तिचा कृष्ण

कथा एका मीरेच्या कृष्णाची..


तिचा कृष्ण

गोष्ट छोटी डोंगराएवढी..



" बरे वाटले तुला? झाले तुझे समाधान? हेच हवे होते ना तुला? बाकीच्यांना हवी ती मदत कर.. मला कशी करशील? मी दोडकी ना तुझी?" ती भरभरून त्याच्याशी भांडत होती..
" का? आता का गप्प बसलास? माझी बाजू खरी आहे म्हणून? की तुला असे वाटते मी नेहमीप्रमाणेच गप्प बसून सगळ्यांचे ऐकून घ्यावे?" तिच्या डोळ्यांना धार लागली होती. पण तो फक्त तिच्याकडे बघत होता. चेहर्‍यावर नेहमीचे खेळकर, मिस्किल हसू..
" मला ना आता या सगळ्याचाच वैताग आला आहे. असे वाटते जाऊन जीव द्यावा. तेच करते मी. तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? तू तर फक्त एक मूर्ती आहेस.. फक्त एक मूर्ती.."
मीरा.. एका लहानशा शहरात राहणारी विवाहित स्त्री. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी गुपचूप लग्न केले. सासरी झालेला सगळा त्रास सहन केला, करत आली.. कारण तिच्यासोबत होता तिचा कृष्ण. तिच्या आजीने दिलेला.. तिची आजी कलावतीआईंची भक्त होती. त्यांची अनेक पुस्तके ती आणायची. आजीने पुस्तके आणली रे आणली की मीरा त्यावर तुटून पडायची. त्यातलाच कृष्ण तिच्या मनात रुतून बसला होता.. त्याचे हसणे, बोलणे ती जगायला लागली होती.. मोठी झाल्यावर तिने युगंधर आणि मृत्युंजय दोन्ही पुस्तके आधाशासारखी वाचून काढली होती. त्यानंतर तर तिने त्याच्याशी बोलायलाही सुरुवात केली. कर्णाच्या बाजूने तो उभा राहिला नाही म्हणून ती त्याच्याशी भांडलीही होती. कोणतीही गोष्ट ठरवताना आधी ती त्याला विचारूनच निर्णय घ्यायची. तिचे हे कृष्णप्रेम तिच्या घरी , मित्रमैत्रिणींना माहित होते. ते ही त्या सगळ्याचा आदर करायचे.
पण सासरी तसे नव्हते. लग्नानंतर तिला जायचे होते गोकुळ, मथुरा, वृंदावन इथे. तिच्या कृष्णाला भेटायला. नवर्‍यानेही तिच्या भावनांना महत्त्व देत तशी आखणी केली. लोकांसाठी ते दिल्लीच्या आसपास गेले होते. पण त्यांनाच माहित होते खरे काय.. तिथे तिला एक अतिशय सुंदर कृष्णाची मूर्ती मिळाली. त्या दिवसापासून तिच्या अमूर्त भक्तीचे रूपांतर मूर्त रूपात झाले. हे तिच्या सासरच्या इतर मंडळींना खटकायला लागले तशी त्या दिवाणखान्यात ठेवलेल्या मूर्तीची रवानगी तिच्या बेडरूममध्ये झाली. त्याचे तिलाही काही वाटले नाही ना तिच्या कृष्णाला. आपली सगळी सुखदुःख ती त्याच्यासोबत वाटून घेत होती. पण आता आता सगळे तिला असह्य व्हायला लागले होते. सासूबाईंचा हेकेखोरपणा, सासर्यांचा माझे तेच खरे करण्याचा स्वभाव , नवर्‍याचा अलिप्तपणा, वयात आलेल्या मुलांचा त्रास तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. त्यात भरीस भर म्हणून ती जिथे कामाला जायची तिथेही तिच्या सहकाऱ्यांनी असहकाराचे धोरण स्वीकारले होते, कारण होते तिला मिळालेले प्रमोशन. त्याचा त्रास तिला इतका होत होता की काहीच सुचत नव्हते. तो राग अर्थातच कृष्णावर निघाला. ती तिथून तावातावाने बाहेर जाणारच तोच तिला आवाज आला.
" माझा निरोप न घेताच निघणार?" तिने पाठी वळून पाहिले. तिचा कृष्ण समोर उभा होता. हातात मुरली, डोक्यावर मोरपीस, गळ्यात वैजयंतीमाला आणि चेहर्‍यावर तेच हसू. तिचा चेहरा फुलला. तेवढ्यात तिला आठवले. आपण तर याच्यावर चिडले आहोत. ती तशीच उभी राहिली.
" अरे बापरे. ही तर फारच कठीण समस्या आहे. काय करू मी?" त्याने पुस्ती जोडली. मनात नसतानाही तिला हसू आले. तो तिच्याजवळ आला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने कृतार्थतेने डोळे मिटून घेतले.
" वेडी ग वेडी. एवढ्याशा गोष्टींसाठी कोणी जीव देते का?"
" तुझ्यासाठी एवढीशी गोष्ट असेल. माझ्यासाठी नाही. तू कधी ऐकलेस लोकांचे टोमणे?" तिने रागाने विचारले.
" रणछोडदास तर मला लोक प्रेमाने बोलतात."
" तुला काय माहित, नातेवाईक कसे टोमणे देतात."
"बरोबर. माझा मामा तर माझ्या स्वागतालाच उभा होता माझ्या जन्माच्या वेळी.."
" नवरा आणि मुले यांचे वागणे तर सहन होत नाही. आपला जोडीदार आपल्याला समजून घेऊ शकत नाही याचे फार दुःख होते कधीकधी."
" मला तर फक्त आठ बायका होत्या. सोळा हजार शंभर स्त्रियांचे पुनर्वसन करायचे होते. आणि माझा सांब तर?? माहित आहे ना?" काय बोलावे ते मीराला सुचेना.
" तू द्रौपदीला, अर्जुनाला जशी मदत केलीस तशी मला का नाही करत कधीच. तुलाही मी आवडत नाही ना?"
" अग.. मला सांग बरं मी कधी मदत केली आणि काय वेगळे केले? त्यांनी माझी भक्ती केली मी फक्त त्यांच्या पाठिशी उभा राहिलो. मला सांग दुर्योधन, दुःशासन यांना मी मारले का?" मीराने नकारार्थी मान हलवली.
" मग मी काय मदत केली? मी फक्त त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. आणि त्या अन्यायाविरुद्ध लढायला मदत केली. ती तर मी तुलाही करू शकतो. पण झाले आहे कसे, तुम्हाला सगळ्यांनाच सवय लागली आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. मग मी ही ठरवले, की सगळे आयते का द्यायचे. उठा, लढा. मगच मी तुमच्या पाठिशी राहीन."
" पण मी वरिष्ठांना उलटं कसं बोलू? घरातल्या, बाहेरच्या?"
" हेच शिकलात का माझ्याकडून? ज्येष्ठ जरी चुकत असतील तरी मी ते सांगायचे धारिष्ट्य केले. लहान चुकत असतील तर त्यांना वठणीवर आणले. आपले सहकारी कितीही अनुभवी असले तरी त्यांची चूक त्यांच्या पदरात घातली, अक्रूरकाकांसारखी. अजून काही?"
" तू काही बोलायला बाकी ठेवतोस का? सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असतात तुझ्याकडे."
" उत्तरे कधी मिळत नसतात ग ती शोधावी लागतात.. आता बघ ना.. हा जो मी आहे तो तुझ्यातच दडलेला आहे. तुझ्या मनात. पण तू तो शोधते आहेस बाहेर कुठेतरी. कोणीतरी येईल तुझ्यावर झालेला अन्याय दूर करेल ही अपेक्षाच ठेवू नकोस.. तू उठ. तुझ्या आतला मी सदैव तुझ्यासोबत असेन.."

मीराने डोळे उघडले. मगाच्या सगळ्या भावनांचा निचरा झाला होता. ती खूप शांत झाली होती. कारण तिला तिच्या आतला कृष्ण भेटला होता.. ती एका नवीन विश्वासाने बाहेरच्या जगात लढायला गेली..

आतल्या कृष्णाच्या मूर्तीच्या चेहर्‍यावरचे अवखळ हास्य मात्र उठून दिसत होते..


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई.

Picture credit.. Kashmira Kandalgaonkar