बाईची गोष्ट ( भाग चवथा)

स्त्रीला आपण किती गृहीत धरून चालत असतो, तिचंही एक जग असतं, स्वप्न असतात तेचं विसरून जातो.

बाईची गोष्ट ( भाग चवथा )

विषय: खेळ कुणाला दैवाचा कळला 


गावा पासून दूर असं ते सुंदर फार्म हाऊस होतं. मंद प्रकाशात आणि हळूवार आवाजात इन्स्ट्रूमेंटल म्यूझिक सूरू होतं. त्या वातावरणात दोघं रसिकपणं ड्रिंक घेत बसले होते. ड्रिंक घेता घेता दोघांच्या हसत खेळत गप्पा सुरू होत्या. बिर्याणीचा भूक उत्तेजीत करणारा सुवास घरभर दरवळला होता.

" बरं का, डॉक्टर साहेब, अजीबात चिंता करू नका. ती आली की आपण जेवणं करु. नंतर मी निघून जाईल. या ठिकाणी फक्त ती आणि तुम्हीचं राहाल. सकाळी ती तिच्या वेळेस निघून जाईल. तसा मी येईलच तुम्हाला घ्यायला. "

एक अनोळखी बाई बरोबर पूर्ण रात्र एकट्याने काढायची या विचारांनीच त्याच्या पोटात एकदम खड्डा पडला.  हळुहळू त्या वातावरणाची नशा दोघांवर चढू लागली. मग ते थोडा अश्लील व्हिडिओ पाहात बसले.

बरोबर नऊ वाजता दाराची बेल वाजली. धावत जावून त्याने अगोदर व्हिडिओ बंद केला. नक्कीच ती आली असणार.

दरवाजा हळूच उघडला गेला. बाहेरच्या प्रकाशाची तिरीप आत आली. त्या प्रकाशाच्या सोबत ती आत आली. खाली मान घालुन चुळबूळ करतं बसून राहीली.

ती कशी दिसते आहे, या बद्दलची उत्सूकता त्याला दाबून ठेवता येईना. कोणी बघत नाही असं पाहून त्यानं तिच्याकडं हळूच चोरून बघितलं. घरंदाज घरातली असावी अशा प्रकारे तिने फिकट रंगाचे कपडे घातले होते. कुठल्याही प्रकारचा भडकपणा तिच्या वागण्यात नव्हता. क्षणभर काय बोलावं तेच कोणाला सूचना. अभयनेच बोलायला सुरुवात केली.

" आपण जेवायला बसायचे का. तुझं जेवण झालं आहे का"

तिने मानेनेच नकार दिला. अभयने खानसाम्याला तीन ताट तयार करायला सांगीतली. सगळे जण जेवायला बसले. जेवण अप्रतीम झालेलं होतं. सगळे आनंदात जेवत होते. जेवता जेवता पुन्हा एकदा त्यानं तिच्या कड हळूच तिरप्या नजरेनं बघितलं.खूप दिवसांनी चवीष्ट जेवणं मिळाल्या सारखी ती मन लावून जेवत होती.

सध्या तिच्या मनात काय बरं विचार सुरु असतील.याचा तोच विचार करत होता. अचानक जेवता जेवता ती उठली आणि बाथरुम कडे पळाली. तिच्या या वागण्या बद्दल दोघांना आश्चर्य वाटलं. थोडया वेळाने हात, पाय, तोंड पुसत ती बाहेर आली.

" सॉरी, मला वाटतं मला ऊन लागलं असावं. अचानक थोडं मळमळल्या सारखं वाटलं. काळजी करू नका. आता ठीक आहे. तूम्ही सावकाश जेवा. मी तोवर बेडरूम मधे जावून पडते . चालेल ना "

तिचा आवाज एव्हढा नादमय असेल असं त्या दोघांनाही वाटलं नव्हतं. खरं म्हणजे ती एका चांगल्या घरातली वाटतं होती. तिचं बोलणं एव्हढ सुसंस्कृत होतं की तिला नाही म्हणणं त्या दोघांनाही सुचलं नाही. त्यांची मुक संमती समजून ती बेडरूम मधे निघून गेली.

" काय साहेब आवडली की नाही मुलगी "अभयने विचारल्यावर तो एकदम भानावर आला. या बाई सोबत आपल्याला रात्र घालवायची आहे. या विचारांनी थोडा नर्व्हस झाला. त्यानं काहीचं उत्तर दिलं नाही. जेवणं झाल्यावर अभयने त्याच्या खांद्यावर हाताने थोपटत, बेस्ट ऑफ लक दिलं आणि त्याला एकट्याला सोडून तो आणि खानसामा निघून गेले. अभयच्या गाडीचे लाईट हळुहळू दिसेनासे झाले.

आता त्या फार्महाऊस वर ते दोघेच एकटे होते. त्याला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. तरी हिंमत करून तो बेडरूम मधे आला. कशाचीच चिंता नसल्या सारखी ती गाढ झोपलेली होती.

कशा असतात ना या बायका एकदम साळसूद. घरच्यांना वाटतं असेल ती नाईट ड्यूटीला जातं असेल, पण इकडं हिचे हे धंदे सुरू. अशा बायका म्हणजे समाजाला किडचं म्हणायची. आता आपण भरलेला पैसा तर वसूल करायलाच हवा. असे विचित्र विचार त्याच्या डोक्यात फिरायला लागले. तो धाडकन रूम मधे आला आणि तिला जाग करायला त्याने तिला स्पर्श केला . एकदम चटका बसल्या सारखा त्यानं हात बाजूला केला. तिला प्रचंड ताप भरलेला होता. तापात ती बरळत होती.

या गोष्टीची त्यानं कल्पनाच केलेली नव्हती. एकाएकी त्याच्यातला डॉक्टर जागा झाला. त्यानं अभयला फोन करून तापाच्या गोळ्या घेऊन यायला सांगितल्या. गोळ्या घेऊन अभय आला. त्यानं तिला गोळी घ्यायला सांगीतली. अभय खाली झोपला होता. अधून मधून तो तिचा ताप चेक करत होता.पण ताप कमीच होत नव्हता. मग बराच वेळ तो तिला स्पंजिंग करत राहिला. मध्यरात्री तिचा ताप बराच कमी झाला होता. त्याच्या सगळ्या ईच्छा संपल्या होत्या.

" सर, माफ करा. आता मी एकदम ठीक आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता." ती अजिजीने म्हणाली.

तो एकदम चिडला." तू वेडी आहेस का. अग तुला थोडया वेळा पूर्वी खूप ताप भरलेला होता. उलट तू कोठे राहतेस ते सांग. मी तुला तुझ्या घरी सोडून देतो."

त्याचं बोलणं ऐकल्यावर ती एकदम रडायला लागली.

" सर, प्लीज. मला रात्री घरी पाठवू नका. माझ्या नवऱ्याला संशय येईल. त्याला मी सांगितलं आहे की मी एका कंपनीत रात्रपाळी करत असते. काही महिन्या पूर्वी नवरा कंपनीत अपघात होऊन दोन्ही पायांनी अपंग झालेला . त्यात मला दिवस गेलेले. त्याच्या कंपनीत नोकरी मागायला गेली. तर त्याच्या बॉसने नोकरी देण्याऐवजी माझा गैरफायदा घेतला. त्या वेळी त्या बॉसचा जीव घ्यावा. पण पोटातलं बाळ तस करायला परवानगी देईना. मग वाटलं त्या बॉसची गुलामगिरी करण्यापेक्षा प्रामाणिक पणं काम करावं. पण तेही शक्य झालं नाही. समाज फार भयानक आहे सर. बाईच्या दुःखा पेक्षा ती एकटी असतांना तिचा गैरफायदा कसा घेता येईल याचा लोकं विचार करतात. खोटी सहानुभूती दाखवतात. मला वेगळा मार्ग मिळाला. भले मी शरीराने कलंकित आहे. पण मनाने मात्र मी माझ्या नवऱ्याचीच आहे. माझ्या या छोट्याशा जगात माझं बाळ आहे आणि त्याची मी आई आहे. आणि हेच माझं खरं जग आहे. ". बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते.

तिची गोष्ट संपली. तो उठला. त्यानं खिडकीचा पडदा बाजूला करून बाहेर पाहिलं. आकाशात एकटाच चंद्र चमकत होता. त्याचं पिठुर चांदण सगळी कडे पडलेलं होतं. अजून थोड्या वेळाने सकाळ होणारं होती. तिच्या जगात ती परत जाणार होती.

( समाप्त )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all