तिचं जग (अंतिम भाग)

कथा मालिका


तिचं जग ४

नंदिनी तिचा एक एक शब्द कान देऊन ऐकू लागली. नव्हे अभिजीत आणि त्याचे आई वडील देखील सोबत होते. सगळ्यांच्याच डोळंयात अश्रू उभे राहिले.

"मी राज काकांच्या मित्राकडे राहू लागली. एक दोन दिवस नीट गेले आणि मग सुरू झाली आयुष्याची उलटी गणती. सुरू झाला छळ. माझ्या कडून भरपूर कामे करून घेतली जाऊ लागली. त्यात ते काका माझ्यासोबत... शी! मला सांगताना सुध्दा लाज वाटते."

"रेश्मा तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या सोबत."

नंदिनी काही क्षण अभिजीतकडे बघत होती.

अभिजीतने डोळ्याने तिला दिलासा दिला.

एक आवंढा गिळून.. परत बोलू‌ लागली. मला हळुहळु वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. पायात घुंगरू बांधून मला तमाशात नाचायला लावू लागले. त्यांना फक्त पैसा हवा होता. आधीच मी दिसायला सुंदर आणि वयात आलेली. पण, ना माझ्या मनाचा,ना शरीराचा विचार कोणीच करीत नव्हते. काही वर्षं त्यांच्या सोबत अनेक गावोगावी फिरले. ते कधीच मला एकटीला सोडतच नव्हते. पण,त्यानंतर मला वेगळे फड उभे करण्यास सांगितले. मला वाटलं आता आपली सुटका होईल. पण, कसलं काय? त्यांची दोन माणसे सतत माझ्यावर लक्ष ठेवत होते. पण, परवाच्या तमाशात जो काही गोंधळ झाला. त्यामुळे ते दोघेही घाबरून पळून गेले आणि मी अडकले.

तरीही मी मात्र एक एक दिवस काकांची वाट बघत होते. कधीना कधी तो परत येईल. या आशेवर मी होते. पण, आजपर्यंत तो परतलाच नाही. गेली दहा वर्षे झाले मी वाट बघतेय. काकांनी घरी काय सांगीतले माहिती नाही. कारण, आईबाबा मला भेटायला आलेच नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही कि नाही? त्यांनी माझा शोध का नाही घेतला?

"मी हरले होते. माझ्या आयुष्यात अंधार झाला होता. पण, नंदिनी ताई आज तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन परत मंद प्रकाशाची वाट मोकळी करून दिली."

"रेश्मा तू आजच माझ्या सोबत चल. आपण पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवू."

"तुझे गाव कोणते गं ?" नंदिनीच्या सासुबाईंनी विचारले.

"मी मराठवाड्यातील. गंगापूर तालुक्यातील एका तांड्यावर राहणारी."

"ठीक आहे. आता जेवण करून घेऊ. मग पोलिस स्टेशनला जायचे आहे."

"हो मी पण येणार तुम्हां दोघींसोबत." अभिजीत बोलला.

अभिजीतचा आधार नंदिनीला स्वतः च्या लढाईत पाठिंबा देत होता आणि इथेच नंदिनी अर्धी लढाई जिंकली होती.

पोलिसांनी ताबडतोब त्या गावात जाऊन चौकशी केली आणि तिच्या काकांना पकडले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि रेश्माला सुखरूपपणे तिच्या आई बाबांच्या ताब्यात देण्यात आले.


आई वडीलांना बघताच डोळ्यांत अश्रू ओघळले. इतक्या वर्षांचा विरह कोणालाच सहन होत नव्हता. आजी आजोबा आणि दोन्ही भावांना देखील खूप आनंद झाला. रडतांना सुध्दा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

"आई, बाबा तुम्ही माझा शोध का नाही घेतला."

अगं, आम्ही सगळीकडे शोधले. मुंबईला सुध्दा आलो होतो. तुला राजने ज्यांच्या घरी सोडले तिथेही जाऊन आलो. पण, त्यांचा काहीच अतापता नव्हता. पोलिस स्टेशनला तक्रार करु म्हटले. तर राज हातात पाया पडून माफी मागत होता.

"दादा वहिनी, रेश्मा कधीच परत येणार नाही. कारण, तिच्या हातून चुक घडली होती आणि म्हणून तिने ट्रेन खाली उडी मारून स्वतःला संपवले."

"राजने आम्हांला जे सांगितले ते फार भयानक होते. हा धक्का आम्ही सहन करू शकतच नव्हतो. पण, गावातही उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. आम्ही तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले.‌ काही दिवसांतच आमची जीवनाची वाटचाल सुरू झाली. एवढं मोठं दुःख गिळणं आणि विसरून जाणे शक्य नव्हते. पण, काय करणार? पुढे दोन मुलांच भविष्य उभं होतं."


"आई , असं काहीही घडलं नाही. कारण, काकानेच माझ्या वर..."

रेश्माने काकांनी तिच्या सोबत काय काय केले. हे ऐकताच सगळ्यांना मोठा धक्का बसला.

नंदिनीने रेशमाची केस लढली आणि तिला न्याय मिळवून दिला. जुन्या केसचाही निकाल लागला. तमाशात ज्या लोकांनी मुद्दाम गावठी दारू विकली. त्यांनाही शिक्षा झाली.

अभिजीतच्या नजरेत नंदिनीची इमेज आणखी वाढली झाली. नंदिनीचा अभिमान वाटू लागला.

एका स्त्रीने नवऱ्याच्या स्वतः च्या विरोधात उभे राहून एका निष्पाप स्त्रीला न्याय मिळवून दिला. तिला मोकळा श्वास घेण्यासाठी तिला अशा जगातून बाहेर आणले आणि तिच्या आनंदी जगात परत नेले.

रेशमाच जग तिचं कुटुंब होतं. पण, सख्ख्या काकाने नात्यांची मर्यादा ओलांडत तिला अशा जगात नेऊन सोडले होते. की ती कधीच परत येऊ शकणार नाही.

पण, नंदिनी सारख्या एका स्त्रीने हे सहज साध्य करून दाखवले. नंदिनी स्वतः च्या जगात खूप खूष होती. अभिजीतची मोलाची साथ तिच्या आयुष्यात ज्योतीप्रमाणे अखंड तेवत राहील.

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all