ती उमगली उमजली

' ती उमगली उमजली' ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे . स्त्रिचे वास्तविक आयुष्य दर्शविण्याच प्रयत्न केला गेला आहे.
नाव : सौ.शगुफ्ता ईनामदार- मुल्ला
विषयः स्त्री ला समजून घेणे खरच कठीण असत का ओ?
उपविषय :

टीम : सोलापूर जिल्हा
--------------------------------------
शाळेच्या मधल्या सुट्टीत सगळे शिक्षक - शिक्षिका नित्य नियमाप्रमाणे आप आपला डबा खायला घेत होते. तसे लेडीज स्टाफ रूम व जेन्ट्स स्टाफ रुमच्या खोल्या अगदी बाजू बाजूलाच होत्या शाळेत. सर्व शिक्षिका आपल्या आपल्या डब्याच कौतूक सांगत घरातील विषयांवर यांची चर्चा सुरु होती. तर शिक्षक यांच्या स्टाफ रूम मध्ये गाडे सर डबा उघडत "आज काय नैवेद्य वाढलय बघू" म्हणत हसले. यावर नवाज सर गाडे सरांना उद्देशून " सर का बरं आज चक्क वाळलेल्या चपात्यांना नैवेद्य म्हणत आहात ? काही नवीन शोध लागला आहे का आज परत किचन मधे ?"
नवाज सरांच्या या वाक्याने स्टाफ रूम मधे हशा पिकला तो इतक्या जोरात की लेडीज स्टाफ रूम पर्यंत ऐकू गेल.
विनिता मॅडम "काय बाई या पुरुषांच बघा किती जोरजोरात हसायच ते, आपण शाळेत आहोत याच तरी भान हव." यावर शिल्पा मॅडम लगेच "अगं विनिता असू दे ग काहीतरी जोक मारला असेल." असच एक एक शिक्षिका शिक्षकांच्या हसण्यावर बोलू लागले. मयुरेश सर वॉश बेसिन मधे हात धुण्यासाठी बाहेर आले होते. हात धुता - धुता त्यांनी आपला कान जरा लेडीज स्टाफ रूम कडे टवकारला. पुरुषांबद्दल काहीतरी चर्चा आहे हे त्यांना कळालं परत स्टाफ रूम कडे वळत होते तेव्हा सहज एक कटाक्ष लेडीज स्टाफ रूम वर बाहेरून जाता जाता त्यांनी टाकली. इतक्यात आतून दिपाली मॅडम ची नजर पडते व ती " यांना बरी पंचायत आमची" म्हणते. हा डायलॉग आपल्यालाच मारला गेला हे मयुरेश सरांना कळत ते नजर चुकवून पुन्हा स्टाफ रूम मध्ये जेवायला येतात. गरड सर यांच्या मोबाईलची रिंग वाजते सर त्यावर एक नजर टाकत पुन्हा खाण्याकडे वळतात. पुन्हा रिंग वाजते यावेळेस मुलाचा मेसेज होता. सर मेसेज वाचतात " बाबा एका स्त्री ला काय बरं हव असत ? तिला कोण समजू शकतो?अस मी नाही ओ विचारत आमच्या स्पर्धेचा विषय आहे."
सर हसून हा मेसेज सर्वांना ऐकवतात. यावर नवाज सर " अवगढ आहे तस ". गाडे सर " एका स्त्री ला काय हवय सोनार बर्‍यापैकी समजतो" असे म्हणून हसतात.
गरड सर गाडे सरांना : " सर क्या बात है , वहिनींनी मागणी घातली वाटतय पुन्हा . का काहीतरी गळच घातली यावेळेस?" .
गाडे सरः "हो सर , गळच घातली म्हणा पैजण घ्यायला म्हणून गेलो म्हेवण्याच्या मुलीला या आमच्या लक्ष्मीने गळयातील चैन घेतली स्वतः साठी. सोनाराच काय ? त्याने बरोबर लावली खिश्याला कात्री." म्हणत डोक्यावर हाथ मारला स्वतःच्या.
मग काय होणार होत सुरु झाली चर्चा ,निष्कर्ष आपल्या परीने लावले जाऊ लागले. घंटा वाजली मधली सुट्टी संपली व तसेच यांच्या चर्चेला पूर्णविराम लागला.
दुपारी शाळा सुटली. तसे सर्व शिक्षक शिक्षिका घरी रवाना होण्याची तयारी करू लागले. शाळेत स्टाफ ला ने-आण करण्याकरिता बसची व्यवस्था होती. बस मधे पुन्हा एकदा स्त्री ला समजणे या विषयावर चर्चा रंगली. सर्वच शिक्षक यात भाग घेत होते. शिक्षिकाही बस मधे होत्याच काही वेळ दुर्लक्ष करून. एक एकिने उत्तर देण्यास सुरुवात केली. पुरुषांची मत : स्री कळणे कठीण आहे. कधी काय मागेल याची शाश्वती नाही . जोरात बोलल तर ओरडल हळू बोलल तर ऐकू येत नाही. एक साडी घ्यायला गेल तिथे एकच आणली तर खूप पुण्य केल असाव अशी लाखात एक. इतक्यात ड्राइव्हर म्हंटलाच कि " नवस करून, साकड घालून देखील दिवसा दिवा घेऊन गेल ना शोधायला तरी नाही मिळत सर अशी बायको, मिळालीच तर देव पावला म्हणायचा ." यावर सगळे पुरुष शिक्षक मंडळी हसू लागले. शिक्षिका नुसत्या उसन हसल्या. सगळ्या शिक्षिका शांत पणे ऐकत होत्या. आज त्यांना नेमक पुरुष कस, कुठे चुकतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळत होत. पुरुषांचे विचार त्यांना जास्त कळत होते. यातील काही शिक्षक यांच्या आयुष्याच्या सहचारिणी त्यांच्याच सोबत त्याच बस नावाच्या रथात स्वार होत्या. त्या राण्यांनी त्यांच्या राजांच्या घरी गेल्यानंतरच्या स्वागताची जय्यत तयारी मनात केली होती. बस मधे आता स्त्री विरुद्ध पुरुष अशी काहीशी स्पर्धा सुरु होती. ज्यात पहिल्यांदा स्त्रियांनी मौन धारण केले होते. शिक्षकांना वाटले की शिक्षिकांना म्हणन पटतय. पण चुकले ते या निष्कर्षात व परत बोलण सुरु केल. आता मात्र चर्चा शिखर पार करत होती.
प्रत्येक जण आपले किस्से रंगवून सांगत होते. पण गरड सर , मयुरेश सर , प्रशांत सर यांची काय जास्त वर मजल गेली नाही. कारण या चर्चेत जर जास्त काही आपण बोललो तर आपल्या लक्ष्म्या कधी काय काली होतील याचा नेम नव्हता. उगाच बस मधे सर्वांसमोर फजिती. शिक्षिका देखील काही कमी नव्हता सर्वांनी ज्या सरांच्या बायका घरी होत्या त्यांना कॉल वर ऐकवल हा प्रकार शिक्षकांच्या नकळत होत होता. प्रत्येक शिक्षक बस मधे आपण पुरुष कसे ग्रेट हे बोलून दाखवत होते. नवाज सर " मयुरेश सर तुमच एक चांगल आहे ओ इतक्या छान वहिनी आहेत आमच्या, अस म्हणत गालातच हसले. ते काय परवा मी पण सबाह ला घेऊन गेलो होतो शॉपिंग ला. तिथेही मला ती काय कळली नाही. झाल अस की माझ्या भावाच्या सासरी आमंत्रण होत. मग गिफ्ट आणाव म्हणून गेलो तिला घेऊन आणि मलाच सरप्राईज मिळाला अडीच हजाराचा."
गरड सर नवाज सरांना " अरे वा! छानच की . आमच्या उभ्या आयुष्यात कधी पाचशे च्या वर आकडा गेला नाही त्यातही बारगनिंग करतात."
नवाज सर " तस नाही पूर्ण ऐका तरी एकदा. अडीच हजाराचा सरप्राईज नव्हे कात्री ओ खिश्याला, मॅडमने पाचशे रुपयात दोन वेगवेगळे गिफ्ट घेतले. दोन हजारात स्वतःची खरेदी. दोन महिन्या पूर्वीच घेतले होते कपडे आता परत." प्रशांत सर " आमच्या कडे १० दिवसांपूर्वी २ नॉनस्टिक भांडी त्यात एक डोसा पॅन आणला , बरं डोसे कधी खाल्ले होते . " हे वाक्य पूर्ण होऊ न देता मिसेस प्रशांत उत्तरतात " सायली उद्या ये हा डोसे खायला तसही उद्या घरी कोणी नसणार आहे." प्रशांत सर बोलून फसलो वाटत अस मनात बोलून घेतात. सर्वच पुरुष आपली कथा; व्यथा असल्या सारखी सांगू लागले.
बरं हा विषय गरड सरांच्या मुलाच्या मेसेजमुळे इतकी चर्चा रंगली होती. मिसेस गरड यांना मुलाचा मेसेज येतो. तिथून मिसेस गरड यांना कल्पना येते. पाऊस लागल्याने बस ट्रॅफीक मधे अडकते. सर्वांची घर ही एकाच एरिया मधली म्हणून कोणी मधेच उतरणार नव्हत. मिसेस गरड यांना चांगली संधी मिळाली. मग काय ? अर्थातच संधीचा योग्य उपयोग. मिसेस गरड आपल्या सीत वरून उठून पुढे येतात. सर्वांच लक्ष त्यांच्या कडे जात.
" मला काही बोलायच आहे". मिसेस गरड .
मयुरेश सर " बोला ना मॅम आवडेल ऐकायला". गरड सर इशाऱ्याने काय ?म्हणून विचारतात. मिसेस गरड आपल बोलण सुरु करतात .
" सर्वानी ऐकाव ही विनंती. आज आम्हाला बरं वाटल तुमच्या मनातील भावना ऐकायला. मला तुम्हा सर्व पुरुषांना विचारायच आहे. काय खरंच स्त्री ला समजण इतक कठीण आहे का? जस तुमच्या मनात आम्ही आहोत. तितक्या कठीण तर आम्ही नाहीच मुळात. फक्त तुम्ही नको तिथे तर्क लावता म्हणून अवगढ वाटत. निसर्गाने जस आम्हाला बनवलय तस आम्ही स्वतःला स्विकारलय. पण तुम्ही पुरुष सर्वच नाहीत तसे पण किती पुरुष आज सर्जरी च्या मदतीने स्त्री होत आहेत. जी स्त्री तुम्हाला नकोशी वाटते मग तिच्या शरीराचा इतका हव्यास का? काय कळत नाही तुम्हाला आमच्या बद्दल सांगा ना? आम्ही कधी खूप फ्रेश तर कधी चिडचिड करतो हेच ना? तर ऐका घरची जबाबदारी सांभाळून नोकरी करत असताना हार्मोन्स इमबेलेंस मुळे मूड स्विंग होतो. बरं घरी असलेल्या स्त्रियांच का होत मग ? होणार ना ओ रोज तेच काम , तिच धुणी भांडी. त्याच खोल्यात पूर्ण दिवस कोंडून घेतलल स्वतःला मग मूड स्विंग तर होणारच ना. दर महिन्याला येणारी पाळी ( मधेच दिपाली मॅडम नको बोलू यावर म्हणून इशारा करते.) दिपाली का बरं गप बसायच इथे कोणी या बद्दल अजाण नाहीये. कळू दे ना यांनाही त्रास म्हणत परत सुरु करतात. बायकाच्या पर्स मधे काय लिपस्टिक पावडर हेच दिसलय यांना पण तारीख जवळ असली किंवा ऐन वेळेस उपयोगी यावेत इतर कोणाही स्त्री ला म्हणून ठेवलेले पॅड नाही दिसत. कारण आम्हीच पर्स ला हात लावू देत नाही. आज कळाल ना कशामुळे ते. आमच्या आयुष्यात पुरुषाने जास्त डोकावलेल नाही आवडत कारण ; आमच्या आयुष्यातील पुस्तकात खूप प्रसंग असे घडून गेलेले असातात जे एक तर तुम्हाला खोटे वाटतात , बिनअकलीचे किंवा तुम्ही सहन करू शकणार नाहीत असे. गाडे सर मी तस तुमच्या पैकी प्रत्येकाच्या घरातील लक्ष्मिंना ओळखते आमचा ग्रुप पण आहे माहिती असेलच. तर गाडे सर तुमच्या मुलीच वय आता १६ आहे तुम्ही सोनाराकडे गेलात तेव्हा प्राजक्ता ला कळाल सोन्याचा दर त्या दिवशी कमी होता. पुढे तिच्या लग्नापर्यंत जरी ते अजून ५-६ वर्षांनी असल तरी . सोन महाग असेल किंवा देव न करो पण प्रसंग सांगून येत नाही पूर्व तयारी म्हणून ती लॉकेट प्राजक्ता ने घेतली. पण ती घालत नाही घरी गेल्यावर नीट पाहा तिच्या गळ्यात. मुलीसाठी घेतली तिने. गाडे सरांनी पुण्यच केल असाव म्हणूनच बघायला गेल्यावर खेड्यात अंधाऱ्यात हो म्हंटलेली अशी हुशार मिळाली. नवाज सर कपडे घेतले ना सबा ने दोन महिन्यापूर्वी कपडे घेतले खरे फक्त एकच साडी घेतली होती. ती तुमच्याच बहिणीने मागितली आवडली म्हणून. मग तुम्ही बहिणीवर ओरडू नये म्हणून तुमच्या न कळत तिने आस्मा ला ती साडी दिली आहे. परवा घेतलेल्या दोन जोडी कपड्यात एक स्वतःसाठी व एक परवीन तुमची लहान बहीण तिच्या साठी तो सूट घेतला. आता कळली का सबा तुम्हाला ? "
प्रशांत सर आता आपला नंबर लागणार या विचारात मान सीट च्या आडोश्याला करत खिडकी बाहेर पाहू लागले.
" प्रशांत सर ऐका यापूर्वी नॉनस्टिक भांडी तुमच्या आई साहेब ज्या गावीच राहणार या मताच्या त्यांच्यासाठी घेतलेत. त्यात तुमचा खर्च नुसता फ्यूलचा झाला. आणि काय काय कळंत नाही तुम्हाला सांगा बरं . तुम्ही पुरुष नवरे कोठेही नको तिथे ओरडून वेळेस चारचौघात रागवून बोलतात म्हणून हळू बोलत जा म्हणतो आम्ही. तुमचे संस्कार दिसायला नको म्हणून. अरे राहिलेच की मिस्टर गरड पाचशे च्या वर आकडा जाण्याचा प्रश्न तर , तुम्हाला बीपी चा त्रास आहे आपली पगार घरखर्च , मुलांची शाळा यातच आऊट होतो. थोडे फार जमा केलेले ते सई साठी राखून ठेवलेत व तुमच्या साठी पॉलिसी घेतली आहे . लास्ट टाईम पैसे दवाखान्यात गेल्यावर नव्हते मी ही त्या वेळी चांगल्या पगाराची नोकरी नसल्याने हताश होते. एकही नातलग पुढे सरसावले नाही मग नकली मंगळसूत्र गळ्यात घालून सोन्याच गहाण ठेवल होत. मधेच नोकरी ही गेली मग कस बस करून गेल्या वर्षी सोडवल ते. माफ करा आजवर सांगितल नाही कारण तुम्हाला कसलच टेंशन याव अशी माझी ईच्छा नाही. तुमच्या सोबत दिवस रात्र राहता याव म्हणून याच शाळेत नोकरीला अर्ज केला. आताही मी कळली नसेन तर ताण घेऊ नका. आम्हाला पुरुषाने समजाव अस आम्ही कधी हट्ट नाही केला, फक्त आम्हाला तुमची साथ हवी. आम्ही स्त्रिया काय कोणत समीकरण नाही कळायला फक्त आम्हाला समजून घेत जा साथ द्या. आम्ही एकट्या ही समर्थ आहोतच पण हक्काचा पुरुष हवा आहे सोबती ज्याच्या खाद्यांवर डोक ठेवून रडता याव, ज्याच्या मिठीत सूख मिळाव, ज्याच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी अन आम्हाला निजता याव. माणसच आहोत आम्हीही जस तुम्ही थकता तस आम्हाला थकवा आहे. बाप तुम्ही बनता तुम्हाला बाप बनवताना आमची कातडी चिरली जाते. हा त्रास शब्दात सांगता येत नाही फक्त समजून घ्या ना. कधी वाफाळता चहा - कॉफी आमच्या पुढ्यात तुम्ही ठेवला ना तरी पुढे महिनाभर टवटवीत असतो आम्ही फक्त तुम्ही दिलत या आनंदात. घरी पसारा आपलीच लेकरं करतात चालता - फिरता कधी तुम्ही जागेवर ठेवलत तरी पुरत. जेव्हा कधी संकट येतील आम्ही तुमच्या पुढे उभे राहू फक्त सगळ झाल्यावर संकटाच्या कारणाची खापर आमच्यावर फोडू नका. तुम्हाला जेवण बनवता येत नाही मान्य पण बाहेरून आणता येत ना कधी महिन्यातून एकदाच का होईना तिला आराम म्हणून आणा ना बाहेरच. ते काय आहे ना पिढ्यानपिढ्या यातच सरपटत आल्या आहेत. पुरुष श्रेष्ठ हे मत कोणी बदलण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमच्या पुरुषत्वाला ठेच लागते. मला ना नेमक पुरुषच कळत नाही त्यात ती स्त्री जी त्याच्यानुसार बदलते का माहितीये का? जाडी बाई नको . मग लगेच आम्ही वळलो सुकून काडी व्हायला नंतर कळत मध्यम बांधा हवा मग ...... काळी नको , जर असलीच काळी मग गोरीवर लक्ष गोरी असेल मग तिच्यावर संशय , यातही मध्यम असेल वर्ण तर नाकी डोळी देखणी असावी. बरं तिचं कर्तुत्व कारस्थानी असेल तरी चालेल. उंच हवी , बुटकी नको , फारच उंच बाईच्या जातीने नसाव , ही काय कमी शिकलेली मग पुरुषाची लफडी बाहेर , शिकलेली मिळाली तर कामवाल्या आवडू लागतात. घरी बसणारी नको, कमावती असेल मग घर सांभाळून करत जा. आपल्या बायका उंबरठ्या मधे उभ्या असलेल्या नको पण आम्हाला बाहेरच्या आवडतात. उंबरठ्याबाहेर जायच नाही पण तुला कोण आवडते तर म्हणे चंद्रावर गेलेली. बायकोचे केस बांधलेले हवेत , बाहेर च्या झिपरी वर पण जीव जडतो. साडी नको म्हणताना जिन्स घातली पण पर पुरूषाने पाहू नये , बाकी यांनी परस्त्री ला पाहिले तर चालत. घरातच बसते म्हणून बाहेर काढल तर बाहेर आली म्हणून आम्ही पाहणार. नेहमी प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखच होत आलं. तुम्हा पुरुषांना नेमक समाधान कशात हेच तुम्हा स्वतः ला उमगलेल नाही. आणि वर म्हणतात स्त्री ला समजण अवगढ आहे. नवरा म्हणणार अमूक लोकांकडे जाऊ नको , त्यांच्याशी बोलू नको ;बदनामी कोणाची होते यात ? बाई चांगली नाही. आमच्या कपड्याच्या आता डोकावू पाहणाऱ्या पुरुषांच्या नजरा अवखळ व्यक्तिमत्व, निरागस मन, तल्लख बुद्धी, निर्णय क्षमता याचा पार नाश करते. काही जबाबदाऱ्या मुळे किंवा घरातील कर्त्या पुरुषाला हातभार लागावा म्हणून स्त्री बाहेर पडताच रस्त्यातील भटक्या कुत्र्याची तिला भिती नसते, जेवढी तिला आमच्या शरीराचे लचके तोडण्याकरिता भिरभिरणाऱ्या त्या किळसवाण्या नजरांची भिती वाटते. जगायच तरी कस ओ बाईने. जन्मले ते घर परक करत , ज्या घरात औक्षण करून घेतले जात तिथे परकी , स्वतःच्या नावासाठी जिला झटाव लागत . बाप, नवरा , मुलगा , समाज यांचा विचार करत केस पिकतात. आयुष्यभर नुसत झटायच का ?तर चार खांद्यांवर जाताना चांगल म्हणवून घेण्यासाठी. कधी कधी तर निरागस , निर्मळ प्रेमालाही या स्त्रिया मुकतात ." ( बोलताना मिसेस गरड अश्रूंचा आवंढा गिळतात . डोळे पुसून
"खर सांगू का तर बाईला समजण अवघड नाहिये. फक्त तुम्ही पुरुषांनी तुमची दृष्टी व दृष्टीकोन बदला".

बस मधील पुरुषांना काय स्त्रियांनाही स्त्री कळली असावी. मि. गरड यांच्या वक्तव्या नंतर. तुम्हाला कळाली का नक्कीच कळवा.

------------------------
लेखिका : सौ.शगुफ्ता ईनामदार - मुल्ला