण आता सासरे ही आलेत, कठिण झालयं सगळं.. कामाची कमी आणि बिनकामाची माणसं जास्ती झालीय घरात आमच्या.

जरा म्हणून शांती नाही डोक्याला, डोक्याचा पार भूगा झालाय भूगा... एक दिवस, स्वरुपाचं फोनवरचं बोलणं ऐकून वृंदाताई अस्वस्थच झाल्या.

आपली उगाच दुस-यांना अडचण नको.. जवळ राहून, मतभेद आणि मनभेदांना खतपाणी घालून, मन कलुषित करण्यापेक्षा.. दूर राहून मन जपल्या जाण्याचा निर्णय वृंदाताईंनी घेतला.

मित्र मैत्रिणींनो, आता तुम्हीच सांगा. वृंदा ताईंचा निर्णय बरोबर होता की चूक....

विजयराव आणि वृंदाताई, दोघेही गावाला जायला निघाले. लक्ष दे गं पोरींकडे, त्यांच खाणपिण बघ.. बाहेरचं फार पचत नाही त्यांना..त्यांना घरचं लागतं सगळं. घरातून निघेपर्यत एक एक गोष्ट, त्या स्वरुपा आणि अमोघच्या कानी टाकत होत्या..

सगळं वरवर छान दिसतं असलं तरी, आईच्या निर्णयाने घरात कुणीच आनंदी मात्र नव्हतं.. खरं तर स्वरुपा ही खुश नव्हती.. आजवर बिनधास्त घराबाहेर वावरणा-या स्वरुपाला अनेक प्रश्न पडले होते? आणि ते तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होत. 

अमोघने कारमध्ये बँगा भरल्या, आईबाबांना रेल्वे स्टेशनपर्यत सोडून दिल. चेहरा उतरवून बसलेल्या नातींना समजावता समजावतं सर्वांचीच पुरेवाट झाली होती.


ट्रेन आली तशी, आतापर्यत रोखून धरलेल्या, अश्रूंनी गर्दी केली. येते गं बाळा म्हणत, वृंदाताईंनी सर्वांचा निरोप घेतला. 

स्त्रीला समजून घेण खरचं अवघड असतं, डोळ्यातल्या ओघळणा-या अश्रूंकडे बघत विजयराव पुटपुटले..

विजयरावांच्या चेह-यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह, वृंदाताईंनी काहीच न बोलता वाचलं आणि मनोमन पुटपुटल्या.. काहीही झालं तरी, माझ्या जीवात जीव आहे तोवर, तुमचा अपमान झालेला मला सहन व्हायचा नाही...

वाचक मित्र मैत्रिणींनो, छोट्या छोट्या गोष्टींवरुन घरात मतभेद होतात , भांड्याला भांड लागलं की आवाज होणारचं म्हणत... सासू सुनांमध्ये रुसवे फुगवे ही काढले जातात. अनेकदा घरकामात मदत करणारी सासू, सुनांना जड वाटतं नाही मात्र दिवसरात्र घरात फक्तच बसून असलेले सासरे अवजड वाटायला लागतात.
वृंदाताईंनी घेतलेला निर्णय अनेकांना आवडला नसेल पण आजवर.. घरपरिवारासाठी खस्ता खाललेले दोघे.. आपल्या कर्तव्याशी पूरुन उरलेल्या दोघांना.. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतं असेल, एकमेकांप्रती काळजी वाटत असेल, त्यात गैर ते काय? 
कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करुन सांगा.. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असुच शकतात, जाणून घ्यायला नक्की आवडतील.
-©®शुभांगी मस्के...