तिचे जग.. अंतिम भाग

कथा त्या एकीची


तिचे जग? भाग ३


मागील भागात आपण पाहिले की राघव समीराला घेऊन एका चित्रप्रदर्शनाला जातो. आणि तिला सौंदर्यदृष्टीवरून बोलतो. आता बघू पुढे काय होते ते.


" समीरा खूप खूप अभिनंदन.." ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या राखीने तिला मिठी मारली.

" अभिनंदन.. कशासाठी?" आश्चर्यचकित झालेल्या समीराने विचारले.

" अग, एम्पलॉयी ऑफ द इयर हा पुरस्कार तुला मिळाला आहे.. खूप आनंद झाला आहे मला." राखीला झालेला आनंद समीराला दिसून येत होता.

" खरंच??"

" अगदी खरं.. "

" बॉसच्या पुढे पुढे केल्यावर कोणालाही मिळणारच हा पुरस्कार.." ओठांवर लिपस्टिक फिरवत कुत्सितपणे प्राजक्ता बोलली.

" मी पुढे पुढे केलं? कधी?" समीराचा पारा चढू लागला होता.

" कधी नाही करत? ऑफिसमध्ये रांगोळी काढायची असली की तूच पुढे, काही सजावट करायची असली की तूच पुढे. त्याशिवाय का मागितल्या मागितल्या लगेच हाफ डे मिळतो. आम्हाला नाही मिळत कधी. आणि आता हे.. त्यांनी पण तुझ्यात काय बघितले त्यांनाच माहित?"
प्राजक्ताचे शब्द समीराच्या कानात उकळत्या तेलासारखे घुसले. तिच्याशी काहीच न बोलता समीरा हुंदका देत तिथून निघाली. राखीने तिला थांबवायचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ती बाहेर पडली होती.


" काय गरज होती तिला असं बोलायची?" राखीने रागाने प्राजक्ताला विचारले.

" काय चुकीचे बोलले? ना कधी धड तिला बोलता येत ना प्रेझेंटेबल राहता येते."

" एम्पलॉयी ऑफ द इयर मिळण्यासाठी काम करावे लागते टाईमपास नाही."


राखी समीराला फोन लावत होती. पण ती उचलत नव्हती. तिने नाईलाजाने राघवला फोन केला.

" राघव, समीरा पोहोचली का घरी सांगू शकशील का?"

" अग मी ऑफिसमध्ये आहे. तिला फोन लाव ना.. आणि ती घरी कशी असेल? ती तर ऑफिसला गेली ना."

हे ऐकल्यावर राखीने त्याला ऑफिसमध्ये घडलेली गोष्ट सांगितली. ती ऐकून राघवला थोडं टेन्शन आलं. कारण काहिही झालं तरी रडणारी समीरा नव्हती. तो तसाच घरी निघाला. घरी पोहोचेपर्यंत तो सतत समीराला फोन लावत होता. पण ती त्याचाही फोन उचलत नव्हती. त्याला वाटले होते तसेच घराला कुलूप होते. मुलं शाळेत होती. समीराचे कोणतेच असे नातेवाईक नव्हते जिथे ती जाऊ शकत होती. तिच्या गावी राहणाऱ्या आईवडिलांना फोन करून टेन्शन द्यायला त्याला नको वाटले. त्याला आठवले, त्याने समीराच्या मोबाईल मध्ये ट्रॅकिंग सिस्टीम बसवली होती. त्याने पटकन ती सुरू केली. मोबाईल त्याच्या घराजवळचे एक लोकेशन दाखवत होते. एवढ्या जवळ आहे मग ही फोन का नाही उचलत? त्याच्या मनात विचार आला. मोबाईल दाखवत असलेल्या दिशेच्या अनुरोधाने तो चालू लागला. दाखवत असलेला पत्ता एका सोसायटीचा होता. तो आणि समीरा इथून जाताना ती नेहमी इथे प्रेमाने बघत असायची. तिचा कोणी प्रियकर असेल का? या विचाराने राघव वेडापिसा झाला. तो दाखवत असलेल्या घरापाशी गेला. दारावर अनामिका अशी पाटी दिसत होती. त्याला चित्रकार अनामिका आठवली. राघवने दरवाजावरील बेल वाजवली. पुन्हा पुन्हा वाजवली. समोर अंगावर रंग माखलेली समीरा उभी होती. राघव बघतच राहिला. हातात रंगाचा ब्रश असलेली ती कोणी वेगळीच वाटली त्याला.

" तू इथे?" तिने विचारले.

" आत येऊ देशील?" राघव म्हणाला. समीरा बाजूला होताच तो आत आला. चारही बाजूंना चित्र लावली होती. अतिशय सुंदर अशी ती चित्रं तो बघतच राहिला. सगळ्याखाली एकच सही होती, अनामिका..


" तूच अनामिका आहेस?" राघवने विचारले.

" काय वाटते?"

" मग का नाही सांगितलेस आधी? का लपवलेस माझ्यापासून? हे घर कधी घेतलेस?"

" काय सांगणार होते तुला? मी पहिल्यांदा हातात ब्रश घेतला होता, तेव्हा झालेले भांडण मी विसरले नाही. आईबाबांना बोलले तर ते म्हणाले एवढ्याश्या गोष्टीसाठी नाते खराब करू नकोस.. पण ते सांगताना एक गोष्ट विसरले. त्यांच्यासाठी एवढीशी असणारी ही गोष्ट माझे जग होते. हे रंग, या रेषा.. हे माझे अस्तित्व आहे. तुमच्या जगात माझी सतत अवहेलना होत आली. कोणी म्हणायचे मी साधी आहे.. कोणी म्हणायचे हिच्यात स्पार्क नाही. पण माझ्यात जी गोष्ट आहे ती कोणालाच समजून घ्यायची नव्हती. म्हणून मी माझे हे नवीन जग उभारले. माझ्या पैशातून.. हे घर घेतले. जिथे तुमच्या जगातली कोणतीच गोष्ट मला त्रास देणार नाही."

" तूच अनामिका आहेस, हे कोणालाच माहित नाही?"

" फक्त माझ्या सरांना माहिती आहे. त्यांनीच माझ्यातली कला ओळखून मला प्रोत्साहन दिले. माझी चित्रे विकायला मदत केली. त्याही पेक्षा जास्त मला जेव्हा वाटेल तेव्हा चित्रे काढण्यासाठी हा फ्लॅट विकायला मदत केली. पण आज जेव्हा त्या नात्यावरच.." समीराचे डोळे पाणावले.

" तू जा आता." समीरा ठामपणे बोलली.

" आणि तू?"

" माझे मन शांत झाल्यावर येईन.." समीरा वळली. राघवने बघितले.. एका धुमसणार्या ज्वालामुखीचे चित्र समीरा काढत होती. त्याची रंगसंगती बघून त्याला स्वतःचे साडीवरून , सौंदर्यदृष्टीवरून काढलेले शब्द आठवले. तो घरी जायला वळला. दरवाजा लावताना त्याने समीराकडे बघितले. ती विसरून गेली होती स्वतःला तिच्या रंगाच्या जगात जिथे तिला हिणावणारे कोणी नव्हते.


अनेकदा व्यक्तीच्या गुणांपेक्षा बाह्यरूपाला जास्त महत्त्व दिले जाते. अशावेळेस त्या व्यक्तीची होणारी कुचंबणा मांडण्याचा हा प्रयत्न.. कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all