Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग (डॉ. किमया मुळावकर) भाग-२

Read Later
तिचं जग (डॉ. किमया मुळावकर) भाग-२


अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी

तिचं जग (डॉ. किमया मुळावकर) भाग-२

साधारणतः दोन वर्षांपूर्वी

शंकरराव, सुधाताई आणि सुयश असं छोटंसं त्रिकोणी कुटुंब. शंकरराव एका खाजगी बँकेत मॅनेजर या पदावरून नुकतेच निवृत्त झाले होते तर सुधाताई ह्या गृहीणी होत्या. सुयश नुकताच एका नामांकित कॉलेजमधून एम्.डी. पास झाला होता. बारावीच्या वेळी बोर्डात दहावा आला होता आणि मेडीकल प्रवेश पूर्व परीक्षेतही राज्यात तिसरा आला होता. महाराष्ट्रातल्या टॉपच्या मेडीकल कॉलेजमधून त्याचं एम्. बी. बी.एस्. पूर्ण झालं होतं आणि आता एम्.डी. च्या वेळी त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर सुयशने एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जॉब करणं सुरु केलं होतं. पुढे त्याला परदेशात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी त्याने एकीकडे सुरू केली होती. सुयशचं एम्.डी. झालं आणि सुधाताईंना त्याच्या लग्नाचे वेध लागले.


"अहो, मी काय म्हणतेय, आपल्या सुयशचा बायोडाटा बनवून घ्या. म्हणजे कसं, नातेवाईकांमध्ये बायोडाटा दिला की वधूसंशोधन सुरु होऊन जातं." संध्याकाळच्या वेळी शंकरराव, सुधाताई आणि सुयश चहा घेत होते तेव्हा सुधाताईंनी सुयशसमोर मुद्दाम हा विषय काढला."बाबा, त्याची काही गरज नाहीये. तसंही मी सांगणारच होतो पण आता विषय निघालाच आहे तर… माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. प्रिया नाव आहे तिचं. एम्. डी. च्या वेळी माझ्या सोबतच होती." सुयश म्हणाला आणि चहा घेता घेता सुधाताईंना ठसका लागला.

"प्रिया नाव आहे. आडनाव काय आहे?" सुधाताई

"ती गोष्ट महत्त्वाची आहे का?" सुयश

"म्हणजे मुलगी दुसऱ्या जातीतली आहे. हे बघ सुयश एकतर मुलगी दुसऱ्या जातीची आणि त्यातल्या त्यात ती डॉक्टर… मला हे लग्नच मान्य नाहीये." सुधाताई


"जातीचं एकवेळ समजू शकतो पण डॉक्टर आहे म्हणून का नकार?" शंकरराव मध्येच बोलले.

"सुयश डॉक्टर, त्याची बायकोही डॉक्टर… दोघे दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये राहणार मग घराकडे कोण बघणार? पुढे मुलंबाळं होतील, त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? आपण किती दिवस पुरणार आहोत? ते काही नाही सुयश, मला हे लग्न मान्य नाही. तुझ्यासाठी घरदार सांभाळणारी, आपल्या जातीतली दुसरी मुलगी मी बघेल, तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल." सुधाताई हट्टाला पेटल्या होत्या."म्हणजे मी मुलगी असतो किंवा मला एखादी बहीण असती तर तू तिला शिकवून डॉक्टर वगैरे केलं नसतं का? की घर सांभाळायचं म्हणून आडाणीच ठेवलं असतं?" सुयशही चिडला होता.


"ते काही मला माहीत नाही पण मला हे लग्न मान्य नाही." सुधाताई


"बरं मुलगी कुठे राहते? तिच्या घराविषयी वगैरे सांगशील का काही?" शंकरराव


"बाबा प्रिया इंटेसिव्हीस्ट आहे. हॉस्पिटलमधला अतिदक्षता विभाग असतो ना, आय.सी.यु. म्हणतात त्याला, ते प्रियाच्या अंडर येतं… प्रिया तिथली मुख्य डॉक्टर आहे. तसं नगरजवळ गाव आहे तिचं, पण सगळं कुटुंब इकडे पुण्यातच आहे. तिचे वडील एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतात. दोन लहान बहिणी आहेत.""म्हणजे कालांतराने तिच्या बहिणींची जबाबदारी तुझ्यावरच येणार… तुझं सगळं नीट व्हावं म्हणून आम्ही दुसऱ्या लेकराचा विचारही केला नाही… त्यांना असा जावई मिळाला तर बरंच आहे ना… ते काही नाही, हे लग्न होणार नाही म्हणजे नाही." सुधाताई इरेस पेटल्या होत्या.

"हे मात्र अतिच होतंय आई… लहाणपणापासून सगळ्या गोष्टी तुमच्याच मनाने करत आलोय पण आता नाही. माझा जीवनसाथी निवडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी लग्न करेल तर प्रियासोबतच नाही तर…" सुयश बोलत होता.

"नाही तर, लग्न करणार नाही ना. ठीक आहे. तू बिना लग्नाचा राहिलेला चालेल मला." सुधाताई त्याचं वाक्य मध्येच तोडत बोलल्या.


"चूकीचं समजतेय तू… मी प्रियासोबतच लग्न करेल आणि तुला हे पटत नसेल तर आम्ही वेगळं राहू." सुयश रागाने बोलून घराच्या बाहेर निघून गेला. त्यादिवशीपासून सुयशने घरात अबोला धरला. सुधाताईही हट्टाला पेटल्या होत्या. दिवस असेच पुढे जात होते.

शंकररावांनी सुधाताईंची समजूत काढली. अखेर सुधाताईंनी लग्नाला होकार दिला. आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न थाटामाटात व्हावं असं सुधाताईंचं स्वप्न होतं पण सुयशने रजिस्टर पद्धतीने लग्न करून त्यांचं हे स्वप्नही मोडलं होतं. लग्न करून प्रिया घरात आली होती.

"प्रिया, तू डॉक्टर असशील दवाखान्यात. इथे घरी मात्र तू या घरची सून आहेस. त्यामुळं घरातली सुनेची सगळी कर्तव्य तुला पार पाडावी लागतील." सुधाताईंनी प्रिया घरात आल्या आल्या तिला सक्त ताकीद दिली. त्यांना वाटलं प्रिया यावर काही उलट उत्तर देईल पण प्रियाने मात्र हसतमुखाने होकार भरला. प्रिया सुधाताईंसोबत जुळवून घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती. लग्न झाल्यावर पंधरादिवसातच प्रिया परत जॉबवर जायला लागली. जॉबच्या पहिल्यादिवशी प्रिया पहाटेच उठली. घरातलं सगळं आवरून जॉबवर गेली. बारा तासांची ड्युटी करून घरी परत आली. तिचा दिवस खूप दगदगीचा गेला होता. घरी परत आल्यावर प्रिया सोफ्यावर डोळे मिटून बसली होती. 

"प्रिया, दवाखान्यातून आल्यावर आधी आंघोळ करत जा. आय.सी.यु. मध्ये काम करते ना तू… तिथं रोजच कुणी ना कुणी मरत असतं, हो ना? मग काही संस्कार वगैरे आहे की नाही… शेजारीपाजारी कोणी मेलं तर तिथे जाऊन आल्यावरही आपण आंघोळ करतोच ना? तू तर मुडद्यालाच हात लावून येतेस…" इतक्यात सुधाताई तिच्यावर ओरडल्या. प्रिया तिथून उठून सरळ बाथरूममध्ये गेली.

"मला नाही म्हटलंस कधी आंघोळ करत जा… मी पण दवाखान्यातच जातो." सुयश त्याच्या आईवर चिडला होता.

"कारण तुला स्वयंपाकपाणी करावं लागत नाही." सुधाताई बोलल्या. सुयशसोबत त्यांचा खूप वाद झाला. सुयश बेडरूममध्ये आला. प्रिया आंघोळ करून बाहेर आलेली होती.


"तिने कर म्हटलं आणि तुही लगेच आंघोळ केली का?" सुयश प्रियावर चिडला.

"बरोबर आहे रे त्यांचं, एका दृष्टीने बघ ना आपण दवाखान्यात जातो… किती व्हायरसेस आणि बॅक्टेरिया असतात तिथं… सगळे आपल्या अंगावर बसतच असतील ना… घरी आल्यावर आपण आंघोळ केली तर आपल्याला आणि घरातल्या लोकांना इन्फेक्शन होणार नाही." प्रियाने तिच्या सासूचीच बाजू घेतली. सुयशला मात्र हे बिलकुल पटलं नव्हतं.


"सासूची बाजू घेणारी तू पहिलीच सून असशील. बरं, कामाला बाई लावायची का नाही? रात्रीचे दहा वाजत आलेत आणि अजून घरात स्वयंपाक झालेला नाहीये. आई हे मुद्दाम करतेय. ती स्वयंपाक करू शकली असती पण… जाऊ दे… तुलाच हौस आहे, आता एवढी थकून आल्यावर करत बस स्वयंपाक..." सुयश अजून चिडला.


"कामाला बाई लावायची आहे रे पण मी म्हटलं तर आई मुद्दाम लावू देणार नाहीत आणि लावलीच तर तिला टिकू देणार नाहीत. चला डॉक्टर प्रिया, आता स्वयंपाकाची तयारी करा." प्रिया एक मोठा उसासा टाकून स्वयंपाक घरात गेली. सर्व स्वयंपाक व्हायला रात्रीचे अकरा वाजले. तिने डायनिंग टेबलवर सर्वांची पानं वाढली.

"सुधा, आपल्या शेजारी जी स्वयंपाकाला बाई येते तिच्यासोबत माझं बोलणं झालंय. उद्यापासून ती सकाळ-संध्याकाळ आपल्याकडे स्वयंपाकाला येत जाईल. तुझे कोणत्याही प्रकारचे नखरे चालणार नाहीत. त्या बाईला चूपचाप स्वयंपाकाचं सांगायचं आणि तिला टिकवून ठेवायचं. काही माणूसकी आहे की नाही तुझ्यात, ती पोरगी थकून भागून घरी येते आणि तू घरात असूनही स्वयंपाक केला नाहीस." शंकराव चांगलेच चिडले आणि त्याचा फायदा प्रियाला झाला.

दिवस सरत होते. सुधाताईंचा प्रियाला निरनिराळ्या प्रकारे सासूरवास करणं सुरुच होतं.

क्रमशः
©® डॉ.किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//