तिचा भूतकाळ ( भाग तिसरा )

आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या भूतकाळा सकट स्वीकारतो तेंव्हा त्याचा मागोवा घ्यायचा नसतो.
तिचा भूतकाळ ( भाग तिसरा )

विषय : भूतकाळात डोकावतांना

त्याने तिला माहेरी सोडलं खरं पण त्याच्या मनातून ती घटना काही केल्या जात  नव्हती. रात्रंदिवस त्याला तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा रहात असे. मनाला एकच प्रश्न पडत असे की कोण असेल तो.

मग त्याने तिचा फेसबुक अकाउंट चेक केलं. फेसबुक वर ती एव्हढी ॲक्टिव नव्हती. खूप जुने जुने फोटो पाहत असताना अचानक आठ वर्षांपूर्वी त्याला तो एका नाटकाच्या ग्रुप फोटोमध्ये  दिसला. त्याचा फोटो त्याने सेव्ह केला. पीसी वर तो फोटो तो झूम करून पाहात असे.

त्याने तिला माहेरी सोडल आहे, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती होती. म्हणून त्याने त्याच्या फेसबुक अकाउंट वरून तिच्या मैत्रिणींची यादी काढली. त्यातल्या बऱ्याच मैत्रिणी तिचा नवरा म्हणून त्यालाही ओळखत होत्या. मग त्याने तिच्या एका मैत्रिणीला फोन करून , मला तुमच्या कॉलेजमधला एक नाटकात काम करणाऱ्या ग्रुपचा फोटो सापडला आहे. तो तुला  व्हाट्सअप वर पाठवतो. त्यातल्या मी सर्कल केलेल्या व्यक्तीला तू ओळखतेस का हे सांग .आणि त्याने व्हाट्सअप वरून तो ग्रुप फोटो पाठवला.

तिच्या मैत्रिणीचा लगेच त्याला मेसेज आला,

" अहो जीजू , याला कोण ओळखत नाही. आमच्या  बॅचचा तो हिरो. त्यातून तो आमच्या कॉलेजचा सीआर. तो नाटकात काम करायचा. एकदा त्याने आणि तुमच्या बायकोने मिळून कॉलेजच्या एका नाटकात काम केलं होतं. आता तो मुंबईला असतो. आणि हो, त्याने किती वेळा तुमच्या बायकोला प्रपोज केलं होतं, विचारूच नका.  पण ती तुमची बायको होणार होती ना म्हणून तिने शेवटपर्यंत ठाम नकार दिला. आता तो कुठेतरी मुंबईला असतो असा ऐकल आहे. पण तुम्हाला काय करायचं त्याच्याबद्दल. पणं तुमची बायको ग्रेट आहे बरं का. तिच्यावर कॉलेज मधली ईतकी मुलं मरायची पणं तिने कधीच कोणाला भीक घातली नाही. मानाव लागेल तिला. पण ते जावू द्या तुमचा हनीमून कसा झाला. "

मेसेज वाचता वाचता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कसला हनीमून आणि कसलं काय. सगळ त्याच्या संशयी वृत्ती मुळे नष्ट झालं होतं. काय करावं त्याला समजेना. आत्ताच्या आत्ता सासरी जावं आणि तिची मनापासुन माफी मागावी अस त्याला वाटलं. घरच्या लोकांना त्याने काहीच सांगितलेलं नव्हत.

दुसऱ्या दिवशी तो कामावर न जाता तडक सासरी आला. त्याला वाटलं की ती दुःखाने कोलमडून गेली असेल. पण तसं काहीच नव्हत. घरातले सगळे जण नॉर्मल होते. तो आल्याची विशेष दखल तिने घेतली नाही. तिने त्याला प्यायला पाणी आणल.

" मी तुला न्यायला आलोय" त्याने कसबस सांगितलं.

" कुठं नेणारं मला. आणि तिथंही कोणी ओळखीचं भेटलं तर काय कराल. त्या पेक्षा आपण ईथच थांबू या. कारण संशय हा शेवटी विनाशा कडेच घेऊन जातो. मला तुमच्या सारख्या संशयी व्यक्ती सोबत संसार करायची अजीबात ईच्छा नाही. " तिचा आवाज ईतका कठोर होऊ शकतो हे त्याला माहीतच नव्हतं.

अत्यंत निराश होऊन तो पायऱ्या उतरून खाली आला. निराश होऊन त्याने सगळा दिवस ईकडे तिकडे व्यर्थ भटकण्यात घालवला. संध्याकाळी बऱ्याच उशिरा तो घरी पोहोचला. कोणाशी काही न बोलता त्याने जेवण केलं आणि आपल्या खोलीत आला.

दिवा बंद करून पलंगावर पडल्यावर त्याला जाणवलं की त्याच्या व्यतिरिक्त पलंगावर अजून कोणीतरी आहे आणि त्याला लगेच लक्षात आलं की ती व्यक्ती तिचं होती.

" माणसाला जेंव्हा आपण स्वीकारतो तेंव्हा त्याच्या भूतकाळा सकट स्वीकारतो. कारण भूतकाळ आपल्याला काहीही झालं तरी बदलवता येतं नाही. पण जर वर्तमानकाळ सुंदर बनवता येत असेल किंवा भविष्यकाळ उज्वल बनवता येत असेल तरच भूतकाळाचा मागोवा घेण्यात अर्थ आहे. अन्यथा त्याची गरज नाही. " 

ती सांगत होती आणि तो मन लावून शहाण्या मुलासारखा ऐकत होता.

" पण तू परत आलीच कशी ? " त्याने विचारलं.

" वेड्या तू मला सोडलं पण आपल्या घरातले लोक तर नातेवाईक होते ना आणि मुख्य म्हणजे ते तूझ्या ईतके शिकलेले नाही म्हणून हे पुन्हा जमून आल. " तिने हसून उत्तर दिलं.

( रसिकहो, प्रत्यक्षात एव्हढ्या तेव्हढ्या कारणांनी पत्नीला कायमचं सोडलेली असंख्य उदाहरणे आहेत. तेंव्हा भूतकाळाचा मागोवा घेण्यात काहीच अर्थ नसतो हेच खरं. )

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all