ती.. नवऱ्याने टाकलेली!

एका घटस्फोटीत स्त्रीची विचार करायला लावणारी लघुकथा!

ती.. नवऱ्याने टाकलेली!



"तिच्याकडे बघितलंस? कशी नटून आली आहे?"   पहिली.


"हो  ना. मेकअप काय? दागिने काय? अगदी तोऱ्यातच दिसतेय."  दुसरी.


"ब्लॉऊज बघितला? स्लीव्हलेस! शोभतं का या वयात?" तिसरी.


"कसलीतरी नोकरी करते असं ऐकलंय."  पहिली.


"या वयात? कठीण आहे बाबा."  दुसरी.


" पण आहे कोण ही?" पुन्हा चौथीची चर्चेत उडी.

"साळवेंची दामिनी हो."  तिसरी.

"अच्छा! म्हणजे तीच का?"  चौथी.

"हो तीच. नवऱ्यानं टाकली तरी बाईचा तोरा काही कमी होत नाही हो."   पहिली.


एकमेकींना टाळी देत त्यांच्या हास्याची कारंजी उडू लागली.



एका लग्नसमारंभातला हा संवाद. चार बाया एकत्र आल्या की त्यांच्यात दुसऱ्याच एका स्त्री बद्दल किती आणि काय बोलू असं होऊन जातं. आज या बायकांना आयतीच संधी चालून आली, कारणही खास होतं.. दामिनी. वय वर्षे पन्नास! या वयात ती एवढं नटून लग्नाला आली हेच त्यांच्या दृष्टीने काहीतरी वेगळे होते.

त्यांचा संवाद दामिनीच्या कानावर नको म्हणत असतानाही पडलाच. त्यातही ते 'नवऱ्याने टाकलेली' हा शब्दप्रयोग तिला नाही म्हटलं तरी खटकलाच. आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नव्हता.


"माझ्याचबद्दल बोलताय ना?" न राहवून त्यांच्याकडे जात ती म्हणाली. तशा त्या बायका जरा चपापल्या. तिला आवाज गेला होता तरी ती अशी डायरेक्ट येऊन बोलेल असं कुणाला वाटलं नव्हतं.


"ते हे.. आम्ही अशाच बोलत होतो." पहिली कशीबशी सावरत म्हणाली.

दामिनी तिच्याकडे बघून तुच्छतेने हसली.


"ये हसतेस काय गं? आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो. काय करशील तू?" दुसरीत अजून जोश होताच.



"तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात पण जिच्याबद्दल बोललात तिला काय वाटलं असेल याचा विचार तुमच्यापैकी एकीच्या तरी मनात डोकावला का?" दामिनी.


"मग असं वागायचंच कशाला? हे असं नटणं मुरडणं शोभतं का तुम्हाला?" एकमेकांना साथ देण्यास त्या कुठेच कमी पडत नव्हत्या.



दामिनी त्यांच्यातच खुर्ची ओढून बसली.

"हो. शोभतं मला. येतांना आरसा बघूनच तर मी आले. ही साडी, हे दागिने, ह्या बांगडया.. सारं सारं काही शोभते मला. मेकअप सुद्धा मी बऱ्यापैकी करते."
तिने एक पॉज घेतला.

"नवरा सोबत नाही म्हणून मी नटू नये असा काही नियम आहे का?"

तिच्या प्रश्नानं बाकीच्या बायकांचा चेहरा खर्रकन उतरला.

"आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, नवऱ्यानं मला नाही तर मी त्याला टाकलेय. तुमच्या नवऱ्याचे बाहेर लफडे असते तर तुम्ही त्याच्यासोबत राहू शकला असता का? मी तरी नाही राहू शकले. सरळ त्याला फॅमिली कोर्टात ओढले आणि घटस्फोट घेऊन मोकळी झाले. अशा व्याभिचारी नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं स्वीकारलं मी. आणि हो, हे नटणं, मुरडणं त्याच्या पैशातून नाही तर स्वतःच्या कमाईतून करते बरं. पोटगी म्हणून एक पैसाही मागितला नाही मी."

सर्व बायका काही न बोलता निमूटपणे ऐकत होत्या.


"आज थोडी सजले, सवरले तर एवढं काही बोललात. घटस्फोटानंतर सात आठ वर्षे मी अशीच वैफल्यात काढली. कधी तोंडाला पावडर सुद्धा नाही लावली तेव्हा तू अशी का राहतेस म्हणून विचारायला तर तुमच्यातील कोणीही आलं नाही गं. नवऱ्यापासून स्वतःहून वेगळी झाले असले तरी मीही खचले होतेच की. उणापुरा वीस वर्षाचा संसार केला होता मी. नाही म्हटलं तरी माझं प्रेम होतंच की त्याच्यावर. स्वतःला त्याच्यातून बाहेर काढायला बरीच वर्षे लागली. नवऱ्याच्या दुःखातून बाहेर पडत नाही तो मुलगा बिघडला. नाही ते व्यसन करू लागला. त्याच्यामुळेही किती मनस्ताप सहन केलाय मी, माझे मलाच ठाऊक."
बोलतांना ती थोडी भावुक झाली.



" ताई माफ करा आम्हाला. आम्ही असं बोलायला नको होते." तिला पाणी देत त्या चौघीतली एक म्हणाली.


तिच्याकडे बघून दामिनीने आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली काढुन तोंडाला लावली.


"नोकरीबद्दल तूच म्हणाली होतीस ना?" तिसरीकडे पाहत दामिनी.


"ताई चूक झाली हो." नजर चोरत ती.


"या वयात नोकरी करताना मला कसलीच लाज वाटत नाही. नोकरीच करते ना? काही चुकीचे तर वागत नाहीये मी. उलट या नोकरीमुळे माझ्यात नवा आत्मविश्वास निर्माण झालाय.

नवरा, मुलांचं करण्यात माझं अख्खं तारुण्य खर्ची पडलं. आता मी जरा स्वतःला वेळ द्यायचा ठरवले. नवरा तर माझा नव्हताच,मुलालाही आयुष्यातून बाहेर काढले. त्याचे व्यसन पूर्ण करण्याचा ठेका मी एकटीने थोडीच घेतलाय ना? पंचेवीसचा झालाय आता तो. दुनियादारी त्यालाही कळते. मी शिकवायला तयार असताना तो शिकला नाही आता मीच त्याला बोलले, 'बाबा रे, तुझं तू बघ. भीक माग, कोणते काम कर पण स्वतःचा खर्च स्वतः उचल. तुझे शौक पूर्ण करणे आता मला जमणार नाही.'

त्या बायका डोळे विस्फारून दामिनीकडे बघत होत्या.

"तुम्हाला सांगू? आता मी खरेच आनंदी आहे. नवऱ्याचे आणि मुलाचे काही टेन्शन नाही. ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत नी मी माझ्या. मी नोकरी करून पैसे कमावते. तारुण्यात स्वतःला वेळ देऊ शकले नाही. आता स्वतःचेच मस्त लाड पुरवते. नीटनेटकी राहते. नटते. पण मग तुमच्यासारख्या बायका भेटल्या की जरा दुखावल्यासारखी होते. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजू शकत नाही तेव्हा त्या स्त्रीची मला कणव येते जशी आत्ता तुमची येत आहे. केव्हा बदलेल बायकांचा हा स्वभाव?" दामिनी.


"ताई खरंच आम्हाला माफ करा. ह्यापुढे आम्ही अशी चूक करणार नाही."
चौघीनी तिच्यासमोर माना खाली घालून हात जोडले. तशी ती उठून उभी झाली.



"तुमच्या बोलण्याने मला कसलाच त्रास झाला नाही. कारण हे असले टक्केटोणपे झेलण्यासाठी कणखर आहे मी शिवाय त्याचे उत्तरही देऊ शकते. एखादीला असे बोलण्याने काय त्रास होऊ शकतो याची जाणीव करून द्यायची होती.आज इथे तुमच्या पुढ्यात मी होते उद्या माझ्या ठिकाणी दुसरीचं मृदू, कोमल हृदय असलेली स्त्री असेल तर ती हे सहन करू शकणार नाही. एखादी तर आत्महत्यासारखे पाऊल देखील उचलू शकेल तेव्हा कोणाकोणाची माफी मागाल तुम्ही?"

"ताई ह्यानंतर अशी चूक नाही होणार. आम्ही तुम्हाला वचन देतो." मघाशी गुरगुरणाऱ्या वाघाचे आता शेळीत रूपांतर झाले होते.

दामिनी हसत उठली. " स्त्री ही वाईट नसतेच मुळी. इकडच्या गोष्टी तिकडे सांगण्याचे निसर्गदत्त वरदान लाभलेय तिला. तेव्हा वाईट गोष्टीपेक्षा चांगल्या गोष्टी पसरवायला शिका. एक घटस्फोटीत असूनसुद्धा माझ्यासारखी स्त्री स्वाभिमानाने कशी जगतेय ह्या पॉझिटिव्ह गोष्टीचा प्रचार करा." त्यांना हसत ती म्हणाली.

तिच्या बोलण्यावर त्या बायकादेखील मनमुराद हसल्या. त्यांच्या मनात तिच्याबद्दल कसलीच असुया उरली नव्हती.
दामिनी जायला निघाली. थोडी पुढे जाऊन पुन्हा माघारी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली.

"पुढच्या महिन्यात ऑफिस स्टाफच्या गर्ल्सगँग बरोबर गोव्याला जाणार आहे. यापूर्वी कधी असा विचारदेखील केला नव्हता."
त्यांना ती सांगत होती.


"ताई, खूप खूप एन्जॉय करा. ऑल द बेस्ट!" चौघी एकासुरात म्हणाल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हसू पसरले होते.



                       - समाप्त -


घटस्फोटीत स्त्री म्हटले तर पुष्कळदा तिच्याकडे आपण एका विशिष्ट चष्म्यातून बघत असतो. बरेचदा असे वागणारी एक स्त्रीच असते हे सुद्धा इथे नमूद करावेसे वाटते. पण अशा स्त्रिया सुद्धा आपल्याच समाजाचा एक घटक आहे. त्यांनाही त्यांचे आयुष्य त्यांच्यापरीने जगण्याचा अधिकार आहे या चष्म्यातून आपण त्यांच्याकडे पाहिले तर?? तुम्हाला काय वाटते ते सांगा. आणि ही कथा कशी वाटली नक्की कळवा.
माझ्या इतर कथा वाचण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता.
धन्यवाद!


              *साहित्यचोरी गुन्हा आहे.*