तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया - भाग २

तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
दुसरी फेरी :- जलद कथामालिका
कथेचा विषय:- तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया)

तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया) भाग २
©निशा थोरे (अनुप्रिया)


मामीचा पारा चढलेला होता.

“पुरे झालं आता. मी यांना सांभाळू शकत नाही. का मी कोणाला फुकट पोसू? त्यांना सांगा त्यांची स्वतःची सोय करायला. आयुष्यभर माझ्याच उरावर बसून राहणार आहेत का?”

“अगं जरा हळू बोल. बाहेरच बसलीय ताई. ऐकू जाईल ना तिला. असं का बोलतेय? कुठे जाणार त्या? आपल्याशिवाय कोण आहे त्यांना?”

मामा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण मामी ऐकायला तयार नव्हती.

“ऐकू देत. मी काय घाबरते का कोणाला? दुःखात होत्या म्हणून माणुसकीच्या नात्याने चार दिवस सांभाळून घेतलं ना पण असं आयुष्यभर सांभाळणं मला जमणार नाही.”

शेवटी मामाचा नाईलाज झाला आणि त्याने आमची रवानगी त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या भाड्याच्या घरात केली. पुन्हा एकदा एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. आई आजूबाजूच्या परिसरात चार घरची धुणीभांडी करू लागली. आई सकाळी घरातलं सगळं आवरून मला आजीकडे ठेवून जायची. मामीने तितकेच काय ते उपकार आमच्यावर केले होते.

बाबांच्या नसण्याने आईच्या जगात फारच खळबळ माजली होती. बाबांच्या राज्यातलं तिचं जग पार बदलून गेलं होतं. बाबांच्या जाण्याने तिच्या विश्वाला सुरुंग लागला होता. ऐन तारुण्यात ती विधवा झाली होती. एकटी स्त्री म्हटलं की पुरुषांसाठी सहज उपलब्ध होणारं सावजच. पुरुषांच्या वाईट नजरांचा सामना करत, बायकांच्या टोमण्यांना न जुमानता आई लढत राहिली. जगणं आणि जगवणं इतकंच तिला ठाऊक होतं. दिवस सरत होते. हळूहळू मी मोठी होत होते. आईने जवळच्याच सरकारी शाळेत माझं नाव घातलं आणि माझं शिक्षण सुरू झालं. लहानपणापासूनच मी खूप हुशार होते. प्रत्येक इयत्तेत चांगल्या गुणांनी पास होत होते आणि पुढच्या वर्गात जात होते. एकदिवस ऋतुचक्राचा कौल मिळाला आणि मी एकदम मोठी झाले. सारं चित्रच बदलून गेलं. माझ्याविषयीची आईच्या मनातली काळजी आता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली.

“गरीबाच्या मुलीची इभ्रत म्हणजे काचेचं भांडं हो. एकदा का या भांड्याला तडा गेला तर पुन्हा कधीच सांधता यायचा नाही. त्यात तुमच्या घराला नराचं संरक्षण नाही. लक्ष ठेव गं कुंदा वहिनी, बाप नाही म्हटल्यावर दबा धरून बसलेली ही सारी जंगली श्वापदं तिच्यावर कधी झडप घालतील कळायचं पण नाही आणि ज्या घराला पुरुषाचा वचक नाही, कोणी बोलणारं नाही म्हटल्यावर पोरीला भरकटायला वेळ लागायचा नाही.”

लोकांच्या बोलण्याने आईच्या मनावरचं दडपण वाढत चाललं होतं. माझ्याविषयीची तिची काळजी रास्त होती पण त्यामुळे ती फारच भित्री, हळवी आणि शंकेखोर झाली होती. मुलांशी बोलणं, हसणं तर दूरच पण तिच्यासमोर कोण्या पुरुष माणसाचं नाव काढणंही आता आमच्या घरात फार मोठा गुन्हा वाटू लागलं. कोणाकडे जायचं नाही, बोलायचं नाही. ती सारखी माझ्यावर चिडचिड करू लागली. मामाशिवाय आमच्या घरी कोणीच पुरुष माणूस येत नव्हतं किंबहुना कोणाला तशी परवानगी नव्हती. हळूहळू आईने घातलेली बंधनं मला जाचक वाटू लागली. तिच्या बंधनांना खरंच मी खूप वैतागले होते पण म्हणतात ना! विधिलिखित जे असेल ते घडतच. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दहावीचं वर्ष सुरू झालं आणि मी जोमाने अभ्यासाला लागले होते. आईच्या कष्टाची मला पुरेपूर जाण होती. मी मन लावून अभ्यास करत होते आणि एक दिवस माझ्या निरस आयुष्यात तो आला.

अमृता तिची कहाणी सांगत होती. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांनी तिला तिच्या जगाची पुन्हा पुन्हा ओळख होत होती. तिची कहाणी सांगताना माझ्यासकट तीही तिच्या भूतकाळात रमून गेली. ती पुढे सांगू लागली.

“अश्विन बनसोडे.. आमच्याच शेजारच्या गल्लीत राहायचा. माझ्याच वर्गात होता. दहावीला असताना एक्सट्रा क्लास असायचे तेंव्हा ओळख झाली. अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. खरंतर आमच्या घरात मामाशिवाय कोणीच फारसं येत जात नसे त्यामुळे अश्विन माझ्या जगात प्रवेश करणारा पहिला पुरुष होता. त्याच्याविषयी माझ्या मनात विशेष जागा निर्माण होत होती. अश्विन स्वभावाने खूपच चांगला होता. तो नेहमी मला समजून घेत होता. हळूहळू आमच्यात छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि एक दिवस त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तुम्हाला सांगते मॅडम, वर्गातल्या सर्व मुलामुलींसमोर अगदी गुडघ्यावर बसून हातातलं गुलाबाचं फुल माझ्यासमोर धरत तो मला म्हणाला होता,

“आय लव्ह यू अमृता..”

मी गांगरून गेले. खरंतर मला फार आनंद झाला होता. मीही त्याच्या हातातला गुलाब घेत लाजून त्याच्या प्रेमाला होकार देऊन टाकला. अडनिड्या वयातलं निरागस प्रेम ते. भविष्याचा विचार केलाच नव्हता. आमच्यातलं प्रेम फुलू लागलं. बाबांचं प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं त्यामुळे त्या मायेच्या स्पर्शाला मी आसूसले होते. अश्विनच्या मायेची ऊब मला हवीहवीशी वाटू लागली. घराला पुरुषाचा आधार किती महत्वाचा असतो आता मला जाणवू लागलं. गाठीभेटी होऊ लागल्या. चिठ्यांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या. खूपच सुंदर, मखमली दिवस होते ते. मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्याच्या येण्याने माझं जग पारच बदलून गेलं होतं. दुःखाशी सामना करता करता माझ्या आयुष्यात त्याच्या प्रेमाची बरसात होत होती. मी खूप खूष होते पण नियतीला माझं सुख मान्यच नसावं. तिने पुन्हा तिचा डाव टाकला.

सारं काही सुरळीत सुरू असताना एक दिवस आमच्या प्रेमाची कुणकुण आमच्या घरी लागली. त्याच्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. खरी अडचण तर माझ्या घरी होती. माझ्या घरून आमच्या प्रेमाला कडाडून विरोध झाला. अश्विन दुसऱ्या समाजातला होता. मामी मामाला घरी घेऊन आली आणि तिने आई मामांसमोर आकांडतांडव केला.

“शेवटी करायचं तेच केलं ना कार्टीने? नाक कापलं ना आमचं? तोंड दाखवायची कुठे सोय ठेवली नाही. जातीबाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडलीय म्हणे! अगं करायचं तर नीट बघून तरी करायचं. घर, घराणं माणसं काहीही न पाहता असं कसं प्रेमात? नाही.. नाही, असं चालणार नाही. आम्हाला समाजात उठायचं बसायचं आहे.”

मामी तावातावाने बोलत होती. आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आईला माझा खूप राग आला होता.

“कार्टे, तुला शिकायला शाळेत पाठवलं होतं की, शाळेत जाऊन लफडी करायला? थांब तुला चांगलाच चोप देते.”

असं म्हणत ती माझ्या हाताला धरून खेचत आतल्या खोलीत घेऊन गेली आणि मला बेदम मार दिला. अंगावर काळे निळे व्रण पडेपर्यंत, नाकातोंडातून रक्त येईपर्यंत ती मारत राहिली. मी ओरडत राहिले. सहन करत राहिले.

“ताई नको, थांब मारू नको तिला. तरण्याताठ्या मुलीवर असा हात उचलणं शोभतं का? बस्स कर ताई.”

मामा बाहेरून दार ठोठवत राहिला पण आईने दार उघडलं नाही. मारून दमल्यावर तिने मला आतल्या खोलीत बंद केलं. मी तशीच एका कोपऱ्यात बसून रडत राहिले पण आईला दया आली नाही. मला खोलीत कोंडून आई बाहेरच्या खोलीत आली.

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all