तिचं अस्तित्व भाग २ जलद कथा मालिका

एक कथा


तिचं अस्तित्व भाग २
मागील भागावरून पुढे…

राघव बराच वेळ काहीच बोलला नाही.आईला कळत नव्हतं की राघवला भानावर कसं आणावं?

थोड्यावेळाने आई म्हणाली,


" राघव मुलांना घरी आल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं असतं. काहीतरी सांगायचं असतं पण त्यांचे हसरे खेळकर बाबा आजकाल त्यांना सापडत नाहीत. माझ्याशी ते बोलतात.पण सतत तुझी चाहूल घेत असतात. राघव ऐकरे बाळा.असं वागू नको.सविताला आवडणार नाही. तिला तिचं घर हसरं खेळतं दिसायला हवं." आई सगळं एका दमात बोलून थांबल्या.

अचानक राघव म्हणाला,

"आई सविता म्हणायची आपल्याला ईश्वराने एवढं छान आयुष्य जगायला दिलंय तर त्याची गुरूदक्षिणा द्यावीच लागेल. माझं आयूष्य आता संपत आलय. मी माझं आयुष्यच देणार आहे गुरूदक्षीणा म्हणुन ईश्वराला." राघव गदगदल्या स्वरात म्हणाल्या.

जरा वेळाने हुंदका थांबल्यावर राघव पुन्हा बोलू लागला,

"आई सविताने किती सहज स्विकारलं नं…आपल्याला जायचंय हे. माझ्या अंगावर तर आत्ताही काटा आला. एवढा समजूतदार पणा कुठून आणला असेल तिने?" राघव ने आईला विचारलं.


"अरे स्त्रीला आपसूक सगळं बळ येतं. राघवा… पुरूषांपेक्षा स्त्री खूप कणखर असते. ती सहजतेनी सगळा बदल स्विकारते. स्त्री चं मन कळणं अवघड आहे .तिचं भावविश्व खूप गुंतागुंतीचं असतं.अवतीभवतीच्या सगळ्या गोष्टीत तिचा जीव अडकलेला असतो. हा सगळा जीव काढून मरणाला सामोरे जाणं इतकं सोपं नाही रे राघवा. अश्या अवघड स्थीतीत मन खंबीर ठेवण्याचं सामर्थ्य देवानं स्त्रीला दिलय."

बोलता बोलता आई राघवच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून थोपटू लागली.

आईच्या या स्पर्शाने राघवला खूप मानसिक बळ दिलं राघवने आईचा हात घट्ट पकडून ठेवून म्हणाला,

" आई तू नको जाऊ मला सोडून. तू पण गेलीस तर मी उघडा पडेन गं!" ढसढसा रडायला लागला.

त्याचा आवेग बघून आईपण स्वतःला रोखू शकली नाही.

" सांग ना आई…तू नाही जाणार नं मला सोडून.?" राघवच्या या प्रश्नाला आईने हुंदका आवरता कसं बसं म्हणाल्या ,
" नाही जाणार…."


राघवचं दु:ख मोठं आहे हे खरंय पण त्यातून याने स्वतःला सावरायला हवं हेही तितकंच महत्त्वाचं आहे हे आईला कळत होतं.

" राघव तुझे बाबा नेहमी म्हणायचे माणसाने दु:खाचे वासे मोडून खाल्ले पाहिजे. दु:खाला आपल्या आयुष्यात हातपाय पसरायला संधीच द्यायची नाही. तुझ्या मालती आत्ताचे मिस्टर केशवकाका गेले तेव्हा तुझ्या बाबांनी आत्याला हेच सांगीतलं. असं केलं तरच आपण या विपरीत परिस्थितीत डोकं शांत ठेऊन वागू शकतो.तूही हे लक्षात घे.दु:खाला तुझ्यावर स्वार होऊ देऊ नको."

एवढं बोलल्यावर राघव काय बोलतो याकडे आईचं लक्ष लागलं.

"आई तू म्हणालीस ते आठवतंय मला. बाबांनी आत्याला ठामपणे हे सांगीतलं तेव्हाचा आत्याचा चेहरा मला अजूनही आठवतोय. तेव्हा तिला राग आला बाबांचा. तिला त्यांचं बोलणं नाही पटलं पण काही महिन्यांनी तीच बाबांना म्हणाली,
" केशवच्या जाण्याचं दुःख खूप मोठं आहे पण तू म्हणतोस तेही खरं आहे.वर्तमानात जगायचंय, मुलांना मोठं करायचंय तर हे दु:ख माझ्या आयुष्यात लुडबुड करायला नको.मी नाही या दु:खाबरोबर जगणार तू माझी काळजी करू नकोस."

राघव हे बोलला पण त्याच्या चेहऱ्यावर सविता जाण्याचं दुःख दिसत होतं. ते बघून आई राघवा म्हणाली,


" राघव मुलांपुढे सविताच्या जाण्याचा उल्लेख वारंवार करू नकोस. त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं बघायला शिक. त्यांना प्रोत्साहन दे. त्यांच्या जवळ रहा. त्यांचं मन जप. त्यांना तुझा आधार वाटेल असं कर. तर ते आपलं आयुष्य शांतपणे जगतील. राघव चल. मुलं येतील एवढ्यात" आई म्हणाल्या.


"आई मी चुकलो. मुलांची बाजू माझ्या लक्षातच आली नाही. मी माझ्याच दु:खात बुडालेला राहीलो.आई मला माफ कर.मी स्वतःला सावरेन. सविता आता फक्त माझ्या मनात असेल. मुलं जेव्हा तिची आठवण काढतील तेव्हाच मीही सवितेला आठवेन. सविताचं माझं नातं वेगळं होतं पण ती प्रथम आणि स्वातीची आई होती हे कसं मी विसरलो? आई बरं झालं तू मला वेळीच सावरलं."


"शहाणं माझं बाळ. आता नीट चेहरा धू. मुलं येतील. स्वाती प्रथम दोघांच्या प्रिलीम परीक्षेचा निकाल आज मिळणार होता. हसतमुखानी बाहेर ये."


राघव सविताच्या जाण्याचा दु:खातून बाहेर पडतोय हे बघून आईला बरं वाटलं.
________________________________

क्रमशः

🎭 Series Post

View all