तिचे जग.. भाग २

कथा एका तिची
तिचे जग? भाग २

मागील भागात आपण पाहिले की समीराच्या साध्या राहणीवरून राघव तिला खूप बोलतो. आता बघू पुढे काय होते ते.


" समीरा, आज संध्याकाळी तयार रहा. आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे." राघवने फोन करून सांगितले.

" मुलांना घेऊन जायचे आहे का?" समीराने विचारले.

" मुलांना? नको. मुलांना कंटाळा येईल तिथे. तू मुलांची समजूत काढ. त्यांना जरा ॲडजस्ट करायला सांग. आपण येऊच. तू मात्र तयार रहा सहापर्यंत. मी आलो की लगेच निघू."

" सहापर्यंत कसे शक्य आहे? मला घरी पोहोचेपर्यंत सात वाजतात. त्यानंतर मुलांचे खाणेपिणे. कसे आवरून होईल माझे?" समीरा समजवायचा प्रयत्न करू लागली.

" हे ना, असे असते तुझे. कधीही काहिही सांगा. कारणं तयार असतात. एक दिवस सांग घरी लवकर जायचे आहे म्हणून. की ते ही मीच सांगायचे?" राघवचा आवाज थोडा चढला होता.

" हे माझ्या बाबांचे ऑफिस नाही की सांगितले आणि बाहेर पडले. मलाही इथे कामं असतात." समीरा वैतागली होती.

" मी सांगायचं काम केलं. येणार असशील तर ये.. नाहीतर बस." रागाने राघवने फोन ठेवला. समीराला काय करावे ते सुचेना. सहापर्यंत आवरून निघायचे म्हणजे आता लगेच निघावे लागणार होते. तिने बॉसला विनंती करून लवकर निघण्याची परवानगी मागितली. उद्या काम पूर्ण करण्याच्या बोलीवर तिला ती मिळालीसुद्धा. समीरा तशीच घरी आली. आईबाबा दोघेच बाहेर जाणार हे ऐकून मुले नाराज झाली पण तिने त्यांच्या आवडीचे खाणे दिल्यावर घरी बसायला तयार झाली.

सगळं आटपून ती तयार झाली. राघव येताच दोघे निघाले.

" कुठे जाणार आहोत ते तरी सांग." समीराने परत विचारले.

" माझ्या एका सहकार्‍याने एका चित्रप्रदर्शनाबद्दल सांगितले आहे. तिथे चाललो आहोत." राघव खुश होत बोलला.

" तुला चित्रांची आवड आहे?" समीराला आश्चर्य वाटले.

" हो.. मला आवडतात."

" अच्छा दिसली नाही ती कधी.."

" मी काय मिरवू का ती डोक्यावर घेऊन?" तुसडेपणाने राघव बोलला.
समीराने नेहमीप्रमाणे मौनव्रत स्विकारले.

प्रदर्शन गॅलरीत एकाच चित्रकाराची चित्रे लावली होती. राघव ती बघतच राहिला. अतिशय सुंदर चित्रे. त्याखाली एकच सही. अनामिका..

" बघितलंस.. याला म्हणतात कला.. काय चित्र आहेत बघ.. किती सुंदर रंग वापरले आहेत." राघव उत्साहाने सांगत होता.

" कोणाची चित्रे आहेत ही?" समीराने उत्सुकतेने विचारले.

"अनामिका लिहिलेले दिसते ना. पार्थ सांगत होता, खूप मोठी चित्रकार आहे. पण कोण आहे हे कोणालाच माहीत नाही."

" अच्छा.. पार्थ सांगत होता. तुला नाही वाटले? " समीराने विचारताच राघव पुढे गेला. समीरा त्याच्याकडे बघतच राहिली. तिला आठवले, लग्नानंतर पहिल्यांदाच सुट्टीच्या दिवशी तिने रंग हातात घेतले होते तेव्हा याच माणसाने किती भांडण केले होते. आणि आत्ता तोच सांगत होता की त्याला चित्रकला आवडते. ती विषण्णपणे हसली आणि चित्रे बघू लागली..

" या अशा बायका पाहिजेत.. काही तरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या. तिच्या चित्रांकडे बघूनच समजते तिची सौंदर्यदृष्टी. जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन. नाहीतर आमच्याकडे सगळ्याचा दुष्काळ.." राघव परत समीराकडे बघत बोलला.


राघवचे बोलणे बरोबर आहे का? खरंच समीराला सौंदर्यदृष्टी नाही? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all