तिचं जग (डॉ.किमया मुळावकर)-भाग १

कथा सासू सुनेच्या जगाची




अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी
तिचं जग (डॉ.किमया मुळावकर)- भाग १

"आई, काळजी करू नका… आपण पोहोचतोय हॉस्पिटलमध्ये… सगळं ठीक होईल…" प्रिया आपल्या सासुबाईंना, सुधाताईंना धीर देत बोलत होती. रोज घरापासून जवळ वाटणारं हॉस्पिटल आज तिला दूर वाटत होतं. तिच्या मनातली धाकधूक चेहऱ्यावर येऊ न देण्याचा ती प्रयत्न करत होती.


सकाळची वेळ होती. रस्त्यावर फारशी गर्दीही नव्हती. त्या शांततेला चिरून, मोठमोठ्याने धडकी भरवणारा सायरनचा आवाज करत अ‍ॅम्ब्युलन्स जात होती. सुधाताई आणि प्रिया अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसलेल्या होत्या. त्यांच्यासमोर सुधाताईंचे यजमान, शंकरराव निपचित पडून होते. सुधाताईंनी त्यांचा हात हातात घेतला होता. त्यांच्या हाताचा तो थंडगार स्पर्श सुधाताईंच्या डोळ्यांतून उष्ण पाणी काढत होता. सुधाताईंच्या बाजूलाच त्यांची सून प्रिया बसलेली होती. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये लावलेल्या मॉनिटरवर काहीतरी बघत ती एकीकडे सुधाताईंना धीर देत होती.


घरापासून हॉस्पिटलचं वीस मिनिटांचं अंतर अ‍ॅम्ब्युलन्सने दहा मिनिटांत पार केलं. हे दहा मिनिटं सुधाताईंना दहा युगांसारखे भासले होते. अ‍ॅम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या आवारात पोहोचली. दोन वॉर्डबॉय स्ट्रेचर घेऊन तयारच होते. प्रिया खाली उतरली. इतक्यात हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागाचे डॉक्टर्स आणि नर्सेसही तिथे आले.


"सिक्युरिटी, लिफ्ट खाली बोलावून ठेवा. डॉक्टर सुषमा, आय.सी.यु.मध्ये बोलून ठेवलंत? बेड तयार आहे का? कमॉन, कमॉन… फास्ट… टाईम इस प्रिशिअस…" स्ट्रेचर सोबत चालत चालत प्रिया बाकीच्या डॉक्टर्स आणि नर्सेसला ऑर्डर्स देत होती. सुधाताई सगळं बघत होत्या. वयाची साठी जवळ आली होती तरी त्यांनी हॉस्पिटलचं तोंडही कधी पाहिलं नव्हतं. वयोमानानुसार शंकररावांना बी.पी. चा त्रास होता पण त्यांच्यासोबतही सुधाताई कधी दवाखान्याची पायरीही चढल्या नव्हत्या. आज मात्र हे सगळं पाहून त्यांचे पाय जड झाले होते. अंगाला कंप सुटला होता. त्यांना एक पाऊल पुढं टाकणंही होत नव्हतं. तरी अंगात उसनं बळ आणून त्या चालत होत्या. घामाने चिंब भिजल्या होत्या. तेवढ्यात एक नर्स त्यांच्याजवळ आली.


"काकू, चला माझ्यासोबत. आपण दुसऱ्या लिफ्टने वर जाऊ. ही लिफ्ट पेशंटसाठी आहे." नर्सने त्यांचा हात हातात धरला. सुधाताई तिच्या आधाराने लिफ्टमध्ये गेल्या. काही क्षणातच त्या पाचव्या मजल्यावर पोहोचल्या. हे काही क्षण मात्र त्यांच्यासाठी प्रचंड घालमेलीचे ठरले होते. नर्सने त्यांना एका रूममध्ये नेले. त्या रूमला लागूनच अतिदक्षता विभाग होता. त्या नर्सने तिथल्या भिंतीवरचा पडदा सरकवला. भिंतीला लावलेल्या मोठ्या काचेतून अतिदक्षता विभागातलं सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसत होतं.


"काकू, तुम्ही इथे बसा. पाणी प्या थोडं. काही काळजी करू नका. अहो डॉ. प्रिया मॅडम म्हणजे देवाचंच दुसरं रूप! आजपर्यंत शेकडो रुग्णांना मृत्युच्या दारातून ओढून आणलंय त्यांनी. त्यांच्या हाताला यश आहे बरं. सगळं चांगलंच होईल. मी येते आता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये जाते. प्रिया मॅडमचं आय.सी.यु. मधलं सर्व झालं की त्या इथेच येतील." ती नर्स सुधाताईंना खुर्चीवर बसवून पाण्याची बाटली त्यांना देत बोलली आणि निघून गेली. सुधाताई मात्र तिच्यासोबत एक शब्दही बोलल्या नाही. त्यांचं सगळं लक्ष काचेतून पलिकडे दिसणाऱ्या अतिदक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या सुनेकडं, प्रियाकडं होतं.


प्रियाने डोक्यावर कॅप घातली, अंगात हिरवा गाऊन चढवला, तोंडाला मास्क लावला आणि हातात ग्लव्हझ् घातले. आजूबाजूला नर्सेस आणि इतर डॉक्टरांची फौज होतीच. अजून दोन डॉक्टर धावत तिथे पोहोचले होते. तिथल्या नर्सेस शंकररावांना इंजेक्शन, सलाईन लावत होत्या. प्रिया आणि इतर दोन डॉक्टर सतत सूचना देत होते. सुधाताईंना कसलाच आवाज येत नव्हता पण समोरच्या घडामोडींवरुन त्या अंदाज बांधत होत्या. शंकररावांचा जीव वाचवण्यासाठी प्रियाची धडपड बघत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला होता. मोठ्याने टाहो फोडून रडावं, मघापासून डोळ्यांत अडवून ठेवलेल्या अश्रूंच्या बांधाला वाट मोकळी करून द्यावी असं त्यांना वाटत होतं. पण त्या अगदी स्तब्ध उभ्या होत्या.


"प्रिया, किती वाईट वागले गं मी तुझ्यासोबत… तुझी, तुझ्या शिक्षणाची कधीच किंमत केली नाही. एका डॉक्टर मुलाची आई असूनही तुझ्यातल्या या गुणाची कधीच कदर केली नाही. इथे सगळे म्हणताय की तू देवाचं रूप आहेस पण माझ्यातल्या सासूने तुझ्यात फक्त सूनच पाहिली… कदाचित ही त्याचीच तर शिक्षा नसेल ना?" सुधाताईंच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. पाण्यानी भरलेल्या डोळ्यांनी त्या काचेच्या पलीकडलं बघायचा प्रयत्न करत होत्या. सगळं चित्र अगदी धुसर धुसर दिसत होतं पण भूतकाळ मात्र अगदी स्पष्ट दिसत होता.

क्रमशः

©® डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all