Login

ती... तिचं माहेर.... नी तिचं बाळंतपण... भाग ३

About Her....
किस्सा नंबर ३

पुन्हा एकदा सासू आणि सून. फक्त या सासूला वंशाला दिवाच हवाय असं काही नाही.... तेवढाच एक दिलासा....


सासू - पुढच्या महिन्यात सुट्टी काढ. आपल्याला पूजा करायची आहे.

सून - कशाची पूजा आई?

सासू - अग तुला मागे सांगितलं होतं ना..... बाळासाठी पूजा घालायची आहे.

सून - बरं आई घेते. किती दिवसांची घ्यायचीये आणि डेट काय आहे पूजेची?

सासू - पुढच्या महिन्यात १२ ते १५.... तीन दिवसाची पूजा आहे. पण तू आठवडाभराची टाकून दे रजा.

सून - बरं, आई चालेल.... मी तसा अर्ज करते.

सासू - आणि हो, पूजा झाल्यानंतर काही पथ्य आहेत, नियम आहेत, ते अगदी काटेकोरपणे पाळायचे आहेत.

सून - अहो पथ्य काय नवीन आहेत का आई मला? गेली ४ वर्ष तेच तर करतीये.... हे खाऊ नको ते खाऊ नको,... इकडे जाऊ नका प्रवास करू नका.... दगदग करू नका काय काय आणि काय काय! जाऊद्या काय करायचंय यावेळी वेगळं....


सासू - पूजा झाल्यावर महिनाभर बाहेरचं काहीही खाता-पिता येणार नाही. अगदी पाणी सुद्धा बाहेरचं चालणार नाही. शक्य झाल्यास प्रवास टाळच, पण जर गरज पडली तर सोबत घरून जेवण आणि पाणी दोन्ही सुद्धा सोबत ठेवायचं. शक्यतो सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल असा प्रवास असेल तर ठीक.

सून - बरं आहे, चालेल. आता एवढं सगळं केलं आहे त्यात अजून हे काही.

सासू - आणि तुझ्या आईच्या हातचं किंवा तिच्या घरचंही काही खाता पिता येणार नाही अगदी तिथलं पाणी सुद्धा चालणार नाही.

सून - काय? सॉरी मला हे जमणार नाही..

सासू - पूजेचा नियम आहे तो.... पथ्य आहे पाळावंच लागेल...


सून - अहो तुमची बाकीची पथ्य, नियम सगळं करतीये ना मी? पण हे मला जमणार नाही. माझी आई परकी कशी काय झाली? तिचं घर बाहेरचं कसं होईल? म्हणजे जिने जन्म दिला.... न्हाऊ माखू घातलं.... खाऊ पिऊ घातलं.... तिच्या हातचं खाल्लं तर पूजेचं फळ मिळणार नाही हा कसला नियम???

सासू - तुझं ज्ञान मला सांगू नकोस. जे सांगितलं आहे ते कर..

सून - मला जमणार नाही. मी आई होण्यासाठी माझ्या आईच्या आईपणाचा अनादर नाही करू शकत. आणि ती जर बाहेरची झाली तर तुमची सून सुद्धा बाहेरचीच झाली ना? आणि याच सुनेकडून तुम्हाला वंशाच्या दिव्याची अपेक्षा आहे. अशा बाहेरून आलेल्या सुनेने तुमचा वंश पुढे वाढवलेला तुम्हाला चालतोय पण तिच्या आईच्या हातचं पाणी पिलं तर पूजा असफल होईल??? हा कसला नियम? आणि कुणी केला?

सासू - हे बघ तुझे हे क्रांतिकारी विचार तुझ्यापर्यंतच ठेव. जे पूजेचे नियम आहेत ते पाळावेच लागतील. बाकी मला माहित नाही काही.

सून - तुम्ही म्हणताय म्हणून मी हा पूजेला तयार झालेली आहे, तुम्ही म्हणताय ते बाकीचे सगळे नियम सुद्धा पाळायला तयार आहे मी. पण हे मला जमणार नाही. आणि आई आपण सगळं स्वयंपाकाचे सामान बाहेरूनच आणतो ना, फक्त घरात आपण ते शिजवतो. जर बाहेरून आणलेलं सगळं सामान जेवणासाठी चालत असेल, तर फक्त माझ्या आईच्या घरच्यासाठी हा नियम का?

सासू - ही पूजा अशीच असते... आणि अशीच होईल. सुट्टी टाक.... बाकी मला वाद नकोय....

सून - मलाही वाद नकोय. सुट्टी टाकेल... पूजा करेल.... पण आईच्या हातचं जेवण, आणि पाणी मी सोडणार नाही. याउपर जर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर विषय इथेच संपला.


आश्चर्य आहे नाही... असं म्हणतात, देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आणि त्याच आई रुपी देवाच्या हातचं पाणी पिल्याने पूजेचे फळ मिळणार नाही!! हा कसला नियम?? आणि देव तरी असं का करेल.? आणि समजा सासर माहेर एकाच शहरात असेल दोघांनाही एकाच ठिकाणाहून पाण्याचं कनेक्शन असेल, तरी पाणी सासरचं चालतं पण माहेरचं चालत नाही... काय वेडेपणा आहे!

जिच्याशी नाळ जोडली गेलीये तिच्याशी नाळ तोडून नव्या जीवाशी नाळ कशी जोडायची बरं!! देवा तू तरी सांग बाबा. पण पटेल असं काही सांग रे...

🎭 Series Post

View all