तिचं जग (भाग/३)

कथा मालिका
तिचं जग ३

रत्नावली बोलू लागली.

ताई, मी खरी रेशमा. एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला. माझे आईवडील आणि आजी आजोबा आणि दोन भाऊ , एक काका सर्वजण एकत्र राहत होतो. मी घरात सगळ्यात मोठी. लहानपणापासून मी दिसायला सुंदर. त्यामुळे प्रत्येकाची नजर माझ्यावर भिरभिरत होती. माझे काका राज त्यांचे नाव. तेही दिसायला स्मार्टच. घरी शेती असल्यामुळे माझे आई वडील, आजी आजोबा सर्वजण शेतात कामाला जात होते. माझे दोन्ही भाऊ लहान असल्यामुळे त्यांनाही शेतावर घेऊन जात असत. त्यामुळे कधी कधी मी आणि काकाच दोघेच घरी असायचो. मग आम्हां दोघांची मौज ,मजा, मस्ती सतत चालायची. मी अभ्यास करतांना काही अडले तर ते पटकन सोडवायचे. माझे काका माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठे होते. त्यामुळे मी जसजशी वयात येत होती. तसतशी त्यांची नजर सतत माझ्यावर खिळून होती. काका नकळतपणे स्पर्श करायचा. एकटा असला तो माझ्या मांडीवर हात ठेवायचा. नको तिथे स्पर्श करायचा. पण, मला मात्र ते समजत नव्हते. काका पुतणीच्या नात्यातून बुरसलेला घाणेरडा वास येत आहे. याची कधीच मी काय घरातील कोणालाच कल्पना नव्हती.

"दादा आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना. तसही तुम्ही कामामुळे कुठेच जात नाही. तेव्हा चार दिवसांसाठी जाऊ या." राज पोटतिडकीने बोलू लागला.

\"आई, बाबा आपण चला ना आपण जाऊ या."

मी आईच्या खूप मागे लागली बाहेर जाण्यासाठी.

पण, उगाचच काम सोडून कोणीही यायला तयार नव्हते. माझ्या आग्रहाखातर आई बाबांनी कसलाही विचार न करता काकांना परमिशन दिली. आपलं तर फिरणं होत नाही. पण, मुलांनी तरी फिरून यावे. हा सोज्वळ विचार मनात आला.

"पण,काकांच्या मनात काही तरी शिजत होते. एके दिवशी मला त्यांनी दिवसभर फिरवले. त्यानंतर काकांनी मला एका लाॅजवर नेले आणि मला पाण्यातून काही तरी औषध दिले. त्यामुळे मला अचानक झोप येऊ लागली. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरली आणि त्यानंतर माझी प्रसन्न सकाळ कधी उगवलीच नाही."

तिचा एक एक शब्द नंदिनीच्या हृदयात घर करीत होता.

"दुसऱ्या दिवशी सकाळीच माझा अवतार बघून मी घाबरले. माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि काका देखील तसाच. उलट तो एका कोपऱ्यात बसून खोटी आसवं गाळत होता.

"राज काका, माझा अवतार?"

"अगं काय केलंस रेश्मा?"

मी काय केलं?"

"सगळं करून वर मलाच प्रश्न विचारते."

काकाने माझ्यावर नाही नाही ते आरोप केले. त्यामुळे माझी मानसिक संतुलन बिघडले. माझे मन वेगळ्याच दिशेने वाटचाल करू लागले.

\"आता घरी कसे जायचे ? कसे तोंड दाखवायचे? काकांनी घरी काही उलटसुलट सांगितले तर? काय उत्तर देणार?\"

"काका काय करणारं आहेस तू? मी काय करू? कुठे जाऊ? मला आता घरी नाही जायचे."

"अगं, तू कशाला विचार करते? आपण आधी घरी जाऊ या."

"नाही, मी घरी जाणार नाही. मी आई बाबांच्या स्वप्नांचा पूर्ण चुराडा केला. त्यांना मी माझे तोंड दाखवू शकत नाही. काका तुच काहीतरी कर ना."

काकाने याच संधीचा फायदा घेतला.

"हो खरोखरच तू दादा वहिनीला, आई बाबांना काय सांगणार? मी बघतो काही तरी."

"एक काम करा. मी एक दोन दिवस येथेच थांबते तुम्ही घरी जाऊन या आणि आई बाबांना सगळं समजावून सांगा. मग मला परत न्यायला या."

"पण, मी तुला इथे एकटीला सोडून नाही जाऊ शकत."

"हे बघ काका, तुम्ही जा आणि आईबाबांना बरोबर घेऊन या किंवा..."

"रेश्मा, नको रडूस. मी आहे ना."

पण, मी तुला इथे नाही ठेवणार? माझ्या एका मित्राच्या घरी त्यांच्या फॅमिलीमध्ये घेऊन जातो. तू तिथे सुरक्षित राहशील."

"बरं ठीक आहे."

राजने तिला त्याच्या एका मित्राच्या घरी नेले आणि तिथे काही तरी सांगितले. तिला सोडून तो निघून गेला.

रेश्मा सोबत काय घडते. पाहुया पुढच्या भागात...

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all