तिचं माहेर

Gosht Tichya Maherchi
©️®️सायली जोशी.

"कसली भाजी केली आहे ही? तुला काही जमत नसेल तर सरळ माहेरी निघून जायचं." सुहास आपल्या बायकोला दम देत म्हणाला.

"का? आईंनी सांगितली तशीच भाजी केली आहे. आवडली नाही?" कौमुदी म्हणाली.

"आईच्या हातची चव तुझ्या हाताला कशी येईल? माहेरच्या माणसांनी काही शिकवलं नाही की काय तुला?"

"सुहास, माझ्या माहेरच्या माणसांना का बोलता? त्यांनी मला सगळं शिकवलं आहे. चांगले संस्कार केले आहेत माझ्यावर म्हणून तर मी आजपर्यंत गप्प होते.
आणि काय हो? काही जमलं नाही तर माहेरी निघून जाण्याचे आदेश काय देता सारखे? यात कसला पुरुषार्थ! उलट लोक तुम्हालाच विचारतील, नवऱ्याला सोडून बायको माहेरी का राहते म्हणून? बायकोला असं उठसूट माहेरी घालवणं बरं नाही.
ते काहीही असो, आज मी माहेरी चालले. तुम्हाला माझी कोणतीच गोष्ट पसंत पडत नाही. कितीही मन लावून, जीव ओतून सगळी कामं केली तरी प्रत्येक बाबतीत काही ना काही खोट निघतेच." कौमुदी आज पहिल्यांदाच इतकं बोलली.

"अगं, भाजी चांगली झाली आहे. तू त्याच बोलणं मनावर घेऊ नको." सासुबाई मधेच म्हणाल्या.

"आई, भाजीचा प्रश्न नाही. पण मला काही जमत नाही म्हणून मी माहेरी निघून जायचं का? मग माझ्या आई - बाबांनी इतक्या विश्वासाने माझा हात यांच्या हातात दिला, त्याचे काय?" कौमुदी खरंच आपली बॅग भरायला गेली.

आई आणि बायकोचे बोलणे ऐकणारा सुहास आपला टिफीन भरून घेऊन ऑफिसला गेला.
ऑफिसमध्ये आज मोठे साहेब येणार म्हणून गडबड चालली होती. मॅनेजरनी दुपारच्या मिटिंगची सगळी जबाबदारी सुहासकडे सोपवली.

ठीक दोन वाजता मीटिंग सुरू झाली खरी. मात्र स्टाफच्या कामावर साहेब नाराज होते आणि त्यांचा टीम लीडर म्हणून त्यांनी सुहासला धारेवर धरले.
"मि. सुहास, तुमच्या हाताखालच्या स्टाफचे काम ठीक दिसत नाही आणि तुम्हाला तुमची जबाबदारी नीट पार पाडता येत नसेल तर या ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे आहेत."

हे ऐकून सुहास चांगलाच सटपटला.
"सॉरी सर, आम्ही इथे मन लावून काम करतो. तरीही प्रत्येक मीटिंगमध्ये खोट काढणे आवश्यक आहे का? आम्ही जीव ओतून काम करतो तरीही तुम्ही या ऑफिसमधून आम्हाला कमी करण्याची भाषा का करता? आता जे करायचं ते करा. आम्ही कोणाला घाबरत नाही." सुहास चिडून मीटिंगमधून बाहेर पडला.

'आपणही नेहमी हेच करतो. कौमुदीला सारखं माहेरी निघून जायला सांगतो. तीही मन लावून घर सांभाळते. सगळ्यांची काळजी घेते आणि तिला समजून घ्यायचं सोडून विनाकारण चिडचिड करतो आपण.' सुहासला त्याची चूक कळाली होती.
तो साहेबांच्या केबिनमध्ये आला.
"सॉरी सर, मगाशी मी जरा जास्तच बोललो. पण स्टाफला मोटिव्हेट करण्याची जबाबदारी माझी होती. मी कमी पडलो. पण हे काम माझ्या हातून गेलं तर मी घर कसं सांभाळू? तीही जबाबदारी माझ्यावर आहे. हे विसरून चालणार नाही.
पण परत अशी चूक होणार नाही. याची काळजी मी नक्की घेईन."
हे ऐकून साहेबांनी सुहासच्या पाठीवर हात ठेवला.

संध्याकाळी सुहास घरी पोहोचला तेव्हा कौमुदी घरी नव्हती.
"आई, कौमुदी कुठे दिसत नाही. खरंच गेली की काय माहेरी?"

"हो. तिलाही कंटाळा आला होता म्हणून जा म्हंटल चार दिवस."

"अगं, कशाला जाऊ दिलंस तिला? थांबवायचं ना? मला वाटलं आपलीच बायको आहे, सोडून जाणार तरी कुठे? नुसती जायची धमकी देत असेल.पण खरंच गेली ती. आई, मी जाऊन तिला घेऊन येतो." सुहास आवरायला आत पळाला.

"अरे, दोन तासांपूर्वी तर गेली आहे. लगेच तिला आणायला जाणार आहेस का? तिच्या माहेरची लोकं काय म्हणतील?" आई गालातल्या गालात हसत म्हणाली.

"म्हणेनात का काहीही? पण तिला सॉरी म्हणतो आणि इकडे घेऊन येतो. मला करमणार नाही तिच्याविना." सुहास आतून ओरडून म्हणाला.
-------------- ------------------

अचानक सुहासला आलेलं पाहून कौमुदीला आनंद झाला. पण चेहऱ्यावर तसं काही न दाखवता ती चहा करायला आत गेली.

"अगं, आत्ता का चहा करतेस? जेवणाची वेळ झाली." आई तिच्या पाठोपाठ आत येत म्हणाली.

"असू दे. त्यांना माझ्या हातचा चहा लागतो. मला माहिती आहे त्यांनी घरी चहा घेतला नसेल."

"नवऱ्याशी भांडून आलीस ना माहेरी? मग आता त्याची बाजू का घेतेस?" आई आपल्या लेकीला चिडवत म्हणाली.

पण कौमुदी काही न बोलता आपल्या नवऱ्यासमोर चहा घेऊन उभी राहिली.

"सॉरी, चुकलं माझं." सुहास तिच्या हातातून चहाचा कप घेत हळू आवाजात म्हणाला.

"बघ आई, मी म्हणाले होते ना? यांना माझ्या हातचा चहा लागतो म्हणून." कौमुदी ओरडून विषय बदलत म्हणाली.

"हो गं..किती ओरडतेस? चल, आवर. तुझी बॅग घे. घरी जातोय आपण." सुहास तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला.

"असे काय करता जावईबापू? आत्ताच तर आली आहे ती. लगेच कुठे घरी नेता तिला?" बाबा हसत म्हणाले.

यावर सुहासला काय बोलावं कळेना.

"ही घरी नसेल तर आईला करमत नाही. सगळी कामं अडतात. शिवाय आईला आता भराभर आवरायची सवय राहिली नाही. गोंधळ उडतो तिचा. मग आई सारखी तिची आठवण काढत राहते. त्यापेक्षा घरी येऊ दे तिला." सुहास कसाबसा म्हणाला.

यावर सासरेबुवा हसू लागलेले पाहतच, आपली चोरी पकडली गेली हे जाणून तो ओशाळला.
"अहो, चालायचंच. नवीन लग्न आहे तोवर बायकोची आठवण यायचीय. घेऊन जा तिला. उगीच सासुबाईंच्या नावे कशाला खपावता? संसार म्हंटल की कुरबुरी व्हायच्याच आणि तुम्ही जरी हळू आवाजात सॉरी म्हंटल असलं तरी आम्हाला ते ऐकू गेलं बरं. "

तशी कौमुदी लाजून आत पळाली. तिला कुठे तोंड लपवावे हेच कळेना.
"आई, येते मी." बॅग घेऊन आईच्या पाया पडून ती पुन्हा बाहेर आली.

"अगं, आलीस काय..लगेच चाललीस काय? पुढच्या वेळी चांगले आठ दिवस राहायला ये." आई म्हणाली.

"आठ दिवस?" सुहास आपल्या सासुबाईंकडे पाहत म्हणाला.

"हो. अहो, लेकीने हक्काने आपल्या माहेरी कधीही यावं. या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे उघडे असतात." सासुबाईंच्या या बोलण्यावर सुहास शरमला.

"लेकीबरोबर जावयाने कितीही दिवस इथे राहायला यावं, अगदी आठही दिवस! आमची काही हरकत नाही." सासरेबुवांच्या या वाक्यावर सगळेच मनापासून हसले.

आता आपल्या बायकोला उठसूट माहेरी जा असे अजिबात म्हणायचे नाही, हे ठरवून सुहास कौमुदीसह तिथून बाहेर पडला. लेकीच्या पाठीशी तिचं माहेर दिमाखात उभं असतं हे त्याला कळून चुकलं होतं.

समाप्त.