तिचा कान्हा

ती आणि कान्हा

                               तिचा कान्हा    

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय : ... आणि कृष्ण भेटला

नक्की कसं अन् काय होतं हे तर तिलाच माहीत, पण जे काही नातं होतं ते अगदी सच्चं आणि स्वच्छ होतं. ती आणि तीचा कान्हा ! 

मैत्रिणी तिला वेडी म्हणायच्या. का ? तर ती दिवसरात्र त्या कान्हाच्या नामात गुंग असायची . उठता बसता तिला सारं काही त्या लाडक्या कान्हाला सांगायचं असायचं. तिने काय केलंय पासून ते तिला काय करायचं आहे इथपर्यंत सगळंच तिला त्याला सांगायचं असायचं. मनात काही शंका असतील तर त्या "त्या"लाच आणि मनातील सारे समज-गैरसमज पण त्यालाच. पुस्तक असो की कपाट, मोरपंख तर हमखास पाहायला मिळणार. मनातील त्याची छबी तर जणू कायमस्वरूपी कोरली गेलेली. खरा सखा होता तो तीचा !

खरंतर आजूबाजूच्या वातावरणात तिला नेहमीच फसवे लोक भेटले नि फसवे अनुभव आले. घरात फार काही जिव्हाळा कधी जाणवलाच नाही. आणि मैत्रपरिवार सुद्धा कधी तो जिव्हाळा जपता येईल असा भेटला नाही. बरं जिव्हाळा तर नाहीच पण स्वार्थ साधण्यासाठी जवळ आलेले मात्र कित्येक ! मग तिचं मन कधी रमलचं नाही त्या वातावरणात. या सगळ्यात तिला सोबत करणारा फक्त एकच होता, तो म्हणजे तिचा "कान्हा" !

'कान्हा बघ ना रे हे काय झालं?', 'कान्हा हे असं का रे ?', पासून 'कान्हा तुला माहितीये आज काय झालं?' पर्यंत सगळं कान्हाच्या गाभाऱ्यात पोहचायचं. आणि दिवसाचा शेवट तर ठरलेल्या ओळीने व्हायचा ती म्हणजे 'कान्हा तू तर बेस्ट आहेस'. एकांतात तर भरमसाठ गप्पा व्हायच्या तिच्या, अर्थात तिच्या हक्काच्या सख्यासोबतच ! पण मग भर गर्दीतही जेव्हा ती तिच्या त्या सख्यासोबत रममाण व्हायची तेव्हा त्या नात्याला नाव दिलं जायचं ‌वेडाचं ! आता त्या सभ्यतेचा मुखवटा धारण केलेल्या स्वार्थी गर्दीला कोण बरं समजावून सांगेल या निःस्वार्थ मैत्रीची, निरागस नात्याची व्याख्या ?

एक मात्र नक्की होतं की तिचा हा सखा नेहमी तिच्या मदतीला धावून यायचा. मित्र म्हणून ऐकूनही घ्यायचा अन् मार्गदर्शक म्हणून योग्य दिशा सुद्धा दाखवायचा. आनंदाच्या क्षणी तो आनंद ज्याच्याकडे व्यक्त करावा वाटेल असा सोबतीही व्हायचा आणि दुःखाचा डोंगर रिता करण्यासाठी हक्काचा कोपराही व्हायचा. एकूणच काय तर तिचा हा हक्काचा सखा सोबती कृष्ण तिला रोजच भेटायचा. खास दिवस बघून भक्ती दाखवणारी न होता, रोजच त्याला हक्काने आर्जव करणारी आणि त्याच्यासोबत मनमुराद गप्पा मारणारी सखी त्याला तरी का नकोशी असेल नाही का ? 

-©® कामिनी खाने.