तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया

तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
दुसरी फेरी :- जलद कथामालिका
कथेचा विषय:- तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया)


तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)


“ऑटो?”

“हां मॅडम कुठे जायचंय?”

“दादा कोथरूड डेपो.”

“हो जाऊ की, सहाशे रुपये होतील.”

“काय इतके? खूप जास्त सांगताय. इतक्यात तर मुंबईहून इथपर्यंत आलेय आणि तुम्ही इथल्या इथे जायला इतके पैसे सांगताय? हार्डली अर्धा-पाऊण तासाचा प्रवास आहे. अहो मिटरप्रमाणे भाडं घ्या ना.”

“मॅडम इतकंच भाडं होतं.”

“नाही मी नेहमी येते. बाणेरहून कोथरूड डेपो हार्डली दोनशे रुपये होतात आणि ट्राफिक असेल तर फारफार तर अडीजशे रुपये होतील. इतकंच जास्त भाडं नाहीच आहे.”

“नाही ओ मॅडम, सहाशे रुपयेच होतात. रात्रीची वेळ आहे. तुमच्याकडे एकतर इतकं सामानपण आहे. रात्रीच्या वेळेस आम्ही सर्व रिक्षावाले दीडपट भाडं घेतोच. तिकडून इकडे येताना रिकामी रिक्षा घेऊन यावं लागेल. तुम्ही कोणालाही विचारा. ते इतकंच भाडं घेतील.”

मी आजूबाजूला दोन तीन रिक्षावाल्या दादांना विचारलं. सर्वांनी जवळपास तेवढंच भाडं सांगितलं. तो रिक्षावाला पुन्हा माझ्याजवळ आला आणि म्हणाला,

“बघा मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं न? तितकंच भाडं आहे.”

“मला माहितीये तुमची सर्वांची एकी झालीय. कोणत्याही रिक्षाने जा. भाडं तितकंच द्यावं लागेल असाच प्लॅन आहे तुमचा.”

मी मनातल्या मनात पुटपुटले. इतक्यात तो पुन्हा म्हणाला,

“मॅडम, लॉकडाऊननंतर आता कुठे आमचा धंदा सुरू झालाय. अजूनही रस्त्यावर फार रिक्षा धावत नाहीयेत. घरी सुरक्षित जाणंही महत्वाचं आहे ना?”

मला कळून चुकलं होतं.

“आता तो लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेणार. अव्वाच्या सव्वा भाडं घेणार. रात्र बरीच झालीय. काय करावं? त्यापेक्षा ओला उबेर कॅब करावी का? निदान मिटरप्रमाणे भाडं घेतील आणि सुरक्षित घरी तरी पोहचेन.”

असा विचार करून मी ओला रिक्षा बुक केली आणि रिक्षाची वाट पाहत उभी राहिले. तोपर्यंत दोन तीन वेळा ते रिक्षावाले माझ्याभोवती घुटमळून लागले.

“चला मॅडम, उगीच वेळ घालवताय. ओला, उबेरवाले कधीही राईड कॅन्सल करतील. मी तुम्हाला सुखरूप पोहचवतो.”

त्याचं बोलणं ऐकून मग मीही इरेला पेटले. मी त्यांना ठणकावून म्हटलं,

“नाही, येईल रिक्षा.. मी ओलाच्या रिक्षानेच जाईन.”

पण बराच वेळ झाला. रिक्षा काही येत नव्हती.

“एवढी रात्र झालीय. खरंच राईड कॅन्सल तर केली नसेल नाही ना?”

मला प्रश्न पडला आणि मी कॉल करण्यासाठी हातात मोबाईल घेतला. इतक्यात समोरून रिक्षा येताना दिसली. मोबाईलवर आलेला रिक्षाचा नंबर तोच होता. मी हात करून रिक्षा थांबवली. सामान रिक्षात टाकलं आणि रिक्षात जाऊन बसले..

“मॅडम ओटीपी सांगता? तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल?”

एक नाजूक आवाज कानावर पडला. मी चमकून पुढे पाहिलं. एक पंचवीशीची मुलगी रिक्षा चालवत होती. मला थोडं आश्चर्य आणि कौतुकही वाटलं. मी तिला ओटीपी सांगितला आणि तिने रिक्षा स्टार्ट केली.

“कसलं भारी नं! स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. ‘चूल आणि मुल’ या संकल्पनेला बगल देऊन प्रत्येक क्षेत्रात असलेल्या पुरुषांच्या मक्तेदारीला सुरुंग लावत त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. गाडी चालवण्यापासून ते विमान उडवण्यापर्यंत, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, अर्थतज्ञ, अगदी देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री पद स्त्रियांनी भूषवले आहे. याचं जिवंत उदाहरण साक्षात माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. खरंच यार! स्त्रीशक्तीचा विजय असो! तिचं जग आता हळूहळू बदलत चाललंय हेच खरं. आजपर्यंतचं चार भिंतीचं तिचं जग सोडून तिने आता नवीन जगात प्रवेश केलाय.”

मला तिचं प्रचंड कौतुक वाटलं आणि आदरही. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली.

“हं बोल नं बाळा, रडू नको हं. मम्माला आज थोडा उशीर होणार आहे नं. तू पप्पाकडून जेवून घे आणि त्याच्यापाशी जो जो कर हं. मी घरी येताना तुझं आवडतं चॉकलेट घेऊन येईन.”

थोडावेळ बोलून तिने कॉल ठेवून दिला.

“मुलगा वाट पाहतोय का घरी?”

मी तिला प्रश्न केला.

“होय ओ, सकाळी जिन्यात पडला. हात फ्रॅक्चर झालाय. दुखतंय त्याला म्हणून रडत होता.”

“अरे बापरे! मग राईड कॅन्सल करायची ना! मी दुसरी रिक्षा केली असती.”

“संध्याकाळपासून पहिलीच राईड आहे ही. लॉकडाऊनमुळे कोणी जास्त बाहेर पडत नाही ना. त्यामुळे धंदाच होत नाही.”

“नाव काय तुमचं?”

“अमृता बनसोडे..”

“कुठे राहता?”

“वारजे.”

“अच्छा, तुम्ही छान रिक्षा चालवता. खरं सांगायचं तर मला तुमचं फारच कौतुक वाटलं. एक स्त्री म्हणून...”

माझं बोलणं मधेच थांबवत ती म्हणाली,

“गरज माणसाला सगळं करण्यास भाग पाडते मॅडम, यात कौतुक वाटण्यासारखं फारसं काही नाही. नियतीने डाव टाकला की, आपलं जग बदलायला वेळ लागत नाही.”

“म्हणजे?”

मला नीटसं काही समजलं नाही. तिने बोलायला सुरुवात केली. आणि आम्हा दोघींचा आमचा प्रवास सुरू झाला. अमृता पुढे बघून रिक्षा चालवत होती आणि माझ्याशी बोलतही होती.

मॅडम, मी ‘अमृता पाटील’ एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. मी दोन वर्षांची असतानाच माझे बाबा आम्हाला सोडून देवाघरी गेले आणि खऱ्या अर्थाने आईचा संघर्ष सुरू झाला. बाबांच्या जाण्याने आईचं जग पार बदलून गेलं. मुखवट्याआडचे खरे चेहरे समोर आले. भल्याभल्यांनी आपले रंग दाखवले. बाबा घराचा कणा होते आणि तोच कणा मोडला होता त्यामुळे आई आणि मी निराधार झालो होतो.

अमृताने कहाणी सांगायला सुरुवात केली. तिची कहाणी ऐकताना माझ्या मनात खळबळ सुरू झाली होती. साऱ्या घटना जिवंत होऊन डोळ्यासमोर सरकत होत्या. ती पुढे सांगू लागली.

मी आणि आई माझ्या मामाच्या गावी कायमचं राहायला आलो आणि मग आमचं जग हळूहळू कसं बदलत गेलं हे आम्हा दोघींनाही समजलं नाही. विलास मामा तसा चांगला होता पण मामीला आमचं तिथे येणं आवडलं नव्हतं. ती मामाला सारखी टोचून बोलायची,

“आधीच घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि आता यांची भर.. कसं पोसायचं यांना? कुठून आणायचा पैसा?”

मामा निमूटपणे ऐकून घ्यायचा. खरंतर आईच्या येण्याने मामीला चांगलंच झालं होतं. घरातली सर्व कामं करायला आयती कामवाली बाई मिळाली होती. आई घरात दिवसभर राब राब राबायची. मामी नुसती घरात पलंगावर बसून हुकूम सोडायची. माझी आजी मामीला काही बोलायची नाही उलट आईलाच बोलायची.

“पोरी, ‘आलिया भोगासी असावे सादर ’ आपल्यावर वेळ आलीय नं? मग आपल्याला सहन करावं लागेल. संचिताचे भोग आहेत ते. आपल्याला भोगलेच पाहिजेत.”

एक दिवस मामा आणि मामीचं कडाक्याचं भांडण झालं. मामी तावातावाने बोलत होती.

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all