तिचं जग (भाग तिसरा )
विषय: तिचं आभाळ
आता पर्यंत तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिच्याजवळ फक्त तिच्या कविता आणि कविताच होत्या. पण तो येऊन गेल्यापासून मात्र ती स्वतःची राहीली नव्हती. तो येऊन गेल्यानंतर तिचं कशातच मन लागत नव्हतं. त्याच्या निळाशार डोळ्यातील नजर तिला जणू चारही बाजूंनी कायमची वेढून गेलेली होती. हृदयामध्ये अशा एका अनामिक भावनेचा उदय झाला होता की जी भावना तिच्या मनात या अगोदर कधीच निर्माण झाली नव्हती. एकाएकी तिला जगण्याचा अर्थ गवसल्याचा भास झाला.
जगण्याचं उद्दीष्ट समजल. त्याच्या शिवाय जगणं म्हणजे, दिशाहिन भटकंती होती. सध्या तर ती अशा मार्गावर बसलेली होती की ज्या मार्गावरून तो कधी जाणारच नव्हता. स्वतःहुन ती कधी त्याच्या कडे जाऊही शकली नसती. पण त्याला फसवण तिला महापाप वाटलं. काय वाट्टेल ते होवो. पण त्याला सगळी हकीकत समजायलाच हवी होती. अन्यथा सगळ्या गोष्टी अंधारात ठेऊन जर त्याला प्राप्त केलं असत तर त्यासारख मोठं पाप कोणतच झालं नसतं. नुसत त्याला फसवण्याच्या विचारांनीच तिला क्षणभर स्वतःची किळस वाटली.
तिने सत्याच्या मार्गाने जायचे ठरवले. छानशा पांढऱ्या शुभ्र कागदावर तिने त्याला पहिलं काव्यमय पत्र पाठवलं.
" प्रिय, तुला कोणत्या नावाने संबोधावे मला समजत नाहीये. कारण आजकाल मी माझीच राहिलेली नाही. मला काय झालं आहे तेही समजत नाही. माझं कशातच मन लागत नाही. तू येवून गेलास खरा. पण आजही रोज सकाळी सूर्य प्रकाशा सारखा प्रसन्न पणं हसत असलेला तू मला नेहमी बागेत एखाद्या झाडामागे किंवा फुलांच्या ताटव्यात हसतांना मला दिसत असतो. पण प्रियतमा तुझ्यात आणि माझ्यात प्रचंड मोठं अंतर आहे ते वयाच. मी तुझ्या पेक्षा थोडी थोडकी नव्हे तर चक्क सहा वर्षांनी मोठी आहे. शिवाय आपल्या दोघांचे रीती रिवाज पूर्ण भिन्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आकाश जरी कोसळलं तरी तूझ्याकडे येऊ शकत नाही."
आणि डोळ्यातल्या पाण्याला गालावरून वाट करून देतं तिने भरलेल्या डोळ्यांनी पुढं लिहायला सुरुवात केली.
" माझ्या लाडक्या प्रियतमा, मी तुला फसवू शकत नाही. आठवत का तुला. तू इतक्या लांबून मला भेटायला आला होतास आणि मी माझ्या खुर्चीवर बसूनच तूझ्या साठी हात फैलावले होते. तुला त्यात काही वावग वाटल नसेल. पण मला सांगणं जरुरी आहे. मी चालू शकत नाही. कारण पोलिओ मुळे मी पायापासून जन्मजात अधू आहे. नेहमी मी माझ्या खुर्चीवर बसून असते. आणि आतापर्यंत टॉमीच माझा मित्र म्हणून राहिलेला आहे. मित्रा तू तरुण आहेस आणि माझ्या पेक्षा सुंदर मुलगी तुला जोडीदार म्हणून मिळेल. तूझी मैत्रीण म्हणून मी तूला सल्ला देते की, आपण आपल नात ईथच संपवू या. चांगल्या मैत्रीणी सोबत तुला तूझ्या आयुष्यात खूप सुख मिळेल... तुझीच "
डोळ्यातले अश्रू पुसून तिने पत्र पाकिटात बंद करून, पोस्टात टाकायला दिलं.
आपल्या प्रेमाचा असा शेवट पाहून ती हुंदके देत देतं रडायला लागली. टॉमी देखील तिच्या कडे कावऱ्या बावऱ्या नजरेनं बघायला लागला.
सगळी कडे काळोख पसरायला सुरूवात झाली होती. कुठं तरी रातराणीचा धुंद सुगंध आसमंतात भरून राहिला होता. ती मात्र कितीतरी वेळ अश्रूंनी उशी भिजवत राहीली.
( क्रमशः)
( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा