तिचं जग(ऋतुजा वैरागडकर)...भाग 2

Stri Eka weli Anek kame karu Shakte


तिचं जग...भाग 2

अश्विनी आणि अशोकचं बोलणं रमाताईच्या कानावर गेलं.
त्या त्यांच्या खोलीत बसलेल्या होत्या तिथूनच त्यांनी हाक मारली,

“अग तो नाही म्हणतोय ना, मग का करतेस तू?” सासूबाईचा आवाज ऐकून अश्विनीला आणखी वाईट वाटलं.

अश्विनीचा चेहरा हिरमुसला, जेवण न करता ती तीच्या खोली जाऊन झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विनी कोणाशीच काही जास्त बोलली नाही. अशोक ऑफिसला गेला, मुले शाळेत गेली त्यानंतर सासुबाईला चहा नाश्ता दिल्यानंतर अश्विनी तिच्या स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला आणि दोघीही टीव्ही बघता बघता जेवण करायला बसल्या.

“काय ग अश्विनी आज अशी गप्प गप्प का आहेस?”

“काही नाही.”

“काही नाही काय तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय, काय झालं?”

“काही नाही आई.”

“काही नाही काय मला माहिती आहे काय झालं, काल तुझं आणि अशोकचं बोलणं ऐकलं मी. अग तो नाही म्हणतोय ना मग राहू दे. तुला माहिती अश्विनी मला या सगळ्यांची खूप आवड होती. पण तुझे सासरे ते खूप कडक स्वभावाचे होते. त्यांना हे सगळं आवडायचं नाही. सासुबाईंना पण हे सगळं चालायचं नाही, म्हणून माझे छंद माझ्या इच्छा सगळं मी मागे टाकलं आणि संसारात रमली. आज वेळ आहे पण शरीर साथ देत नाही.

आजही मला असं वाटतं की आपण ते सगळं करावं, आपले छंद जोपासावे पण आता कुठे जमतं का तेवढं? म्हणून मग मी आपला वेळ  भजनात, कीर्तनात, देवळात घालवते. इकडे तिकडे जाऊन आपला वेळ घालवते. पण तुला खरं सांगू का अश्विनी माझं जे झालं ना ते तुझं होऊ नये असंच मला वाटतं. हे बघ अशोकला बाहेर जाऊन नोकरी करू देणं नाही आवडत ना तर तू घरातल्या घरात काही करू शकतेस. तुझे छंद जोपास, तुला काय आवडते ते तू कर.

हे बघ बाईने मनात आणलं ना तर ती खूप काही करू शकते. तू घरूनही तुझा बिजनेस करू शकते. तुझ्या हाताला किती छान चव आहे, आहे ना? तू घरूनच तुझा काहीतरी बिझनेसही करू शकतेस. बघ मला जे वाटलं ते मी बोलले, तुला पटते का बघ आणि हो तू नोकरी जरी केलीस ना तरी माझी काही हरकत नाही.

माझ्याकडून तुला उलट मदतच होईल आणि हे बघ आता असा चेहरा पाडून बसू नकोस. छान पोटभर जेवण कर आणि विचार कर तुला काय काय आवडतं. संध्याकाळी अशोक आला ऑफिस वरून की मी बोलेन त्याच्याशी.” सासूबाईचं बोलणं ऐकून अश्विनीला आनंद झाला.


क्रमशः

🎭 Series Post

View all