हिचा आत्मा तिच्यात.. अंतिम भाग

कथा दोन जोडप्यांची


हिचा आत्मा तिच्यात आणि तिचा आत्मा हिच्यात.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की अपर्णा आणि चित्रा बदलल्यामुळे पार्थ आणि राघव दोघेही खूप खुश आहेत. त्यांचा आनंद कायम राहील का? बघू या भागात.


" अहो, पोचलात का ऑफिसला?" अपर्णाने पार्थला फोन केला.

" मी आता मिटिंगमध्ये आहे."

" हो का? बरं मी ना सकाळी सांगायची विसरले. आज तुम्हाला बटाट्याचा रस्सा दिला आहे. डबा आडवा करू नका. संध्याकाळी लवकर घरी या. मी वाट बघते." बॉस पार्थकडे बघत होता.

" ते थोडं अर्जंट होते." पार्थने स्पष्टीकरण दिले.

" हो.. ते समजले. बटाट्याचा सांडलेला रस्सा कपड्यांवर दिसतो आहे." सगळे हसताना पाहून त्याला शरमल्यासारखे झाले. तर इथे राघव सकाळपासून चित्राच्या फोनची वाट बघत होता. तो ऑफिसला पोचला, जेवला, ऑफिसमधून निघाला की तिचा बरोबर फोन यायचा. आज तिने एकदाही फोन केला नाही. शेवटी त्यानेच तिला फोन केला.

" काय ग, जेवलीस का?"

" आय लव्ह यू टू.." समोरून रिप्लाय आला.

" चित्रा.." राघव जोरात ओरडला.

" काय झाले?"

" तू काय बोललीस? अग दोन महिने तुझ्या पाठी लागलो होतो एकदा तरी बोल. तर तुला लाज वाटत होती. आणि आज अचानक? तू फोनही नाही केलास मला?"

" हो, रे. थोडी बिझी होते. पार्लरमध्ये आले आहे. चल बोलते नंतर." चित्राने फोन ठेवून दिला. राघव फोनकडे बघतच राहिला. सतत त्याला हवे नको ते बघणारी त्याच्या मागे मागे फिरणारी ती आता त्याच्याशी बोलायलाही तयार नव्हती. त्याला खूप वाईट वाटत होते. सगळ्यात जास्त हाल त्याच्या जेवणाचे झाले होते. दोन महिने सतत नवीन नवीन पदार्थ खायची सवय झाली होती. आता? फक्त हे डाएट आणि ते डाएट. त्याचे डोकेच चाले ना. त्याने वैतागून पार्थला फोन केला.

" हाय, काय करतो आहेस?"

" आज? घरी लवकर जाऊन हिने घरी केलेला दोडक्याचा शिरा कसा लागतो ते बघणार आहे. तू?"

" मी विचारणार होतो बसायचे का आज?" राघव खिन्न स्वरात बोलला. " आधी तुला विचारायची ही गरज नसायची. तूच मला फोन करायचास. गेले काही दिवस.." राघवने वाक्य अपूर्ण सोडले.

"हो रे, गेले काही दिवस अपर्णा जरा सुद्धा इथे तिथे जाऊ देत नाही. सतत पाठी पाठी. वैताग आला आहे. आधी छान होतं, ती मला सगळी सूट द्यायची. तेव्हा असे वाटायचे.." पार्थने जीभ चावली.

" गेले काही दिवस.." दोघेही एकदम बोलले.. " पूजा?? म्हणजे ते खरे होते? आता परत पूजा करून देवाला साकडे घातलेच पाहिजे.. "

" यावेळेस आमच्याकडे.. बघू परत पहिली बायको मिळते का?" राघव बोलला. कसेबसे राघवने चित्राला पूजेसाठी तयार केले. गुरूजी आले. पूजा झाली. दोघांनीही मन लावून प्रार्थना केली.

" देवा, आमची चूक झाली. आमच्या आधीच्या बायकाच चांगल्या होत्या. परत दे रे.." दोघेही विनवत होते.

" नक्की का? कारण हा काही भातुकलीचा खेळ नाही." परत तोच धीरगंभीर आवाज आला.

" हो देवा.. परत हे कधी होणार नाही. आम्ही आमच्या बायकांवर मनापासून प्रेम करू."

" तथास्तु.." दोघांनीही डोळे उघडले. यावेळेस अपर्णा आणि चित्रा त्यांच्याकडे लक्ष न देता गप्पा मारत बसल्या होत्या. हे दोघेही आनंदाने त्यांना सामिल झाले.


" चित्रा, तू खूपच हुशार आहेस. वाटलं नव्हतं हं तुझ्याकडे बघून." पोहे खात अपर्णा बोलली..

" म्हणूनच म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं." चित्रा पोह्यातले शेंगदाणे शोधत बोलली.

" पण सुचले कसे हे तुला? मला नसतं हो समजलं.."

" अग, मी लग्न झाल्यापासून बघते आहे, याच्या तोंडात फक्त तुझेच नाव, ती दिसते कशी? बोलते कशी? आणि पार्थभाऊजी तर.. जाऊ दे.. तेव्हाच ठरवलं. प्रकरण गंभीर होण्याआधीच मुळासकट उखडून टाकू. नाहितर ज्ञानाचा फायदा काय?"

" डोन्ट टेल मी, भाऊजींना माहित नाही तुला डॉक्टरेट मिळाली आहे मानसशास्त्रातली.."

" अग, लग्न ठरले तेव्हा हातात डिग्री आली नव्हती म्हणून फक्त एम.ए. केले आहे असे सांगायला सांगितले होते मी आईबाबांना. मग आमच्या ह्यांचा समज झाला की मी त्यांच्या तुलनेत अशिक्षित. पण झाला की नाही या गोष्टीचा फायदा?"

" मानलं हो तुला आणि तुझ्या मानस आणि संमोहन शास्त्राला सुद्धा."


दुसरीकडे बारमध्ये बसलेले हे दोघे देव आपले कसे ऐकतो याची टिमकी वाजवत होते..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all