तिचं जग (श्रावणी लोखंडे) भाग ३

लढाई एका आईची


इवलीशी प्राजक्ता हळू हळू मोठी होत होती. तिच्या पहिल्या वाढदिवशी तिच्या लाडक्या बाबांनी तिला छानसा परी चा फ्रॉक आणला होता पण दैवाला काही वेगळच मंजूर होत. वाढदिवस छानपैकी साजरा झाला आणि सगळी आवराआवर करतांना गच्छिवर गेलेला शालीनीचा नवरा पाय घसरून खाली पडला. गच्छी फार उंच नव्हती पण खाली असलेल्या टोकेरी दगडावर त्याच डोकं आपटल आणि तो जागीच ठार झाला. आनंदावर दुःखाची झालर एवढी घट्ट चढली की कुणीच त्यातून बाहेर पडेना. सासूने तरणा ताठा लेक गमावला होता आणि संसार आता कुठे छान बहरत होता त्याला विधात्याची दृष्ट लागली होती.

नवरा गेल्याने शालिनीचं संपूर्ण जगच उध्वस्त झालं होत. मानाने बघणाऱ्या नजरा आता मनात हवस घेऊन बघत होत्या. कधी कोण झडप घालेल याचा नेम नव्हता. सगळ्यांनी स्वतः ला सावरलं होत. सुधिरच्या पहिल्या श्राद्धच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र.. कपाळावर चंद्रकोर..हातात हिरवा चुडा असा अलंकार घालून शालिनी बाहेर आली. तिला बघून लोकांच्या चर्चा सुरू झाल्या. तिने समोर उभ राहून बोलायला सुरुवात केली.

"सगळ्या थोरा - मोठ्याना माझा नमस्कार. मला अस सौभाग्यवती बघून तुम्हाला धक्का बसला असेल ना? मी दुसर लग्न केलं की काय? यासारखे बरेच प्रश्न पडले असतील. मी त्या सगळ्यांची उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. नवरा गेला की बाईचं अस्तित्व संपत. मानाने बघणाऱ्या नजरा वखवखलेल्या होतात. नवरा नावाचं छप्पर नसल की बाई उघड्यावर पडलेली वाटते. नवरा म्हणजे बाई भोवती असणारा भक्कम कडा. तिची राखण करणारा हक्काचा राखणदार. इथे बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे सुधीर या जगात नाहीत पण तरी मी हे सगळं पुन्हा घालण्याचा निर्णय घेतला कारण माझी रक्षा म्हणून.. तुमची मुलगी किंवा बहिण म्हणून सगळे मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते." शालिनी लेकीला घेऊन पुढचे विधी करायला बसते.

तिच्या बोलण्यावर फार कोणी प्रतिक्रिया देत नाहीत पण तिचा अपेक्षाभंग देखील होत नाही. शालिनी सकाळी सगळे विधी आटोपून संध्याकाळी लेकीचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवते. छोटासा केक आणून तिने घरच्या घरी लेकीचा जन्मदिवस साजरा केला आणि नवऱ्याची पुण्यतिथी सुद्धा विधिवत पूर्ण केली. रात्री सगळ आवरून ती प्राजक्ताला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेली. मोठी जाऊबाई पण तिच्या भावासोबत रात्रीच माहेरी गेली.

बरेच दिवस गेलेल्या भावाच्या बायकोवर असलेली त्याची घाणेरडी नजर आणि त्याचातली हवस आज मात्र त्याला झोपू देत नव्हती. बायको पण माहेरी गेली होती आणि आई पण शेतावर झोपली होती त्यामुळे घरात कोणीच नव्हत. संधीचा फायदा घेत तो तिच्या दाराबाहेर येऊन मुद्दाम अडखळला.

"शालिनी...शालिनी... आई ग...माझा पाय.." मंदार.. शालीनीचा मोठा दिर ओरडत होता.

आवाजाने शालीनीला जाग आली म्हणून तिने प्राजक्ताच्या मानेखालून हळूच हात काढत बाहेर पळत आली. बघते तर मोठे दिर वेदनेने कळवळताना तिला दिसले.

जशी ती त्यांच्या जवळ आली तसच त्यांनी तिला कमरेत घट्ट पकडली.

"दादा..काय करताय? सोडा मला."

"अग..तुला पण गरज आहेच की या सुखाची. वर्ष झालं कोरडी पडली आहेस. ये.. माझ्या जवळ ये. मी सगळ सुख देईन तुला आणि कोणाला कळणारही नाही." तो तिला बळजबरी स्वतः कडे खेचत बोलत होता.

"नाही दादा..सोडा मला. हे पाप आहे.. हे चुकीचं आहे. मी माझ्या नवऱ्याला फसवू शकत नाही. मी हात जोडते तुमच्यापुढे सोडा मला.." ती त्याच्याकडे हात जोडून सुटकेची भीक मागत होती पण तो हैवान मात्र तिच्या मानेवर जबरदस्ती चावे घेऊ पाहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचे दात लागून तिला जखम झाली होती. त्याच्या पुरुषी शक्तीपुढे तिची ताकद कमी पडली आणि त्या नराधमाने शेवटी तिच्या इभ्रतीवर कलंक लावलाच. शरीरावर ठिकठिकाणी झालेले घाव तिच्या दुःखात भर घालत होते. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या सासूला हा सगळा प्रकार सांगून पोलिसात तक्रार करण्याबाबत सांगितल पण सासूने एक चकार शब्द न काढता तिलाच दोषी ठरवलं आणि तिला शांत रहायला सांगितल नाहीतर घडला प्रकार ती स्वतः पंचाना सांगून तिला कलंकित बाई म्हणून गावाबाहेर करेल अशी धमकी पण दिली शिवाय गर्भनिरोधक गोळी पण दिली. डोळ्यातल्या आसवांसोबत तिने ती गोळी पण पोटात ढकलली.


माहेराला मुकलेली शालिनी लेकीसाठी त्या घरात राहत होती. जमेल तेवढं ती घोळक्यात राहत असे. रात्रीच्या वेळी अगदीच कसला आवाज आला तर उठायची. तशी सासूने मोठ्या लेकाला तंबी देऊन ठेवली होती म्हणून तो पण आता लांबच होता.

प्राजक्ता चार वर्षांची झाली. तिचे बोबडे बोल नवऱ्याची जास्त आठवण होऊ देत नव्हते. तिचा एकमेव असा आधार आता तिची लेक होती. अशातच एकदिवस अंगावर पित्त उठलं तिच्या म्हणून तिने तिला उघडं करून तिच्या संपूर्ण अंगाला कोकमाच पाणी लावला होत आणि पंख्याखाली झोपवून ती कपडे धुवायला गेली. शेतावरून आलेला तिचा दिर पाणी पिऊन पुन्हा बाहेर जायला पडला तोच त्याची नजर झोपलेल्या त्याच्या चार वर्षाच्या पुतणीवर पडली. त्याचातला हैवान पुन्हा बाहेर आला. त्याने इवल्याशा प्राजक्तावर अतिप्रसंग केला. त्यातच ती हे जग सोडून गेली. तोंडावर हात ठेवल्याने ती बिचारी ओरडू ही शकत नव्हती आणि मदतीसाठी कुणाला आवाजही देऊ शकत नव्हती. बापाच्या जागी असणाऱ्या सख्ख्या मोठ्या काकाने लेकिसारख्या पुतणी सोबत हे वाईट कृत्य करून तिथून पसार झाला. कपडे धुवून घरी आलेल्या शालिनीने लेकीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल आणि तिची आर्त किंकाळी बाहेर आली. तिचा एकुलता एक आधार असलेली तिची लेक तिला एकटीला ठेऊन हे जग सोडून कायमची निघुन गेली होती. रूनझून करणारे पैजण...तिचे बोबडे बोल तिला पुन्हा कधीच ऐकू येणार नव्हते. यावेळी मात्र तिने शांत राहणार नाही अस ठरवून पोलीस स्टेशन मधे तक्रार केली होती. पोलिसी खाक्या दाखवून पोलिसांनी सगळा गुन्हा कबूल करून घेतला होता.
क्रमशः

@श्रावणी लोखंडे©


🎭 Series Post

View all