तिचं जग (डॉ. किमया मुळावकर) भाग-३

कथा सासू सुनेच्या जगाची




अष्टपैलू महासंग्राम
दुसरी फेरी

तिचं जग (डॉ. किमया मुळावकर)- भाग ३

प्रियाला विनाकारण त्रास देऊन सुधाताईंचा सासूरवास करणं सुरुच होतं. सुयश या सगळ्या गोष्टींना कंटाळला होता. प्रिया मात्र नेहमीच शांत राहायची.

"प्रिया, अगं डॉक्टर आहेस तू आणि का एवढं सहन करतेस? माझीच आई आहे पण किती विचित्र वागते तुझ्यासोबत…तुला राग येत नाही का गं? तुला हवं असेल तर आपण वेगळं राहू…" सुयश आईच्या वागण्याला कंटाळून प्रियाला म्हणाला.

"कसं आहे ना सुयश, मी डॉक्टर असले, स्वत:च्या पायावर उभी असले ना तरी माझ्यावर आई वडिलांचे संस्कार आहेत, जे मला सासूला, मोठ्या माणसांना प्रतिउत्तर देण्यापासून मला रोखतात. मला माहितीये, आई एवढ्या वाईट नाहीयेत. त्या कदाचित माझी परीक्षा घेत असतील. आपण तर आपली प्रत्येक केस परीक्षा समजूनच हँडल करतो ना. मला विश्वास आहे एक दिवस या परीक्षेत नक्की उत्तम गुणांनी पास होईल." प्रिया आत्मविश्वासाने म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सुयशही थोडा शांत झाला.


एक दिवस प्रिया संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी आली. ती घरी येण्याआधी सुयश घरी आलेला होता. तिच्या हातात एक बॉक्स होता तिने तो टेबलवर ठेवला आणि सुयशला आवाज दिला. सुयश आणि सुधाताई हॉलमध्ये आले. शंकरराव आधीच तिथे बसून होते. प्रियाने बॉक्स उघडला.


"अरे वा इमर्जन्सी कीट! बरं सुचलं तुला, चांगलं झालं आणलेस ते." सुयश आणि प्रिया बॉक्समधलं एक एक सामान बाहेर काढत होते. त्यात काही औषधं आणि मेडीकलचे काही इन्स्ट्रूमेंट्स होते.


"याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण! घरात सगळे ठणठणीत आहेत तरी हिने मुद्दाम हे घरात आणलं." नेहमीप्रमाणे सुधाताईंनी प्रियाला विरोध केला. त्यावर सुयश काही बोलणार तर प्रियाने त्याला अडवलं.


"आई, डॉक्टरचं घर आहे आपलं. आपल्याला गरज पडली नाही तरी शेजारीपाजारी कधी काही इमर्जन्सी आली तर एक डॉक्टर म्हणून आम्ही हे वापरू शकतो आणि कोणाचा तरी जीव वाचवू शकतो ना… आई, तुम्ही पण एकदा सगळं चेकअप करून घ्यायला हवं. बघा मी बाबांना मागच्या वेळी म्हटलं होतं आणि त्यांनी ते केलं , बी.पी.चा त्रास निघालाच ना त्यांना." प्रिया


"तू मला सांगू नको. मला विनाकारण औषधांवर जगायचं नाहीये. आणि ही अवदसा तुमच्या खोलीतच ठेवा." सुधाताई रागाने म्हणाल्या आणि त्यांनी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडलं. सुधाताईंच्या अशा कुरघोडी करणं सुरुच होतं. सुयश प्रत्येक वेळी चिडून जायचा आणि प्रिया त्याला शांत करायची.


बघता बघता प्रिया आणि सुयशच्या लग्नाला वर्ष झालं. सुयश पुढील शिक्षणासाठी विदेशात जाणार होता आणि त्यासाठी लागणारी परीक्षाही तो पास झाला होता. सर्वांना वाटलं प्रिया त्याच्यासोबत जाईल पण प्रिया विदेशात गेली नाही. इथे राहून तिने त्यांच्या नव्या हॉस्पिटलसाठी जागा घेऊन त्याचं बांधकाम सुरु केलं; जेणेकरून सुयश परत आल्यावर स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस सुरू करू शकणार होता.


"प्रिया, फक्त बांधकामासाठी तू इकडे कशाला थांबली? ते काम मीसुध्दा करुन घेऊ शकलो असतो." शंकरराव तिला म्हणाले.


"नाही बाबा, तेवढंच कारण नाहीये. तुम्ही, आई, माझे आईबाबा… आता तुम्हा सर्वांचे वय झाले आहे. कधी कोणाला काही गरज लागली आणि आम्ही दोघेही इथे नसू तर आमच्या डॉक्टर होण्याचा काय उपयोग? दोन वर्षांचा तर प्रश्न आहे… सुयश परत येणारच आहे… आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे." प्रिया बोलत होती. सुधाताईंनी हे बोलण ऐकलं.


"तू नेहमी वाईटच विचार करणार… लगे आमचं मरण दिसलं का तुला?" नेहमीप्रमाणे सुधाताई अर्थाचा बेअर्थ काढत होत्या. शंकररावांनी त्यांचं बोलणं मध्येच थांबवलं आणि त्यांना समजावून सांगितलं. नेहमीप्रमाणे सुधाताईंमध्ये फारसा फरक पडला नाही.


बघता बघता सुयशला विदेशात जाऊन एक वर्ष झालं होतं. तारेवरची कसरत करत प्रिया हॉस्पिटल, घर आणि नवीन जागेच बांधकाम सगळं बघत होती. शंकरराव तिला जमेल ती मदत करत होते. प्रिया रात्री हॉस्पिटलमधून उशीरा घरी आली होती. दिवसभराच्या दगदगीने तिला अगदी गाढ झोपली लागली होती. पहाटे पहाटे सुधाताईंच्या आवाजाने तिला जाग आली. त्या शंकररावांसोबत काहीतरी बोलत होत्या. प्रिया झोपेतच होती. तिला त्या काय बोलताय हे कळत नव्हतं. अचानक सुधाताईंचा किंचाळण्याचा आवाज आला. प्रिया खाडकन उठली आणि धावतच रूमच्या बाहेर गेली. हॉलमध्ये शंकरराव कोसळले होते. तिने त्यांची नाडी पाहिली. तिला नाडी सापडली नाही. तिने धावतच जाऊन रूममधला इमर्जन्सी बॉक्स आणला. शंकररावांना तपासलं. त्यांच्या हृदयाची स्पंदन लागत नव्हती… प्रियाने ताबडतोब त्यांच्या छातीवर दाब देत सी.पी.आर. सुरू केला.

"आई, तुमचा फोन आणा. मी एक नंबर सांगते तो डायल करा." सी.पी. आर देत प्रिया बोलत होती. सुधाताईंनी फोन आणला. प्रियाने सांगितलेला नंबर त्या लावत होत्या; पण त्यांचे हातपाय लटलट कापत होते. प्रियाने फोन स्पीकरवर टाकायला लावला. हॉस्पिटलमध्ये बोलून तिने ॲम्ब्यूलन्स बोलावून घेतली. सुधाताईंना काही कळायच्या आत सर्व हालचाली होत होत्या. आज त्या काचेतून आय.सी.यु. मधल्या हालचाली स्तब्ध होऊन बघत होत्या. दोन वर्षापासूनच्या घटना क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोरून गेल्या होत्या.


"आई…" प्रियाने आवाज दिला आणि त्या भानावर आल्या. प्रिया दिसताच इतक्यावेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला होता. प्रियाच्या गळ्यात पडून त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडत होत्या. प्रिया मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all