Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया - भाग ३

Read Later
तिचं जग - निशा थोरे अनुप्रिया - भाग ३
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
दुसरी फेरी :- जलद कथामालिका
कथेचा विषय:- तिचं जग- निशा थोरे (अनुप्रिया)


तिचं जग- भाग ३ -निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)


“अगं किती मारशील? ती आता लहान राहिलीय का? मुलं मोठी झाली की आपल्यालाच समजून घ्यावं लागतं असं चिडून कसं चालेल?”

मामा तिला समजावणीच्या स्वरात म्हणाला.

“ते काही नाही दादा.. लवकरात लवकर मुलगा बघ आणि हिचं लग्न उरकून टाक. उगीच नातेवाईकांत चर्चेला विषय मिळायचा. मला उगीच डोक्याला ताप नकोय.”

आईचं वाक्य पूर्ण होत नाही तोवर लगेच मामी म्हणाली,

“माझ्या पाहण्यात एक स्थळ आहे. मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. निर्व्यसनी आहे. पहिलं लग्न झालं होतं पण बायको जास्त दिवस नांदली नाही. पंधरा दिवसांतच ती तिच्या माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. ते दुसऱ्या लग्नाचा विचार करताहेत. त्यांना हुंडा, घेणंदेणं असलं काहीही नकोय. फक्त नारळ आणि मुलगी द्या असं म्हणाले होते. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांच्याशी अमृताविषयी बोलून घेते. हिने कुठे तोंड काळं करण्यापेक्षा लग्न लावून द्या तिचं. पंखच कापून टाका नाहीतर लय फडफड करेल.”

“हो वहिनी, चालेल. बोलून घ्या आणि फायनलच करून टाका.”

त्यांचं बोलण्याचा आवाज आतल्या खोलीपर्यंत येत होता. मला लग्नाच्या बोहल्यावर चढवण्याची तयारी करायला सुरुवात झाली होती. मामीचं बोलणं ऐकून मी पुरती हादरून गेले होते. अश्विनला हरवण्याची भीती मनात दाटून आली.

“नाही.. नाही, मी असं होऊ देणार नाही. माझं अश्विनवर खूप प्रेम आहे. मी लग्न करेन तर त्याच्याशीच. माझा जीव घेतला तरी मी अश्विनशिवाय दुसऱ्या कोणाची होणारच नाही त्यापेक्षा मी स्वतःला संपवून टाकेन.”

मी माझ्या मनाशी पक्कं ठरवलं आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या मैत्रिणीकरवी मी अश्विनला निरोप दिला आणि मी घरातून पळून गेले. त्यावेळीस फक्त आणि फक्त आपलं प्रेम इतकाच विचार होता. कष्ट करणारी आई, तिच्या भावना, समाज, नातेवाईक, मित्रपरिवार कसलाही विचार न करता मी अश्विन सोबत माझं घर सोडून पुण्यात आले. इथे वारजेमध्ये अश्विनचा सुधीर नावाचा एक मित्र होता. त्याने आम्हाला बरीच मदत केली. आम्ही एक दिवस त्याच्याकडे मुक्काम केला आणि दुसऱ्याच दिवशी सुधीरच्या मदतीने आम्ही आळंदीला जाऊन लग्न केलं. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून आयुष्यभराचे जोडीदार झालो. खऱ्या अर्थाने पती पत्नी झालो. आम्ही एकमेकांनी स्वतःला सिद्ध केलं होतं आणि आमचं प्रेम जिंकलं होतं. सुधीरने त्याच्या घराच्या जवळपास त्याच्याच ओळखीने आम्हाला भाड्याने घर मिळवून दिलं आणि अश्विनला त्याच्या कंपनीत कामही. सुधीरच्या बायकोने तिच्या घरातल्या संसाराला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू मला आणून दिल्या. अंथरुणपांघरूण दिलं. आणि अशा रितीने माझा संसार सुरू झाला.

अश्विनच्या प्रेमामुळे माझं जग बदलत होतं. खरंतर अश्विनच माझं जग बनला होता. अर्धवट शिक्षण झालेलं त्यामुळे नोकरी फारशी चांगली नव्हती. पगारही फार नव्हता पण तरीही आम्ही दोघं फार आनंदात होतो. घर सोडून आलो होतो. कधीकधी आईची फार आठवण यायची. माझ्या डोळ्यात पाणी पाहून अश्विनला खूप वाईट वाटायचं. एक दिवस त्याने माझ्या नकळत माझ्या आईच्या कामावरचा नंबर मिळवला आणि मला आईला कॉल लावून दिला. समोरून हॅलो आवाज ऐकताच माझ्या
डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आईचा आवाज ऐकून मला भरून आलं होतं.

“आई, मी अमृता..”

“कोण? कोण अमृता? मी ओळखत नाही.”

“आई, मी तुझी मुलगी. प्लिज असं बोलू नकोस गं.”

“कोण मुलगी? माझी मुलगी कधीच मेली. ज्या दिवशी ती तिच्या आईचा विचार न करता आईच्या तोंडाला काळं फासून गेली, परजातीच्या मुलाचा हात पकडून पळून गेली त्याच दिवशी ती आमच्यासाठी मेली. फोन ठेव आणि जर खानदानी असशील तर पुन्हा फोन करू नकोस समजलं?”

आईने खाडकन फोन ठेवून दिला. इतकी वर्ष जपलेला मायेचा एकमेव बंध तुटून गेला आणि मी खऱ्या अर्थाने पोरकी झाले. त्या दिवशी मी अश्विनच्या गळ्यात पडून खूप रडले. रडत रडतच त्याला आईचं बोलणं सांगितलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. माझा हात हातात घेतला आणि मला कुशीत घेऊन म्हणाला,

“अमू, याच्यानंतर अजिबात रडायचं नाही. यापुढे आपणच एकमेकांसाठी आयुष्यभर असणार आहोत. मीच तुझी आई, बाबा, भाऊ, बहीण सगळं काही मीच. यापुढे तुझी सगळी नाती माझ्यातच भेटतील. आता रडायचं नाही. एकमेकांना साथ देऊन सुखाने संसार करायचा. एकमेकांचा हात कधीच नाही सोडायचा.”

अश्विनच्या बोलण्याने मनाला खूप उभारी मिळाली आणि मी सगळं दुःख मागे टाकलं. त्यानंतर काही महिन्यातच मला आई होण्याची चाहूल लागली. आमच्या प्रेमाच्या वंशवेलीवर एक गोंडस फुल उमलणार होतं. आम्ही दोघेही खूप खूष झालो. सोहमच्या रूपाने आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे रंग भरले गेले. अश्विनला तर सोहमच्या येण्याने आकाश ठेंगणं झालं होतं. त्याच्या येण्याने आयुष्यभर सोसलेल्या दुःखाचा जणू अंत झाला होता. सोहम हळूहळू मोठा होऊ लागला. आता आम्हाला स्वतःच्या सुखापेक्षा सोहमच्या सुखाची, आनंदाची, भविष्याची चिंता वाटू लागली. एक दिवस अश्विन कामावरून लवकर घरी आला आणि मला म्हणाला,

“अमू, आपला सोहम आता दोन वर्षाचा झाला. अजून एखाद वर्षांनी त्याला शाळेत घालावं लागेल. आपल्याला त्याच्यासाठी चांगली शाळा शोधावी लागेल न? शाळेची फी, बाकीचा खर्चही वाढेल मला काय वाटतं, आता बघ मी सकाळी कामावर जाऊन सहा साडे सहा पर्यंत घरी येतो. नंतरचा वेळ असाच बसून वाया जातो. सुधीरचा एक मित्र आहे त्याच्याकडे दोन रिक्षा आहेत. तो मला रिक्षा चालवण्याबद्दल विचारत होता. ट्रेनींग,बॅच, लायसन्स यासाठी तो मदत करतो म्हणालाय. तुला काय वाटतं? मी संध्याकाळी रिक्षा चालवली तर? वेळही जाईल आणि आपल्याला चार पैसेही गाठीशी राहतील.”

मला अश्विनचं म्हणणं पटलं. तो आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करूनच बोलतोय ना? त्याच्या रिक्षा चालवण्याच्या निर्णयाला मी संमती दर्शवली. आता अश्विन जास्त मेहनत करू लागला. दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी रिक्षावर जाणं असा त्याचा दिनक्रम झाला. चार पैसे गाठीशी पडू लागले. आम्ही सोहमचं नाव चांगल्या शाळेत दाखल केलं. सोहम प्लेग्रुपला शाळेत जाऊ लागला. मीही दोन चार मुलांचे शिकवणी वर्ग घेणं सुरू केलं.


क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//