तिचं आभाळ भाग अंतिम

Story About Separation



"सावनी, तू कधी हक्काने बोललीस का माझ्या आई -बाबांशी?" निहार

"बोलायचा प्रयत्न केला मी. पण त्यांना हक्काने बोलणं म्हणजे उद्धटपणा वाटायचा." सावनी.

"काहीही काय बोलतेस सावनी? पण हे मात्र लक्षात ठेव. मी घराचा उंबरठा ओलांडून कुठेही येणार नाही. झालं ते झालं. आता तुझे नि माझे मार्ग वेगळे. मला पुन्हा अडकवायचा प्रयत्न करू नकोस. मी निघतो आणि हो..मी तुझ्याशिवाय राहू शकतो." क्षणात निहारच्या डोळ्यात परकेपणा दिसला सावनीला.

"फक्त एकदा विचार कर निहार. निदान आपल्या मुलीसाठी तरी.." सावनी.

पण काहीही न बोलता निहार निघून गेला आणि सावनी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली.

"मॅम, मी खूप केसेसमध्ये पाहिलं आहे, बरेच आई- वडील आपल्या मुलाचा संसार सुखाचा होऊ देत नाहीत. त्यांना वाटत मुलाने, सुनेने आपलेच ऐकावं.
अर्थात सारेच सासू -सासरे किंवा आई -वडील तसे नसतात. अपवाद असतात याला. पण..इतकं भावनिक होऊन चालत नाही. दुनिया ही अशीच असते. झालं गेलं मागे सारून पुढचा विचार करा." वकील सावनीला म्हणाले.
"कोर्टात लढाई जिंकली तरी आपल्या अशिलाने काहीतरी "गमावलेलं "असतं. याचं आम्हालाही वाईट वाटतं."

इतका वेळ अडवून धरलेले अश्रू शेवटी डोळ्यातून ओघाळलेच. "आई..जिंकूनही हरले मी. मनातली तगमग सहन होत नाही गं." सावनीने आपल्या आईला गच्च मिठी मारली.
"बाळा, रडतेस कशाला? आम्ही आहोत ना? मान्य आहे, झालं गेलं लगेच विसरता येणार नाही. म्हणतात ना, जे होत ते चांगल्यासाठी होत. पण आता मागे वळून पाहायचं नाही. पुढचा विचार करायचा."आई समजुतीच्या स्वरात म्हणाली.

"आई, बाबा का गेला गं?" सावनीच्या मुलीने, रियाने तिला मिठी मारली आणि तीही रडू लागली.

"तो आता कधीच येणार नाही. पण तुझी आई आहे ना? पुस बघू डोळे." आपल्या मुलीला पाहून सावनीने स्वतःला सावरले.

जाणाऱ्या निहारच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बराच वेळ पाहत राहिली. 'लग्नाआधीचा निहार आणि आत्ताचा निहार..किती वेगळा आहे! त्याच आपल्यावर जराही प्रेम राहिलं नाही का? असं कसं वागू शकतो तो आपल्याशी? रियाच्या जन्मानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला, नंतर सासू -सासऱ्यांचं वागणंही जास्तच बदललं. त्यानंतर अगदी एकटी पडले मी.
आपल्या आई -वडिलांवर मुलाचं प्रेम असणं साहजिक आहे. मात्र त्यासाठी बायकोला न समजून घेता प्रत्येक गोष्टीत गृहीत धरणं योग्य नव्हतं..कधीच नव्हतं.'

सावनीने आपल्या अश्रूंना मुक्तपणे वाहू दिले. मनात साचलेला दुःखाचा भर थोडा ओसरल्यावर तिला बरं वाटलं. 'हे सारं विसरण तितकं सोपं नाही. मात्र आता झालं गेलं मागे सारून पुढचा विचार करू. आपल्या लेकीसाठी पुन्हा भरारी घेऊ.' सावनीने स्वतःला समजवायचा प्रयत्न केला.

'माझं तुझ्यावर अजूनही तितकच प्रेम आहे, अगदी आभाळा एवढं..त्या प्रेमाला सीमारेषा नाही.' सावनीला मगाशी बोललेले स्वतःचेच शब्द आठवले.
तिने पुन्हा मागे वळून पाहिलं. निहार खूप दूर निघून गेला होता. कदाचित त्या सीमारेषेच्याही पलीकडे. "इतकं सोपं असतं का हे? क्षणात सारे पाश तोडून एखाद्या पासून इतकं दूर निघून जाणं?" काहीतरी हरवल्याच्या भावनेने तिचं मन भरून आलं आणि तिला वाटलं, 'तिचं गच्च भरून आलेलं आभाळ' रीतं झालं आहे अगदी कायमसाठी!

समाप्त.
©️®️सायली

🎭 Series Post

View all