तिचं जग- निशा थोरे अनुप्रिया- भाग ४ - अंतिम

तिचं जग - निशा थोरे अनुप्रियाअष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
दुसरी फेरी :- जलद कथामालिका
कथेचा विषय:- तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया)

तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया) भाग ४ (अंतिम)
©निशा थोरे (अनुप्रिया)


सगळं छान सुरळीत सुरू होतं. काही दिवसांनी आम्ही बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःची रिक्षा घेतली. अश्विनला जणू भविष्यातल्या संकटाची जाणीव झाली होती की काय कोणास ठाऊक! सहज गंमत म्हणून त्याने मलाही रिक्षा चालवायला शिकवलं होतं. पुढे मागे कामी येईल म्हणून त्याने माझं लायसन्ससुद्धा काढून ठेवलं. रिक्षाचा धंदा चांगला सुरू होता. त्यामुळे बँकेचे हप्ते वेळेवर जात होते. आम्ही खूप आनंदी होतो. दृष्ट लागण्यासारखा आमचा संसार सुरू होता. जसजशी मी संकटाचा सामना करत होते तसतशी माझ्या वाट्याला अजूनच नवीन संकटं चाल करून येत होती. अशातच माझ्या एकट्यावरच नाही तर साऱ्या जगावर कोरोना आजाराचं संकट कोसळलं आणि त्यात माझ्यासारख्या कित्येकीचे संसार होरपळून निघाले. कित्येकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. या काळात प्रत्येकाला कुटुंबाची खरी किंमत समजली. हो न मॅडम?”

अमृताने मला विचारलं.

“हो अगदी खरंय.. तेंव्हा घरातल्या स्त्रीचीही किंमत कळली. ती काय करते? तुम्ही घरीच असता? असं विचारणाऱ्या प्रत्येकाला तिच्या चार भिंतीतल्या जगाची किंमत समजली.”

हे बोलताना माझ्या डोळ्यासमोर माझी आई आली आणि आपोआप डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अमृता पुढे बोलू लागली.

पुन्हा एकदा माझ्यावर सत्वपरीक्षेची वेळ आली. साऱ्या देशभरात लोकडाऊन जाहीर करण्यात आला. लोकांनी घराबाहेर पडायचं नाही असा आदेश देण्यात आला. मग सर्वांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. बस, गाडी, मार्केट, दुकानं, छोटया छोट्या खाजगी कंपन्या, व्यवसाय बंद पडले. बऱ्याच लोकांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यात माझा अश्विनही होता. माझ्या शिकवण्या बंद झाल्या. आजाराने बरीच माणसं मरण पावली होती. कितीजणांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली होती. सगळीकडे शुकशुकाट पसरला होता. साऱ्या देशावर, जगावर कोरोना नावाच्या संकटाने थैमान घातलं होतं. आम्ही दोघंही घरातच बसून होतो. आमच्या जवळचे पैसे संपत आले होते. जवळचं अन्नधान्यही संपत चाललं होतं. सरकारने पहाटे सहा ते आठच्या दरम्यान लॉकडाऊन थोडं शिथिल केलं. त्यावेळात गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अजूनही नियती आमचा पिच्छा सोडत नव्हती. एक दिवस अश्विन दूध-भाजीपाला आणि थोडं वाण सामान आणण्यासाठी रिक्षा घेऊन बाहेर पडला आणि थोड्याच वेळात सुधीरचा मला कॉल आला.

“वहिनी अश्विनचा अपघात झालाय. त्याला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला नाक्यावरच्या वाण्याने फोन करून सांगितलं. तुम्ही सोहमला माझ्या घरी सोडा आणि लवकर या.”

मला काय करावं समजेना. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तशीच उठले सोहमला घेतलं आणि घराबाहेर पडले. रस्त्यात पोलिसांनी अडवलं. पोलिसांना मेडिकल इमर्जन्सी सांगितल्यावर मला जाऊ दिलं. मी सोहमला सुधीरच्या घरी ठेवून हॉस्पिटलला पोहचले. अश्विनला बरंच लागलं होतं. मुलगा शेजारी आणि नवरा हॉस्पिटलमध्ये काय करावं समजेना. ‘इकडे आड अन तिकडे विहीर’ अशी माझी अवस्था झाली होती. अश्विनच्या मित्रांकडून, शेजाऱ्या पाजऱ्यांकडून उसणे पैसे घेऊन मी अश्विनचा दवाखाना केला. कोव्हीडमुळे मला त्याच्याजवळ थांबता येत नव्हतं. तो एकटा हॉस्पिटलमध्ये आपल्या वेदनांशी लढत होता. दोन महिन्यांनी अश्विन घरी आला पण या अपघातामुळे त्याच्या डाव्या पायाला आणि कमरेला खूप गंभीर इजा झाली होती. आता तो रिक्षा चालवणं तर दूरच अवजड वस्तूही उचलू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळं आता त्याला घरी बसून राहण्याखेरीज त्याच्याकडे कोणताच दुसरा मार्ग नव्हता.

अमृताने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलायला सुरुवात केली.

दोघंही घरात बसून होतो. कोरोनाच्या आजाराने मरण्यापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ आली होती. आताच थोड्या दिवसापूर्वी लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं. आयुष्य पूर्ववत नाही पण तुरळक प्रमाणात सुरू झालं. बॅंकेचे हफ्ते थकले होते. बँकेतून वसुलीसाठी तगादा मागे लागला होता. घरात बसून चालणार नव्हतं. मुलाला, नवऱ्याला जगवायचं होतं आणि जगायला पैसा हवा होता. म्हणून मग मी हा खाकी युनिफॉर्म अंगावर चढवला आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली. आता मी माझ्या नवऱ्याची जागा चालवतेय. फार नाही पण थोडा फार धंदा होतो. लाईफ सुरू आहे मॅडम.. संकटं, अडचणी येत राहतात. मी कोसळते पुन्हा उभी राहते. आता हेच बघा ना आज सकाळी सोहम जिन्यावरून पडला. लागलंय थोडं.. त्यामुळे तो रडतोय. अश्विन सांभाळतोय त्याला पण शेवटी आईची सर येते का?

ती हसून म्हणाली. तिची कहाणी ऐकून माझं मन सुन्न झालं होतं. काय बोलावं मलाच समजत नव्हतं. इतक्यात अमृताच म्हणाली,

“मॅडम, अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता. मी माझा मार्ग निवडला होता. त्याच्या परिणामांची मग ते चांगले असो किंवा वाईट त्याची जबाबदारी मी स्विकारलीय. माझं जग मी निवडलं होतं आणि माझ्या जगात मी सुखी आहे. माझ्या आईची उणीव मला नेहमी जाणवते पण तिचे फोनवरचं बोलणं आठवतं आणि माझा नाईलाज होतो. शेवटी मी तिचाच शब्द पाळतेय नां? कधीतरी तिला लेकीची आठवण येईल आणि ती माझ्या जगात आनंदाने प्रवेश करेल. मॅडम, जगण्याचा प्रयत्न सुरू आहे. कितीही संकटं येवोत मी अजूनही हार मानलेली नाहीये.. मी अजून संपलेली नाहीये.”

अमृताची कहाणी मन हेलावणारी होती. तिची कहाणी ऐकता ऐकता माझं घर कधी आलं मला समजलंच नाही.

“हे घ्या मॅडम, आला तुमचा स्टॉप.”

तिच्या आवाजाने माझ्या विचारांची तंद्री भंग पावली. मी तिला रिक्षाभाडं दिलं आणि अजून वर थोडे पैसे देऊ केले. ती नम्र नकार देत म्हणाली,

“नको मॅडम, जेवढे माझ्या कष्टाचे, हक्काचे आहेत तितकेच द्या. एकदा का उपकार घेण्याची सवय लागली तर ती कधीच जात नाही. तुम्ही शब्दांनी आधार द्या पण सहानुभूती नकोय मला.”

“अगं हे मी तुला नाही दिले. सोहमच्या खाऊसाठी दिलेत. त्याच्या मावशीकडून त्याच्यासाठी मोठं चॉकलेट घे..”

मी असं म्ह्टल्यावर ती आनंदून गेली आणि तिने ते पैसे घेतले आणि म्हणाली,

“चला मॅडम, निघायला हवं. सोहम वाट पाहत असेल नां? खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. कधी कधी न काही व्यक्तींशी आपसूकच बोलावंसं वाटतं. तुम्ही तशाच वाटल्या. तुमच्याजवळ मनातली व्यथा सांगावीशी वाटली. मन हलकं झालं. चला निघते आता.. माझं जग मला खुणावतंय.”

“हो, काळजी घे. तुझ्या जगाची आणि तुझी स्वतःची सुद्धा..”

ती गोड हसली आणि अंधाराला कापत तिची रिक्षा परतीच्या वाटेने निघाली. मी कौतुकाने तिच्या जाणाऱ्या वाटेकडे पाहत होते. मनात बरेच प्रश्न थैमान घालत होते.

“अमृताच्या वाटयाला का असं आयुष्य आलं? प्रेमविवाह नेहमी वाईटच असतो का? आपल्या पोटच्या लेकरापेक्षा समाज, जात, धर्म इतका मोठा होतो? मुलांच्या निर्णयात पालकांनी साथ द्यायला हवी नां? मग तिच्या घरच्यांनी का तिला साथ दिली नाही? काय झालं असतं, फार फार तर तिचा निर्णय चुकला असता पण आपल्या मुलांच्या प्रत्येक निर्णयात पालकांनी त्यांच्या सोबत असायला नको का? आज तिला तिच्या आईची साथ लाभली असती तर कदाचित तिचं जग वेगळं असतं. वेगळं दृश्य पहायला मिळालं असतं.”

विचारांच्या तंद्रीतच मी घरी पोहचले. दारावरची बेल वाजवली. दार उघडलं. आई समोर उभी होती. का कोणास ठाऊक! मी आईला घट्ट मिठी मारली आणि नकळत डोळ्यातून एक सर ओसरली. माझ्यावर विश्वास ठेवशील नां? जणू काही असंच मला त्या मिठीतून विचारायचं होतं..

समाप्त.
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all