तिचं अधीर मन...भाग 3 अंतिम

Maherchi odh

तिचं अधीर मन... भाग 3


आधीच्या भागात आपण पाहिले की, समीर बाहेर गेला, अनघाने आईने दिलेली साडी नेसली. त्या साडीसोबत तिच्या खूप आठवणी होत्या. तिने डायरी काढली, त्यातली कविता वाचली.  समीरच्या आवाजाने ती बाहेर आली.


आता पुढे,

अनघा किचनमध्ये चहा बनवायला गेली, तिला खूप राग आलेला होता. तिला गावाला जाण्याची उत्सुकता होती आणि समीरचे काम संपत नव्हते. त्यामुळे तिला नर्वस देखील झालेलं होतं आणि रागही आलेला होता.


‘मला इथे जायची घाई आहे पण यांना काहीच पडलं नाहीये. यांना जायचं नसेल उगाच मला जाण्याचं सांगितलं आणि मी माझ्या मनाला तयार केलं. तयारी केली नसती  तर बरं झालं असतं, त्यांना माझं मन जपताच येत नाही, त्यांना माझं मन कळतंच नाही.’ अनघाची स्वतःशीच बोलू लागली.

अनघाने चहा केला आणि समोर नेऊन दिला. सगळ्यांनी चहा घेतं गप्पा मारल्या. अनघाने तोवर किचन आवरून ठेवली.

फ्रीज बंद करून ठेवला, इलेक्ट्रिसिटी बंद करून ठेवलं, रेगुलेटर ही बंद करून ठेवले. तिला वाटलं आता यांचे मित्र गेले की हे तयारी करतील पण तसं काही झालंच नाही. त्यानंतर पुन्हा समीर पेपर घेऊन निवांत बसला होता.


“अहो आता तरी तयारी करा ना, दुपार होत आली आहे आपल्याला पोहोचायला रात्र होईल प्लीज आता लवकर करा ना.”

“हो ग, जाऊ या ग निवांत. काय तुला घाई झाली आहे.”

अनघा नर्व्हस झाली, पुन्हा खोलीत जाऊन बसली. बराच वेळ ती शांती एकटीच बसून होती. 

आता आरुलाही कंटाळा आला. तीही तयारी करून बसलेली होती.

“मम्मा, आपल्याला जायचंय की नाही? मी तयार होऊन बसले आणि निघायचं नाव नाही.”

“जा तुझ्या बाबांना विचार.”


“ते मी नाही विचारतं मी चालले माझ्या रूममध्ये.” असं म्हणत आरु तिच्या खोलीत गेली.

“अहो आता तरी तयार व्हा ना.” अनघा पुन्हा समीर जवळ जाऊन बसली.

“अगं हो किती उत्सुकता? किती अधीर मन झालंय तुझं? जाऊया ना.”

“अहो तुम्हाला नाही कळणार. किती वर्षापासून मी माहेरी गेलेली नाहीये. माहेरहून मुलगी लग्न होऊन येते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होते ते तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी तुम्हाला स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल.

माहेरची ओढ काय असते? प्रेम, जिव्हाळा काय असतो ते तुम्हा पुरुषांना नाही कळणार. कारण तुम्हाला माहेर सोडून जावं लागत नाही ना, तुम्हाला जन्मभर तिथेच राहावे लागते पण आम्हाला आई-वडिलांना सोडून ते माहेर सोडून सासरी यावे लागते. नवीन लोकांशी नातं जोडून घ्यावं लागतं. सगळ्या गोष्टी नवीन असतात. मनाची घालमेल होते.


ती मनाची घालमेल समजून घेणार फक्त एकच ठिकाण असतं ते म्हणजे माहेर... 


जिथे प्रेम जिव्हाळ्याची कुठलीही कमी नसते ते असते माहेर...

जिथे भरभरून प्रेम मिळतं ते असतं माहेर...


मला आई-बाबांना भेटायचं आहे, त्यांची विचारपूस करायची आहे. आईच्या कुशीत विसावा घ्यायचा आहे. माझं मन अधीर झालंय, मला हुरहूर लागली आहे.


माझ्या मनाची हुरहूर, माझ्या मनाची घालमेल तुम्हाला नाही कळणार शेवटी पुरुष ते पुरुषच..

समाप्त:

🎭 Series Post

View all