तिचं जग(ऋतुजा वैरागडकर)...भाग 4 अंतिम

Tila kami lekhu Naka Ek paul pudhe chalu dya

तिचं जग...भाग 4 अंतिम


अश्विनीच्या बाहेर जाण्याने सगळे स्वतःचे काम स्वतः करायला शिकले. मुलंही प्रत्येक गोष्टीत आई आई न करता त्यांची छोटी छोटी मोठी कामे करायला लागली.

अशोक आणि अश्विनी मधला दुरावा थोडा कमी होताना दिसत होता. तुला जमेल का? तुला करता येईल का? हे अशोकचे बोलणे अश्विनीला वारंवार आठवायचे. मग पुन्हा त्याच जोमाने ती कामाला लागायची. घरकामही त्यात जोमाने करायची.

बघता बघता एक महिना झाला आणि अश्विनीला तिचा पहिला पगार मिळाला. पहिला पगार हातात आला त्यावेळी तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहायला लागले होते. घरी आली आणि सर्वप्रथम तिने तो पगार देवापाशी ठेवला. देवाला नमस्कार केला. सासूबाई घरी नव्हत्या काही वेळाने अशोक आणि सासूबाई दोघेही घरी आले.

अश्विनीने तिचा पहिला पगार सासूबाईंच्या हातात दिला.

“आई हा माझा पहिला पगार यातून तुम्हाला जे आवडेल ते घ्या.”

“अश्विनी यावर सर्वस्वी तुझा अधिकार आहे, पण तुला जर हा कुणाला द्यायचा असेल तर तुझ्या नवऱ्याच्या हातात दे. त्यालाही कळू दे की तू सगळं करू शकतेस तुला जमलंय. तोच म्हणायचा ना जमेल की नाही जमेल, सांग त्याला मला जमलं म्हणावं, जा ठेव त्याच्या हातात पगार.”


अश्विनीने रमाताईंना नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि तो सगळा पगार अशोकच्या हाती ठेवला.

“अहो हा माझा पहिला पगार, आता खरं खरं सांगा जमतय ना मला.”

“हो जमतंय.” असं म्हणून तिघे हसायला लागले.

रात्री जेवण झाल्यानंतर अश्विनी सगळं आवरून रूम मध्ये गेली. अशोक तिच्याजवळ येऊन बसला.

“अश्विनी मला माफ कर ग, मी नेहमीच तुला हिणवत आलोय. तुला जमेल का तू करू शकतेस का तुला हे जमणारच नाही असंच बोलत आलोय. पण खरं सांगू आज मला तुझा अभिमान वाटतो. खरंच एका स्त्रीने जर मनात आणलं ना तर ती काहीही करू शकते. मी तुला या आधी सपोर्ट केला असता तर आज तू कुठल्या कुठे राहिली असतीस.

पण काही हरकत नाही तू सुरुवात केलीस ना मग आता माझा सदैव तुला पाठिंबा असेल. आता मागे वळून नाही पाहायचं. आता फक्त पुढे चालत राहायचं. आता तुझ्या नोकरीत तुला प्रगती मिळू दे आणि तू उंच शिखर गाठ, स्वतःची वेगळी ओळख, स्वतःचे वेगळे जग निर्माण कर आणि मला विश्वास आहे तू ते करू शकतेस.”


नवऱ्याचा आपला वर एवढा विश्वास बघून अश्विनीला रडायला आलं.

“अग रडू बाई आता का रडतेस?”

“मी रडत नाहीये हे आनंदाचे अश्रू आहेत. आज तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला ना मी त्या विश्वासाला खरं करून दाखवेल.” असं म्हणून ती त्याच्या कुशीत विसावली.

समाप्त:

स्त्रियांना कधी कमी लेखू नका,  स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही करू शकते,  ती घर सांभाळू शकते तसेच बाहेर जाऊन नोकरी करू शकते, तिला काहीही अशक्य नाही,  सगळ्यांना असं वाटतं असेल की घर सांभाळणं खूप सोपं काम आहे, तर चूक, ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि कुठलीही स्त्री विनातक्रार ते काम वर्षोनुवर्षे करत असते, त्या घरासाठी राबत असते, सगळ्यांच सगळं करते.

ते कुणालाच दिसत नाही, त्या बदल्यात दोन प्रेमाचे शब्द तिला मिळत नाहीत, त्या स्त्रीने जर बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा दर्शवली तर तुला जमेल का तू करू शकत नाहीस असं म्हणून तिला हिणवलं जातं, कमी समजलं जातं, हिला काय येतं अस वाटत त्यांना.

स्त्री ही परिपूर्ण असते आणि ती एका वेळेला सगळे काम करू शकते आणि स्वतःचं जग निर्माण करू शकते. तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. तिला जगू द्या, एक पाऊल पुढे टाकू द्या. तिला अडवू नका.

🎭 Series Post

View all