तिचा भूतकाळ ( भाग दुसरा )

आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या भूतकाळा सकट स्वीकारतो तेंव्हा त्याचा मागोवा घ्यायचा नसतो.


तिचा भूतकाळ ( भाग दुसरा )

विषय भूतकाळात डोकावतांना

" कोण होता तो ? "

त्याच्या आवाजातला बदल ऐकून ती एकदम चमकली. तिचा चेहरा एकदम उतरला. सगळ्या गोष्टीतलाच रस निघून गेला होता. दोघेही आता गप्प होती. त्याच्या दृष्टीने बोलण्यासारखं काही राहिलेले नव्हतं आणि तिच्या दृष्टीने हे असं विचारणं याला काय अर्थच नव्हता. त्याने असं विचारणं म्हणजे त्याचा तिच्यावर विश्वास नव्हता हे दर्शवल्यासारखं होतं. तिने कुठं तरी वाचल होते की संसाराचा पाया हा विश्वासावरच असतो. जर नवऱ्याचा एवढ्या छोट्या गोष्टीतून आपल्यावर  विश्वास नसेल. असेल तर पुढील जीवनाला काही अर्थच नव्हता. त्याच्या प्रश्नाला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ती नुसती उदासपणे हसली.

आता दोघांनाही कुठे जाव अस वाटेना. लवकर फिरणं आटपाव आणि असंच घरी परतावं असं तिला वाटलं.

" ऐक ना, माझं खूप डोकं दुखतंय. आपण घरी जायचं का  ?" तिने त्याला काकुळतीने सांगितले . त्या बोलण्याचा अर्थ त्याने वेगळाच घेतला. कदाचित तो ओळखीचा माणूस भेटल्याने तिचं बिंग बाहेर पडलं. आपल्याला माहीत झालं. यामुळे तिचं डोकं दुखत असेल. नाहीतरी त्याला देखील कुठे फिरण्यात रस राहिला होता. दोघांनी आपला कार्यक्रम आवरता घेतला. दोघं न बोलता परतीच्या प्रवासाला लागली. लग्नानंतरचा हा पहिला आठवडा असा असेल असा तिने कधी विचारही केला नव्हता.

त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालले होते. सारखा त्या तरुणाबद्दल त्याचा विचार सुरू असे. कोण असेल तो. त्याचा आणि आपल्या बायकोचा काय संबंध. जर ती त्याला ओळखते तर या आधी ती मुंबईला नक्कीच आली असेल आणि आली असेल तर तिने आपल्याला खोटं का सांगितलं. सगळे प्रश्न आणि प्रश्न प्रश्न.  त्याला काहीच सुचत नव्हतं. सगळ्या आयुष्यात आपला हा मोठा पराभव झाला आहे असं त्याला वाटलं. पण तो असा सहजासहजी हरणारा नव्हता. कोणत्याही गोष्टीला ताठ मानेने सामोरे जाणारा होता. ती दोघं न बोलता घरी परत आली.

घरी सगळेजण त्यांचे थट्टा मस्करी करत होते. पण त्या दोघांचे तिकडे लक्ष नव्हतं. दोघेही गप्प गप्प होती. त्याने तिला परत प्रश्न विचारला ," तो कोण होता ?" पण त्याच्या या प्रश्नाला तिने अजिबात उत्तर दिलं नाही. त्या प्रश्नाला उत्तर द्यावं असेही तिला वाटेना. ती शांतपणे कपड्यांच्या घड्या करत राहिली. शेवटी तो चिडला. त्याने तिला तिचं सामान बांधायला सांगितले. तिची बॅग भरून तयार झाल्यावर तो तिला घेऊन तडक सासरी आला. तिचं काही एक ऐकून न घेता त्याने तिला माहेरी जाण्याचं सांगितलं.

ती देखील काही बोलली नाही. शांतपणे ती आपल्या घरात गेली आणि काहीच झालं नाही असं समजून वागायला लागली. तिच्या घरच्या लोकांनी त्याला काय झाले म्हणून विचारलं, पण तो काहीच बोलला नाही.

त्यांच्या आयुष्यातलं एक अत्यंत दुःखाचा पर्व सुरू झालं.

" हॅलो, कशी आहेस. ओळखलस ना मला "

किती साधा वाक्य आहे ना पण याच वाक्याने त्या दोघांच्या आयुष्यात तक्षकाच्या अळीचे रूप घेतलं होतं.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all