Login

तिचं जग (ऋतुजा वैरागडकर)...भाग 1

Strila Kadhihi Kami lekhu Naka


तिचं जग... भाग 1
ऋतुजा वैरागडकर
अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी

“अहो मी काय म्हणते, एकदा प्रयत्न करू द्या ना मला. ट्राय करायला काय हरकत आहे?”

“अग पण तुला जमणार आहे का? तू इथून साधी भाजी मार्केटमध्ये जातेस ते ही पायवाटेने. कधी गाडीने गेली आहेस का? तुला गाडी चालवायला जमतं का? जाणार आहेस का?”

“अहो प्लिज एकदा प्रयत्न करू द्या ना? प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही जमलं तर नाही करणार.”
अश्विनी आणि अशोक मधील हे संवाद रोजच असायचे. अश्विनीला नोकरी करायची इच्छा होती पण अशोक तिला तुला जमेल का तुला करता येईल का असं म्हणून तिला टाळायचा.

अशोक आणि अश्विनीच्या लग्नाला पंधरा वर्षे झालेली होती. समायरा आणि पारस अशी दोन मुलं होती. घरात सासू आणि हे चार असे पाच जण राहायचे. अशोक एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. सकाळी अशोक ऑफिसला गेला की काही वेळाने मुले शाळेला जायचे. त्यानंतर घरी फक्त अश्विनी आणि तिच्या सासूबाई रमाताई असायच्या.

काही वेळाने त्याही बाहेर निघून जायच्या, मग अश्विनीला एकटीला घर खायला उठायचं. आधी मुलं लहान होती तेव्हा दिवसभर तिला काम होती, तिचा दिवस मुलांमध्ये जायचा. पण आता मुले मोठे व्हायला लागली. स्वतःचा अभ्यास स्वतः करायची. त्यामुळे आता अश्विनीकडे थोडा वेळ होता. अश्विनीला बाहेर जाऊन काहीतरी काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिचा वेळही जाईल आणि हातात थोडे पैसे येतील. पण अशोकला हे मान्य नव्हतं. त्याला असं वाटायचं की हिला जमणार नाही.

अशोक ऑफिस वरून आला,

“अहो मी काय म्हणते, मी एका कंपनीत रिझ्युम पाठवलाय, त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलंय. मी जाऊ का?” अश्विनीने सगळं उत्साहात सांगितलं.

“अश्विनी तुला खरंच जमणार आहे का? अग रोजचा प्रवास, येणे-जाणे, घरचा स्वयंपाक हे सगळं एकत्र करायला तुला जमेल का? तुझी धावपळ होईल उगाच. का तू स्वतःला त्रास करून घेतेस? अग घरी रहा, आराम कर, स्वतःला वेळ दे.”

“अहो पण तुम्ही गेल्यानंतर मुले पण शाळेत जातात. मग आई बाहेर निघून जातात. मला एकटीला घर खायला उठतं, एकट एकट वाटतं, करमत नाही. त्या वेळेत जर मी ऑफिसला गेले काहीतरी काम केलं तर काय हरकत आहे. माझाही वेळ जाईल आणि घरी आल्यानंतर करेल मी माझं काम.”

“अगं हो पण ते तुला काही दिवस बरं वाटेल, नंतर तुझीच धावपळ होईल. रोज काय ते लोकलने प्रवास करणे आणि गाडीने गेलीस तरी तुला तेवढ्या लांब गाडीने जाता येणार आहे का? इथल्या इथे घाबरतेस ग तू.” दोघांचं बोलणं रमाताईच्या कानावर गेलं.