तिचं अधीर मन...भाग 1( जलद कथामालिका लेखन स्पर्धा)

Maherchi odh

तिचं अधीर मन...


“अहो चला ना, निघायचं नाही का” अनघा किचनमधून केस बांधत बाहेर आली.

समीर पेपर वाचत बसलेला होता.


“हम्म” 


जायचं आहे म्हणून अनघा खूप आनंदात होती. समीरला सुट्टी मिळाली म्हणून तो सहज बोलून गेला. त्याला वाटलं ती मनावर घेणार नाही. पण तिने जाण्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. 

“आरु उठ बेटा, माझं आवरून झालंय. उठ आणि फ्रेश हो.”

“काय मम्मा, सकाळी सकाळी कुठे जायचंय?”
“तुला सांगितलं होतं ना आपल्याला गावाला जायचं आहे. चल उठ ग लवकर.” 


तिने आरुच्या अंगावरच पांघरून काढलं. तशी आरु उठून बसली.


अनघाने नाश्ता बनवला, वाटेत काही खायला लागेल म्हणून ते डबेही तयार करून ठेवले.

त्याने सुट्टी मिळाली अस सांगितलं आणि तिच्या आनंदाला उधाण आलं. चार वर्षे झाली होती ती तिच्या माहेरी गेलेली नव्हती. 


आता तिला माहेरची ओढ लागलेली होती. कधी जाते अस होत होतं. 


समीर मात्र निवांत बसलेला होता. 


पेपर वाचून उठला आणि टी व्ही बघायला गेला.

अनघा आत गेली, कपाटातून डायरी काढली. तिची स्वतःची लिहिलेली डायरी होती ती. त्यावरून हात फिरवत ती त्या डायरीला बघू लागली. लग्नाआधी रोज ती डायरी लिहायची. रोजचा घडलेला घटनाक्रम लिहायची. प्रत्येक दिवसाची शब्दात मांडणी करायची. 

लग्नानंतर ती डायरी बंद झाली ती बंदच राहिली. आज इतक्या वर्षानंतर तिने ती डायरी उघडली. त्यातला एक एक पान उलगडताना तिचे डोळे भरून आले होते.

खूप आठवणी जपून ठेवल्या होत्या तिने. त्यातली तिची ही आठवण म्हणजे डायरी. तिची सुख, तिचं दुःख सगळं या डायरीत होतं. 

पान उलगडताना अचानक जळलेला पान डोळ्यासमोर आला. 


समीरला आवडायचं नाही म्हणून त्याने ती डायरी जाळायला घातली होती, अनघाने  जळण्याआधी बाहेर काढून लपवून ठेवली होती आणि त्यांनतर तिने डायरी कधीच बाहेर काढली नव्हती.

“अनघा चहा मिळेल का?”

समीरच्या आवाजाने ती लगेच उठली, डायरी आत ठेवली आणि किचन मध्ये गेली. चहा बनवला आणि समीरसाठी घेऊन गेली.
“अहो चहा.”

“हम्म”
“अहो कधी निघायचं आपण.”

“जाऊया ग, काय घाई आहे.”
“अहो पोहोचता पोहोचता रात्र होईल”

“मला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे. मी जाऊन येतो.”

“अहो पण तुम्ही तर सुट्टीवर आहात ना?”

“हो ग पण कधी कधी असंही काम करावं लागतं.”

“मी जाऊन येतो.” अस म्हणून तो निघून गेला.

“आरु बेटा तयार झालीस का?”

“मम्मा मला नाही यायचं ग तिथे.
 एकतर तिथे मोबाईलला नेटवर्क नसतो. माझं माझ्या फ्रेंडशी बोलणंही होणार नाही. माझा लॅपटॉप चालेल की नाही हेही माहीत नाही. मम्मा तिथे इलेक्ट्रिकचा पण प्रॉब्लेम असतो.”

“आरु तू ना फाटे फोडू नकोस. तुझ्या बाबांनी स्वतःहून म्हंटल. तसही ते कधीच घेऊन जात नाहीत. ते तयार झाले आहेत तर प्लिज तू आता काही बोलू नकोस.”

अनघा खोलीत गेली, कपाटातून आईने दिलेली साडी काढली. त्या साडीवरून हात  फिरवताना तिचं मन भरून आलं होतं...

क्रमशः

🎭 Series Post

View all