तिचा काय दोष? कुंकू तर बालपणीचं आहे ना...

काही बदल आवश्यक आहेत ..एक पाऊल प्रत्येकाने उचलले पाहिजे...
अग वर्षा,अस कसं म्हणतेस ग तू?त्यांना नसेल का वाटत की आपणही नटाव, छान तयार व्हावं कारण त्यांनाही मन आहे ग!

अग हो गार्गी, आहे मन त्यांना पण त्या नाही ना अस काही काही गोष्टी करू शकत अजूनही ..समाज मान्यता नाहीये अजूनही काही ठिकाणी अशा गोष्टींना...

वर्षा, अग पण का आणि किती दिवस त्यांनी हे सहन करायचं मन मारून जगणं?

अग समाज अशा गोष्टींना मान्य करत नाही अजुनही ...

कोण समाज ग? तोच ना समाज जो अशा स्त्रियांना जेव्हा खरी गरज असते सहकार्याची तेव्हा फक्त पाठ फिरवतो आणि वर जर का एखाद्याने कोणी मदत केली त्यांना तर नावही ठेवणार हे सो कॉल्ड समाजातील लोक...

आता हेच बघ ना संक्रांती सारखा गोड सण अस एकीकडे म्हणतो आपण आणि त्या स्त्रियांना सन्मान तर बाजूलाच पण त्यांचा नकळत अपमानच करतात की त्यांना परंपरा आणि रुढीची भीती घालून...

मी मात्र यावेळी ठरवलं आहे वर्षा, की सोसायटी च्या संक्रांत हळदीकुंकू करणार तेव्हा ते सगळ्या महिलांसाठी असेल अस मी मत मांडणार आहे...त्यात मुली, सुवासिनी आणि विधवा स्त्रिया ही असतील..अग काय हरकत आहे त्याही जरा छान तयार होऊन अशा समारंभात सगळ्या स्त्रियांच्यात मिळून मिसळून आल्या आणि जरा वेगळं काही तरी एन्जॉय केलं म्हणून ..यायचं की नाही हे त्या ठरवतील आपण मात्र बोलवलं पाहिजे...

बर बाई गार्गी तू कर तुला काय मनात आहे ते..

हो मी करणारच आहे ...
अग गेल्या वर्षीच माझी रोजची बाई आहे ना, कोरोना मुळे तिच्या नवऱ्याच निधन झालं आणि काही दिवसातच बिचारी परत कामाला येवू लागली...तेव्हाही तिला नाव ठेवलीच तिच्या नातेवाईकांनी पण तिने काम नसतं केलं सुरू तर तिची मुलं उपाशी राहिली असती ना...
तिला दर वर्षी संक्रांतीला मी हळदीकुंकू लावून गजरा आणि वाण देत असे, यावर्षीही मी तिला दर वर्षी प्रमाणे हळदीकुंकू लावून वाण ही दिलं..अक्षरशः रडत रडत मीठी मारली ग मला...म्हणाली ताई अहो कशाला हा मान मला? मी तर अशी आहे आता उगाच तुम्हाला नी मला पाप लागेल ...मग मी समजावलं तिला ..अग तुला चालेल ना मी कुंकू लावलेलं मग झाल तर...काही नाही पाप लागत...नको काळजी करू आणि रडू नको...

अग दर वर्षी किती छान नटून यायची काही सण असला की आणि इतकी काम करूनही नवीन साडी सणासुदीला नेसून यायची, अगदी हसतमुख आणि टापटीप,...

अग कदाचित या गोष्टीला मला नाही प्रतिसाद मिळणार आणि ज्या विधवा स्त्रियांना मी बोलवेन म्हणते त्यांनाच कदाचित नको वाटेल अस येणं किंवा त्यांना कुंकू लावताना नको वाटेल पण तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे,  आपण मात्र एक पाऊल सर्वांनी मिळून उचलणे गरजेचं आहे हे नक्की ...

आता तसही कित्येक गावात विधवा प्रथा बंद करण्याचे पाऊल उचललं जात आहे...आता काही गावात पुरुष लोक ही पुढाकार घेतात आणि काही स्त्रियाही पुढाकार घेत आहेत ही प्रथा बंद करण्यासाठी...


एखादीचा पती देवाघरी गेला की तिचं मंगळसूत्र काढायला लावयाच , बांगड्या काढायच्या आणि सगळ्यात भयंकर म्हणजे तिचं कुंकू पुसायच...तसही कुंकू तर अगदी लहानपणापासून आपण लावतो मग ते का नंतर नाही लावायच आपण?
किती भयानक आहे ना हे सगळ...पण आता काही गावातून ही प्रथा बंद करण्यात आली आहे.. खरचं एक खूप चांगलं पाऊल आहे हे...


हो ग गार्गी, खरचं ह्या प्रथा खूप भयंकर आहेत आणि त्या स्त्रीला त्रासदायकच खर तर...अग शहरात हल्ली नोकरीला जायचं ,एकटीने प्रवास करायचा आणि काही वेळेला तर खूप उशिरा एकटीने घरी यायचं मग स्त्री मंगळसूत्र घालते आणि टिकली ही लावते पण गावात अस होत नसे खरतर पण आता हे एक चांगलं पाऊल उचलत आहेत गावात ही...

आणि वर्षा, मला अजून एक गोष्ट खटकते ती, म्हणजे सण, उत्सव, लग्न यातही अशा स्त्रियांना सामावून घेतलं पाहिजे...
अग गार्गी, मग असतात की लग्नकार्यात अशा स्त्रिया...
अग वर्षा, हो असतात, मान्य मला ...म्हणजे त्यांना बोलवतातही लग्न कार्यात पण त्यांना फुल गजरा द्यायचा नाही, काही  दिवा ओवाळण असेल किंवा काही असेल तर या मागे मागे असतात कारण त्यांनी ते करायचं नसते...

इतकचं कशाला अग एखादा साठी शांत किंवा पंच्याहत्तरी वाढदिवस असेल तरी यांना पटकन बोलवत नाही पुढे दिवा ओवाळायला आणि औक्षण करायला...

अग हल्ली म्हणून तिळगुळ समारंभ अस काही सार्वजनिक ठिकाणी नाव देतात..म्हणजे शाळेत मुलांच्या आई, किंवा एखाद्या सामाजिक संस्थेत तिळगुळ समारंभ अस नाव देतात आणि मग अशावेळी सगळ्यांना येता येत पण हळदीकुंकू म्हटले की थोडी बंधन येतातच ...

खरचं आहे ना कितीही बदल झाले तरी असे छोटे छोटे बदल जे मनाचा विचार करणारे असतील असे झाले तर किती तरी मन आनंदित होतील आणि पुन्हा एकदा छान आयुष्य त्यांना जगावस वाटेल..नाहीतर कोण काय म्हणेल आणि मी हे कसं करू यात खूप मोठं नुकसान होत असत आणि ते फक्त त्या स्त्रीचे नाही होत तर तिची मुले, तिच्या घरचे सगळ्यांनाच तिची अवस्था बघून खूप त्रास होत असतो...

थोड फार सगळ्यांनी बदललं तर नक्कीच एक दिवस सकारात्मक बदल होईल आणि ह्या स्त्रिया ही त्यांचं मन मारून जगणं थांबवून मनाप्रमाणे जगू लागतील अगदी आनंदाने आणि स्वतः च्या मनाला पटेल तस त्यांच्या मर्जीने...आणि तसही त्यांनाही मन आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून आनंदाने रहाण्याचा हक्क आहेच की...काय पटतय ना तुम्हालाही...

अशा प्रथा अजूनही काही ठिकाणी चालू आहेत आणि त्या बंद होण्यासाठी प्रत्येकाने एक एक पाऊल पुढे टाकून सगळ्यांनी प्रयत्न करणे मात्र खूप गरजेचं आहे...नाही का??

©️®️शुभदा घाणेकर रिसबूड✍️
* जर तुम्हाला माझे लेख वाचून आवडत असतील तर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि लाईक व कमेंट मधून तस सांगितल तर अजूनच छान! जे मला नवीन लिखाणासाठी प्रोत्साहित करणारं असेल. माझा लेख आवडला तर नावासह शेअर करू शकता...